Monday 3 January 2022

ऐसें कैसे झाले भोंदू...!

देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो, त्यामुळं इथली सत्ता महत्वाची समजली जाते. त्यासाठी हरेक प्रयत्न केले जाताहेत. राजकीय, धार्मिक उन्माद माजवला जातोय. श्रद्धास्थानाचा वापर केला जातो. लक्ष्मीपूर खेरीसारखी प्रकरण घडविली जाताहेत. संत-महंतांना कामाला लावलं जातंय. त्यांनी आता देशभरात धर्मसंसद भरवण्याचा सपाटा लावलाय. त्यातून धार्मिक विद्वेष, हिंसक धमक्या, नरसंहाराची वक्तव्य केली जाताहेत. त्यासाठी महात्मा गांधींचा अश्लाघ्य भाषेत उद्धार केला जातोय तर गोडसेचं गुणगान गायलं जातंय. यामुळं देशात अस्थिरता, अशांतता निर्माण होईल, परकीय शत्रूंना मदत होईल तेव्हा वेळीच लक्ष घाला असं आवाहन पांच निवृत्त लष्करप्रमुखासह अनेक मान्यवरांनी राष्ट्रपतींना, प्रधानमंत्र्यांना केलीय. धर्मसंसदेच्या नावाखाली अशा तथाकथित संतमहंताकडून आगामी काळात आणखी काय आणि कसा उन्माद घडवला जाईल देव जाणे. अशांना साधू-संत म्हणावं तरी कसं? जगद्गुरू तुकारामांनी 'ऐसें कैसे झाले भोंदू..!' म्हटलंय त्याची प्रचिती येतेय!"
---------------------------------------------------

*ज*गद्गुरू संत तुकारामांनी अभंगात म्हटलंय की,
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू।।
अंगा लावोनिया राख । डोळे झाकोनी करती पाप।।
दावी वैराग्याच्या कळा । भोगी विषयाचा सोहळा।।
तुका म्हणजे सांगो किती। जळो तयाची संगती।।
हिंदू धर्माविषयी समाजात न्यूनगंड, भयगंड निर्माण करण्याचा उद्योग पद्धतशीरपणे सुरू आहे. ‘हिंदू संकटात’ आहेत असा विखारी प्रचार केला जातोय. असे लोक हे मुख्यप्रवाहात, निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ लागलेत. उत्तरखंडसहित काही राज्यात धर्मसंसद भरवली जातेय. उत्तरप्रदेशासह पाच राज्यात विधानसभा निवडणूका होताहेत; त्यासाठी सर्वांत मोठ्या आणि श्रीमंत भाजपसारख्या पक्षाला अशांची मदत घ्यावी लागत असेल तर त्यांची ही 'मूल्यवृद्धी' काय कामाची! खालच्या दर्जाचा आचरटपणा केल्यावर पक्षदरबारी आपलं वजन वाढू शकतं, याचा अंदाज या मंडळींना येऊ लागल्यानं ही मंडळी अशाप्रकारे वागताहेत. धर्मसंसदेत जमलेल्यांच्या ‘धर्म’ आणि ‘संसद’ या दोन्ही शब्दांच्या जाणिवा अगाध म्हणाव्या लागतील. त्यातल्या एकानं हिंदूंचं रक्षण करण्यासाठी वेळ पडल्यास मुस्लिमांना ठार मारण्याचं विधान केलंय. एकानं तामिळ टायगर्सप्रमाणे हिंदूधर्मासाठी लढणाऱ्या युवा संन्यासींना एक कोटीची मदत देण्याचं कबूल केलंय. डॉ.मनमोहनसिंगांनी अल्पसंख्याकांबाबत केलेल्या विधानांबद्धल त्यांना ठार मारायला हवं होतं, असं एक महाभाग बोलला. अशा या धर्मसंसदेचं आयोजन यती नरसिंगानंद यांनी केलं होतं. 'मुस्लीम जिहाद' देशात अटळ असून, त्याविरोधात हिंदूंनी एकवटून शस्त्रं हाती घेतली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं!

ही धर्मसंसद नव्हे तर जणू गुंडांचा मेळावा आणि तिथं बसलेले हे संत-महंत आहेत की जणू सैतानच! केवळ इयत्ता आठवी पास झालेला भगवाधारी हा चक्क विदेशातून बॅरिस्टर होऊन भारतात परतलेल्या, स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या एका संतसज्जनावर वाट्टेल तशी मुक्ताफळं उधळतो. कालीचरण यांच्या वक्तव्यानंतर भक्तांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्यानंतर त्याच मंचावर उपस्थित छत्तीसगढ गौसेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दासजी यांनी धर्मसंसदेतून काढता पाय घेतला. याचा अर्थ, धर्मसंसदेवर साधूंची ‘कमांड’ नसून, दंगेखोरांचेच राज्य चालतं, हे स्पष्ट होतं. धर्मनिरपेक्षता हा आपल्या लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. लोकशाही वगळता इथं कोणतीही राज्यव्यवस्था अस्तित्वात नाही. निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाही हवी असेल, तर मग या व्यवस्थेमधलं 'धर्मनिरपेक्षता' हे प्रधान तत्त्व स्वीकारावंच लागेल. अशी आग ओकणारी वक्तव्य करणारे इतर धर्मातही आढळतात. पण एका मूर्खपणावर दुसरा मूर्खपणा हा उतारा ठरू शकत नाही. या धर्मसंसदेविषयी भाजपच्या कोणत्याही नेत्यानं अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राज्यकर्ते म्हणून त्यांनी निषेध करण्याची गरज होती. तसंही झालेलं नाही, कारण काही राज्यांतून निवडणुका होताहेत, तिथं 'धार्मिक ध्रुवीकरण' हाच निवडणुका जिंकण्याचा शाश्वत मार्ग असल्याचं सत्ताधीशांना वाटत असल्यानंच यती नरसिंगानंदांसारखे लोक इथं सोकावतात! अशी विखारी वक्तव्य करून भावना भडकवतात!

हरिद्वारच्या धर्मसंसदेतल्या वादग्रस्त भाषणांचा गदारोळ सुरू असतानाच रायपुरच्या धर्मसंसदेतही महात्मा गांधींना शिव्या घातल्यानं नव्या वादाला सुरुवात झालीय. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रियादास, संत त्रिवेणीदास, हनुमानगढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतमहंतांनी धर्मसंसदेला हजेरी लावली. तिथं कालीचरणनं महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी त्यानं जे हीन शब्द वापरलेत. जे इथं लिहूही शकत नाही. कालीचरणच्या या विधानामुळं वाद पेटला. कालीचरण हा फक्त गांधीजींना शिवीगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला धन्यवाद दिलेत, त्याचे आभार मानलेत, त्याच्या कृतीचं कौतुकही केलंय. कालीचरणचा हा वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल झालाय. या धर्मसंसदेत गांधींजींबाबत वादग्रस्त वक्तव्य होताना नथुरामला वंदन करताना काहींनी टाळ्या वाजवल्या. हा सारा प्रकार खेदजनक आहे!

कालीचरणनं भोपाळमधल्या भोजेश्वर मंदिरात
गायिलेलं शिवतांडव स्तोत्र देशभरात चर्चिलं गेलंय. कालीचरण याचं मूळ नाव अभिजित धनंजय सरग,मूळ गाव अकोला. अभ्यासात रस नसल्यानं कालीचरणला लहानपणीच आई-वडिलांनी वैतागून इंदूरला मावशीकडं पाठवलं होतं. तिथं तो हिंदी बोलायला शिकला. भय्यूजी महाराज हे कालीचरणचे गुरू. भय्युजींच्या आश्रमातच अभिजितचं नामकरण कालीचरण झालं. त्यानं महापालिकेची निवडणूक लढवली. मात्र त्याचा पराभव झाला. गांधीद्वेष व्यक्त करणाऱ्या अशा पाखंड्यांचा हा प्रकार काही नवा नाही. ३० जानेवारी २०१९ ला हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे हिनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळ्या घालून त्यांची पुण्यतिथी साजरी केली होती. गेल्यावर्षी माजी केंद्रीय मंत्री भाजपचे अनंतकुमार हेगडे यांनी 'गांधीजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग असून, अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?' असं विधान केलं होतं. आज या कालीचरणनं गांधीजींवर नको त्या भाषेत तोंडसुख घेतलंय. मुळातच, या भगवाधाऱ्यांचा गांधीजीबद्धल नेमका ‘प्रॉब्लेम’ काय आहे, तर गांधीजी हे सत्य आणि अहिसेचं प्रतिक आहेत; याउलट ही मंडळी ढोंगी, पाखंडी आणि हिंसाचारयुक्त विचारांची प्रसारक आहेत. गांधीजींनी प्रेम आणि सदाचार शिकवला, याउलट ही ‘मुँह मे राम, मन में नथुराम’वाली हिंस्र टोळी आहे. त्यामुळंच गांधीजींना ही मंडळी मानत नाहीत. तरीही गांधीजींच्या विचारांची हत्या अद्याप कोणीही करू शकलेलं नाही. त्यांचे विचार जिवंतच आहेत. जगातलं कुठलंही पाठ्यपुस्तक नाही, ज्यात गांधींबद्धल धडा नाही. कुठलंही असं विद्यापीठ नाही, जे गांधींबद्धल विद्यार्थ्यांना धडे देत नाही. पुरोगामी गांधीजी भारतात परतल्यानंतर राजकीय स्वातंत्र्य मागायला लागले. त्यावेळीही काही असामाजिक तत्वं स्वातंत्र्याला एका चौकटीत बांधू पाहत होती आणि गांधी या सीमारेषा स्पष्ट करू पाहत होते. त्यामुळं गांधीजींवर १९३४ ला पहिला हल्ला झाला होता. त्यानंतरही तीनदा प्रयत्न झालाय. ज्यासाठी गांधीजी लढत होते, त्यांचा प्रतिवाद त्यांना करता आला नाही. आज १४७ देशांमध्ये गांधींजींचे पुतळे आहेत. आपल्या प्रधामंत्र्यांनाही परदेशात गेल्यानंतर आपल्या वैचारिक ढूढ्ढाचार्यांची नव्हे तर गांधींजींचीच आठवण करावी लागते! त्यांची महती ऐकवावी लागते.

देशातले पाच माजी लष्करप्रमुख सर्वश्री ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ऍडमिरल विष्णू भागवत, ऍडमिरल अरुण प्रकाश, ऍडमिरल आर.के.धवन, माजी लष्करप्रमुख एस.पी.त्यागी, माजी आयपीएस ज्युलिओ रिबेरो, राजमोहन गांधी, नजीब जंग, अरुणा रॉय, यांच्याशिवाय अनेक निवृत्त लष्करी, सनदी अधिकारी, ज्येष्ठ लेखक, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून आवाहन केलं आहे की, धर्मसंसदेतून अल्पसंख्यांकांच्या विरोधात नरसंहारच्या वल्गना केल्या जात आहेत. हे थांबवलं नाही तर, देशात अस्थिरता, अशांतता निर्माण होण्याची भीती तर आहेच, शिवाय बाहेरील शत्रूंना मदत केली जाईल. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. धर्मसंसदेतल्या विखारी, उन्मादी भाषणांचे, परधर्मियांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे पडसाद जगभर उमटले आहेत. ब्लूमर पासून द न्यूयॉर्क टाईम्स, एएफपी न्यूज पर्यंतच्या अनेक परदेशी प्रसिद्धीमाध्यमांनी यावर आक्षेप घेत टीकाटिप्पणी केली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातल्या ७६ ज्येष्ठ विधिज्ञांनी न्यायाधीशांना पत्र लिहून धर्मसंसदेतल्या धार्मिक तेढ वाढवणाऱ्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. धर्मसंसदेत स्वतःला धर्मगुरू अशी बिरुदं लावलेल्या अनेक महंतांनी मुसलमानांविषयी अतिरेकी वक्तव्ये केलीत. त्याबद्धल जराही आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्रात भाजप सरकार आल्यापासून 'हे हिंदूराष्ट्र आहे' असं ते लोकांच्या मनावर सतत बिंबवत आहेत. संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेल्या 'वुई ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड' या पुस्तकातल्या त्यांच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारची वाटचाल सुरू झालेलीय. पुस्तकातल्या पान १४९, १५० वर गुरुजी म्हणतात, 'हिंदुस्थान ही हिंदूंचीच भूमी आहे आणि ही भूमी फक्त हिंदू लोकांच्याच वृद्धीसाठी, समृद्धीसाठी आहे हेही निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. मग या भूमीवर राहात असलेल्या परंतु हिंदू वंश, धर्म आणि संस्कृतीशी संबंध नसलेल्या लोकांचे भवितव्य काय असले पाहिजे? राष्ट्राचा विचार करता, जे लोक या विचाराच्या परिघाबाहेर आहेत त्यांना राष्ट्रीय जीवनात कोणतेही स्थान असू शकणार नाही. ज्यावेळी आपले मतभेद ते पूर्णपणे संपुष्टात आणतील, राष्ट्राचा धर्म, भाषा आणि संस्कृती यांना आपली मानतील आणि स्वतःला पूर्णपणे राष्ट्रीय वंशात विलीन करतील त्याचवेळी ते राष्ट्राचा एक भाग बनू शकतील. जोपर्यंत ते आपले वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अंतर तसंच राखून राहतील तोपर्यंत असतील. बाहेरून आलेल्या लोकांनी बहुसंख्यांकांची म्हणजेच राष्ट्रीय वंशाची संस्कृती आणि भाषा स्वीकारून आणि त्यांच्या आकांक्षा वाटून घेऊन, आपले परदेशी मूळ पूर्णपणे विसरून, आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव पूर्णपणे सोडून देऊन स्वतःला त्या वंशात विलीन करून टाकले पाहिजे. जर त्यांनी तसं केलं नाही तर राष्ट्राच्या सर्व रीतिरिवाजांचा आणि परंपरांचा, साहित्यांचा स्वीकार करून त्यांना राष्ट्राच्या दयेवर एखाद्या परदेशी व्यक्तीप्रमाणे राहावं लागेल...!' अशा गोळवलकर गुरुजींना आदर्श मानणारे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले नसते तरच नवल!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...