Friday 28 June 2019

डॉ.लोहियांचा वैचारिक सिद्धांत!

"भारतातलं एक प्रतिभावंत समाजवादी नेतृत्व ज्यांनी कार्ल मार्क्स, साम्यवाद आणि गांधीवाद याचा साकल्यानं विचार करून भारतीय सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीला अनुरूप भारतीय मानसिकतेच्या मुशीत घडवलेला समाजवादी विचार मांडला होता. तो पारंपारिक विचारसरणीच्या तत्कालीन राजकीय नेत्यांच्या पचनी पडला नाही. त्यांना सामाजिक उन्नतीपेक्षा सत्ता महत्वाची वाटली. खरं तर आज ह्या विचारांची देशाला खूप गरज आहे. पण ती वैचारिक बैठक स्वीकारण्याची मानसिकता सध्याच्या राजकारण्यांमध्ये दिसत नाही अशावेळी डॉ.लोहिया यांनी मांडलेल्या देशातील महिलांसाठीच्या 'शौचालय आणि पाणी' च्या समस्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपण काम करत आहोत, असं संसदेत सांगितलं. समाजवादी विचारांची ससेहोलपट होत असताना त्यांचे 'साथी'च त्या विचारांपासून दुरावले असताना डॉ.राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा जागर मोदींनी केलाय. हे ही नसे थोडंकं!"
-----------------------------------------------

 *बि* हारमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहियांचा नेहरू आणि काँग्रेसला असलेला विरोध, त्यांची भारतातल्या महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत, दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्धलची त्यांची भूमिका, यांचा उहापोह केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी 'लोहिया नेहमी महिलांच्या शौचालयाबाबतची अडचण आणि पाण्यासाठी महिलांना  होणारे कष्ट या दोन समस्यांवर नेहमी बोलत. समाजवादी नेते त्यांचं किती ऐकतात हे महित नाही, पण आम्ही त्यांचं अनुकरण करतोय. त्यांनी सांगितलेला शौचालयाचा प्रश्न हाती घेऊन आम्ही तो सोडवतोय. आता जलसंपत्ती मंत्रालय स्थापन करून महिलांना होणाऱ्या पाण्याच्या त्रासापासून सोडविण्याचा प्रयत्न करतो आहोत.' असं सांगून त्यांच्या विचारांचा जागर केला. त्याचवेळी संसदेत विरोधीपक्ष नेत्यांनी मोदींवर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठली. देशाचा विरोधीपक्ष कसा असावा हे जे लोहियांनी सांगितलंय त्याबाबत काँग्रेसनं जरा पाहावं, अधीर रंजन चौधरींनी ते वाचावं म्हणजे विरोधीपक्ष नेत्यांची गरिमा कशी सांभाळायची याचं ज्ञान होईल. डॉ.राममनोहर लोहिया यांच्या एकूण राजकारणाबाबत विरोधीपक्ष म्हणून त्याचं काय म्हणणं होतं ते पाहिलं तर आजचे नेते हे खरंच परिपक्व आहेत काय हे दिसून येईल!

*लोहियांच्या विचारांचा जागर!*
हिंदुस्थानात१८५७ च्या आधीपासूनच सुरू झालेल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी भारतीयांच्या एकाबाजूला खूप मोठ्या अपेक्षा होत्या तर दुसऱ्या बाजूला अनेक साशंकतादेखील होत्या. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांतील अनेक राष्ट्रांना असं वाटतं होतं की, भारत हा लोकशाहीच्या मार्गावर फार काळ काही वाटचाल करू शकणार नाही. असं त्यांना वाटण्याचं एक प्रमुख कारण होतं भारतात असलेली त्याची असाधारण अशी विविधता! त्याचमुळं असं म्हटलं जातं होतं की, एका भारत देशातच अनेक देश आहेत. दुसरं एक महत्त्वाचं कारण होतं, ज्या लोकतांत्रिक, राजनैतिक व्यवस्थेला मजबूत अशा विरोधीपक्षाची जी गरज असते तो विरोधीपक्ष इथं दिसतच नव्हता. या दरम्यान स्वातंत्र्यलढ्यातील काही वरिष्ठ मान्यवर नेत्यांनी सत्तेचा मोह सोडून सत्तेच्या, व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकले; त्यामुळं सक्षम अशा  विरोधीपक्षाची कमतरता त्यावेळी जाणवली नाही. त्या व्यक्तित्वांनी तेव्हा देशात सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या अनेक निर्णयांना आव्हान दिलं. या व्यक्तिमत्वात प्रामुख्यानं घेतलं जातं डॉ.राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांची नांवं!

*वंचितांची भागीदारी वाढली पाहिजे*
समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी १९५३ पासूनच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन 'पक्षविरहीत लोकतंत्र' आणि 'सर्वोदय' याचं काम उभं केलं होतं. अशावेळी डॉ. राममनोहर लोहिया हेच असे एक होते की, ज्यांनी विरोधीपक्ष कसा असतो आणि त्यानं काय करायला हवंय, याचा धडा भारतीय संसदीय लोकशाहीला शिकवला! आपल्या सकारात्मक आणि विधायक प्रयत्नांनी, संसदेतील सर्व संवैधानिक आयुधं वापरून, त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशावर एकछत्री अंमल असलेल्या काँग्रेसपक्षाला आपल्या मृत्यपर्यंत म्हणजे १९६७ सालापर्यंत सळो की पळो करून सोडलं होतं. पण काँग्रेसपक्षाला विरोध करताना त्यांनी कधी आपल्या मूलभूत तत्वांशी, सिद्धांताशी, विचारधारेशी प्रतारणा केली नाही की, समझौता केला नाही! डॉ.राममनोहर लोहिया यांच्या रचनात्मक राजनीती आणि अद्भुत, अलौकिक नेतृत्वक्षमतेचा प्रभाव असा होता की, त्यांच्या निधनानंतर जवळपास वीस वर्षांनंतर त्यांच्या तत्वानुसार, विचारांवर चालणाऱ्या अनेक पक्ष भारताच्या संसदीय लोकशाहीच्या पटलावर वावरत होते. 'सामाजिक न्याय' ही त्यांची संकल्पना आज राजनैतिक मूलभूत सिद्धांत बनलीय. लोहियांचा आग्रह होता की, तमाम वंचित जाती आणि वर्गातील लोकांची हळूहळू का होईना सर्व क्षेत्रात हिस्सेदारी, भागीदारी वाढली पाहिजे. आज तशी हिस्सेदारी जी वाढतेय हा डॉ. लोहियांच्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणायला हवा!

*तटस्थ परराष्ट्रनिती ही लोहियांची देणगी*
डॉ. लोहिया हे सुरुवातीच्या काळात नेहरुवादी होते. त्यानंतर मात्र ते गांधीवादी बनले. याचा अर्थ प्रारंभीच्या काळात ते महात्मा गांधींच्या तुलनेत नेहरूंच्या विचाराने जास्त प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांचा नेहरूंनी घेतलेल्या अनेक धोरणांमुळे भ्रमनिरास झाला आणि ते गांधींच्या तत्वांवर, विचारांवर आणि कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास वाढत गेला. डॉ.लोहियांचं वडील हिरालाल हे गांधीवादी होते. वडिलांचा प्रभावही त्यांच्यावर होता. उच्चशिक्षण घेताना जर्मनीत डॉ. राममनोहर लोहिया यांची राजकारणातील सक्रियता याची माहिती तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांना विशेषत: जवाहरलाल नेहरू यांना होती. म्हणून १९३३ मध्ये लोहिया पीएचडी प्राप्त करून देशात परतल्यानंतर नेहरूंनी त्यांना काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार समितीत सहभागी करून घेतलं होतं. त्यानंतरच्या दोन वर्षाच्या काळात लोहियांनी भारताची विदेशनीती कशी आणि काय असावी याबाबत महत्वाचं योगदान दिलं. यामुळं त्यांना त्याकाळी गैर-अधिकारिक परराष्ट्रमंत्री म्हटलं जात होतं. स्वातंत्र्यानंतर भारतानं स्वीकारलेलं तटस्थ आणि गटनिरपेक्ष परराष्ट्र नीतीचं धोरण स्वीकारलं. त्याबाबत असं म्हटलं जातं की, असं धोरण ठरविण्यात लोहियांनी मांडलेल्या भूमिकेचं महत्वपूर्ण योगदान होतं. काँग्रेसच्या धोरणानुसार काँग्रेसचा कोणताही सर्वसामान्य कार्यकर्ता हा इतर कोणत्याही संस्था वा संघटनेचा सदस्य होऊ शकतो. यामुळं समाजवादी विचारधारेने प्रभावित असलेले जयप्रकाश नारायण व इतर अनेक काँग्रेसीनेत्यांनी एकत्र येत मे १९३४ मध्ये 'काँग्रेस समाजवादी पार्टी' ची मुहूर्तमेढ रोवली. यातही डॉ. राममनोहर लोहिया यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतर १९३९ पासून लोहियांचे नेहरूंशी असलेले संबंध इथून बिघडायला सुरुवात झाली. खरं तर लोहिया आणि नेहरू यांच्यातील परस्पर संबंध बिघडायला निमित्त झालं ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात भारतानं सहभागी होण्याच्या मुद्द्यावर! लोहियांचं म्हणणं होतं की, या महायुद्धात कमजोर बनलेल्या इंग्रजांची हालत आणखीन कमजोर करण्यासाठी भारतानं या महायुद्धात सहभागी होऊ नये. त्यांच्यामागं भारताची ताकद उभी करू नये. तर नेहरू यांचं मत होतं की, भारतानं या जागतिक महायुद्धात इंग्रजांची साथसंगत करावी.

*'भारत छोडो'आंदोलनात निर्णायक भूमिका*
९ ऑगस्ट १९४२ ला जेव्हा भारत छोडो आंदोलन छेडलं गेलं तेव्हा संपूर्ण भारतात काँग्रेसी नेत्यांची धरपकड केली होती. तेव्हा असं वाटलं होतं की, हे आंदोलन आता अयशस्वी होईल. पण जयप्रकाश नारायण आणि डॉ. राममनोहर लोहिया यासारख्या समाजवादी नेत्यांनी पुढची दोन वर्षे या आंदोलनाचं यशस्वी नेतृत्व केलं. आंदोलनाची घोषणा होताच मुंबईहून एका भूमिगत रेडिओवरून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं. हे सारं करण्यात इतर कुणी नाही तर ते लोहियांच होते. इंग्रजाना या भूमिगत रेडिओचा शोध लागेपर्यंत लोहिया कलकत्त्यात जाऊन पोहोचले होते. तिथं त्यांनी पत्रकं वाटण्याचं सुरूच ठेवलं. त्यानंतर ते जयप्रकाश नारायण यांच्यासह नेपाळ पोहोचले. तिथं यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना सशस्त्र हल्ला करण्याचं प्रशिक्षण देऊ लागले. सलग दोन वर्षे  इंग्रजांना हुलकावणी देणाऱ्या जयप्रकाश नारायण आणि डॉ. राममनोहर लोहिया यांची मे १९४४ मध्ये धरपकड  झाली. या दोघांवर खटला गुदरला गेला आणि त्यांना लाहोरच्या कारागृहात जेरबंद केलं गेलं. त्यानंतर त्यांची एप्रिल १९४६ दरम्यान त्यांची सुटका झाली. कारागृहात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाल्यानं त्यांची तब्येत त्यानंतर बिघडली.

*फाळणीचे गुन्हेगार गांधी नव्हे नेहरू*
डॉ. लोहियांनी आपल्या 'विभाजन के गुनहगार' या पुस्तकांत म्हटलं आहे की, '२ जून १९४७ रोजी झालेल्या बैठकीत जयप्रकाश नारायण आणि आपल्याला विशेष आमंत्रित म्हणून बोलावण्यात आलं होतं. बैठकीतील वातावरण असं होतं की, नेहरू आणि पटेल यांनी आधीच सारं काही ठरवून आल्यासारखे वागत, बोलत होते. इंग्रजानी देशाची फाळणी करून स्वातंत्र्य देण्याला संमती दिल्याची माहिती दिली; त्यावेळी महात्मा गांधी यांनी फाळणीला विरोध केल्यानंतर नेहरू आणि पटेल यांनी आपल्या काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देण्याची धमकी गांधीजींना दिली.' डॉ. लोहिया पुढं लिहितात की, तेव्हा गांधीजींसमोर फाळणीच्या प्रस्तावावर मौन सहमती देणं आणि फाळणीच्या गुन्हेगारांमध्ये सामील होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता!

*सोशालिस्ट पक्षाची स्थापना अन दमदार विपक्ष*
महात्मा गांधी यांच्या निधनानंतर १९४८ मध्ये गांधीजींनी निर्माण केलेलं काँग्रेसी मॉडेल नेहरूंनी मोडून टाकलं. काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या विचारभेद असलेल्या समाजवादी नेत्यांना काँग्रेसपक्ष सोडण्याचा विकल्प दिला गेला. डॉ. लोहियांना नेहरूंनी काँग्रेस पक्षाचे महासचिव बनण्याचा प्रस्ताव दिला होता. तो त्यांनी नाकारला. डॉ. लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक समाजवादी नेत्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा पर्याय स्वीकारला. ह्याची जाणीव या नेत्यांना होती की, स्वातंत्र्यलढ्यातील असलेला काँग्रेसचा प्रभाव भारतीयांच्या मनावर खूप मोठ्याप्रमाणावर आहे, ते दूर करणं सहजसाध्य नाही! पण डॉ.लोहिया आणि त्यांच्या साथीदारांनी लोकशाहीत समर्थ आणि सक्षम विरोधीपक्ष बनण्याचा आणि त्याचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार १९४८ मध्ये 'सोशालिस्ट पार्टी'ची स्थापना त्यांनी केली. त्यानंतर १९५२ मध्ये आचार्य कृपलानी यांनी आपल्या 'किसान मजदूर पार्टी' विलीन केली. कालांतरानं पक्षांत झालेल्या मतभेदांमुळे लोहिया यांनी 'प्रजा समाजवादी पक्ष' स्थापन केला. पण त्यानंतर १९५५ मध्ये सोशालिस्ट पक्ष मजबूत करण्यासाठी म्हणून ते पुन्हा परतले.

*लोकशाहीला डॉ. लोहियांचं देणं*
डॉ.लोहिया आणि त्यांचे सहकारी समाजवाद्यांचा पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवच झाला. त्यांचा पराभव हा त्यांच्या लोकप्रिय नसण्याचा कारणावरून झालेला नव्हता तरच त्यांचा पक्ष, त्याचं संघटन काँग्रेसच्या तुलनेत कमजोर होतं, शिवाय आर्थिक संसाधनांची कमतरता होती. काँग्रेसच्या मजबूत स्थितीमुळं एक झालं की, समाजवादी विचारांचे जे काही पक्ष होते ते सारे त्या पराभवामुळे एकत्र आले. अशावेळी लोहियांच्या मूलभूत सिद्धांतांचा विचार काहींच्या पचनी पडला नाही. ते कोणत्याही मार्गानं केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळंच लोहियांनी १९५५ मध्ये प्रजा समाजवादी पक्ष त्यागून सोशालिस्ट पक्षाची कास धरली. त्यानंतर त्यांनी  भारतात सर्वत्र फिरून सर्व मागासवर्गीयांना संघटीत करण्याचा प्रयत्न आरंभला. याचा एक भाग म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटून त्यांच्या 'ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास असोसिएशन'चं सोशालिस्ट पार्टीत विलीन करण्याबाबत चर्चा केली. तेवढ्यात १९५६ दरम्यान डॉ. आंबेडकर यांचं निधन झालं, त्यामुळं आंबेडकरांना सोशालिस्ट पार्टीशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. पण त्यानंतरही इतर संघटनांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवला.

*लोहियांना १९६७ मध्ये सर्वप्रथम यश मिळालं*
डॉ. राममनोहर लोहियांचा या अथक प्रयत्नांचा परिणाम १९६७ मध्ये दिसून  आला. त्यावेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला सात राज्यात   पराभव स्वीकारावा लागला. पहिल्यांदाच विरोधीपक्ष सत्ताधारी काँग्रेसला टक्कर देण्याच्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर लोहियांनी ठरवलं की, राजकारणापासून दूर गेलेल्या जयप्रकाश नारायण यांना पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहात आणून विरोधीपक्ष मजबूत करू या. पण दरम्यान लोहिया यांचंच निधन झालं आणि तो विचार तिथंच थांबला. पण तब्बल दहा वर्षांनंतर राममनोहर लोहियांचा प्रयत्न  प्रत्यक्षात आला. १९७५ दरम्यान जयप्रकाश नारायण नवनिर्माणाचा माध्यमातून पुन्हा राजकारणाच्या मुख्यप्रवाहात परतले. आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व विरोधीपक्ष एकत्रित करण्यात जयप्रकाश नारायण यांना यश आलं. २५ वर्षे सत्तेत असलेल्या सत्तारूढ काँग्रेसपक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. महात्मा गांधींनंतर मौलिक तत्वचिंतक राजनेता राममनोहर लोहिया यांनी जर्मनीत वास्तव्यात असताना कार्ल मार्क्स आणि एंगेल्स यांच्या विचारांचा खूप अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षांत आलं की, भारताच्या भौगोलिक, सामाजिक दृष्टीनं कम्युनिस्ट विचारधारा ही अपूर्ण आहे. मार्क्सवादानं साम्राज्यवाद आणि पुंजीवाद याची जी व्याख्या केलीय त्याच्याशी डॉ. लोहिया असहमत होते. किंबहुना ते त्याच्या नेमकं उलटं समजत होते. मार्क्सवादाच्या मते पुंजीवादाच्या विकासानं साम्राज्यवाद वाढीला लागतो. त्यामुळं पुंजीवादाच्या  नाशानं साम्राज्यवाद संपला जाईल. लोहियांच्या मते हा विचार नेमका उलटा आहे. तो साम्राज्यवादच आहे की, ज्यानं पुंजीवादाचा विकास झालाय. यामुळं पुंजीवादाला संपविण्यासाठी पहिल्यांदा साम्राज्यवाद उखडून टाकायची गरज आहे. त्यांनी ब्रिटनच्या उदयाला भारतासारख्या कमकुवत देशाच्या शोषणाशी जोडलं आणि म्हटलं की, भारताला स्वतंत्र केल्याशिवाय पुंजीवादाची मुळं कमजोर होणार नाहीत. याप्रकारे लोहियांनी पुंजीवाद संपविण्यासाठी भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे हे आग्रही प्रतिपादन केलं!

*मार्क्सवादाची व्याख्याच भारताच्या दृष्टीनं चुकीची*
डॉ.राम मनोहर लोहिया यांनी मार्क्सच्या वर्गवादी सिद्धांताला भारतीय संदर्भातून नवीन व्याख्या प्रदान केली त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातला समाज हा काही औद्योगिक नाही या समाजात असमानता आहे ती जातिव्यवस्थेमुळे! त्याच्या शोषणाचा आधारही जातिव्यवस्था हीच राहिलेली आहे. वंचित वर्ग ज्यामध्ये आदिवासी दलित अन्य मागासलेल्या जाती आणि महिलांचाही इतकच नाही ही तर सर्व थरातील महिलांचाही यात समावेश व्हायला हवा या सर्वांना सर्वहारा मानला जायला हवा भारताच्या संदर्भात मार्क्सवादाची ही व्याख्या यांची होती त्यामुळे ते क्रांतिकारक राहिले भारतामध्ये समाजवादी विचारधारा यासोबतच प्रादेशिक पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्याची मजबुती होण्यामध्ये लो यांची ही वेगळी व्याख्या यांचे मोठे योगदान राहिले आहे या व्याख्यान जातिगत ओळख याचे योगदान राहिले आहे यातूनच जातीची ओळख मजबूत बनत गेली आहे राजनीतीमध्ये वंचित जातींना यामुळेच आधार मिळाल्या. सर्व प्रकारच्या विषमता संपविण्यासाठी 'सप्त क्रांति सिद्धांत' हा राम मनोहर लोहिया यांनी दिला ही अनोखी भेट मानली जाते. या सिद्धांतामध्ये सात मुद्दे होते. रंगभेद संपायला हवा. जातीव्यवस्थेनुसार होणारा भेदभाव थांबला पाहिजे. स्त्री आणि पुरुष यात कोणतेही अंतर राहायला नको. राष्ट्रवादाला संकुचित असे स्वरूप न देता ते व्यापक समजले गेले पाहिजे. समाजवादी आर्थिक मॉडेल हे सर्वश्रेष्ठ आहे याबरोबरच सगळे देश निशस्त्रीकरणच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्याचबरोबर भेदभाव करण्याच्या विरोधात लढण्याचा सत्याग्रह होण्याची गरज आहे. लोहियांना निवडणूकीच्या माध्यमातून एक विकेंद्रीकृत समाजवादी राज्य निर्माण व्हावं असं वाटत होतं. मार्क्सवाद आणि गांधीवाद यांच्या मिश्रणातून समाजवादाचं एक अनोखं भारतीय मॉडेल तयार करू इच्छित होते. ज्याची मुळं भारतीय सामाजिक तत्वात असतील जे भारतीय मूल्यांना प्रतिबिंबित करतील. पण त्यांचं हे मॉडेल नेहरूंच्या राज्य समर्थीत समाजवाद आणि भारतीय कम्युनिस्टांच्या केंद्रीकृत समाजवादाच्या मॉडेलहून अलग होतं. या दोन्हींच्या व्यतिरिक्त ते विकेंद्रीकृत आर्थिक आणि राजनैतिक संरचनेच्या बाजूनं होते. परंतु त्यांची परिवर्तनाची इच्छा केवळ आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रापुरतंच मर्यादित नव्हतं.  आर्थिक आणि राजनैतिक संरचने व्यतिरिक्त ते सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेला बदलू इच्छित होते. त्यांची वैचारिक भूमिका अगदी स्पष्ट होती. ते राष्ट्रीय आणि भौगोलिक सीमेत बांधले गेलेले नव्हते.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...