Tuesday 10 July 2018

प्रबोधनकार ठाकरे...!

 १७ सप्टेंबर, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती. सत्यशोधक आंदोलनातले एक समाज सुधारक, प्रभावी लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, घणाघाती वक्ते, धर्मसुधारक, इतिहास संशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, चळवळे शिक्षक, भाषासुधारक, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार, लघुलिपिकार असे बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी व्यक्तिमत्व! त्यांच्या समाजसुधारणेच्या अनेक घटना आहेत. त्यापैकी एक सार्वजनिक नवरात्रौत्सव! दलित समाजाच्या तरुणांचा गणपती पूजनाचा हक्क डावलला गेला होता, अन्यायाविरुद्ध तुटून पडणाऱ्या स्वभावामुळे ते मूर्ती फोडण्यासाठी सज्ज झाले. अखेर दलिताला पूजेचा हक्क मिळाला. पण सनातन्यांनी गणेशोत्सवच बंद केला. यांच्या या निर्णयाविरोधात त्यांनी मग सार्वजनिक नवरात्रौत्सव सुरू केला. जो आज महाराष्ट्रभर सर्वत्र सुरू आहे!

संपूर्ण महाराष्ट्राच्या चळवळीतील पंचकांपैकी एक, संयुक्त महाराष्ट्राचा एक शिल्पकार; 'मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।' हे ब्रीद आमरण उराशी बाळगणारा हा फटकळ लेखणी-वाणीचा, पण निर्मळ करणीचा मर्द मराठा; अंतिम क्षणापर्यंत 'ऊठ मराठ्या ऊठ' असं प्रबोधन करणारा हा सव्यासाची पत्रकार! 'शिवसेने'चा साक्षेपी प्रेरणादाता!

प्रबोधनकारांना सारे दादासाहेब ठाकरे असे संबोधित असत. दादांनी आमरण मराठी तरुणांच्या व्यथांना, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडली. त्यांना कठोर परिस्थितीशी झुंजण्यासाठी धीर दिला, हिंमत दिली आणि

*वाघिणीचे दूध प्याला*
*वाघ-बच्चे फांकडे*
*भ्रात तुम्हां कां पडे?*

ही जाणीव देऊन त्यांची अस्मिता जागविली! गुणशाली लेखक असो, कलाकार असो, नट असो, गायक असो, गुण-लुब्ध दादांनी तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली नाही, असं कधी घडलं नाही. ते सदैव नव्या पिढीबरोबर टवटवीत वाटचाल करू शकले याचे कारण ते स्वतः अखेरपर्यंत वृत्तीनं ताजे-टवटवीत नि तरुण होते. एका विख्यात शायराने केलेलं वर्णन दादासाहेब ठाकरे  ह्यांना तंतोतंत लागू पडते -

*थकली तनू ही जर्जरा,*
*'वार्धक्य कापूर हा जरी!*
*तरि यौवनाची आगही,*
*याच्या वसे नित्य अंतरी!*

आणि ही गोष्ट सोपी नाही, 'वृद्धत्वी निज यौवणास जपणे' भल्याभल्यांना जमत नाही! प्रबोधनकार अखेरपावेतो रसरशीत तरुण होते. सकाळी उठल्यावर ते स्वतःच्या हाताने गुळगुळीत दाढी करून मगच दिनचर्येला प्रारंभ करायचे. ओशाळी बावळी चर्या त्यांना खपत नसे! अखेरपर्यंत अनेकविध विषयांवरील त्यांची अनुभव, ज्ञानसंपन्न 'अप-टू डेट रनिंग कॉमेंट्री' ते येणाऱ्या- जाणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उत्साहाने ऐकवीत! सर्व वृत्तपत्रे वाचीत आपल्या 'जीवन गाथे'ची प्रूफ त्यांनीच तपासली होती. त्यानंतर दृष्टी फार अधू झाली तरी ते हताश झाले नाहीत. कारण रेडिओ वरील बातम्या आणि भाषणं लक्षपूर्वक ऐकण्याचा त्यांचा परिपाठ होता. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला त्यांना उचलून व्यासपीठावर नेण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली होती. पण त्यांना ती मंजूर नव्हती. ते स्वतःच्या पायांनीच व्यासपीठावर आरूढ झाले.

शिवसेनेच्या एका 'बेकार तरुणांचा मोर्चा'ला ४-५ हजार लोकच होते, तेव्हा ते तरुण कार्यकर्त्यांवर कडाडले, "इतकेच काय?... अरे, मुंबईत किमान तीस-चाळीस हजार बेकार आहेत! ....कंबर कसून काम करा." अखेर पावेतो बारीक सारीक गोष्टीत त्यांचे बारीक लक्ष आणि परखड मार्गदर्शन! तरुणांना रुचणारा तडफदारपणा त्यांच्यात होता अन मिळमिळीत मुर्दाडपणाचा त्यांना अतिशय तितकार्स वाटे!

असे तारुण्य वृद्ध देहात असले तरी तरुण मनाला आकर्षित करतेच करते. मनाने केव्हाच मरून गेलेले गलितगात्र म्हातारे आपण ठायी ठायी पाहतो अथवा म्हातारपणी विशोभित पोरखेळ करणारे महाभागही अनेक असतात! पण प्रबोधनकारांसारखा चिरतरुण वृद्ध विरळाच! महाराष्ट्रातील हजारो 'एकसष्टी' बहाद्दर वृद्धांनी पेन्शनकडे डोळे लावून भकास जिणे जगण्यापेक्षा हा 'प्रबोधन'कर्ता आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. महाराष्ट्राला आज जशी तानाजींची जरुरी आहे तशीच दादांसारख्या 'शेलारमामा'ची देखील! वार्धक्याकडे विटलेल्या विफलतावादी नजरेनं पाहण्यापेक्षा 'वार्धक्य म्हणजे परिपक्व तारुण्य' या निरोगी दृष्टीनं वृद्धांनी स्वतःच्या जीवनाकडे पाहायला हवे. असे वार्धक्य निराशेच्या अंधारात 'हरी हरी' म्हणत घटका-पळे मोजत बसत नाही, तर जनता-हरीच्या चरणी समर्पित होऊन धन्य होते. दादांचा हा विचार आजही अनेकांना प्रेरित करतो.

काही काही अंत्ययात्राही खूप बोलक्या असतात. दिवंगत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अखेरचा लखलखीत प्रकाशझोत टाकणाऱ्या अचूक भाष्याप्रमाणे असतात! अगदी अलीकडच्या काळातील आपण पाहिलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जशी निर्वाणयात्रा होती तशीच प्रबोधनकारांची होती. प्रबोधनकारांच्या चिरतरुण व्यक्तिमत्वाने मराठी तरुण मन किती भारावली होती याची साक्ष पटवणारी! एरव्ही ८९ वर्षाच्या वृद्धाच्या अंत्ययात्रेत पन्नाशी ओलांडलेल्या वृद्ध माणसांचीच संख्या अधिक असणे साहजिक.  कारण नव्या पिढीला त्यांचे कर्तृत्व कितीसे ठाऊक असणार? 'दर वीस वर्षाला एक पिढी बदलते' हे सर्वमान्य तत्व गृहीत धरले, तर तत्कालीन विशीतला तरुण दादांपासून किमान तीन पिढ्या दूर असला पाहिजे होता! पण असे झाले नाही. ५० हजाराहून अधिक माणसं असलेल्या या अंत्ययात्रेत ९० टक्के तरुण होते विशीपासून चाळिशी पर्यंतची! असा हा तरुणांना आपल्या वाणीने, विचाराने आपल्याकडे खेचणारे दादासाहेब होते!

- हरीश केंची ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...