Monday 9 July 2018

सेक्युलर बतावणी, जातीयतेची लावणी...!





देशाच्या पंतप्रधानपदाच्या दिशेनं वाटचाल करू पाहणाऱ्या शरद पवारांनी आपल्या राजकीय चालीनं काँग्रेसवाल्यांची सुस्ती आणि युतीवाल्यांची मस्ती उतरवलीय. त्यांनी आपला राजकीय हिशेब कसा चोख आहे, त्यांचं नेतृत्व-नाणं कसं खणखणीत आहे , याची माहिती ते आपल्या वागण्यातून देताहेत. शरद पवारांना महाराष्ट्राची सत्ता पुनःश्च संपादनाचं उत्तर सापडत नव्हतं तोपर्यंत त्यांनी भाजपेयी सरकारपुढं कोणताही प्रश्न निर्माण केला नव्हता. पण राष्ट्रवादीच्या हल्लाबोल अभियान आणि वर्धापनदिन याच्या माध्यमातून भाजपविरोधी सर्व राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवलाय. प्रामुख्यानं जातीव्यवस्थेचं राजकारण, दलित-मुस्लिम झुंडीच्या जोरावर ते आता विधिमंडळातिला विरोध रस्त्यावर आणून भाजप शासनाला जेरीला आणतील. शरद पवारांची ही खेळी राष्ट्रवादी-काँग्रेस यांना सत्तेच्या दिशेनं झेप घेण्याचं बळ देणारी असली तरी महाराष्ट्राचं समाजमन नासवणारी आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत समतेचा कितीही नारा केला तरी आजचा रिपब्लिकन पक्ष हा पक्का जातीयवादी पक्ष आहे. त्यात बौद्धेतरांना आणि इतर मागासवर्गीयांना थारा नाही. तेव्हा इतरांची बातच सोडा! ही बाबासाहेबांच्या विचारांशी केलेली गद्दारी आहे. भारतीय राजकारणात प्रबळ विरोधीपक्ष असावा या उद्देशानं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष स्थापनेचा मनोदय जाहीर केला होता. भारतातील सर्व विचारांच्या, धर्माच्या समाजाला सामावून घेणाऱ्या या पक्षाची रूपरेषा त्यांनी लिहिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या 'शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' बरखास्त करण्याची तयारी केली होती. या नियोजित पक्षात डॉ. लोहिया, एसेम जोशी, आचार्य अत्रे यांनी सहभागी व्हावं; त्याचं नेतृत्व करावं अशीही डॉ. आंबेडकरांची इच्छा होती. तशी विनंती करणारी पत्रं त्यांनी लिहिली होती, पण त्याच रात्री बाबासाहेबांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या नांवावर अनेक दलित पुढारी गब्बर झाले, पण बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्ष स्थापनेमागची वैचारिक विशालता प्रत्यक्षात आणण्याची दानत त्यांनी कधी दाखवली नाही. उलट ज्यांच्या विरोधात बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा इरादा व्यक्त केला होता त्याच काँग्रेसनं सत्तामायेचा तुकडा दाखवताच ह्या पुढाऱ्यांनी शेपट्या हलवत काँग्रेसच्या वळचणीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उभं राहण्यात धन्यता मानली. आंबेडकरांच्या नावानं भोळा दलित बांधव गोळा करायचा आणि राजकारणातल्या घोडेबाजारात आपला भाव मिळवायचा. हा दलित पुढाऱ्यांचा व्यवहार दलित समाजालाही कळत असला तरी त्यांचीही भावनिक लाचारी आहे. तेही आपल्या जातीपलीकडचे नेतृत्व स्वीकारायला नाहीत. काहींचा अपवाद वगळता सर्वच दलित बांधवांना आपल्या कल्याणाचा विचार करणारा नव्हे तर आपल्या  जातीचाच नेता पाहिजे असतो. म्हणूनच सत्तेची किमती पदं भूषवलेले, आलिशान गाड्यातून हिंडणारे, छोट्या छोट्या इस्टेटी करणारे जे नेते आहेत ते दलित कसे, हा प्रश्न त्यांना बोचत नाही. शेंदूर फासलेल्या दगडांना देव बनवून भाबड्या भक्तांना बसप-पुण्याची भीती दाखवणारे ब्राह्मण्य जेवढं तिरस्करणीय आहे. तेवढंच काही मिळण्याच्या इराद्याने दलितत्व कुरवाळत राहणंही लांच्छनास्पद आहे. दलितत्व ही सामाजिक परिस्थितीनं लादलेली गुलामी आहे, याची जाणीव होताक्षणी ते झटकलं पाहिजे, असा आग्रह धरणारा आंबेडकरांचा विचार आहे. दलित म्हणून जगणं, लढणं आणि मरणं यात कसली आहे अस्मिता? असा मूलभूत प्रश्न नष्ट करण्यासाठी काही पवारांनी रिपब्लिकनांशी युती केली नव्हती. हे लक्षांत घेतलं पाहिजे!

दलितत्व आणि मुस्लिमत्व धगधगतं ठेवून स्वार्थाच्या पोळ्या भाजणाऱ्या दलित-मुस्लिम पुढाऱ्यांना पटवून भाजप विरोधात मत तयार करणारी पवारांची ही खेळी पुरोगामी, निधर्मी असूच कशी शकते? ती जातीय आहे, धर्मीय आहे. राष्ट्रवादीतल्या सहकारसम्राटांना राजकीय आधार संपल्यानं त्यांची भ्रष्ट संस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना वाचविण्यासाठी गोरगरीब दलित-मुस्लिमांची मतं कामाला यावी अशी त्यांची खेळी आहे. पवारांची काँग्रेस पूर्वी दलित-मुस्लिमात फूट पडून सत्तालाभ घेत होती. आता बचावासाठी देखील त्यांचाच वापर केला जातोय. त्यासाठी त्यांनी शिवसेनेलाही आवाहन केलंय. यातूनच सत्तालालसा स्पष्ट होतेय.

शरद पवारांनी भाजपला शह देण्यासाठी उघडपणे 'पगडी'चं जातीय चाल खेळलीय! ही त्यांच्या राजकारणाची अधोगती आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींना राज्यसभेवर नेमल्यानंतर त्यांनी जे मतप्रदर्शन केलं होतं याचं स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. पवारांच्या 'पगडी' राजकारणाला यापुढच्या काळात तितक्याच तीव्रतेनं प्रत्युत्तर देणारं लोकमन तयार झालेलं पाहायला मिळेल. अर्थात एखाद्या जात धर्माला दुसरा जात धर्म हे उत्तर नाही. तो अधर्म आहे. या अधर्माचं भान सर्वधर्मसमभावी शरद पवार ठेवत नसतील तर त्यांच्या जातीय खेळीला प्रत्युत्तर देणाऱ्यांनी तरी ठेवायला पाहिजे. धर्म धर्माभिमान्यांनीच जागवायचा असतो!

पवारांना दिल्लीनं नेहमीच हुलकावण्या दिल्या. पवारांना दिल्लीत स्थिरस्थावर करण्यात सुरेश कलमाडी जेवढे सहाय्यभूत ठरले होते तेवढी किमया प्रफुल्ल पटेल करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती पवारही मान्य करतील. देवेगौडा प्रधानमंत्री झाले तेव्हा कर्नाटकातून त्यांनी केवळ १५ खासदार निवडून आणले होते. परंतु महाराष्ट्रातून ३७ खासदार जिंकून आणणाऱ्या पवारांना मात्र काँग्रेसचं संसदीय नेतेपद मिळण्यासाठी १५ दिवस ताटकळत राहावं लागलं होतं. आणि वेळ येताच पवारांना दूर सारून थेट सोनिया गांधी सरकार बनविण्यास सिद्ध झाले होते. म्हणूनच पवारांनी विदेशीचा मुद्दा काढून राष्ट्रवादीची निर्मिती केली.इथं तत्वांचा मुद्दा नव्हता तर पदाचा होता! हा इतिहास कसा विसरता येईल. इंदिरा गांधींच्या विरोधात दहा वर्षे राजकारण करणाऱ्या शरद पवारांबाबत दिल्लीतले काँग्रेसवाले अजूनही साशंक आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या मुपणार, चिदंबरम यासारख्या नेत्यांना काँग्रेसमध्ये जेवढी आस्था दाखवली जाते तेवढी शरद पवारांबद्धल नाही. यश मिळवूनही अपयशी होण्याचे दिवस आता पवारांनीच संपविले पाहिजेत. दिल्लीतही मराठीबाणा दाखवला पाहिजे, त्यासाठी नुकसान सोसायलाही हरकत नाही. स्वाभिमानानं जे गमावलं त्यानं महाराष्ट्राची व आपली शान राहील. मात्र अपमानित होऊन जे कमवाल त्यानं आपल्याबरोबर  महाराष्ट्राचीही लाज जाईल. हे सांगण्याची वेळ शरद पवारांनी महाराष्ट्र मंडळींवर आणू नये.

शरद पवारांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांना व भुजबळांना घालण्यात आलेल्या पुणेरी पगडीच्या ऐवजी फुले वापरीत तशी पगडी म्हणजेच पागोटे यापुढील काळात घातली जावी असं फर्मान कार्यकर्त्यांना सोडलं. त्यामागे त्यांची भूमिका काय असावी याचा अंदाज कार्यकर्त्यांना आला. आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष अशी ओळख होती. ती बदलण्यासाठी ओबीसीतल्या माळी समाजाला बरं वाटावं म्हणून फुलेंचा असाही वापर त्यांनी केला. त्याच बरोबर भुजबळांच्या खांद्याचा वापर करीत भाजप, ब्राह्मण व उच्चवर्णीयांवर शरसंधान केलं. त्यांच्या या क्रियेच्या प्रतिक्रिया लगेचच उमटल्या. त्यानं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. त्यामुळं लगेचच त्यांनी पुण्यातच त्याबद्धल सारवासारव केली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळीला कृतिशील साथ देणारे अनेक उच्चवर्णीय होते. सावित्रीबाई फुले यांची मुलींची शाळा भिडे वाड्यात भरली होती. ज्या वरातीत फुले असल्यामुळे गोंधळ उडाला त्या वरातीत त्यांना आमंत्रित करणारा मित्र परांजपे होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यता निवारण आंदोलनात सहस्रबुद्धे, श्रीधरपंत टिळक, म.वि.चिटणीस यांच्यासारखे अनेक उच्चवर्णीय त्यांच्या साथीला होते. पोलादी विचारांच्या माणसांना अन्य विचार-वृत्तीचं भय नसतं. प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या फुले-आंबेडकरांना ते नव्हतं. पवारांनी जे पगडी नाट्य रंगवलं त्यामागं समतेचा विचार नव्हता. तो निव्वळ जातीवाद होता!

अनुकूलतेच्या बळावर जातीयतेचा बागुलबुवा दाखवत आपला कचकडीपणा जपणाऱ्या आजच्या राजकीय पुढाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? आपल्या रंगढंगांना कुरवाळणाऱ्यांना इतर रंगाचं भय कायम राहणार! जेव्हा सर्व रंग मिसळतात, तेव्हा सूर्य उगवतो. निवडणूक येताच सोयीचा युती-आघाडीसाठी क्रांतीचा लोलक दाखवून रंग कसे मिळणार?, भाजपला लोळविण्यासाठी जे काही पवारांनी चालवलंय त्यानं कुणाचा फायदा होणार आहे? कोणता सामाजिक फायदा शरद पवार यांच्या खेळीमुळं होईल? जातीधर्माचा विचार न करता अवघ्या मराठी माणसांसाठी काही करतील तर अवघा महाराष्ट्र त्यांना साथ देईल.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची दशा-दिशा भिन्न असली तरी दोघांनाही चाहणारे, त्यांचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी झटणारे प्रचंड संख्येनं आहेत.  दोघंही लोकनेते ! परंतु सत्ताकारणासाठी ते दोघं समोरासमोर ठाकल्यानं एकाचं यश हे दुसऱ्याचं अपयश ठरलं. दोघांचंही राजकीय चलनवलन पाहता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्या एकाच नाण्याच्या फोन बाजू होत्या. फरक इतकाच, ठाकरे काटा काढून आपली छाप पाडत; तर पवार आपली छाप पाडून काटा काढतात. ठाकरेंची खेळी उघड होती; तर पवारांची खेळी नेहमीच छुपी असते. छुपेपणानं खेळया करणं ही पवारांची मजबुरी आहे. काही असो दोघांचंही राजकारण प्रभावी होतं. बाळासाहेब प्रथम प्रश्न निर्माण करीत आणि मग उत्तर शोधित; तर पवार प्रथम उत्तर शोधतात आणि मगच प्रश्न निर्माण करतात हे त्यांच्या आजवरच्या राजकारणातून दिसून आलंय. 'पगडीनाट्य' मागे पवारांची हीच खेळी आहे.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...