"शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसं दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गटारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं."
-----------------------------------------------------
*राजकारणावर चर्चाच!*
भारतातल्या कोट्यवधी माणसांचं दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झालं आहे. कारण असं एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसं असतं, वा कसं असावं?' ह्या परिसंवादाशी फारसे कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा पण करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसं चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतःला क्रियाशील राजकारण फारसं जमलं नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचं 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास कामाच्या निमित्ताने जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात! राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असं आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणं आणि त्यांचे ऐकणं, त्यांच्या मुलाखती घेणं, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणं हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!
*गरजेचे राजकारण*
राजकारण गरजेचं असतं हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असतं, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणं! असं राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहतं. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनंही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरतं. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा केला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे.
'जो बहुतांचे सोसेना।
त्यास बहुत लोक मिळेना।।'
एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना।
महत्व आपुले।।'
अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच
'हिरवटाशी दूरी धरावे।
युद्ध कार्यास ढकलावे।
नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।'
असा इशाराही त्यांनी दिला आहे.
*राजकारणाचे चक्रव्यूह*
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचं ध्येय निश्चित ठरविता येईल; पण त्या ध्येयाच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचं, गुणाकाराचं पण वेळप्रसंगी वजाबाकीचं आणि भागाकाराचं देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेरजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत. इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राच्याही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार?
*विधिनिषेध राहिलेला नाही*
राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा एकदा चर्चा झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना तेव्हा पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जाते आहे, कुणालाही स्वीकारले जाते, याचा कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.
*राजकीय चारित्र्याची चर्चा*
देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य धोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं साऱ्या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावे लागतात आणि सहसा ते सर्व असतातही.
*शील आणि चारित्र्य*
दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे, हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. अढीतल्या आंब्याप्रमाणे हळूहळू समाज नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, " वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे.त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे." आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागली आहे. याउलट याचं जसं पचलं तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको? अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होत आहे आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनात उलटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, टी आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत.आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य धोरणे, वैचारिक बैठक, तत्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम' यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्चर्य वाटायला नको.
- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:
Post a Comment