उद्या सावरकरांचा स्मृतिदिन आहे. आयुष्यभर हिंदुस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेव्हापासून आजतागायत अनेक जण सावरकरांचे नाव अनेकप्रकारे गांधीहत्येशी कायम जोडत आले. त्यानं सावरकरांचं कार्यकर्तुत्व डागाळत आलं. त्याच्या विराधात शेषराव मोरे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अंदमान इथं झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात आवाज उठवला. संमेलनाध्यक्ष म्हणून शेषरावांनी केलेलं संपूर्ण भाषण हे सावरकरांविषयीच विषयीच होतं. त्यात त्यांनी सावरकरांचे विचार, त्यांचं लेखन, साहित्य, अभ्यास करण्यासाठी मिळालेली प्रेरणा यावर ते प्रामुख्यानं बोलले. "सावरकरांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी 'कपूर समिती' तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं नेमली होती. या समितीनं सावरकरांना अकारण गोवून बदनाम केलं. आता केंद्रात आणि राज्यात सावरकरांना मानणारं सरकार असल्यानं त्यांनी सावरकरांवरील हा कलंक पुसला गेला पाहिजे." अशी अपेक्षा शेषरावांनी व्यक्त केली होती.
सावरकरांचा विचार आणि त्यांचा कार्यकर्तृत्वभाव याचा अनेकांनी आपल्या लेखनातून आजवर मांडलं आहे. सावरकरांच्या विचारांबद्धल कुणाचे कितीही मतभेद असले, तरी त्यांच्या विचारातली स्पष्टता दखलपात्र ठरली. हिंदुधर्मातल्या जातिभेदांचा उच्छेद व्हावा यासाठी सावरकर आग्रही होते. देव-धर्माच्या खुळचट कल्पनांना-विधी-रूढींना त्यांनी कठोर शब्दात झिडकारलं होतं. आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी लेखनाचे विविधप्रकार प्रभावीपणे वापरले होते. लेखणीप्रमाणेच त्यांच्या वाणीतही सौष्ठव होतं. तथापि सावरकर भक्त त्यांना 'फ्रान्सच्या मार्सेलीस खाडीत बोटीतून मारलेल्या उडीत'च बुडवत राहिले. रा.म.आठवले, भा.कृ.केळकर, मो.शि.गोखले, सदाशिव रानडे, रघुनाथ भोपे, गोविंदस्वामी आफळे, शि.ल. करंदीकर अशा अनेकांनी सावरकरांच्या हयातीत त्यांच्यावर लेखन केलं. पण ते सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांच्या पलीकडे गेलं नाही. सावरकरांच्या पश्चात द.न.गोखले यांनी अत्यंत प्रभावीपणे सावरकरांच्या जीवनाचं आणि विचारांचं रहस्य उलगडलं. हे सारं आजवरचं लेखन हे सोवळी पाशात अडकलेलं होतं. ते सोडविण्याचं काम शेषराव मोरे यांनी केलं. 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग', 'विचारकलह', या त्यांच्या ग्रंथातून शेषरावांच्या सावरकर यांच्या विषयीच्या अभ्यासाची साक्ष मिळते. त्यातून ते सावरकरभक्त नाहीत हे स्पष्टपणे, ठळकपणेे दिसतं. त्यांचं 'अप्रिय पण...!' या नावाचं सदर दैनिक सामनामधून बरीच वर्षे प्रकाशित होत होतं. त्याचं पुढं ग्रंथात रुपांतरही झालं. त्यातही त्यांच्या तटस्थतेचं दर्शन घडतं.
शेषराव हे जांब- नांदेडसारख्या भागात राहून त्यांनी सावरकरवादाचा अभ्यास केला. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना त्यांचे शिक्षक उप्पे गुरुजी या लिंगायत समाजातील व्यक्तीनं दिली. तथापि, मूळचे रा.स्व.संघाचे पण मतभेदांमुळे 'सावरकरवादी' झालेल्या धों.वि.देशपांडे, दि.वि.गोखले, स.ह.देशपांडे, ग.वा.बेहेरे यांनी शेषरावांना वेळीच समीक्षकी प्रशस्ती, प्रसिद्धी देऊन 'सावरकरवादी' करून टाकलं. परंतु शेषरावांनी आपला बुद्धिवाद आणि तार्किकता केवळ सावरकरांना शुद्ध करून घेण्यासाठीच वापरलेली नाही. त्यांच्या 'विचारकलह' या ग्रंथातील खरा 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही! 'शाहू महाराज:ब्राह्मणशाहीला शह देणारा हिंदू सुधारक:मराठा समाजाची स्थिती व भवितव्य' हे लेख आवर्जून वाचावं असे आहेत. इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, आणि विचारपद्धती याचा सुरेख संगम त्यांच्या लेखनातून दिसतो. त्यांना वैचारिक तटस्थतेचे फटके नक्कीच बसले असतील. दावा-उजवा-मध्यम;, हिंदू-हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी, सावरकरवादी, अशा नाना प्रकारचे वैचारिकवाद, समीक्षापद्धती देशात आहेत. त्या माध्यमातून साहित्य, विचार आणि समीक्षा क्षेत्रात राजकारण खेळणारेही आहेत. या खेळापासून शेषराव तसे दूर आहेत. पुरोगामी-प्रतिगामी, उजवा-डावा असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात पुरोगाम्यांनीच आणली. 'सावरकर यांच्याविषयी मी लिहिल्यानं मला प्रतिगामी ठरवलं गेलं!' अशी खंत शेषराव मोरे व्यक्त करतात. त्यात तथ्यच नाही, तर वस्तुस्थती आहे
शेषरावांनी संमेलनाध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात पुरोगाम्यांच्या या व्यवहाराला 'दहशतवाद' म्हणणं तितकंसं खरं नाही, तो अतिरेक झाला. दहशतवाद हा माणसाच्या बुद्धीला गुलाम करणारा असतो. तसा जीवघेणाही असतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतचा आग्रह सावरकरांनी अत्यंत कठोरपणे धरला होता. देव-धर्माच्या खुळांची त्यांनी चिरफाड केली आहे. 'एकवेळ गायीची थोडी हत्या झाली, तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राच्या बुद्धीची हत्या होऊ नये.' असं सावरकर म्हणत. संघवाद्यांनी विचार साम्य असूनही सावरकरवाद्यांपासून आपलं वेगळंपण जपलं आहे. सावरकरांवरचा गांधी हत्येचा कटाचा कलंक पुसणं, हे आता सहजसोपं आहे, असं शेषरावांना वाटलं असेल;तर ते सावरकर अभ्यासकाचं लक्षण नाही. अशाप्रकारे उचापती सावरकरभक्त करतात. भक्त मंडळी नेहमी सत्याला बगल देण्याचा प्रयत्न करतात. 'गांधीहत्या कटाचा साथीदार' या सावरकरांच्या कलंकाची चर्चा कुणी करत नाही.
१८५७ मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात हिंदुस्थानात उठाव झाला होता. त्यावर सावरकरांनी 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. त्यावर १८५७ च्या शताब्दी निमित्तानं इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी 'हे स्वातंत्र्यसमर नव्हतं तर ते शिपायांचं बंड होतं.' हे स्पष्ट करणारा ग्रंथ लिहिला होता. अशीच समीक्षा करणारं प्रबोधनकार ठाकरे यांचं भाषणही आहे. सावरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रकाशित केला म्हणून ब्रिटिश सरकारनं सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला गोळ्या घालून मारलं. तर नाशकात कलेकटर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली.
पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं. तिथं त्यांना मणामणाच्या बेड्यांत अडकवलं होतं. तेलाच्या घाण्याला कसं जुंपलं होतं; याच्या दर्दभऱ्या कहाण्या आहेत. तथापि सावरकरांनी शिक्षेची ११ वर्षे झाल्यानंतर 'ब्रिटिश सरकार विरोधात कोणतंही काम करणार नाही,' असा माफीनामा देऊन स्वतःची काळकोठडीतून सुटका करून घेतली. अर्थात, अंदमानातली ११ वर्षे ही शिक्षा काही कमी नाही. हा इतिहास आहे. त्याचं समर्थन सावरकरांनी कधी केलं नाही. किंबहुना सावरकरभक्तांच्या फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी झाली.
सावरकर कठोर बुद्धिनिष्ठ होते, पण ते विज्ञाननिष्ठ होते. हा शुद्ध भ्रम आहे. ते विज्ञाननिष्ठ असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा निर्णय जाहीर करताच, आंबेडकरांची उडी हिंदुधर्मातच! 'बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे' अशी शेंडीला गाठ मारणारी भाषा सावरकरांनी वापरली नसती. अवतार ही कल्पना विज्ञाननिष्ठेतेत बसत नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तर सावरकरांची कठोर बुद्धिनिष्ठताही पातळ झाली. म्हणूनच त्यांनी पत्थरी देवदेवतांच्या आरत्या लिहितात तशी शिवरायांवर आरती लिहिली.... 'जय देव जय देव जय श्री शिवराया....' . दलित-दलितेतर एकत्र यावेत, यासाठी सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत तिथं 'पतित पावन मंदिर' स्थापन केलं. म्हणजे सोवळ्याची; दलित-मागासांना प्रवेश नसलेली मंदिरं तशीच ठेवली; आणि पतितपावन हे तिसरंच मंदिर निर्माण केलं. तथापि कुणाला पतित म्हणणं हे चूक; त्याच्यापेक्षा पतितपावन करून घेणं , महाचुकच! असो!
उद्या सावरकरांच्यावर गांधीहत्येचा जो कलंक लागला आहे, तो पुसून काढावा, त्याबाबतचं एक पुस्तक प्रकाशित होतंय त्यासाठी केलेला हा लेखन प्रपंच!
No comments:
Post a Comment