Friday 24 July 2020

शिवसेना अन राष्ट्रवादीनं एकत्र ..!

"महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात भेट झालीय, याला अनेक कंगोरे आहेत. याला वेगवेगळे अर्थ आहेत, महाराष्ट्राची सत्ता ही तीन पक्षाची असताना यातल्या काँग्रेसला विश्वासात घेतलं जातं नाही असं म्हटलं जातंय. त्या पार्श्वभूमीवर आगामी राजकारणासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यायचं ठरवलंय. रायगडमध्ये या दोन्ही पक्षात वाद होते. हे वाद मिटविण्यासाठी ही बैठक झाली असली तरी आगामी राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे संकेत या निमित्तानं मिळताहेत. राज्यात सेना-भाजप ही युती संपुष्टात आल्यानंतर हे नवीन समीकरण अस्तित्वात येत आहे. २५-३० वर्षांपूर्वी खरं ते घडलं असतं पण बाळासाहेब ठाकरे-शरद पवार या दोन लोकनेत्यांना भाजपनं जाणूनबुजून एकमेकाविरोधात लढवून आपला कार्यभाग साधला होता. या दोन पक्षांनी एकत्र यावेत असं मराठी माणसाला जे वाटत होतं ते आता प्रत्यक्षात येतंय!"
-------------------------------------------------------------------

*रा*ज्याच्या राजकारणाचा, प्रादेशिक अस्मितेचा, मराठी माणसाच्या प्राधान्याचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रसंगी भाजपेयींची साथ सोडलीय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्यानं सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला जशी शिवसेनेची साथ नकोशी झालीय, तशीच शिवसेनेला भाजपची! त्यामुळेच सत्तासाथीदार होता तरी भाजप शिवसेनेला फारशी किंमतच देत नव्हती. २०१४ मध्ये सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तांत्रिकदृष्टया शिवसेना विरोधीपक्षातच होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि शिवसेनेला झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. पण महाआघाडीत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर, ते भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? असं वाटल्यानं शिवाय राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला आहे म्हणूनच उद्धव ठाकरे-अजित पवारांची भेट झालीय. शरद पवारांनी मात्र आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिलेला नाही.

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाही म्हटलं तरी दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसतेय. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं.

*भाजपेयींचा कुटील डाव*
महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग.वा.बेहेरे, विद्याधर गोखले, दि.वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं.  त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्याने भाजपेयींनी नाना मार्गाने शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आज घडलंही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*भाजपेयींना सेना-राष्ट्रवादीला एकमेकाविरोधात*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. १९९९ मध्ये राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हा पासून भाजपनं हा शिवसेनेच्या विरोधात सवतासुभा उभा केला. त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केलीच शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. भाजपच्या ह्या कुटिल डावाला अप्रत्यक्षरीत्या साथ देण्यासाठी मनसेचे राज ठाकरे आणि काँग्रेसचे नारायण राणे यांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. राज आणि राणे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, या दोघांनी पवारांचा आशीर्वाद घेऊनच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई महापालिका आपल्याकडं राखली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं आज केलाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. अजित पवारांची उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल!

*प्रारंभी समाजवादींशी युती*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आपलं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं नाही तर प्रबोधनी हिंदुत्व असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची संभ्रमावस्था झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागलं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिवसेनेतल्या काहींना मात्र भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवायचंय त्यामुळं काहीजण अस्वस्थ होतील पण शिवसैनिकांना हे हवंय! हा

*शिवसेनेमुळे पवार काँग्रेस सोबत!*
२०००साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केलं असल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. सत्ता हाती ठेवण्याचं वा सत्तेवर अंकुश ठेवण्याची शिवसेनेची संधी त्यावेळी हुकली. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेनेनंही हा निर्णय घेतलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे स्वयंघोषित 'चाणक्य' आणि शिवसैनिक यांनाही सेना-राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं असं वाटतं हे इथं महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*कोकणातील वादातून आघाडी झालीय*
सेना-राष्ट्रवादी सत्तेत असताना रायगडच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. ते मतभेद दूर करावेत, समेट घडवून आणावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. अलिबाग जिल्हयात उभय पक्षात निर्माण झालेला वाद दूर करण्यासाठी ही बैठक झाली. कार्यकर्त्यांनी परस्परांवर कुरघोडी सुरु ठेवल्यानं या जिल्हयात कमालीचा ताण आहे. आज भारत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या सेना तर पालकमंत्री आदिती तटकरे ,अनिकेत तटकरे, सुरेश लाड यांच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी समेटाची बैठक घडवून आणली. त्या त्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता कामं करावीत, असा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्हा ही आता सेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील सत्ता समीकरणाची नांदी ठरणार आहे. अलिबाग परिसरात शेकापनं सध्या राष्ट्रवादीसोबत रहायचं ठरवलं होतं पण नव्या सत्ता समीकरणात दोघांनी एकदिलानं काम करण्याचा निर्णय घेतलाय. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात काटे की टक्कर झाली होती. ही स्पर्धा संपवून आता साहचर्याचे युग निर्माण करायचं ठरलंय. हा प्रयोग यापुढं महाराष्ट्रात सर्वत्र राबवला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परस्परांच्या जवळ आले असून ही युती राज्याचे नवे भवितव्य ठरू शकेल.
------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...