Saturday 22 April 2023

ए गोली मार भेजेमें....!

"राजकारण नासलंय. उत्तरप्रदेशात अतिक अहमद आणि अश्रफ या दोघा राजकारणातल्या माफियांची हत्या झालीय. आधी राजनीतीचं अपराधीकरण झालं, मग अपराधाचं  राजनीतीकरण झालंय! राजकारणी गुन्हेगारांची मदत घेत. मग या गुन्हेगारांना राजकारणाचं ग्लॅमर खुणावू लागलं. नंतर गुन्हेगारच राजकारणी बनले. राजकारणात गेलेल्यांमध्ये झालेला बदल लगेच लोकांना जाणवू लागतो. सदाचारी लोकसेवकाला अधिकारी जुमानत नाहीत. तीच मंडळी भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगार लोकसेवकांची कामं झपाट्यानं करतात. मग लोकही अशांच्याकडं वळतात. ही मंडळी हळूहळू माफिया बनतात. राजकीय पक्षही 'निवडून येण्याची क्षमता' एवढ्या गुणवत्तेवर अशांचीच निवड करतात. मग गुन्हेगार, गुंड साकारला जातो तो 'लोकसेवक' म्हणून! आपणही त्यालाच गोंजारतो, वाढवतो. मग ह्या माफियाचा आग्यावेताळ बनतो अन ग्रासू लागतो. त्यातूनच सुरू होतं 'माफियाराज..!' तो केवळ भ्रष्टाचार करतो असं नाही तर वसुली, अपहरण, खंडणी, खून, मारामाऱ्या करत दहशत माजवतो. मग त्यांच्यातलाच एक सरसावतो अन त्याचा खात्मा करून त्याचं माफियाराज संपवतो. इथं दोन गुंड मारले गेलेत, पण तीन तयार झालेत. यापुढं असंच होत राहील! कालाय तस्मै नम: ...!"
----------------------------------------------

'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा l
इन्सानकी औलाद हैं, इन्सान बनेगा ll

अशा गाण्यांतून भारताच्या खुल्या स्वप्नांना उभारी मिळाली. ती आता पार धुळीला मिळालीत आणि ती स्वप्नं पोहोचलीत
'ए गोली मार भेजेमें l
के भेजा शोर करता हैं ll
भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू l
अरे तू करेगा दूसरा भरेगा कल्लू ll

इथंवर जाऊन पोहोचलीत! एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणजे कायदेशीर हत्या, खून करणाऱ्यांना आपण हिरो बनवलंय, हे सारं पाहात आम्हीं टाळ्या वाजवल्या. त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना आपण 'ओल्ड फॅशनड' म्हणू लागलो. शांत चित्तानं विचार करा... चूक कुण्या एकाची नाही आपल्या सगळ्यांचीच आहे. ज्या फुलपूर मतदारसंघातून पंडित जवाहरलाल नेहरू निवडून येत, त्याच मतदारसंघातल्या मतदारांनी अतिक अहमद या माफियाला निवडून दिलंय. ज्या घरांच्या भिंतींवर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरींनी सजल्या जात होत्या, आता तिथं काय आहे? हे सगळं आपण जाणतो. आधी राजनीतीचं अपराधीकरण झालं, मग अपराधाचं  राजनीतीकरण झालंय! आपल्या धर्म, जातीचे गुंड हिरो बनलेत. हे कुणी बनवलं, विचार करा. शिक्षकांपुढं, गुरूंपुढं नतमस्तक होणारा समाज पैशाच्या मोहाला कसा बळी पडलाय. त्यातून आत्मसन्मानाची जागा कधी पॅकेजनं घेतली ते कळलंच नाही. विचार करा, मला काही सुचतंय, तुम्हालाही काही सुचेल. पण हे कुठंतरी पोहोचलं पाहिजे... नाहीतर एक गुंड मरेल, तर उद्या दुसरा पैदा होईल... आणि पुढं होतंच राहतील. यात सिनेमाच्या १९७० च्या दशकात यंग अँग्री मॅन च्या भूमिकांचा तपास झाला पाहिजे. कित्येकांनी गोळ्या कशा घालायच्या हे दाखवून दिलं. मारामारीला चढवलेला ग्लॅमर त्यांनी तिथं पहिल्यांदाच अनुभवला. ते सारे हिरो हे मनानं खूप चांगले असल्याचं दाखवलं गेलं. ९० च्या दशकात हिरो हॉकी स्टिकनं मारामारी करताना दाखवलं गेलं. मग घरंदाज घरातली मुलं हॉकी स्टिक घेऊन बाहेर पडले. हे असं म्हटलं तर लोक नाराज होतात! जेव्हापासून मंडल-कमंडल राजकारण सुरू झालं, तेव्हापासून संपूर्ण हिंदी भाषक पट्टा हा जात आणि धर्माच्या वातावरणात जखडला गेला. उत्तरप्रदेश-बिहार हे यातून बाहेर पडले नाहीत. कधीकाळी हा भाग साहित्य, लेखक, कलाकार, क्रांती आणि शिक्षण यासाठी ख्यातिप्राप्त होता. आज मात्र बाहुबली आणि हिंसेची ओळख करून दिली गेलीय. प्रयागराज इथल्या अतिक अहमदच्या प्रकरणानं इथल्या 'अपना दल'बाबत विस्तारानं लिहायला हवंय. अतिकला समाजवादी पक्षापेक्षा अपना दलनं संरक्षण दिलं होतं. पण मीडिया यावर चर्चाच करत नाही. कारण अपना दल हा सत्तेतल्या भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष आहे. त्यांची युती आहे. निवडणुकीचं नातं आहे. अतिक अहमद अपना दलचे संस्थापक होते. सोनेलाल पटेल आणि अतिक यांनी एकत्रित येत अपना दलाची स्थापना केली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचाच जोरावर ही कृष्णकृत्य होत होती!

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अतिक आणि अश्रफ या दोघा माफिया बनलेल्या लोकसेवकांवर वैद्यकीय तपासासाठी रुग्णालयात नेत असताना, पोलिसांच्या कडक संरक्षणाखाली गोळ्यांचा वर्षाव झाला. एक आमदार तर दुसरा पाचवेळा आमदार आणि खासदार! आता या खुनामागं राजकारण चिकटवून आणखी राजकारण खेळलं जाईल. 'खून का बदला खूनसे...!' अशा गर्जना त्यांचा प्रभाव असलेल्या भागात होताहेत. सुपाऱ्या देऊन हे खून झालेत असं पोलीस सांगत नाहीत, पण लोक तसं म्हणताहेत. एका माहितीनुसार सुपारीची रक्कमही लाखात नाही, कोटी रुपयात असल्याचं बोललं जातंय. असे कोट कोट रुपये देऊन ह्यांना उडवण्याची गरज कुणाला वाटावी? का वाटावी? याचा शांत डोक्यानं राजकारण्यांखेरीज इतरांनी विचार करायला काय हरकत आहे? अतिक आणि अश्रफ हे दोघे आता गेलेत. त्यांचा राजकीय क्षेत्रातला प्रवेश, त्यांनी याकाळात केलेलं 'समाजकार्य', त्यांच्या सांपत्तिक स्थितीतला या काळातला बदल, त्याच्याबद्धल व्यक्त केल्या जाणाऱ्या सामान्य माणसांच्या भावना, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, त्यांचे धंदे, त्यांचं चारित्र्य याचा अभ्यास म्हणून विचार का होऊ नये? सर्वसामान्य माणूस आणि काही समाजकार्य करावं ह्या भावनेनं भारलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रारंभी सतत वावरणारे लोकसेवक हळुहळू या कार्यकर्त्यांपासून, सर्वसामान्य माणसांपासून अलग होतात आणि आंगठ्या झळकवणाऱ्या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, मनगटावर भारी घड्याळे घालणाऱ्या, डोळ्यातला पैशाचा- कुणालाही विकत घेऊ या मिजाशीचा मद रेबॉन गॉगलआड दडवणाऱ्या मोटारीतूनच वावरणाऱ्या 'बड्या' मंडळीत अल्लद विरघळून जातात. त्यांच्याशी दबक्या आवाजात बोलतात. त्यांच्या कामातच गुंतून पडतात. हा संपर्क लोकसेवकाचं रंगरूप बदलवतो. एक दिवस लोकसेवक लोकांची अधिक सेवा करता यावी म्हणून मोटार घेतो. बायकामुलांच्या आग्रहानं जुनं घर बदलून नव्या प्रशस्त घरात जातो. अर्थात तिथं तो जाण्यापूर्वीच घरामध्ये सर्व सुखसोयी मौजुद होतात. मुलाबाळांचा नूर बदलतो. बायकांना नवजीवन जगण्याची संधी मिळते आणि एक दिवस हे सगळं विचित्रपणे अंगावर उतरते. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं राजकारण केलं जाऊ नये. त्या हत्येमागची सर्व कारणं प्रामाणिकपणे तपासली जावीत. लोकसेवक खरोखरच कुणाची सेवा करतात, हे आपल्याला कळू शकणार नाही. त्यांच्यातले परिवर्तन कसं, केव्हा आणि कशानं झालं हेही कळू शकणार नाही. राजकीय पक्ष आपल्या डोळ्यासमोर कुठून कुठं गेलेत हे बघितलंय. गांधींपासून गुन्हेगारांपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण गप्प बसलो म्हणून झाला, असं का म्हणून नये? सर्वांना सर्वकाळ फसवता येत असेल, पण फसलेले सर्व, सदासर्वकाळ आपल्या दैवाला दोष देत गप्प बसत नाहीत. त्यातले काही प्राणावरही उठतात. असा नवा विचार करण्याची गरज निर्माण करणाऱ्या घटना आता वारंवार घडताहेत. अतिक आणि अश्रफ या दोघांच्या खूनामुळं आणखी काहींचे धाबे दणाणले आहेत. 'हम उनको मिट्टीमें मिला देगे....!' असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. लोकसेवकांना वापरून घेणारे वा वापरू बघणारे कोण आहेत ही गोष्ट गोपनीय आहे असा आव कुणी आणू नये. उघडपणे आज सर्व गोष्टी चालतात तेव्हा जर लोकसेवकांचे रक्षण करायचं असेल तर त्यांच्या सहाय्यानं कायदा, नीती आणि शिष्टाचार याच उल्लंघन करू बघणाऱ्यांना चाप लावण्याचं धोरण अवलंबावं लागेल.

'कोणत्या' लोकसेवकांना धोका आहे? तो का आहे? त्याचीही कसली भीडभाड न ठेवता चौकशी व्हायला हवी. गैरकृत्ये करण्यासाठी पैसा घेऊन ती कामे न करण्यानं धोका आहे. का गैरकृत्ये कितीही पैसा दिला तरी न करण्याचा दृढ निधार दाखवल्यानं धोका आहे याचा शोध व्हायला हवा. लोकसेवकाची भूमिका घेऊन राजकारणात शिरलेले गुन्हेगारीवृत्तीचे लोक आहेत. प्रतिष्ठा आणि पैसा यांच्या बळावर कुठलाही गुन्हा करण्याची आणि ती पचवण्याची तयारी ठेवूनच हे लोक राजकारणात वावरत आहेत. त्यामुळं त्यांची कृष्णकृत्य काही काळ दाबली जातात. एकाच पक्षात हे आहेत असं नाही. जिथं आपल्याला लवकर प्रतिष्ठा प्राप्त होईल असं त्यांना जाणवतं तिथं तिथं हे लोक शिरतात. आपल्या तंत्रानं लवकर मोठेही होतात. त्या राजकीय संघटनांची धोरणं देखील ते प्रसंगी बदलतात आणि राजकीय पक्षाची बंधनं गुंडाळून आपआपसात यांच्या आघाड्याही बनतात. लोकसभेला भाजपचा उमेदवार यशस्वी करा विधानसभेला काँग्रेसचा असं देवाण घेवाण तंत्र ह्या गुन्हेगार जगतात विनाविघ्न चालतं. 'जिकडं तिकडं मजला माझी भावंडं दिसतात' अशा मायाळू नजरेनं बघणारे असे मायावी निष्ठावंत राजकारणात आज थोडेथोडके नाहीत. ठार झालेल्या प्रत्येक लोकसेवकाबद्धलच भरपूर गुणगान केलं जातं. कारण सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये आणि पत्रकारांत 'ढोंगाला श्रद्धांजली नाही' म्हणण्याचा ढोंगी परखडपणा नसतो. पण अशी जाहीर पांघरूणं घालून झाल्यावरही निदान आपल्या संघटनेच्या आणि समाजाहितासाठी प्रामाणिकपणे अशा प्रकारामागची कारणं तपासण्याचं कष्ट घेतले जावेत. जे काही चाललंय त्यानं अनेक प्रश्न डोक्यात घोंघावणारा मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. निवडणुकीच्या काळात अतिक अहमदबाबत जाहीरपणे जबाबदार व्यक्तीकडून आरोप केले गेले होते ही गोष्ट डोक्यात कुठे नोंदली गेलेले माझ्यासारखे हजारो सर्वसामान्य नागरिक प्रयागराजमध्ये नक्कीच असतील. लोकसेवा सुरू करताच काहींच्या घरी आपण होऊन येतो, हा मेवा खाताना लागतोही बरा, पण वेळ येताच तो पोट फाडून बाहेर पडतो. काही तोही पचवतात ही गोष्ट वेगळी. पण या सगळ्याची जाणीव आपण ठेवायला हवी. अशा मंडळीच्या हातात विरोधी पक्षांचं राजकारणही जावं ही फार मोठी शोकांतिका आहे. कॉंग्रेस गुन्हेगार, लुटारू, ठग, पेंढाऱ्यांची टोळी आहे असं म्हणायचं आणि आपली संघटनाही त्या टोळीच्या मुकाबल्यात भारी ठरावी म्हणून तसेच नग आपल्या संघटनेत असले तर बरं असं मानायचं हा प्रकार एखादवेळी पक्ष संघटनेला समर्थ बनवतही असेल, पण राजकारणाला अधिक घाण बनवणाराच आहे. राजकारण घाण करणारी सारीच घाण दूर व्हावी असा आग्रह धरणाऱ्यांचीच आता एखादी समर्थ संघटना बनवायला हवीय.

जे देवांना राजकारणासाठी जुंपतात अथवा दानवांच्या दयेवर राजकारणात टिकून असतात त्यांना लोककल्याणाची पर्वा असूच शकत नाही. प्रत्येक गोष्टीचा धूर्तपणे, मुसलमानांविरोधात आग पेटावी म्हणून वापर करणारे आणि सर्वधर्मसमभावाचे सोंग मिरवीत प्रत्येक अल्पसंख्याकाला राष्ट्रनिष्ठ ठरविण्यासाठी कुठलाही विचार न करता कसलाही आचरटपणा करणारे ह्या देशाला समाजाला पुन्हा अंधार युगात ढकलत आहेत. कॉंग्रेसचा अजागळपणे हाताळला जाणारा सर्वधर्मसमभाव आणि भाजपचा अविवेकीपणे रेटला जाणारा हिंदुत्ववाद दोन्ही या देशाचा विनाश करणारेच आहेत. एक नको त्या संबंधातून होणारा एड्स म्हटला तर दुसरा रक्त नासवणारा ब्लड कॅन्सरच म्हणावा लागेल! या दोन्हीपासून दूर राहण्याचा विवेक दाखवण्याचीच आज जरूर आहे. अतिक आणि अश्रफ यांचे खून होतात हा प्रकार ह्या राज्यातल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेपेक्षा गुन्हेगार अधिक समर्थ, अधिक मारक, अधिक धोरणी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध करणाराच आहे. ह्या राज्यात अत्याधुनिक शस्त्रात्रे मोठया प्रमाणावर आली आहेत. दडवली गेली आहेत हे समजूनही पोलिसांनी ती शोधून काढण्यासाठी काही केल्याचं जाणवत नाही. पोलीस किती निष्क्रीय, किती लाचखाऊ आहेत याची कल्पना नसणाऱ्या आणि गुन्हेगार मंडळीइतक्या निर्ढावलेल्या नसलेल्या काहीजणांनी हे लचांड आपल्याकडे नकोच असं ठरवून आपल्याकडील शस्त्रसाठे, दारूगोळा पोलिसांच्या हातात पडेल अशी व्यवस्था केली पण जे असले गुन्हे करण्यात मुरले आहेत अथवा ज्यांना पोलिसांना चकवण्याची पटवण्याची हातोटी साधलीय. ही शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतलेली माणसे कोण हे ह्या गुन्हेगारांना ठाऊक आहे. ठरलेल्या सूत्रांकडून इशारा होताच ही शस्त्रे ह्या माणसांच्या हातात देऊन इथं हलकल्लोळ माजवला जाईल. तो अधिक माजावा आणि सर्वत्र अराजक निर्माण व्हावं म्हणून ह्यातली शस्त्रास्त्रे दारूगोळा आपल्या हस्तकांकरवी दुसऱ्या बाजूच्या अतिरेकी अविवेकी माणसांपर्यंतही पोहोचवली जातील. हिंदू-मुसलमान यांच्यातला अविश्वास वाढावा, शत्रुत्वाची भावना प्रबळ व्हावी, त्यांचा विवेक सुटावा यासाठी गुन्हेगार जगताच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती घडवण्याचं तंत्र वापरायला सुरुवात झालीय. आवश्यक घबराट निर्माण करायला आणि तोल जाण्याइतपत सर्वसामान्य माणसांचा संताप उसळण्याला ह्या दोघांच्या खुनानं निश्चितच गती मिळेल याची हे गुन्हे योजणाऱ्यांना खात्री होती. त्यांनी त्यांचा डाव खेळला आणि त्यांना हवं ते घडलं. सत्तेवर असणाऱ्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करायला हवा होता, पण तो करण्याइतपत कुणाचं डोकं ठिकाणावर आहे? आपली खुर्ची आणि भवितव्य सांभाळण्यातच सत्ताधारी सर्वबुद्धी-सर्वशक्ती शिणावी एवढे गुंतलेत. विविध प्रकरणात आपणच केलेली घाण उघड्यावर येऊ नये म्हणून त्यांची धडपड चाललीय. ही वेळ अराजक माजवू इच्छिणाऱ्यांनी साधली नसती तरच नवल. खून होण्याच्या घटना नाटक सुरू होण्यापूर्वी वाजणाऱ्या घंटेसारख्या आहेत. दोन घंटा झाल्या आहेत, आता तिसरी झाली की, खेळ सादर होणार. तो काय आहे हे लोकांना तो बघितल्यावरच कळेल. अधिकारी आणि पोलीस या सगळ्या यंत्रणा नागरिकांचे हित बघण्यासाठी, देशाच्या भल्यासाठी. कायदा सुरक्षा शाबूत ठेवण्यासाठी आहेत. का ह्या सगळ्यांचा निकाल लावून, देशद्रोह्यांच्या हातात देश सोपवून आपले स्वार्थ साधण्यासाठी आहेत? या यंत्रणांना काम करणं अशक्य व्हावं अशी परिस्थिती राजकारणी मंडळीनीच निर्माण केलीय. व्यक्तीगत स्वार्थासाठी, पक्षीय स्वार्थासाठी ह्या यंत्रणामध्ये हस्तक्षेप करण्याची चटक राजकारण्यांना लागलीय. आपलं साधावं म्हणून विशिष्ट पदावर विशिष्ट माणूस आणण्याचा आग्रह केवळ काँग्रेसवालेच धरत होते असं नाही. सगळ्या राजकीय पक्षांचे आमदार मास्तरापासून मामलेदारापर्यंत, डॉक्टरापासून कलेक्टरपर्यंत कुठे कोण असावा ह्याचा आग्रह धरतात, तशा बदल्या-बढत्या घडवून आणतात. प्रसंगी त्यासाठी स्वपक्षाच्या धोरणांना सोडचिठ्ठी देऊन सौदेबाजींचं राजकारण करतात. शासन आणि प्रशासन सडण्याची-किडण्याची ही कारणं राजकारणी मंडळी नाकारतील? मरणाऱ्याबद्धल वाईट नं बोलण्याची सभ्यता आपण अजून पाळतो. राजकारणात भडवेगिरी कशी आणि किती भिनलीय हे जाणणाऱ्या नेत्यांनी तरी ह्याप्रकारे आपले अनुयायी अनावर होणार नाहीत याची काळजी घ्यायलाच हवी. दुर्दैवानं आज नेत्यांचेच नको ते आदर्श आहेत. वारेमाप आक्रस्ताळे, अविचारी आणि असभ्य वक्तव्य करण्याचा वसाच काही मंडळींनी घेतलाय. आपल्या या बोलण्याचे दुष्परिणाम कुणाला भोगावं लागतात ह्याची तमा नेते दाखवत नाहीत, पण ह्या सगळ्यांचा परिणाम होऊनच राजकारण असं नासलंय. समाजवाद्यांनी साधनशुचितेचा आग्रह धरला. त्यांची मनसोक्त टिंगल सर्वांनीची केली, पण आज ताल सोडून स्वार्थाचा नंगा नाच राजकारणात राजरोस चाललाय. ह्याचे खापर कुणाच्या माथ्यावर आपण फोडणार आहोत? आपले थोर थोर लोकनेतेच ह्याला कसे जबाबदार आहेत ह्याकडे लक्ष देणार आहोत काय?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
'त्या' तिघांचं काय होणार?
ते तिघेही गरीब घरातले आहेत. लिहिणं-वाचणं केवळ कामापुरतं झालेलं. करियरचं नावाची बाबच नाही. परिणाम? उद्देशहीन जीवन, नकारात्मक ऊर्जा ज्याची गरज 'नफरतच्या सौदागरां'ना असते. ते शेवटी तिथंच पोहोचतात. खोट्या विचारांना बंदूक लादलेले हात जगवतात. याचं शेवट कसा होईल? कारागृहात सडतील किंवा कुठल्यातरी एनकाउंटरमध्ये मारले जातील. नाहीतर, त्यांच्यासारखंच कुणीतरी एखादं दिवशी संपवून टाकतील. एवढंच सांगायचं आहे की, आपल्या मुलांना आशा वाममार्गावर जाण्यापासून रोखा, त्याला वाचवा. त्यांच्या अजाण, मासूम डोळ्यांत भली स्वप्नं पाहू द्या. ते चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करतील असा प्रयत्न करा. अभिमान बाळगण्यासाठी धर्म, जात नाही, तर ज्ञान आणि कर्म याची जाणीव करून द्या. ही आपल्या सर्वांची नैतिक, सामाजिक, राजनैतिक, जबाबदारी आहे. 

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...