Tuesday 10 July 2018

समाजवादी विचारांची गरज!

पु
रोगामी वाचाळ असतात आणि कृतीशून्य असतात, हा इतिहास कोणी बदलायचा?
गेल्या दोन वर्षात अनेकजण आम आदमी पक्ष सोडून गेले आणि अनेकजण नव्याने त्या पक्षात आले. पण इतका तमाशा यापुर्वी कधीच झालेला नव्हता. यापुर्वीही असे अनेक राजकीय पक्षांच्या बाबतीत झाले आहे. मात्र आज त्या पक्षात जे काही घडते आहे, त्याला सत्तेची साठमारी वा गटबाजी असे संबोधणे चुक होईल. हा दोन भूमिकांचा संघर्ष आहे. अण्णा आंदोलनाला जो भरघोस पाठींबा मिळाला, त्यामुळे अनेक निकम्मे राजकीय गट त्यात आपापले भवितव्य शोधू लागले होते. त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवादी चळवळीचे विखुरलेले लोक होते. त्यांनी घाऊक संख्येने जुन्या समाजवादी चळवळीचा पक्ष बनवण्याचे स्वप्न बघितले असेल तर नवल नाही. युतीची सत्ता असताना अण्णा हजारे यांनी आरंभलेल्या आंदोलनातही असेल काही समाजवादी घुसले होते. पण तेव्हा त्यात कुणी केजरीवाल किंवा अनुभवी चतुर इव्हेन्ट मॅनेजमेन्ट करू शकणारा नव्हता. म्हणून दोन दशकापुर्वीचे ते अण्णा आंदोलन बारगळले. कुठल्याही व्यक्तीमत्वाला महात्मा बनवण्याचे लाभ मिळू शकतात. पण ते उठवण्यासाठी संघटित ताकद आवश्यक असते. अण्णा तेव्हाही एकांडे शिलेदार होते आणि आजही तसेच आहेत. तेव्हा ज्या समाजवाद्यांनी अण्णांची कास धरली, त्यांच्यापाशी लोकसंख्या नव्हती. पण माध्यमांची साथ असल्याने युती विरोधातल्या राजकारणासाठी अण्णांचे महात्म्य माध्यमातून माजवण्यात आले, व्यवहारात काहीच नव्हते. म्हणूनच आंदोलन बारगळले आणि तात्कालीन समाजवाद्यांची राजकीय उभारणीची स्वप्ने धुळीस मिळाली. पुढल्या काळात अण्णांची महत्ताही ओसरली होती. पत्रकबाजीपेक्षा अधिक काही नव्हते. चार वर्षापुर्वी
 जनलोकपाल आंदोलनाची कल्पना घेऊन जे मुठभर लोक कामाला लागले, त्यापैकी केजरीवाल यांच्यापाशी आपल्या संस्थेचे हुकमी पाठीराखे मोठ्या संख्येनं होते.

केजरीवाल यांनी गाजलेला व देशाला ठाऊक असलेला, पण पाठबळाखेरीज दुबळा असा चेहरा म्हणून अण्णांना सोबत घेतले. त्यात पुन्हा शांतीभूषण, किरण बेदी. स्वामी अग्निवेश इत्यादी प्रसिद्ध चेहर्‍यांना सोबत आणले. त्या सर्व काळात साधने व सज्जता हे काम एकटे केजरीवाल करीत होते आणि पुढे अण्णांचा चेहरा होता. जोपर्यंत अण्णा उपयोगाचे होते, तोपर्यंतच त्यांनी अण्णांचे महात्म्य चालू दिले. अण्णांच्या आडोश्याने केजरीवाल हा देशव्यापी चेहरा झाला. तसाच बेदी, अग्निवेश, प्रशांत भूषण इत्यादी देशाला परिचित चेहरे होते. पण त्यांच्यामागे कुठलीच संघटित शक्ती वा लोकसंख्या नव्हती. केजरीवाल यांच्याकडे तशी ‘तैनाती फ़ौज होती. ज्यांना पगारी पाठीराखे म्हणता येईल, अशी टोळी केजरीवाल, शिसोदिया, संजय सिंग व गोपाल राय यांनी उभी केलेली होती. त्यांनी अन्य चमकणार्‍या प्रत्येक चेहर्‍याचा आरंभी धुर्तपणे गर्दीला झुलवण्यासाठी उपयोग करून घेतला आणि आपल्या जमावाचे राजकीय पक्षात रुपांतर करून घेतले. एकदा त्यात यश मिळू लागल्यावर अण्णा व इतरांना बाजूला करून या मुळच्या टोळीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पुढे आणल्या. त्यात आडवे येतील व त्रासदायक होतील त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे डाव खेळले. पण समाजवादी नेहमी बुद्धीमान असतात आणि म्हणूनच इतरांना मुर्ख समजून विचारपुर्वक मुर्खपणा करतात. योगेंद्र यादव त्यापैकी असल्याने आजवर इतरांचे काटे काढण्य़ात त्यांनी केजरीवाल यांना मदत केली. त्यातून केजरीवाल फ़क्त आपल्यावर अवलंबून रहातील आणि पुढे वैचारिक कारणास्तव पक्षालाही आपल्या विचारसरणीने चालावे लागेल, असा त्यांचा आडाखा किंवा डाव असावा. पण तिथेच त्यांची फ़सगत झाली. कारण असे प्रथमच झालेले नाही. यापुर्वी असे अनेक पुरोगामी बुद्धीमंतांनी केलेले प्रयोग त्यांच्यावरच उलटलेले आहेत.

१९७० च्या दशकात कॉग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांना पक्षातील म्हातार्‍या नेत्यांची अडचण झाली होती. त्यांना संपवायला त्यांनी रातोरात समाजवादी वस्त्रे अंगावर चढवली आणि तेव्हाच्या एकाहून एक बुद्धीमान समाजवादी साम्यवाद्यांनी कॉग्रेसलाच पुरोगामी पक्ष बनवण्याची स्वप्ने रंगवायला सुरूवात केली. कम्युनिस्टांपासून सोशलिस्टांपर्यंत अनेक जाणते दिग्गज नेते, मग इंदिराजींच्या कॉग्रेस पक्षात सहभागी होऊन गेले. न्या. एच. आर. गोखले, बॅ. रजनी पटेल, कुमारमंगलम अशा कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींची पालखी उचलून विचारांपेक्षा व्यक्तीमहात्म्य सांगायचे काम हाती घेतले. त्यासाठी मोरारजी देसाई, अतुल्य घोष, कामराज, निजलिंगप्पा इत्यादींची निंदानालस्ती करण्यात हेच पुरोगामी आघाडीवर होते. त्यांच्या जोडीला मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत, शशीभूषण असे समाजवादी तरूण तुर्कही उभे ठाकले होते. या सर्वांची अशी समजूत होती, की जुन्याजाणत्या नेत्यांपासून इंदिराजींना तोडले; मग त्या डाव्या विचारांच्या अनुयायांवर अवलंबून रहातील आणि कॉग्रेसच समाजवादी-साम्यवादी पक्ष होऊन जाईल. त्यांच्या कष्टाने व बुद्धीने इंदिराजी देशाच्या व गरीबांच्या तारणहार होऊन गेल्या आणि त्यांची प्रतिमा इतकी उंचावली, की तुलनेत हे सर्व समाजवादी साम्यवादी विचारवंत खुजे बुटके होऊन गेले. मग क्रमाक्रमाने त्यांना फ़ुंकर घालून इंदिराजींनी उडवून लावले. अवघ्या चार वर्षात त्याच तरूण तुर्क पुरोगाम्यांना त्याच इंदिरा गांधी व त्यांच्या उद्धट पुत्र संजय गांधींच्या विरोधात आवाज उठवायची पाळी आली. तेव्हा त्या बोलघेवड्यांना इंदिराजींनी तुरूंगात डांबलेले होते. आज आम आदमी पक्षाला नवा समाजवादी वा डाव्या विचारांचा पक्ष वा संघटना बनवण्याचा यादव व त्यांच्या जुन्या समाजवादी सहकार्‍यांचा प्रयास, त्याचीच इवलीशी आवृत्ती होती तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

कारण इतिहासापासून न शिकणे आणि त्याच त्याच चुका अतिशय आत्मविश्वासाने करत रहाणे, हा समाजवादी व पुरोगाम्यांचा गुणधर्म असतो. सामान्य माणसे सहज ज्या चुका करतात. पण पुरोगामी शहाणे अतिशय सुक्ष्म विचार करून चुका व मुर्खपणा करीत असतात. त्याचा हा परिणाम असतो. योगेंद्र याद्व किंवा त्यांच्याच समाजवादी गोतावळ्यातील विखुरलेल्या लोकांना या देशात कुठल्या कायद्याने वा सत्तेने आपला राजकीय पक्ष संघटना उभारण्यास प्रतिबंध केलेला नाही. जनतेमध्ये जाऊन लोकहिताच्या आपल्या भूमिकांना पाठींबा मिळवत समाजवादी साम्यवादी विचारधारेचा पक्ष उभारण्यात मग कसली अडचण आहे? अकारण दुसर्‍यांच्या आंदोलन चळवळीत घुसून आपला उल्लू सीधा करण्याची चलाखी कशाला? त्यापेक्षा आपल्यातला उल्लू झटकून व्यवहारी शहाणपण जोपासले, तरी खुप होईल. देशातल्या समस्या व लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न पन्नास वर्षापुर्वी जितके गहन होते, तितकेच आजही आहेत. तेव्हा त्यावर नुसती प्रवचने देण्यापेक्षा केजरीवाल जसा एखाद्या कोपर्‍यात गल्लीत वा शहरात इवली सुरूवात करतो, तशी या समाजवाद्यांनी लोकांच्या जगण्याशी थेट संबंध असलेली समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले, तर पक्षाची उभारणी व्हायला काय अडचण आहे? त्यापेक्षा प्रसिद्धीच्या मागे लागून, माध्यमातून चळवळीचा आभास करून काहीही निष्पन्न होत नाही. म्हणून केजरीवाल दिल्ली जिंकतो. पण मेधा पाटकरांना एका मतदारसंघात डिपॉझिटही वाचवता येऊ शकत नाही. मेधासारख्या अनेक विखुरलेल्या समाजवाद्यांनी थेट प्रश्नाला भिडणारी वा लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सुटतात, अशी आंदोलने लढवली, तर यादव हाकलले जाऊ शकणार नाहीत किंवा केजरीवाल शिरजोर होऊ शकणार नाहीत. पण पुरोगामी वाचाळ असतात आणि कृतीशून्य असतात, हा इतिहास कोणी बदलायचा?

सामान्य कार्यकर्त्यांनी उभी केलेली चळवळ किंवा त्यातून उदयास आलेला आम आदमी पक्ष यांच्याकडून लोकांच्या खुप अपेक्षा असतात. कारण लोक प्रस्थापित राजकारणी व संस्था संघटनांच्या मस्तीला वैतागलेले असतात. भ्रष्टाचार अशा प्रस्थापितातून येतो आणि त्यातून आमिषे दाखवून कार्यकर्त्यालाही भ्रष्ट केले जाते असा लोकांचा समज असतो. म्हणून तर कुठल्याही प्रस्थापित नेत्याकडून स्थापन झालेल्या पक्षापेक्षा लोकांच्या चळवळीतून आलेल्या व्यक्तींकडून अधिक अपेक्षा असतात. मुळात चळवळ म्हणजे लोकक्षोभाचा हुंकार असतो. त्याची प्रेरणाच जनभावनेतून आलेली असते. पण अशा चळवळी फ़ार काळ टिकत नाहीत आणि टिकूही दिल्या जात नाहीत. त्यांना व त्यात सहभागी असलेल्यांना विविध आमिषात मोहात गुंतवले जाते. पर्यायाने तिथून त्या चळवळीचा र्‍हास घडवून आणला जात असतो. आम आदमी पक्ष त्याला अपवाद ठरण्य़ाचे काही कारण नव्हते. पहिल्याच फ़टक्यात त्या पक्षाला जे यश मिळाले, त्यातून जे नेतॄत्व उदयास आले, त्याच्याकडून अधिक भ्रष्टाचार व मस्तवाल वागणे झाल्यास म्हणूनच नवल नव्हते. अलिकडेच या पक्षाने जुन्या व आरंभापासून संघटनेत असलेल्या कार्यकर्त्यांना टांग मारून दोघा उद्योगपती व भांडवलदारांना राज्यसभेच्या जागा विकल्या. ती लोकपाल चळवळीच्या अस्ताची पावती आहे. खरे तर पहिल्या विधानसभा निवडणूकीत त्या पक्षाला यश मिळाल्यावरच त्याची घसरण सुरू झालेली होती. कारण नंतर त्याचे नेतृत्व एकामागून एक सत्तालोभामध्ये फ़सत गेले आणि त्यात मतलबी लोकांची गर्दी सुरू झाली होती. आपण चळवळीला काय देतो, यापेक्षा चळवळीकडून आपल्याला कोणते लाभ होऊ शकतात, अशा लोकांची वर्दळ संघटना वा चळवळीत सुरू झाली म्हणजे त्या चळवळीच्या हेतूचा अस्त होत असतो. हिटलरने आपल्या ‘माईन काम्फ़’ ग्रंथामध्ये त्याचा इशारा देऊन ठेवला आहे. तो म्हणतो,

‘एखाद्या चळवळीमध्ये अधिकाराच्या जागा आणि मानाची पदे, बिरूदे जितक्या मोठ्या प्रमाणात वाटण्यात येतात, तितक्या प्रमाणात त्या चळवळीकडे निकृष्ठ दर्जाचे लोक आकर्षित होऊ लागतात. शेवटी तर असले बुभूक्षित इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी पक्षामध्ये गर्दी करतात, की पूर्वीच्या काळातील झुंजार प्रामाणिक कार्यकर्त्याला हाच तो आपला पक्ष हे ओळखू देखील येईनासे होते. जेव्हा असे घडते तेव्हा त्या पक्षाचे जिवीत कार्य संपुष्टात आले असे खुशाल समजावे.’ योगायोगाने त्याला भारतातल्या एका सामान्य कार्यकर्त्यानेही पुढल्या काळात दुजोरा दिलेला होता. त्याचे नाव आर, जी, रुके असे आहे. रुके हे आंबेडकरवादी कार्यकर्ते. आरंभीच्या रिपब्लिकन पक्षातले धडाडीचे कार्यकर्ता होते. मुंबई रिपब्लिकन पक्षाचे चिटणिस म्हणूनही त्यांनी काम केलेले होते. १९६७ सालात सत्ताधारी कॉग्रेस पक्षासोबत आंबेडकरी पक्ष वा चळवळीने राजकीय युती करावी, असा प्रस्ताव आला होता. तेव्हा रुके यांनी दिलेला इशारा मान्य झाला असता, तर ती चळवळ व पक्ष इतका विस्कटून गेलाच नसता. त्या युतीनिमीत्त झालेल्या बैठकीत रुके म्हणाले होते, ‘आज आपला पक्ष स्वाभिमान आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यासमोर कुठल्याही प्रकारचे आमिष नाही. ते सत्तेपासून दूर आहेत म्हणूनच ते ताठ आहेत. कॉग्रेसच्या आहारी आपण गेलो तर कार्यकर्त्यांना स्वार्थाची लागण लागेल. त्याच्या स्वार्थापुढे पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची जागा कॉग्रेस घेई्ल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल. हे नाकारायचे असेल तर येत्या जिल्हा परिषद निवडणूकीत कॉग्रेस बरोबर युती करू नये. युती केली तर तो आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला असे होईल आणि आत्मनिर्भर आंबेडकरी चळवळ संपुष्टात येईल.’

आज पन्नास वर्षानंतर रुके यांचे शब्द किती नेमके व खरे ठरले आहेत, त्याची साक्ष आपल्याला बघायला मिळते आहे. रिपब्लिकन पक्ष शेकडो गटातटात विभागला गेला आहे आणि आंबेडकरी चळवळ तर जितके नेते तितके गट अशी विस्कटून गेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा पाव शतकातला नेता आज जिग्नेश मेवाणी या गुजराती तरूणाच्या वा नक्षली गटांच्या मागे भरकटला आहे. रामदास आठवले सत्तेच्या परिघात फ़िरत बसले आहेत आणि सामान्य आंबेडकरी जनता गोंधळलेली आहे. आपापल्या स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसायला असे नेते मागेपुढे बघत नाहीत, ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. दुसरीकडे तशीच वाताहत चळवळकर्ते म्हणवून घेणार्‍या प्रत्येक विचारसरणीच्या गटांची आहे. शेकड्यांनी असे गट मग आपापली पोळी भाजून घेण्यासाठी संयुक्त आंदोलने परिषदा भरवतात. पण आपापले स्वार्थ साधून झाल्यावर हेतूला हरताळ फ़ासून मोकळे होत असतात. दोघा उद्योगपती भांडवलदारांना केजरीवाल यांनी पक्षातर्फ़े राज्यसभेची उमेदवारी दिली, तेव्हा त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास, योगेंद्र यादव किंवा कपील मिश्रा यांनाही केजरीवालना ओळखणे अशक्य झाले. त्यांना आपणच स्थापन केलेला हा आम आदमी पक्ष आहे काय, अशी शंका आली. पण त्याची सुरूवात खुप आधी झालेली होती. चार वर्षापुर्वी आशुतोष वा तत्सम काही लोक त्या पक्षात येऊ लागले आणि त्यांचीच वर्द्ळ सुरू झाली; तेव्हाच लोकपाल आंदोलनाचा र्‍हास सुरू झाला होता. त्याचा कार्यकारणभाव निकालात निघालेला होता. त्या आंदोलनातली भाषा, उर्जा, घोषणा व लोकप्रियतेला बाजारात विकायला काढलेले होते. त्याचे भान अशा जुन्यांना तेव्हाच आले असते, तर पक्ष वाचला असता. रुके यांनी पन्नास वर्षापुर्वी मांडलेली भूमिका आपच्या कुणा नेत्याला घेता आली नाही आणि तो पक्ष व त्यामागचा हेतू कधीचाच लयास गेला आहे.

सवाल एका संघटनेचा वा आंदोलनाचा नसतो. अशा आंदोलनातून लोकांच्या अपेक्षा पालवलेल्या असतात आणि त्यांच्या आकांक्षा ही त्या चळवळीची खरी उर्जा असते. ती मावळली मग पुन्हा जागृत व्हायला दिर्घकाळ जावा लागत असतो. म्हणूनच त्यामागे असलेली जनभावना जपून हाताळण्याची गरज असते. त्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला त्याचे प्रत्येक क्षणी भान राखावे लागते. अन्यथा ती उर्जा आपल्या मतलबासाठी वापरून, मग तिलाच उकिरड्यात फ़ेकून देणारे संधीसाधू तिथे गर्दी करीत असतात. आपल्या व्यावसायिक प्रभावापुढे सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला नामोहरम करीत असतात. तिथेच चळवळीचा र्‍हास सुरू होत असातो. रुके यांनी जो इशारा दिला तो अमान्य झाला आणि पुढल्या काळात सत्तापदांसाठी एक एक रिपब्लिकन कार्यकर्ता नेता कॉग्रेसच्या आहारी गेला. अगदी खुद्द रुकेही त्यातून वाचले नाहीत. आज म्हणून तर मेवाणी वा खालिद उमर यांच्यामागे फ़रफ़टण्यात आंबेडकरी चळवळ खुश आहे. कारण तिला कोणी विश्वासार्ह नेता राहिलेला नाही. नक्षली गटांनी त्यात शिरकाव करून घेतला आहे आणि आंबेडकरी विचारांचे व प्रतिकांचेही अपहरण केलेले आहे. हेच दलित पॅन्थरचे झाले होते आणि प्रत्येक ऐक्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे झाले. जनता दल वा पक्ष म्हणून पुढे आलेल्या मुळच्या समाजवादी चळवळीचा र्‍हास तसाच होत गेला आहे. त्यापासून कटाक्षाने अप्लित राहिलेल्या साम्यवादी वा कम्युनिस्ट पक्षाचीही त्यापासून सुटका झाली नाही. प्रकाश करात वा सीताराम येच्युरी अशा उथळ नेत्यांच्या मतलबामुळे डाव्या चळवळीला स्थान उरले नाही. त्यातही मतलबी लोकांची वर्दळ वाढली. कॉग्रेसची पाळेमुळे खुप खोल रुजली असल्याने तिचा र्‍हास व्हायला दशकांचा कालावधी लागला आहे. यापासून आपल्या संघटनेला काळजीपुर्वक बाजूला राखण्यामुळे रा. स्व. संघ मात्र भरभराटला आहे.

भाजपा हा संघाच्याच मुशीत तयार झालेल्यांचा राजकीय पक्ष असला तरी त्यालाही संघाने आपल्या व्यावहारीक कामकाजापासून दुर ठेवलेले आहे. भाजपाला संघामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. पण संघाला आवश्यक असेल तेव्हा संघाचे काही नेते भाजपात हस्तक्षेप करीत असतात. सत्तेच्या चक्रात फ़िरणार्‍या संघाच्या भाजपातील कुणाही नेता कार्यकर्त्याला संघाच्या धोरणात्मक व्यवहारात समावून घेतले जात नाही. त्यामुळे़च संघ अजून टिकला आहे व विस्तारतो आहे. भाजपाच्या राजकीय दौडीला संघ मदत करतो. पण सत्तेच्या कर्दमात रुतलेल्यांना संघ आपल्यात येजा करू देत नाही. बाकीच्या चळवळी वा संघटनांची तिथेच गोची झालेली आहे. सत्तेतच रमलेले लोक चळवळीचे निर्णय घेत असतात आणि आपल्या राजकीय गरजेनुसार चळवळीला वाकवत मोडतही असतात. केजरीवाल एकाचवेळी मुख्यमंत्री असतात व चळवळीचे कार्यकर्तेही असतात. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर वा मेवाणी, कन्हैयाकुमार यांच्यात किंचीतही फ़रक नाही. चळवळ व राजकारण यांची गल्लत केली म्हणून त्यांना त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यांना म्हणूनच आमिष दाखवून वाटेल तसे वळवता येते वा वाकवताही येते. कॉग्रेसने या चळवळींना किती सहजगत्या आपल्या राजकीय हेतूसाठी वापरले, ते वारंवार दिसलेले आहे. आताही डाव्या संघटनांनी मेवाणी वा आंबेडकरी लोकांना बिनधास्त वापरून घेतले. त्यात तात्पुरते समाधान नक्कीच मिळते. जोश चढतो आणि तो ओसरल्यावर आपण कुठे आहोत, त्याचाही थांगपत्ता लागत नाही. म्हणून चळवळीला सत्तास्पर्धेपासून कटाक्षाने दूर ठेवावे लागते. पक्ष संघटना चालवताना त्यात मतलबी लोकांच्या हाती सुत्रे जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. भीमा कोरेगाव घटनेनंतरच्या चर्चा व वक्तव्ये बघितली, तर आंबेडकरी चळवळ आंबेडकरी नेत्यांच्या हाती तरी शिल्लक राहिली आहे काय, याची म्हणूनच शंका येते.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...