Sunday 9 April 2023

सावरकरी विचार झेपतील काय?

"देशातली वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, वाढलेला हिंसाचार, राजकीय असहिष्णुता हे आटोक्यात आणण्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयश आल्यानं लोकांचं लक्ष वळविण्यासाठी भावनिक मुद्दे काढले जाताहेत. 'सावरकर यात्रा', 'हिंदू आक्रोश यात्रा' काढली जातेय. राहुल गांधींच्या मूर्ख बडबडीचं निमित्त साधून मविआला फैलावर घेणाऱ्यांना, सावरकर यात्रा काढणाऱ्यांना सावरकरांचे विचार मान्य आहेत का? ते विचार पचवून, लोकांना पटवून मतं मिळवण्याचं धाडस करणार आहेत का? गांधीजीना जसा गांधीबाबा-महात्मा करून कॉंग्रेसनं आपल्या राजकारणासाठी वापरलं; तसाच सावरकरांचा वापर होतोय. स्वातंत्र्यलढ्यात संघ, जनसंघ यांचा सहभाग नव्हता. त्यामुळं सरदार पटेल, नेताजी बोस यांना नेहरूंच्या विरोधात वापरलं पण त्याचा फायदा होत नाही, म्हणून मग राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यासमोर सावरकरांना उभं करून त्यांचं महिमामंडन करत गांधींच्या जागी सावरकरांना राष्ट्रपिता म्हणून साकारण्याचा प्रयत्न सुरु झालाय, पण भारतीय जनमानस हे स्वीकारील का? हा खरा प्रश्न आहे!"
-------------------------------------------------------------
*का*लपर्यंत सावरकरांबाबत संघ, भाजपनं कधीच आस्था  दाखवलेली नाही, किंबहुना त्यांना दूर राखण्यात धन्यता मानली. आज मात्र राजकारणासाठी त्यांच्या प्रेमाचे उमाळे फुटताहेत. याचा इतिहास पाहिला तर लक्षांत येईल की, स्वतःला कट्टर सावरकरवादी म्हणवणाऱ्यांनी नको त्या गोष्टीत पडून हिंदू महासभा मोडीत काढली. आता सावरकरवादालाच मोडीत काढण्याचे उद्योग हिंदुत्वाच्या, हिंदू जनजागरणाच्या, सावरकर यात्राच्या नावाखाली सुरू आहेत. त्यांचं हे कर्तृत्व नावाला साजेस असलं तरी सावरकरांच्या विचारांना छेद देणारं आहे. सावरकरांनी हिंदू धर्मग्रंथातल्या कपोलकल्पित कथांचा, देव-देवतांचा, भक्तिभावाचा, खुळचट रूढी, व्रत, वैकल्याचा, लिंगपूजा, पशूपूजा, वृक्षपूजेचा, पोथीनिष्ठतेचा आपल्या कठोर विचारांनी अक्षरश: चेंदामेंदा केलाय. 'प्राचीन श्रुतिस्मृतिपुराणादि शासन गुंडाळून ठेवा आणि विज्ञानयुगाचं पान उलटा...!' असं सांगणारे सावरकर म्हणतात, 'वेद सांगतात, स्वर्गाचा इंद्र हाच राजा! पण बायबलच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्यालाही माहीत नाही. बायबलमध्ये देवपुत्र येशूच्या कंबरेला साऱ्या स्वर्गाची किल्ली! कुराणातल्या स्वर्गात 'ला अल्ला इल्लिल्ला आणि महंमद रसूलल्ला!' तिसरी गोष्टच नाही. रेड इंडियनांच्या स्वर्गातही डुकरेच डुकरे, घनदाट जंगले! पण मुस्लीम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली नापाक चीज औषधालाही सापडणार नाही!" सत्यनारायणाची पूजा करणाऱ्यांना असत्यनारायणाचे पूजक ठरवणारे सावरकर समाजाला भक्तिभावात बुडण्यासाठी चमत्कारिक कथांचा वापर करणाऱ्यांचा समाचार घेताना, 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' या निबंधात लिहितात, 'संकटातून आपणाला सोडवलं म्हणून आपण सत्यनारायण करतो. पण ह्या संकटात आपल्याला प्रथम ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्याला मलम लावतो. त्याची मलम लावण्यासाठी पूजा करायची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी येथेच्छ शोभाही करावयास नको का...?' सावरकरांमधल्या अंधश्रद्धाविरोधकानं संत ज्ञानेश्वरांभोवतीच्या भाकड कथांच्याही चिंध्या केल्यात. सावरकर लिहितात, 'ज्ञानेश्वरांच्यापुढे ऋद्धिसिद्धी हात जोडून उभ्या असल्यानं ते रेड्याच्या मुखे वेद बोलवू शकले, असं ऐकवण्यात येतं. ज्ञानेश्वरांसह निवृत्ती, सोपान, मुक्ता, नामदेव, गोरा कुंभार या संत-महंतांच्याकडं देव येत, जेवत, त्यांची कामं करत, असंही सांगितलं जातं. पण त्याचवेळी अल्लाउद्दीन खिलजी अवघ्या दहा-पंधरा हजारांचं सैन्य घेऊन कोट्यवधी हिंदूंनी गजबलेल्या दक्षिणेत बकऱ्यांच्या कळपात वाघ घुसावा तसा घुसला. तेव्हा दक्षिणेच्या रामदेवराजाला अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतोय बघ, म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती. ती ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेवराजाला देता आली नाही...!' सावरकरांचं हे अंधश्रद्धाविरोधी मार्गदर्शन फडणवीस-शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलं पाहिजे. पण ते देव-धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या सोंगाढोंगात, प्रतीकात, अवतारात गुंतणाऱ्या लोकांत भटीमायाजालात रमले. त्यांची ही हौस दुर्लक्षिण्यासारखी असली, तरी त्यानं वास्तव बदलत नाही.

भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात नैसर्गिक आणि मानवी या दोन प्रवृत्तींचं प्राबल्य दिसतं. निसर्ग आपल्या गतीनं पुढं जात असतो. त्याला थांबणं ठाऊक नसतं. मानव मात्र मध्येच अडेलतट्टूप्रमाणे थांबतो. पण आव मात्र प्रगतशीलतेचा आणतो. डॉ. राणावत यांनी वाजपेयी यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. परंतु ते निर्विघ्नपणे व्हावं, यासाठी भाजपनं मुंबादेवीला शतचंडी यज्ञ केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावरील बायपास सर्जरीच्या वेळीही शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांच्या पंचाहत्तरी निमित्त संजय निरूपम यांनी मृत्युंजय यज्ञ केला होता. ह्याला श्रद्धेचा भाग म्हणणं, ही शुद्ध फसवणूक आहे. ही पुराणप्रियतेचं भिकार गाडगं गळ्यात अडकवल्यामुळं आलेली लाचारी आहे. पुराणप्रियता हा सामाजिक विकासातला मोठा अडथळा आहे. श्रीमंतांना नरकाची भीती आणि गरिबांना स्वर्गाची लालूच दाखवून हा अडथळा निर्माण करण्यात आलाय. याबाबत प्रबोधनकार ठाकरे आपल्या 'भिक्षुकशाहीचे बंड' या ग्रंथात लिहितात, 'परंपरेचा अभिमान निराळा आणि पुराणप्रियतेचा ताठा निराळा. पहिल्यात सात्विक शुद्धता, तर दुसऱ्यात तामसी घाण आहे...!' ही घाण केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी नाही, तर सामाजिक भेदही जोपासणारी, वाढवणारी आहे. जग बदलतंय. जगण्याच्या विचार पद्धतीतही बदल होतोय. भारतानंही आकाश भेदणारे अग्रिबाण सोडलेत. आपले अणुग्रह अवकाशात नेलेत. अणुबॉम्बचे स्फोट घडवून पाताळ गाठलंय. दूरदर्शन, दूरध्वनी, कॉम्प्युटर, इंटरनेटच्या माध्यमातून जग हातात आलं. तरीही देवाधर्माला मातीत कालवणाऱ्या, पत्थरात चिणणाऱ्या, चित्र-छायाचित्रांत लटकवणाऱ्यांची मती सुधारत नसेल, तर त्यांचा तो देवाधर्माला बदनाम करणारा नादानपणा आहे. माणसानं आपल्या कुवतीनुसार देव आणि धर्म बनवला. तो माणसापेक्षा, समाजापेक्षा अधिक शक्तिशाली केला. पूर्वी माणसं बैल, घोडा, खेचर, याकसारख्या जनावरांचा वाहन म्हणून वापर करीत. आपल्यापेक्षा देव देवता अधिक शक्तिशाली आहेत. हे दाखवण्यासाठी माणसानं त्यांना वाघ-सिंह हत्ती यासारख्या हिंस्र-अजस्त्र तर मोर-उंदरासारख्या प्रतीकरूपी वाहनांवर बसवलं. दरम्यान माणसाची विचारशक्ती वाढली. ज्ञानाच्या साथीला विज्ञान आलं. विज्ञानानं माणसाची वाहनं यांत्रिक, आधुनिक केली, तरी देव-देवतांचा प्रवास अजून जनावरांवरून सुरू आहे. विद्यापतीप्रमाणेच वरुणराजही जनावरांवरून येतो. यात धार्मिकतेचा टिळा लावणाऱ्यांना बदल करावासा वाटत नाही. त्यामुळंच श्रद्धांचं रूपांतर खुळचटपणात आणि अन्य धर्माविरोधी खुनशीपणात झालंय. हा ज्ञान आणि अज्ञान, प्रकाश आणि अंधार यामधला झगडा आहे. आपल्या धर्माचं तेज राखायचं असेल, तर आपल्यातल्या खुळचटपणाचा नाश आधी केला पाहिजे. त्याऐवजी दुसऱ्या धर्मातल्या नालायकीकडं बोट दाखवत राहाणं, ही भटीमायाजालाची भुताटकी आहे!

रा.स्व. संघाला महात्मा गांधींचा खुनी म्हणणं, हा राहुल गांधी यांचा वैचारिक अतिरेकीपणा आहे. संघाच्या विषमतावादी, चातुर्वण्य, बनेल विचारधारेबद्धल अथवा भावनिक भडका उडवत आपला कार्यभाग उरकणाऱ्या कार्यपद्धतीबद्धल मतभेद असू शकतात. असे मतभेद खुद्द संघ परिवारातही आहेत. तथापि, या मतभेदांचा परिणाम संघाला हानीकारक ठरण्याऐवजी फायदेशीर ठरलाय. अशा मतभेदांतून नवनवे मुद्दे पुढे आले आणि त्या मुद्यांवर स्वतंत्रपणे कार्य संघटन करण्याची मुभा संघ नेतृत्वानं दिली. त्यांच्या सेवा संस्था-संघटन कार्याला सहकार्य दिलं. त्यातूनच संघ परिवार विस्तारला. केंद्र सत्तेपर्यंत पोहोचला संघ खुनशी विचाराचा असता तर संघ परिवार विस्तारणं, सत्ताधारी होणं शक्य नव्हतं. लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्षपणे वावरणाऱ्या कुठल्याच संस्था-संघटनांची विचारधारा खुनशी असू शकत नाही. भारतात संसदीय लोकशाही आहे. संघ अध्यक्षीय लोकशाहीचा आग्रह धरणारा आहे. ही मतभिन्नता पद्धतीबाबत आहे. पण त्यात लोकशाहीचाच पुरस्कार आहे. यामुळंच संघानं राहुल यांच्या वक्तव्याविरोधात बदल्याची भाषा करण्याऐवजी कायदेशीर कारवाई केलीय. राहुल यांचा संघावरचा आरोप नवा नाही. महात्मा गांधी खून खटल्याच्या वेळेस या आरोपाच्या अनुषंगानं चर्चाही झाली होती. यासाठी संघ आणि हिंदू महासभेला बंदीचा फटका बसला होता. सावरकरांवरही आरोपीचा ठपका होता. कारण गांधीजीचा खून करणारा नथुराम गोडसे हा संघ आणि हिंदू महासभेशी संबंधित होता. तो संघाचा बौद्धिक कार्यवाह होता. पुढं तो सावरकरांच्या गांधीविरोधी विचारांनी भारावून हिंदू महासभेत दाखल झाला. या दोन संघटनांप्रमाणे अन्य काही संघटना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असल्या, तरी त्यांची मूळ भूमिका मुस्लीमविरोधी अशीच आहे. हा विरोध केवळ राजकीय सत्तेसाठी आहे. धर्मासाठी नाही. गांधीजी हिंदू-मुस्लीम आणि अन्य धर्म-जातीत समन्वय साधणारे नेते होते. सत्य आणि अहिंसा या दोनच विचारतत्त्वांनी बनलेले त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व होतं. आपल्या या जीवनतत्त्वांशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. म्हणूनच 'ईश्वर-अल्ला तेरो नाम, सबको सम्मती दे भगवान...!' हे भजन ते सर्वांच्या गळ्यातून गाऊन घेऊ शकले. देशाच्या फाळणीनं स्वातंत्र्य मिळू नये, याबाबत गांधीजी आग्रही होते. परंतु मोहम्मद जिनांच्या कट्टर इस्लामवादी भूमिकेमुळं फाळणी अटळ आहे, हे स्पष्ट होताच, ते सत्य सांगण्याला गांधीजी डरले नाहीत. या फाळणीविरोधात आज गलबलून बोलणाऱ्या, फाळणीचं पाप गांधीजी आणि काँग्रेसच्या माथी थापत तरुणांना चिथवणाऱ्यांचे वैचारिक बाप तेव्हा एका कोपऱ्यात बसले होते. फाळणी रोखण्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली नाही. मात्र गांधीजी आणि काँग्रेसविरोध ते पेटवत बसले. याउलट, फाळणीनंतर नौखालीत उसळलेल्या आगडोंबात उद्ध्वस्त झालेल्यांचे अश्रू पुसायला गांधीजी गेले. त्यांचे शिव्याशापही खाल्ले. फाळणीनंतरच्या विद्वेषात होरपळणाऱ्यातल्या एखाद्यानं गांधीजीची हत्या केली असती, तर त्याला भावनिक उद्रेक म्हणता आलं असतं. परंतु नथुरामाचं नीच कृत्य फाळणीविरोधी विचारांशी जोडलेलं असल्यानं त्यानं वैचारिक संबंध जोडलेल्या संघ आणि हिंदू महासभा या संघटनांवरही गांधीजींच्या खुनाचा ठपका बसला हे केवळ नथुरामाचं या संघटनांशी संबंध असल्यामुळं घडलेलं नाही. संघ, हिंदू महासभा आणि त्यांच्या मित्रपक्ष, संघटनांच्या लेखी आजही गांधीजी चिडीचा आणि टवाळीचा विषय आहे. या द्वेष भावनेतूनच 'दक्षिण आफ्रिकेत गांधींना ट्रेनमधून ढकललं नसतं, तर त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला नसता. महात्मा झाले नसते. बॅरिस्टरीच करीत बसले असते...!' अशी वाक्यं निपजतात. तथापि, संस्था-संघटना-पक्षाशी संबंधितानं केलेलं भले बुरे कृत्य जोपर्यंत संस्था-संघटना-पक्षानं केलेल्या ठरावानं अथवा नेतृत्वानं दिलेल्या आदेशानं झालेलं नसतं, तोपर्यंत तो व्यक्तिगत मामला असतो. गांधींचा खून करावा, असा संघानं अथवा हिंदू महासभेनं ठराव केला नव्हता. सावरकरांनीही गांधींना मारा, असा आदेश दिला नव्हता. परंतु मुस्लीमद्वेष आधारित कट्टर हिंदूवादाचा व्यापक प्रचार करून संघ आणि हिंदू महासभेनं देशात जो विद्वेष निर्माण केला होता. त्या वातावरणानं गांधीजींचा बळी घेतला, हे सत्य आहे. हे सत्य कायद्याच्या कसोटीला उतरलं नाही. म्हणून संघ, हिंदू महासभा, सावरकर हे गांधी खून खटल्यात निर्दोष ठरले. परंतु त्यानं सत्य बदललं अथवा संघ प्रवृत्तीत, कार्य प्रणालीत बदल झाला, असं नाही. गेल्या काही वर्षात देशात अनेक दंगली झाल्या. त्यात गुंतलेल्या अनेक व्यक्ती ह्या संघ परिवाराशी संबंधित होत्या. हे बऱ्याचदा सिद्धही झालंय. परंतु संघानं संबंधित दंगल कृत्यासाठी कोणतेही आदेश न दिल्यानं अथवा ठराव न केल्यामुळं संघ नेहमीच नामानिराळा राहिला. अशीच चलाखी राहुल गांधींनीही दाखवलीय. त्यांनी माफी मागण्याऐवजी संघातर्फे टाकण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याला सामोरं जाईन, असं जाहीर केलं. त्यांची ही बहादुरी संघासारखीच बनावट आहे. राहुल आणि काँग्रेसीनी प्रथम सत्य समजून घ्यावं. ते गांधीजीचे पणतू तुषार गांधी यांनी सांगितलंय. त्यांचं म्हणणं, 'आरएसएसवाल्यांनी खुद्द बापूजींचा खून केला. पण काँग्रेसनं बापूजींच्या तत्त्वांचाच खून केलाय. गांधी नावाचा वापर तेवढा करून घेतलाय...!' गांधीवाद्यांच्या स्तोमाबाबत ते म्हणतात, 'गांधीवादी कंपूनं बापूजींचा खाजगी क्लब करून टाकलाय...!' सत्य कडू असतं ते पचवण्याची ताकत गांधीजींच्या विरोधकांत नव्हती. म्हणून फाळणीचं निमित्तानं गांधीजीच्या जीवावर उठण्याचा डाव खेळला गेला. गांधीचा खून एकदाच झाला. त्यांच्या विचारतत्त्वांचा खून संधी मिळताच पुनःपुन्हा केला जातोय. गांधीजीच्या हत्येबरोबरच त्यांच्या विचारवादाचा कृतिशील विकास-प्रसार थांबवण्यात आला. त्याला काँग्रेसीच अधिक जबाबदार आहेत.

सावरकरांच्या बाबतीतही संघ परिवारानं असाच व्यवहार केलाय. केंद्रीय पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातल्या सावरकरांच्या स्मारकाच्या संबंधानं काढलेले उद्गार चुकीचे होते. अंदमानातल्या स्वातंत्र्य ज्योतीवर स्वातंत्र्ययोद्ध्यांची वचनं लावली गेलीत. परंतु अय्यर यांनी त्यापैकी सावरकरांच्या वचनाला आक्षेप घेतला. तो संतापकारी होता. सावरकरांचा इतिहास हिंदूराष्ट्रवादानं, भेदनीतीनं भारलेला होता. पण त्यांच्या विचारात देशभक्ती खच्चून भरलेली होती. सावरकर गांधीजीचे आणि काँग्रेसचे कडवे विरोधक होते, म्हणून त्यांची देशभक्ती बेगडी ठरत नाही. 'सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी ब्रिटिश सरकारकडं माफीचा अर्ज केला होता. त्यानुसार, त्यांची शिक्षा रद्द झाली. पण तोपर्यंत त्यांनी अकरा वर्षांची काळ्या पाण्याची सजा भोगली होती. याकडं दुर्लक्ष करून त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या कामगिरीची मापं काढणं हा खोटारडेपणा आहे. तथापि, हा खोटारडेपणा खोडून काढणारे तरी कुठे खरे आहेत! संघ परिवारानं आणि त्यांच्या बगलेत अडकलेल्यांनीच सावरकरांच्या हयातीत आणि पश्चात त्यांच्या विचारांची विशेषतः त्यांच्या विज्ञानवादाची गठडी वळून धार्मिक, जातीय उन्मादाला प्रोत्साहन दिलंय. सावरकर केवळ विज्ञानवादीच नव्हते. ते अंधश्रद्धा निर्मूलकही होते. वेदप्रामाण्य, पुराणातल्या भाकडकथा आणि त्यावर आधारलेली व्रत-वैकल्यं, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, जातीयता. स्पृश्य-अस्पृश्यता, धर्माधता यांचा त्यांनी कठोर शब्दात समाचार घेतलाय. वाजपेयी सरकारनं गोहत्या बंदी कायदा मंजूर करून त्याचा अंमल करायचा की नाही, याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली. सावरकर गोहत्या बंदीचे विरोधक होते. 'गाय कुणाची महामाता असेल, तर ती बैलाची होय...!' अशी टिंगल ते करीत. 'गोरक्षण न करता, गोभक्षण का करू नये, असा प्रश्न ते विचारीत. 'ब्रह्मवादानुसार रक्षण-भक्षण ह्यात भेद नाही. दोन्ही व्यवहार सारखेच खोटे आणि खरे आहेत. त्यानुसार, गाढव आणि गाय समानच आहेत. एक वेळ गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होऊ नये...!' असे कठोर विचार सावरकरांनी सांगितलेत. राहुल यांच्या मूर्ख बडबडीचं निमित्त साधून मविआला फैलावर घेणाऱ्यांना सावरकरांचे हे विचार मान्य आहेत का? ते पचवून, लोकांना पटवून मतं मिळवण्याचं धाडस करणार आहेत का? गांधीजीना जसा गांधीबाबा-महात्मा करून कॉंग्रेसनं आपल्या राजकारणासाठी वापरलं; तसाच सावरकरांचा वापर होतोय. त्यात सावरकरांच्या विचारांचा जिव्हाळा नाही. सावरकरांच्या विचारांना मर्यादा होत्या. पण त्यांचा विचार-आग्रह त्यांच्यापुरता बावनकशी होता. ते राजकीय ढोंग नव्हतं. तथापि, राजकीय ढोंगींच्या साठमारीत विरोधकांवरच्या टीकेसाठी आणि मतांच्या भिकेसाठी सावरकरांचाही वापर व्हावा. हे पटणारं नाही!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
ही प्रतिक्रिया आहे, मूळ क्रिया नाही....
लेखक धनंजय कीर, य.दि.फडके, डॉ. रावसाहेब कसबे, डी. के. झा, अशोक कुमार पांडेय निरंजन टकले यांच्या पुस्तकांतही सावरकरांच्या माफीनाम्याविषयी तारीख आणि तपशीलवार उल्लेख आहे. सावरकरांनी १९३७ नंतर त्यांची पूर्णतः सुटका झाल्यावर पुढील दहा वर्षांत ब्रिटिशांच्या विरोधात एकही लढा उभारला नाहीच, उलट त्यांनी निर्णायक अशा ४२ च्या लढ्याला विरोध करून हिंदूंना ब्रिटिश सैन्यात भरती होण्याचं आवाहन केलं. त्यांच्या टीकेचा सारा रोख ब्रिटिशांच्या ऐवजी गांधींवर होता. स्वातंत्र्यलढ्याला धार आणि बळ मिळण्यासाठी गांधींसह इतर नेते हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी झटत असताना, सावरकर त्या ऐक्यावरच घाव घालत होते. इतरांचे राहो, पण त्यावेळी खुद्द आचार्य अत्रे हे सावरकरांवर इतके संतापले की त्यांनी 'नवयुग' च्या अंकातून 'स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्याचे शत्रू' असे दोन अग्रलेख लिहून सावरकरांच्या राजकारणावर अत्यंत कडक शब्दात टीका केली ('लोकमान्य ते महात्मा’ डॉ. सदानंद मोरे, पृष्ठ : ९३५). सावरकर इतके बदलले याची कारणं त्यांनी ब्रिटिशांना लिहून दिलेल्या माफीनाम्यात सापडतात. ब्रिटिशांनी उघड केलेल्या कागदपत्रांतून हे स्पष्ट झाल्यावरही सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणं, त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी करणं याला खरा विरोध आहे. माफीनाम्याची चर्चा ही प्रतिक्रिया आहे, मूळ क्रिया नाही, हे सावरकर समर्थकांनी ध्यानात घेणं जरुरीचं आहे. हिंदुत्ववाद्यांकडून समाजमाध्यमातून गांधी-नेहरूंची केली जाणारी यथेच्छ बदनामी हे देखील याबाबतचं महत्त्वाचं कारण आहेच....! म्हणूनच जयराम रमेश यांनी काही दिवसांपूर्वी एक मार्मिक विधान केलं होतं, 'तुम्ही आमच्या नेत्यांविषयी खोटे बोलणं थांबवा मग आम्ही तुमच्या नेत्यांविषयी खरं बोलणं थांबवू....!'

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...