"तमाम आंबेडकरी जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईच्या दादरमधील निवासस्थानात 'राजगृह'मध्ये शिरत मंगळवारी दोघा अज्ञातांनी तोडफोड केली. मंगळवारी ७ जुलैला संध्याकाळी हा प्रकार घडलाय. यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय. दादर पूर्व भागात असणारं 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास त्यांच्या पुस्तकांसाठी बांधलं होतं. आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या घराच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांच्या वापरातल्या विविध वस्तू - भांडी, चालताना वापरण्याच्या विविध छड्या, त्यांचा चष्मा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाची प्रत आहे. चैत्यभूमीवर जाणारा प्रत्येकजण इथं राजगृहावर डॉ. बाबासाहेबांचं वास्तव्य असलेल्या निवासस्थानाची अनुभूती घेत असतो. तिथं त्यांच्या अस्तित्वाचा भास होतो अशी त्यांची भावना असते. ते तिथं नतमस्तक होतात. त्या राजगृहाची ही माहिती!"
---------------------------------------------------------
*म*हाराष्ट्रात एक घर आहे. या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर ३ हजार, कायद्यावर ५ हजार, अर्थशास्त्रावर १ हजार, तत्वज्ञानावर ६ हजार, युद्धशास्त्रावर ३ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार अशा विविध विषयांवरील पुस्तकांची अशी बरीच संख्या आहे. तुम्हाला या घराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एक गोष्ट विशेष करून सांगावीशी वाटते ती म्हणजे, या घरातील पुस्तकांचं ज्ञानसंपन्न असं ग्रंथालय हे त्याकाळचं जगातील सर्वांधिक व्यक्तिगत पुस्तकं असणारं ग्रंथालय होतं. हे साधं घर नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह आहे. काही दिवसांपूर्वी या राजगृहावर एका माथेफिरूनं हल्ला केला. बंगल्याच्या आवारात कुंड्या फोडून नुकसान केलं. वाईट या गोष्टींच वाटतं की ज्या घरात ६ हजाराहून अधिक तत्वज्ञानाची पुस्तकं आहेत त्या घरावर हल्ला करण्यात आलाय. यातील एक पान जरी या माथेफिरूनं वाचलं असतं तर त्यांच्याकडून नक्कीच असं कृत्य झालं नसतं. असो.
राजगृहावर करण्यात आलेल्या या भ्याड हल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करत शांतता राखण्याची विनंती केलीय. बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वजण घेत आहेत. पण या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “राजगृह” ही नेमकी वास्तू कशी आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. ब्रिटिशकाळात मुंबईत जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं, इतिहासात शहाजहानं मुमताजसाठी ताजमहल बांधल्याची नोंद आहे. आपल्यासारखी माणसं राहण्यासाठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस हा खऱ्या अर्थानं महामानवच असतो. डॉ. बाबासाहेब हे महामानव होते म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. बॅरिस्टर झाल्यानंतर देखील बाबासाहेबांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. १९३० सालापासून त्यांच्या प्रॅक्टिसमुळे या स्थितीत थोडाफार फरक पडत गेला. आर्थिक पातळ्यांवर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मुंबईत दोन घरं बांधण्याचा मनोदय केला. त्यापैकी एक घर हे खास पुस्तकांसाठी असणार होतं तर दुसरं घर हे राहण्यासाठी असणार होतं. त्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट घेतले. ९९ क्रमांकाचा आणि १२९ क्रमांकाचा प्लॉट त्यांनी विकत घेतला. १९३१ मध्ये बांधकामास सुरवात करून १९३३ साली त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. तर ९९ क्रमांकावर असणाऱ्या प्लॉटवर १९३२ साली बांधकाम सुरू करण्यात आलं. ९९ क्रमांकावरील बंगल्याचं नाव त्यांनी चार मिनार ठेवलं. मात्र पुढे ९ मे १९४१ साली त्यांनी चारमिनार ही इमारत विकली. कशासाठी तर ग्रंथ विकत घेण्यासाठी. १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर बांधण्यात आलेल्या सुरेख दुमजली इमारतीचे नाव बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांच्या राजमहालावरून “राजगृह” असं ठेवलं.
माणसं घरात पुस्तकं ठेवतात. पण राजगृहाची रचना पाहिली तर बाबासाहेब पुस्तकांमध्ये राहायचे हे दिसून येतं. आपलं सुरेख ग्रंथालय त्यांनी बांधताना न्यूयॉर्कमधील ग्रंथालयाचा अभ्यास केला होता. त्यासाठी मोठमोठे खांब आणि स्वच्छ प्रकाश येणाऱ्या खिडक्या बांधण्यात आल्या होत्या. अशा या राजगृहाचं बांधकाम पूर्ण होताच त्यांनी रमाईला इथं आणलं होतं. रमाई हे घर पाहताच म्हणाल्या होत्या हे घर नाही तर एका महान विद्वानाचं भव्य असं ग्रंथ भांडार वाटतं. पुढं इथंच बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहले. भारताचं संविधान तयार होण्याचं किंवा 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हे पुस्तक लिहिण्याचं राजगृह साक्षीदार राहिलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांसाठी इंग्लंडच्या ठक्कर कंपनीतून ग्रंथालय कार्ड बनवून घेतली होती. बाबासाहेबांच्या अचूक स्मरणशक्तीमुळे ५० हजार पुस्तकांमधून त्यांनी ती अचूक सापडत असत. तासन् तास ते ही पुस्तकं वाचत बसत असत. इतक्या पुस्तकांमधून ते अचूक संदर्भ सांगत असत. एका विद्वान माणसानं पुस्तकांसाठी म्हणून हे घर बांधलं होतं. शेवटी इतकंच सांगावासं वाटतं की, या पुस्तकांमधील कोणतंही एक पुस्तक आणि कोणतीही एक ओळ वाचण्याचं धैर्य माथेफिरूंनी दाखवलं असत तर असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस त्यांचं झालं नसतं.
राजगृह असं आहे
बाबासाहेबांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतलं राजगृह. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर दादरमधली ही वास्तू बांधून घेतली होती. बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतलं होतं. १९३१ ते १९३३ दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये आज वस्तुसंग्रहालय आहे. डॉ. आंबेडकरांनी आणि रमाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथं ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातलं फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथं त्यांचं टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या चालताना वापरायच्या छड्या जमवण्याचाही छंद होता. वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय. शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारे फोटोग्राफ्स आहेत. राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही ठेवण्यात आला आहे.
त्यांच्या निधनानंतर दादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आलं होतं. ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथंच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि नंतर इथूनच ७ डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं. अंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात आणण्यात आल्या. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे. राजगृहाच्या वास्तूतलं तळमजल्यावरचं हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं असतं तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात. ६ डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही येऊन जातात.
बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर! जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. १९३० साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो. १९३० ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्धधर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडं सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडं घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.
राजगृह अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार
भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानंही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम १९३३ ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.
राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह
बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे १९३५ ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. 'एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा' हे ग्रंथ इथंच आकाराला आलं. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:
Post a Comment