Monday 9 July 2018

दलित पँथर इतिहास

*दलित पँथरचा इतिहास *

"जो समाज इतिहास विसरतो , तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही"
  --डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरी चळवळीचा सुवर्ण काळ म्हणजे दलित पँथर चा काळ....दिनांक २९मे१९७२ रोजी दलित पँथर चा जन्म झाला. त्या काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले ...!
            बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेशी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा देत होता. तो छोटासा काळ होता. परंतु त्यांनी शासनाला जाग आणली होती. राजकीय पक्षांना भानावर आणले होते. उपेक्षितावरील अन्यायला वाचा फोडली होती. अन्यायी प्रवृतीची नांगी ठेचली.. !
              दलित पँथरचा लढ़ा केवळ संपत्तीसाठी नव्हता. तो होता घटनात्मक अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी, तो होता समतेची प्रस्थापना करण्यासाठी, तो होता स्वातंत्र्याचे मोल जपण्यासाठी, तो होता समाजात बंधुभावना निर्माण करण्यासाठी, तो होता माणसाला माणुसपण बहाल करण्यासाठी, तो होता श्रमाला, घामाला किंमत मिळवून देण्यासाठी ....
प्रतिष्ठा देण्यासाठी.. !
          त्यामुळेच खैरलांजी, सोनई, खर्डा, अणि आता शिर्डी सारख्या घटना घडल्यास आपसुकच उच्चारले जाते "आज दलित पँथर सारखी जहाल संघटना असती तर..... !"
दलित पँथर संघटना स्थापन होण्यास कारणीभूत ठरलेल्या घटनांपैकी एक घटना म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील बावडा गावात घडलेली घटना! संपूर्ण गावाने तिथल्या बौद्ध समाजातील लोकांवर बहिष्कार टाकला होता. त्याच वेळेस परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगांव या ठिकाणी माणुसकीला कलंक लावणारा प्रकार घडला .
१४मे१९७२ ला बौद्ध वस्तीतील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. कारण काय तर विहीरीवर पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून.. त्यांच्या गुप्तांगवर बाभळीच्या काट्यांचे फटके मारत गावभर नग्न फिरवण्यात आले.. !
         त्यातच एक घटना घडली ती म्हणजे १० एप्रिल १९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. सद्सद्विवेक बुद्धी असलेल्या माणसाची मान शरमेनं खाली जावी असा तो अहवाल होता. माणूसकीला काळीमा फासणारा असा तो अहवाल होता. अन्याय करणारे काँग्रेसवाले होते, ब्राह्मण, ब्राह्मणेतर होते.
त्या अहवालानुसार एका वर्षात देशभर १हजार१७७ दलितांचे खून झाले. असे नोंदविण्यात आले होते. प्रत्यक्षात ही संख्या ११हजार पेक्षा जास्त होती. दलित स्त्रियांची धिंड काढ़ायचे, बलात्कार करायचे, पाणवठे बाटवले म्हणून बेदम मारहाण करणारे, पाटलासमोर नवीन कपडे घालून आल्यामुळे चाबकाचे फटके खाणारे, पायात चप्पल घातली म्हणून चपलेने तोंड फोड़णारे, ज़मीन बळकवणारे, मजुराना कायमचे दास्यात ठेवणारे, दलितांच्या पाणवठयावर विष्टा टाकणारे अनेक प्रकार नोंदविण्यात आले होते ! तसेच शहरातील सुप्त जातीयवादाचे दर्शन या अहवालात करण्यात आले होते...!
      मुंबईतील अलंकार सिनेमा ते ओपेरा हॉउस दरम्यान चालत असताना ज. वि. पवार व नामदेव ढसाळ यांनी निर्णय घेतला की अशा अन्याय अत्याचारला पायबंद घालण्यासाठी एखादी जहाल संघटना स्थापण्याचा.. ! म्हणजे दलित पँथर चा जन्म रस्त्यात झाला अणि लढ़े उभारले ते ही रस्त्यावर उतरुनच....! दलित पँथर ची स्थापना जरी ढसाळ व ज. वि. पवार यांनी केली असली तरी त्याचे संवर्धन राजा ढाले यांनी केले. त्यांनी संघटन वाढवले ...!
         स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात राजा ढालेनं साधना या साप्ताहिकात लिहीलेला "काळा स्वातंत्र्यदिन" लेख हा वादळी ठरला !  त्यांनी आपल्या लेखात म्हटले, "ब्राम्हणाच्या बाई चा कसोटा ब्राम्हणगावात सोडला जात नाही, जातो बौद्ध स्त्रीचा! नी याला शिक्षा काय, तर एक महीना शिक्षा नाहीतर ५० रूपए दंड..! साला राष्ट्रगीताचा अपमान केला तर उठून उभा नाही राहिले तर ठीक नाही ३०० रुपये दंड, प्रतिकांचा अपमान झाला तर दंड नी सोन्ना गावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या बोलत्या स्त्रीचे पातळ फेडलं तर ५० रूपए दंड। ( पुढचे वाक्य ग्रुप वर भगिनी असतात म्हणून प्रस्तुत केले नाही) अशी जहाल टिका साधना मासिकातुन केली..!
       दुर्गा भागवत ह्या त्या काळचे मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी एका सभेत वक्तव्य केले की "वेश्या व्यवसाय हा समाजासाठी आवश्यक आहे पुरुषी
वासनांची पूर्तता करुन वेश्या समाजाचा तोल सांभाळत आहेत त्यामुळे वेश्या व्यवसायला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.."त्या वर एक युवक उठून म्हणाला की "मग त्या व्यवसायची सुरवात तुमच्या पासून होऊ द्या" तो युवक होते राजा ढाले. ह्या घटनेने खळबळ माजवली.
         वरळी नायगांव येथे  पँथर ची सभा होणार होती. शिवसेनेने  वरळी नाक्यावर एक फलक लावला होता त्या फलकावर हिंदू देवदेवतांची निर्भत्सना करणाऱ्या पँथरला धडा शिकवण्याचा जाहीर आश्वासन देण्यात आले होते . या फलका मुळे वातावरण संतप्त झाले होते.
सभेच्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण होते. ढसाळ यानी भाषणात त्रिशूलचा उल्लेख केल्यावर एक दगड स्टेज वर पडला. त्यांच्या भाषणानंतर राजा ढाले माईक जवळ येताच प्रचंड दगडाचा वर्षाव झाला. तो पूर्व नियोजित होता . ज.वि.पवारांनी पोलिसांना आवाहन केले की गुंडाना अटकाव घालावा. मात्र पोलीस सभेला आलेल्या लोकांवर लाठीमार करू लागले. एका पोलिसाने स्पीकर बंद करण्यास सांगितले. (पोलिसांच्या मुलांनी आपल्या वडिलांचे गणवेश घालून लाठीमार केला असे बोलले जाते) दगडांचा भडीमार सुरु होता.
पोलिसांचा निषेध करण्या साठी स्त्रियांचा प्रचंड मोर्चा निघाला. दगड ज्या दिशेने येत होते तेथे पोलिस पाठवा. असे ढाले यांनी डी.सी.पी. ना सांगण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर प्रचंड लाठिहल्ला केला. ढाले रक्तबंबाळ झाले. त्यांचे हाताचे एक बोट मोडले. दयानंद म्हस्के जख्मी झाले. दंगलीचा आगडोंब उसळला.
कोंग्रेस - रिपब्लिकन युतीचा धिक्कार पोलिस राजचा धिक्कार, आंबेडकरांचा विजय असो.. अशा घोषणा देत होते.
स्त्रियांच्या मोर्चावर इमारतींच्या गच्चीवरुन दगड, सोडा वाटरचे बाटल्यांचा वर्षाव होत होता. वरुण मसाला वाटायचा पाटा कुणीतरी सोडला. तो एका वृद्ध आजीवर पडणार तोच भागवत जाधवाने तो आपल्या अंगावर झेलला! भागवत रक्ताच्या थारोळयात पडला. शहीद झाला !
     
दलित पँथर ही चळवळ संपूर्ण भारतभर फोफावू लागली दलित पँथर च्या छावण्या अनेक राज्यात सुरु झाल्या त्यामधे दलित पँथर गुजरात, दलित पँथर दिल्ली, दलित पँथर मद्रास, दलित पँथर मध्यप्रदेश, दलित पँथर आंध्र प्रदेश, दलित पँथर कर्णाटक,दलित पँथर पंजाब व भारताबाहेर लंडन येथे दलित पँथर ची स्थापना झाली.
        पँथर नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार, अविनाश महातेकर, अरुण कांबळे, दयानंद म्हस्के, के बी गमरे(लंडन), गंगाधर गाड़े, भाई संगारे, रामदास आठवले, उमाकांत रणधीर, चेंदवंकर, एमेस अंधेरीकर, अरविन्द निकाळजे, दादाभाऊ साळवे, रतन कुमार पाटलीपुत्र, सी.रा.जाधव असे अगणित खेड्या पाड्यातील युवक तसेच युक्रांद चे कुमार सप्तर्षि, हुसेन दलवाई,भालचंद्र मुणगेकर यांना व त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...!
        पँथरच्या त्यागाची आठवण करुन देणेे हाच या लेख संकलित करण्या मागचा हेतु आहे ...!
इतिहास माहित नसेल तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही...
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...