Sunday 26 May 2024

भाजप मोठा, संघ छोटा...!

"वैचारिक, मूल्याधिष्ठित, सुसंस्कारित समाज निर्मितीच ध्येय उराशी बाळगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना शंभर वर्षापूर्वी झाली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघानं गरजांनुसार ३६ संस्थांची स्थापना केली. राजकीय उद्दिष्टासाठी जनसंघाची स्थापना केली. आता जनसंघ भारतीय जनता पार्टीच्या रूपानं अधिक आक्रमकरित्या समोर आलाय आणि म्हणता म्हणता जगातला मोठा पक्ष ठरला. भाजपला वैचारिक मार्गदर्शन संघाचं राहिलेलंय. आपल्या विचारानं भाजपची वाटचाल होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी संघ स्वयंसेवक हे संघटन मंत्री म्हणून नेमले जातात. पण ऐन निवडणूक काळात पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी 'आता आम्ही सक्षम झालो आहोत त्यामुळं आम्हाला आता संघाची गरज उरली नाही!' असं म्हटल्यानंतर खळबळ उडालीय!"
------------------------------------------- 
*पू*र्वी संघ किंवा जनसंघ यांची दखल प्रसिद्धिमाध्यमं घेत नव्हती. संघ गोळवलकर गुरुजींच्या काळात तर मीडियाशी फटकून वागत असे. ते प्रसिद्धीपासून लांब असत. पण कालांतरानं परिस्थिती बदलली. संघानं मग प्रवक्तेही नेमले. तरी देखील माध्यमं दखल घेतच नसत. आणीबाणीनंतर माध्यमं संघाच्या घडामोडीत लक्ष घालू लागली. जनता पक्षाच्या काळात दुहेरी सदयत्वापासून संघ माध्यमांच्या प्रकाश झोतात आला. तेव्हापासून आजतागायत संघाच्या प्रत्येक लहानमोठ्या घडामोडींची वृतांतं माध्यमं देवू लागली. अटलजी प्रधानमंत्री झाल्यानंतर तर भाजपबरोबरच संघातल्या लहानमोठ्या बाबींना माध्यमांतून स्थान मिळू लागलं. म्हणूनच पक्षाध्यक्ष नड्डा यांच्या वक्तव्यावर माध्यमांचा प्रकाश झोत पडला आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली! संघ विचारधारा राबविणारा भाजप गेली दहावर्षे सत्तेवर आहे. संघ आणि भाजप यांचं नातं सर्वांनाच माहीत असल्यानं त्यावर गदारोळ होणं हे स्वाभाविक आहे. ते तसं झालं नसतं तरच नवल म्हणायला हवं. मुळात नड्डा यांना विचारलेला प्रश्न कोणता होता हे पाहिलं तर नड्डा यांनी दिलेलं उत्तर हे सहजपणे दिलेलं होतं. 'अटलजी आणि लालजी यांच्या काळातला भाजप आणि आता मोदी शहा यांच्या काळातला भाजप यांच्यात काही बदल झाला आहे का...?' असा तो प्रश्न होता. बदल झालाय का? तर हो, झालाय. हे स्पष्ट करतांना त्यांनी सांगितलं की, 'अटलजींच्या काळात भाजप अक्षम होता त्यामुळं तो संघावर अवलंबून होता, पण आज आम्ही सक्षम झालो आहोत, त्यामुळं आता आम्हाला संघाची गरज राहिलेली नाही..!'  वाजपेयी हे २४ घटक पक्षांच्या आघाडीचं सरकार चालवत होते. भाजपचं तेव्हा १८० च्या आसपास खासदारांचं बळ होतं. त्यामुळं संघाचे विचार, अजेंड्यावर निर्णय घेणं अटलजींना शक्य नव्हतं. संघाच्या अजेंड्यावर असलेले, राम मंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे विषय त्यांना बासनात बांधून ठेवावं लागलं होतं. भाजपला मतदान करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. पूर्वी केवळ संघाची 'मतपेढी असलेल्या भाजप'चा विस्तार आज खूप मोठा झालाय. जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून त्याची नोंद झालीय. त्यामुळं संघ आणि भाजप यांच्यातल्या नातेसंबंधातही बदल झालाय. मात्र भाजपचा वैचारिक पाया हा संघाचाच राहिलाय. २०१४ नंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तेव्हा संघाच्या अजेंड्यावरचे मुद्दे सहजपणे भाजपला राबविता आलेत. त्यासाठी संघालाही भाजपवर दबाव टाकण्याची कोणतीच गरज भासली नाही. 
संघाबाबतची जी भूमिका नड्डा यांनी व्यक्त केलीय ती मुळातच मोदी आणि शहा यांचीच आहे अशी चर्चा देशभरातून सुरू झाली. पण संघानं आपल्या सामाजिक उद्दिष्टांसाठी ज्या विविध ३६ संस्था, संघटना सुरू केल्यात त्यांना तशी मोकळीक दिलेलीय, मात्र वैचारिक बैठक ही संघाचीच असल्यानं त्यांच्या घडामोडींवर संघाचं लक्ष असतं. भाजप कार्यकर्त्यांची संख्या आता खूप विस्तारलीय, पण भाजप संघाच्या विचारावर मार्गक्रमण करतोय  की नाही हे पाहण्यासाठी, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपच्या 'संघटन सरचिटणीस' पदावर संघाकडून स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येते. जशी ती राष्ट्रीय स्तरावर असते, तशीच ती राज्यस्तरावर, जिल्हा, शहर पातळीवरही असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच ही रचना आहे. ह्या रचनेत जोवर बदल केला जात नाही वा तसा प्रयत्न होत नाही तोवर संघाची गरज आता भाजपला उरलेली नाही असं म्हणता येणार नाही. आज भाजपमध्ये पूर्वीप्रमाणे केवळ संघ विचारानं प्रेरित होऊन आलेले लोक नाहीत. जनता पक्षाच्या फुटीनंतर जनसंघ हा भारतीय जनता पक्ष म्हणून नवं रूप घेऊन राजकीय पटलावर आल्यानंतर त्यात विविध विचारांची मंडळी सहभागी झाली. सध्या तर जवळपास निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी इतर विचारांचेच आहेत. त्यामुळंच सत्ता मिळविण्यात भाजपला यश आलंय. भाजपमध्ये त्रिस्तरीय कार्यकर्त्यांची फौज कार्यरत आहे. एक संघाच्या विचारांचे, दुसरे संघाच्या विचाराने प्रेरित असलेले तर तिसरे संघाच्या विचारांचे नसलेले, इतर पक्षांतून आलेले! जे संघाच्या विचारांचे नाहीत त्यांना भाजपमध्ये गेल्यानंतर संघाची ओळख झालीय. त्यामुळं संघ विचारांचा प्रभाव वाढलेलाय. संघाच्या मंडळींना राजकीय महत्वाकांक्षा नाहीत पण राजकीय हेतूनं भाजपमध्ये आलेल्यांमध्ये सत्तेसाठीची इच्छा असते, त्यामुळेच ते तिथं स्पर्धा करत असतात. पक्षांतर्गत असं वातावरण निर्माण झाल्यानं नव्यानं आलेल्यांना सामावून घेताना केवळ संघाच्या लोकांनाच घेतलं जातंय असं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कदाचित नड्डा यांनी संघाची गरज आता राहिलेली नाही असं मतप्रदर्शन केलं असावं. केवळ बोलण्यापुरतंच असावं कारण भाजपवरच्या नियंत्रणासाठी पक्षाच्या रचनेत जोवर संघटन सचिव या पदावर संघातून येणारे संघ स्वयंसेवकांची होणारी नियुक्ती बंद होत नाही तोवर संघाचं भाजपवर नियंत्रण राहणारच आहे.
संघानं घडवलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेसाठी भाजपनं जो व्यवहार चालवलाय तो पटत नाही, रुचत नाही; पण जे काही चाललंय ते थांबवा असं म्हणवतही नाही. 'तोंड दाबून मुका मार' अशी या कार्यकर्त्यांची अवस्था झालीय. काहींना जे काही चाललंय ते पटत नसलं तरी त्याशिवाय अन्य पर्याय नसल्यानं चाललंय, ते चांगलंच आहे असं मानावं लागतंय. तसं म्हणायची वेळ येईल तेच म्हणावंही लागतंय. तसं भाजपमध्ये फरक असायचाच. सत्ता हेही परिवर्तनाचं साधन आहे. संघाला समाजात जे घडवून आणायचंय त्याला सत्ता भाजपच्या हातात असण्यानं सहाय्यच होईल. आज संघाच्या विचार-आचारानुसार काही गोष्टी घडत नसल्या तरी हळूहळू भाजपला संघ आचार-विचार आणि सरकारचा व्यवहार यात सुसंगती आणावीच लागेल. आज भाजपमध्ये संघातून घडलेल्या कार्यकर्त्यांखेरीज अन्य विचार प्रवाहातून आलेले अनेक आहेत. त्यांच्यामुळे आणि सत्तासाथीदारांमुळे काही घटना दोषास्पद घडतही असतील, पण हळूहळू सर्वांनाच संघ विचार-आचार मानावंच लागतील. 
राम तेरी गंगा मैली हो गई,
पापियों के पाप धोते धोते....!
राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली...!' या चित्रपटातलं हे गीत आहे. या आणि अशाच भावना या जुन्या पिढीतल्या संघ, जनसंघ, भाजप कार्यकर्ते यांच्या आहेत. याचं कारण सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणारा, पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा भाजप पूर्णपणे बदललाय, इतर पक्षातून आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना क्लिनचीट दिली जातेय. त्यामुळं विरोधक भाजपची तुलना 'वॉशिंग मशीन'शी करताहेत. काहीजण तर त्यांना 'धोबी घाट' देखील म्हणताहेत. ह्या राजकीय नेत्यांना राजकारणाचा खरा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाचा अर्थ सत्ताकारण असाच गृहीत धरण्यात येतो आणि लोक मग सत्तेच्या मागे धावतात. ज्याप्रमाणे जहाज बुडताना सर्वांत आधी उंदीर बाहेर पडतात. त्याचप्रमाणे सत्ता बदलली की अनेकजण पक्ष बदलतात. परंतु ही गोष्ट योग्य नाही. असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी सत्ताकारण नव्हे तर समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण केलं. आज याच गोष्टीची आवश्यकता आहे. परंतु राजकीय नेते सत्तेच्याच मागे धावताहेत. आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहून राजकारण्यांकडून संयम ठेवला गेला पाहिजे. मात्र ते होत नाही. राजकारणात मतभिन्नता, विचारभिन्नता असणं स्वाभाविक आहे. पण आज राजकारणातल्या विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या निर्माण झालीय. 'इतिहास हा लोडावर टेकून अत्तराचा सुगंध घेत लिहिला जात नाही, तर तो परिश्रमाच्या घामाच्या धारांनी लिहिला जातो...!' सध्या सत्ता हीच विचारधारा अशी परिस्थिती सर्वच राजकीय पक्षात निर्माण झालीय. जे पक्षांतर करताहेत, त्यांचा काही ना काही हेतू असतो. त्यामुळं ते सत्ताधारी पक्षात दाखल होत असतात. आज भाजपमध्ये जाताहेत उद्या ते काँग्रेसमध्येही जाऊ शकतात. पक्षांतर करणारे हे लोक भाजपशी किती बांधील राहतील? हा प्रश्नच आहे. या प्रवेशामुळे निष्ठावंत नाराज आहेत का हे पक्षानं तपासून पाहणं गरजेचंय. पण तसं होताना दिसत नाही. सारे भाजप नेते हे तत्वाधिष्ठित, मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची भाषा करत होते. आपण संघात घडलेले कार्यकर्ते आहोत हे दाखवत होते. मंत्री असले तरी संघ शाखेवर जाऊन ध्वजप्रणाम करत होते. हे सारे वरून कीर्तन करतानाच आतून त्यांच्या कारभाराचा मात्र तमाशा सुरू होता. खुर्ची मिळावी म्हणून त्यांनी तत्वशून्य तडजोडी केल्याच होत्या. आता खुर्ची मिळाल्यावरही मूल्यांना डावलण्याची त्यांची धिटाई वाढतेय. काँग्रेसचा चोरबाजार संपावा, मूल्याधिष्ठित राज्य असावं म्हणून लोकांनी भाजपला आपलंसं केलं, सत्तेवर बसवलं. पण आज निवडणूक काळात दिलेली आश्वासनं धुळीला मिळालीत, सामान्य माणसाला जीवन जगणं असह्य होऊ लागलंय. सोशल मीडियावर सरकारची लक्त्तर काढली जाताहेत. केवळ जनतेशीच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांशीही त्यांनी प्रतारणा केलीय. म्हणून जे तत्व मानतात, मूल्यांची कदर करतात, साधनशुचितेचा आग्रह धरतात अशा सर्वांनीच आता आपली नाराजी व्यक्त करायला हवीय. नेत्यांना फोन करून, पत्रं लिहून वा पदाधिकाऱ्यांना त्याबाबत आपलं मत कळवून ही नाराजी व्यक्त करायला हवी. तुम्ही तुमच्या बळानं नव्हे, तर आमच्या बळानं खुर्चीवर बसला आहात, स्वतःला सावरा, तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. बहकू नका. तुम्हाला मोकाट स्वार्थामागे धावू देणार नाही हे सातत्यानं लोकांनी सांगायला हवंय. नेत्यांच्या कारभाराबद्दलची नाराजी नोंदवण्याची काळजी घ्यायला हवीय. वाकडं पाऊल पडतानाच अडवायला हवं, नाहीतर सरळ वाटही वाकडी होऊन जाते!
तत्वनिष्ठ, मूल्याधिष्ठित राजकारण दूर ठेऊन तडजोडी करण्याची चटक जशी वाढेल तसे संघवाले राजकारणात लुडुबुडू नयेत हा आग्रहही वाढणार. तुमचं सुसंस्कृत राष्ट्रनिष्ठ नागरिक बनवण्याचं काम सुरक्षितपणे चालावं म्हणूनच आम्ही आम्हाला वाटेल तशी सत्ता राबवतो आहोत. आमच्याकडं फार लक्ष देऊ नका, तुमचं काम संघस्थानावर चालू ठेवा, असं सांगून संघाच्या कार्यकर्त्यांना गुंडाळलं जाईल. म्हणून संघाची आता गरज राहिलेली नाही असं म्हटलं जातंय. मंत्री संघ स्थानावर ध्वज प्रणामासाठी कर्मकांड उरकायला अगदी गाजावाजा करून येत राहतील. पण खुर्ची कायम राहण्यासाठी नको त्या माणसांशी, नको त्या तडजोडी करून, नको तेवढी लाचारी आणि नको तेवढा उन्मतपणा करत राहतील. संघाला सत्ताकांक्षा नाही. त्याला सांस्कृतिक, सामाजिक पुनरुथानाचं कार्य करायचंय आणि संस्कारित, सुजाण, शिस्तबद्ध नागरिकांची समर्पित भावनेनं सर्व कार्य करणारी संघटित अशी शक्ती समाजात उभी करायचीय. ह्यासाठी आवश्यक तर सत्ताही हवी असं माणणाऱ्यांनी भाजपला यासाठी निवडलंय. भाजपनं हे भान ठेवलंय असं मात्र दिसत नाही.भाजपत सत्तातुरांची गर्दी झाली असून 'भय ना लज्जा' अशा थाटात ही मंडळी वागत आहेत. संघ हिंदू समाजाचे एका आदर्श, समर्थ संघटित समाजात परिवर्तन करण्याचं व्रत घेऊन उभा आहे. संघाला अन्य संघटनांसारखं सत्ताकारण करायचं नाही. तत्वं चर्चेपेक्षा आचरणावर संघ अधिक भर देतो असं संघ प्रचारक सतत सांगतात. नैतिकतेचा टेंभाही ते सतत मिरवतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, मोहनराव भागवत या सर्वांनी नैतिकतेचा मापदंड समाजापुढं ठेवलाय. 'समाज जीवनात कितीही भ्रष्टाचार असला तरीही सर्वसामान्यपणे संघ स्वयंसेवक, संघ संचालित संस्था भ्रष्टाचारापासून दूरच आहेत...!' असेही संघ प्रचारक, संघ पुरस्कर्ते म्हणतात. संघाचे स्वयंसेवक जिथं जिथं असतील तिथं तिथं प्रत्यक्ष कार्यासाठी उभे झाले तर समाजाची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी, सर्वसामान्य माणसांमध्ये नैतिक बळ वाढविण्यासाठी, देशाला पोखरणारा भ्रष्टाचार संपविण्यासाठी, निदान तो उघड्यावर आणण्यासाठी जिथं जिथं संघ स्वयंसेवक आहे तिथं तिथं तो कार्यक्षम व्हायला हवा होता. गेली शंभरवर्षे संघ हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच करणारी कार्यकर्त्यांनी संघटित शक्ती उभी करण्याचं काम करतो आहे. ह्या शक्तीचं संघटित दर्शन भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, फसवणूक या नेहमीच समोर येणाऱ्या सामाजिक प्रश्नात घडायला हवंय. अशी सर्वसामान्यांची भावना आहे. संघाची गरज राहिलेली नाही असं पक्षाध्यक्ष म्हणत असतील तर त्यावर संघानं आणि खस्ता खालेल्या स्वयंसेवकांनी आपलं मत मांडायला हवं होतं पण ते अद्याप मांडलं गेलेलं नाही....!
हरीश केंची
९४२२३१०६०९

2 comments:

  1. मुळात जनसंघाची स्थापना संघाने केली का ?
    माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हिंदुत्वाला आवाज देण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन श्री गुरुजींकडे कार्यकर्ते मागितले, जी परंपरा पुढेही सुरू राहिली.

    संघ भाजपला कार्यकर्ते द्यायचा तो भाजपवर लक्ष्य ठेवण्यासाठी की भाजप चे बळ कमी असताना भाजप चे राष्ट्रीय विचारांवर राजकीय संघटन वाढवण्यासाठी ?
    माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी कार्यकर्ता मागण्याची परंपरा सुरू केली आणि संघाने राष्ट्रीय कार्यांसाठी आयुष्य वाहून घेणारे समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते जनसंघाला दिले. १९७६ ची आणीबाणी संपली तेव्हा कित्येक पक्ष व संघटना फक्त सत्ता हवी असणाऱ्या इंदिरा गांधींनी संपवलेल्या होत्या. त्यानंतर जुन्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राजकीय संघटना बांधत भाजप ची स्थापना केली. पुन्हा राजकीय संघटना मजबूत करण्यासाठी संघाकडे कार्यकर्ते मागितले, संघाने दिले...

    संघ फक्त भाजप लाच कार्यकर्ते देतो का ? अन्य पक्षांत स्वयंसेवक नाहीत का ?
    संजय गांधींनी म्हटले होते की आम्हीही शाखा चालवू. त्यावर तत्कालीन सरसंघचालकांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते की आवश्यकता असल्यास आम्ही कार्यकर्ते पुरवू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऑन रेकॉर्ड टेलिव्हिजन वरील मुलाखतीत सांगितले आहे की ते स्वयंसेवक आहेत.

    जे.पी. नड्डा म्हणतात की आता आम्हाला संघाची गरज नाही, त्यामुळे खरेच खळबळ उडाली का ?
    मुळात जे पी नड्डा यांना विचारण्यात आलेला प्रश्न जुन्या व नव्या काळाबद्दल होता, त्यावर त्यांनी उत्तर दिले होते. संघ फक्त हिंदूंना संघटीत व जागृत करण्याचे काम करतो. ह्याच भूमिकेतून राष्ट्रीय मुद्द्यांवर राजकीय संघटन करण्यासाठी भाजप संघाला कार्यकर्ते मागायचा व संघ द्यायचा. आज भाजप पुरेशी मजबूत झालेली असेल तर ही कोणत्याही संघ कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे.

    संघ खरेच राजकारणात काम करतो का किंवा राजकारणात रस घेतो का?
    या प्रश्नाचे उत्तर शुद्धपणे नाही असेच आहे. कारण संघ फक्त हिंदूंना संघटीत करण्यासाठी उभा आहे. संघाचे ध्येय आहे की राष्ट्रीय वृत्तीचा भारतीय समाज घडावा, आणि फक्त त्यासाठी च संघ आवश्यक तेथे काम करतो, असा माझा अभ्यास आहे.

    ReplyDelete
  2. संघ भाजपमधले वाद गेल्या दहा वर्षात अजिबात चव्हाट्यावर आले नाहीत. सुदर्शन जी आणि वाजपेयी कॉम्बो मध्ये जितके आले तेवढे तर अजिबात नाही. जवळजवळ शून्यच.

    नड्डांच संघाची गरज नसल्याचं बोलणं ऍक्च्युली इंटरव्यू वाचला तेव्हा अजिबात टोचणारं वाटलं नाही. जे संघ नेहमी म्हणतो तेच ते म्हणाले.

    सोबतच आज सरसंघचालकांचे ही केंद्राला उद्देशून दिलेले इशारे बातम्यात आले.

    हे संघ भाजपातल्या गेले दहा वर्ष सांभाळलेल्या शिस्तीला साजसे वाटत नाही.

    कुछ तो गडबड है दया !

    ReplyDelete

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...