संभाजी राजा हा निव्वळ बदफैली, विलासी, रंगेल आणि नशेबाज होता......!"
पुणे दिल्ली असा विमान प्रवास सुरु होता. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या दोघा तरुणांचा हा संवाद कानावर पडला, मी मागे वळून रागानेच त्यांच्याकडे पाहिलं, पण मी रागानं त्यांच्याकडं का पाहतोय हे त्यांना समजेना! मी जागेवरून ऊठलो आणि त्यांच्याजवळ गेला त्यांच्याशेजारी बसलेल्या परप्रांतीय व्यक्तीला माझ्याजागेवर बसण्याची विनंती केली आणि त्याच्या जागेवर जाऊन बसलो. त्या दोघांची विचारपूस केली दोघेही मराठी होते, सॉफ्टवेअर इंजिनिअर होते, कामासाठी ते दिल्लीला निघाले होते. विमानतळ गाठण्याचा वेळात येरवड्याजवळ शंभूराजांची पुरंदरहुन तुळापूरकडे निघालेल्या पालखीमुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे त्यांना विमानतळावर यायला थोडा उशीर झाला होता. त्यासाठी त्यांची ही बडबड सुरू होती. मी शांतपणे आस्थेनं त्यांची चौकशी केली, शंभू राजांबद्दल त्यांना काय माहिती होती? त्यांच्याबद्धल काही वाचलंय का? त्यांना संभाजी राजांची कितपत माहिती होती हे सारं जाणून घेतल्यानंतर त्यांचं अज्ञान दिसून आलं, त्या बिचाऱ्यांचं काय चुकलं? त्यांना तेच शिकवलं गेलंय, सिनेमा, नाटकातून, प्रसिद्धी माध्यमातून हेच चुकीचं चित्र संभाजीराजांचं रंगविण्यात आलेलं आहे. मी त्यांना संभाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाची थोडीशी झलक ऐकविली ते स्तब्ध झाले. त्यांना हे सारं नवीन होतं. त्यांनी त्या प्रवासात राजांची अधिक माहिती मिळावी म्हणून त्रोटक पण परिणामकारक असं चरित्र ऐकवलं आणि नव्यानं संशोधन करून राजांसंदर्भात केलेलं लेखन वाचण्यासंदर्भात पुस्तकांची नावं सांगितली. अज्ञानातून अनाहूतपणे राजांविषयी केलेल्या शेरेबाजीबद्धल माफी मागितली आणि ही पुस्तकं आणून नक्की वाचू असा विश्वासही त्यांनी दिला. मला बरं वाटलं, दोघांचं मतपरिवर्तन करू शकलो! पण प्रवासाच्या अखेरपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना दिसत होती.
*अस्सल पुरावे जाळले गेले*
मी त्यांना सांगत होतो, "शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे ! संभाजी महाराजांबद्दल अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत लिखाण केलंय. संभाजीराजांच्या वधानंतर झुल्फीकारखानाने रायगडचा पाडाव केला व तेथील सर्व दप्तरखाना व कागदपत्रे जाळून नष्ट करून टाकली त्यामुळे सर्व पुरावेच नष्ट झाले. विकृत व चुकीच्या लिखाणामुळे समाजात शंभूराजांबद्दल बरेज गैरसमज निर्माण झाले. आज ही चुकीच्या इतिहासामुळे आपण अजूनही एकात्म होऊ शकलो नाही; परंतु औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजीराजांबद्दल केलेले वर्णन जेव्हा उजेडात आले त्यानंतर मात्र आमचे डोळे उघडले. खाफीखानाने संभाजीराजांचे वर्णन `सत्तेची नशा चढलेला राजा' असे केले; पण ग्रँड डफ याने या वाक्याचा `ध' चा `मा' केला व `दारूची नशा चढलेला राजा' असे केल्याने `संभाजी म्हणजे रंगेल' राजा असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकावा लागला.
*औरंगजेबाला २७ वर्षे झुंजवलं*
धर्मवीर संभाजीराजे ! महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते. औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.
*फितुरीने महाराजांचा घात केला*
संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे. संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान ! संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला, या फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला. जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.
*गवताला भाले फुटले*
संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच. " श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे."
*शंभुराजांवर इतका राग का?*
त्या दिवशी बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि त्यांच्यापैकी एक तरुण म्हणाला की , ' शिवाजीने जितके केले , ते सगळे संभाजीने फुकट घालवले. आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणि गाण्या-बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.' बस्स आणखी काही माहिती नाही. मी त्यांना म्हणालो, "पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली, ह्यामुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता?" ते दोघे निरुत्तर होते
*हजरजबाबी शंभूराजे*
'काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई , सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही. शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो. शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , 'हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत.' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.
*अकबराला शंभूराजांचा आसरा*
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]
*घरातील बेबनावाचा फटका*
युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठा अपमान झाला असेल? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.
*चौकट*
*सारे पराक्रमी अल्पायुषी*
मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज (वय वर्ष ३२) , विश्वासराव पेशवा (वय वर्ष १६) माधवराव पेशवा (वय वर्ष २७) हे मराठ्यांचे पराक्रमी फारच अल्पायुषी होते. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणाऱ्या राजाबद्धल जेव्हा , ''शिवाजीने जितके केले, ते सगळे शंभूराजांनी वाया घालविले....... '' असं बोलून अक्कल पाजळतो तेव्हा साहजिकच चीड येते.
*महापराक्रमी शंभूराजे*
जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा, जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा, आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा, त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला, दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजनकरणारा उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा,इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा, धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा, बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा, शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा, स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा, देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा, सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा, आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा, स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी....
*आरमारांची उभारणी*
पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.
“ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते.आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.जहाज बांधणीचे काम सुरु केले.पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.
*रुद्रासारखे वर्तावे*
छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी राजांना म्हणतात, “त्या रुद्र-शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासहीअसे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केल. तुम्हां-आम्हाला ते प्रसंग पडला तर कैकवेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, ‘राजा हा विष्णूचा अंश आहे’. पण त्यांना ठाव नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच ‘शिवलिंग’ पुजतो.
शंभुराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे...रुद्रासारखेच वर्तावे...!.”संदर्भ - छावा (शिवाजी सावंत )
*शिवाजीराजांनीच छंद जोपासला*
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा थोडा दगदगीचा होता. वयाच्या सातव्या वर्षीच शिवाजीराजांवर मराठ्यांचा संसार उभारण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. ती शेवटपर्यंत कमी झाली नाही. कदाचित यामुळे महाराजांना स्वतःतील साहित्यिक व्यक्त करायला अवधी मिळाला नसावा. खरं तर शिवाजी महाराजही नामवंत कवी होते. त्यांचे फारसी आणि मराठीतील काव्य परदेशातील काही ठिकाणी असल्याचं इतिहास संशोधक सांगतात. त्यापूर्वी महाराष्ट्रापासून तंजावरपर्यंत साहित्य, कला, सांस्कृतिक बाबींना मराठा राजांनी सतत राजाश्रय दिला आहे. स्वतः शहाजीराजे लोककलेला उत्तेजन द्यायचे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी २६ जानेवारी १६७१ मध्ये शंभूराजांना स्वतंत्र राज्यकारभार सोपवितानाच विविध भाषापंडित त्यांच्या दिमतीला ठेवले होते. शंभूराजांची रसिकता आणि साहित्यछंद ज्ञात होता त्यांचा तो छंद जोपासला जावा यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं होतं.
*आग्र्यातील वास्तव्याचा प्रभाव*
संभाजीराजे आग्ऱ्यास गेले होते तेव्हा ते नऊ वर्षाचे होते. त्यांना संस्कृत, फारसी, हिंदी, मराठी, अशा अनेक भाषा ज्ञात होत्या. शंभूराजे आग्रा, मथुरा, वाराणसी, अलाहाबाद अशा गंगा यमुनेच्या परिसरात सुमारे दोन वर्षे वावरत होते. त्याचवेळी त्यांना कनौजी ब्राह्मण असलेल्या कवी कलश हे हरहुन्नरी ब्रजभाषी कवी भेटले. शंभुराजे बुद्धिमान होतेच, त्यांनी विविध भाषा, साहित्याबरोबरच लोकसंगीताचा छंद जोपासला. त्यातूनच त्या कोवळ्या वयात शंभुराजांना मथुरेच्या, वृंदावनाच्या, गोपालांच्या, गवळणींच्या, भक्तांच्या सहवासातून श्रीकृष्ण-राधा भक्तीगीते पाठ झाली असावीत.
*राजांनी शंभूराजांचे दिवस घातले*
अंगावर शहारा येतो..केवढी कठीण साधना..औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडुन महाराज राजगडावर परतले तेंव्हा नऊ वर्षाच्या कोवळ्या शंभुराजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले..आणि शत्रुला हुल देण्यासाठी अफवा उठवली शंभुराजे गेले..एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुधा घातले..काय झालं असेल एका पित्याच्या काळजाचं जेंव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या पिंडाला कावळा शिवताना महाराज बघत असतील..जणु महाराजांना आधीच कळले होते..या माझ्या रुद्रप्रतापी शंभुराजाच्या नशीबात त्याच्या बलीदानानंतर हे कुठलेच विधी नाहीत..ही राज्यसाधना..हा त्याग..हा महायोग..काय लिहावे पुढे...!
No comments:
Post a Comment