Friday 28 June 2019

शिवसेनेचा भाव आणि प्रभाव

सतराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. शिवसेनेनं आपलं यश अबाधित राखलंय. नुकतंच शिवसेनेला ५३ वर्षं पूर्ण झालीत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रीय म्हणवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अस्तित्व धोक्यात आलं असताना मात्र शिवसेनेचा प्रभाव सुवर्ण महोत्सवी वर्षानंतरच्या काळात दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि नंतर अयोद्धेतील राममंदिरासाठीचं शिवसेनेचं आंदोलन यामुळं देशात सर्वच स्तरावर शिवसेनेची दखल घ्यावी अशी स्थिती निर्माण झालीय.  

*शिवसेना बाळासाहेबांच्या नजरेतुन!*
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता आपल्यात नाहीत, पण त्यांनी पेटवलेला हा वडवानल आजही धगधगतोय. शिवसेना हा काय प्रकार आहे ही उत्सुकता आजही देशभर किंबहुना जगभर कायम आहे. आजकाल चांगली बातमी ऐकू येणं दुरापास्त झालं असून वाईट, अनिष्ट बातम्यांचा सुकाळ झालाय.
शिवसेनाप्रमुख आज आपल्यात नाहीत, पण महाराष्ट्र व मराठी माणसांच्या कल्याणासाठी त्यांनी स्थापन केलेली शिवसेना पन्नाशी उलटून त्रेपन्न वर्षांची झालीय. शिवसेनेच्या स्थापनेनंतर देशात वेगवेगळ्या १८० सेना निघाल्या. टिकली फक्त शिवसेना! असं बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत अनेकदा सांगितलं होतं. शिवसेना स्थापनेचा वर्धापन साजरा होईल, पण मराठी माणसासाठी निर्माण झालेल्या शिवसेना स्थापनेचा सुवर्ण सोहळा कसा होता ते बाळासाहेब अनेकदा मार्मिकपणे सांगत-
‘‘शिवसेना स्थापन झाली अन लोकांना तिच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली. तरुण मनं या संघटनेकडे आकर्षित होऊ लागली. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला मेळावा भरला. प्रचाराची साधनं आमच्या जवळ नव्हती. ‘मार्मिक’सारखं एकुलतं एक साप्ताहिक तेवढं प्रचार करीत होतं. शिवाजी पार्कसारखं विस्तृत मैदान आम्ही घेऊन ठेवलं म्हणून आम्हाला वेड्यात काढणारी काही माणसं निघाली. ‘एवढ्या मोठ्या मैदानाची गरज काय?’.... ‘त्यापेक्षा कित्ते भंडारी हॉल काय वाईट होता? ....निदान संपूर्ण तरी भरून जाईल.’.... ‘शिवाजी पार्कवर गर्दी जमली नाही तर निष्कारण फजिती होणार?’..… आमच्या अनेक विद्वान हितचिंतकांनी आम्हाला हिताचा अनाहूत सल्ला दिला. पोलिसांनीसुद्धा किती प्रचंड सिद्धता करावी? तर फक्त ५-६ व्हॅन्स. आणि मेळावा भरला! लोक आश्चतर्याने थक्क झाले. असा मेळावा आजवर भरला नव्हता! अशी गर्दी पाहिली नव्हती. शिवाजी पार्कचं मैदान अक्षरश: फुलून गेलं होतं. कट्ट्याकट्ट्यावर लोक उभे राहिले होते. सर्वत्र मराठी माणूस नुसता उधळला होता…गुलाल उधळावा तसा. कशासाठी, शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी. बाळ ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी!

*शिवसेनेचं यश आणि विरोधकांचं पोटशूळ!*
‘खरं म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे पुढारी. शिवाजी पार्कवरचा हा प्रचंड जनसमुदाय वास्तविक फक्त आमचाच! मग या बाळ ठाकरेंच्या भाषणाला एवढी गर्दी कशी?’ महाराष्ट्राच्या पुढारीपणाचा मक्ता घेतलेले पुढारी गोंधळून गेले. त्यांची पोटं दु:खू लागली. शिवसेनेला काही पुढाऱ्यांकडून विरोध करण्यात येतो त्यातला खरा पोटशूळ हा आहे.
‘शिवसेना हा काय प्रकार आहे? हे बाळ ठाकरे कोण आहेत? ते निदान सांगतात तरी काय?’ या उत्सुकतेने (क्युरिऑसिटी) कदाचित लोक पहिल्या मेळाव्याला जमा झाले असावेत, असं जे आपण म्हणता त्यात बिलकूल तथ्य नाही. केवळ जिज्ञासा एवढंच कारण असतं तर शिवसेनेचे पुढचे मेळावे अथवा सभा लाखोंच्या संख्येने भरल्या नसत्या. २६ जानेवारीला कामगार मैदानावर जो मेळावा भरला त्यालाही तुफान गर्दी होती. १८ फेब्रुवारीला स.गो. बर्व्यांच्या निवडणुकीसाठी जी सभा घेण्यात आली तिला पाच लाख लोक उपस्थित होते. जांबोरी मैदानावर बोलविलेली सभासुद्धा अशीच अभूतपूर्व होती.
शिवसेनेच्या मेळाव्यांना, शिवसेनेच्या सभांना लोक गर्दी का करतात? उत्तर एकच आहे, मराठी माणसाला संघटनेचं महत्त्व पटलंय. बारीकसारीक मतभेद मिटवून शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायला हवंय हे त्यानं ओळखलंय. हे सारं उत्स्फूर्त होतंय; कारण आपल्यावर अन्याय होतंय याची स्पष्ट जाणीव मराठी माणसाला झालेलीय. शासन पाठीशी नसलं तरी चालेल, राजकीय पक्ष अगर पुढारी नेतृत्व करायला आले नाहीत किंवा त्यांनी पाठिंबा दिला नाही तरी चालेल. भांडवलदार, कारखानदार, पैसेवाले यांचंही सहाय्य नाही मिळालं तरी चालेल. हे सारे बरोबर येवोत वा न येवोत, मराठी माणूस स्वत:च्या पायावर उभं राहून आपले प्रश्न सोडवायला सिद्ध झालेला आहे ही गोष्ट निश्चित! हाच सामान्य मराठी माणूस ही शिवसेनेची शक्ती आहे अन् शिवसेना हीच मराठी माणसांची गरज आहे.’’

*मराठी माणसाचा जीवन-मरणाचा लढा!*
‘हा आमचा जीवन मरणाचा लढा आहे!’ असं तेव्हाच शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केलं. त्याचं विश्ले्षण करताना त्यांनी सांगितले, ‘‘मराठी माणसांचे कोणते प्रश्न शिवसेना सोडविणार? त्या प्रश्नांचे स्वरूप काय? ते आर्थिक आहेत, सामाजिक आहेत की राजकीय आहेत? असं आम्हाला विचारलं जातं. प्रश्नं सोडविताना ते कुठले आहेत? त्याचं स्वरूप काय? असं विचारणं हास्यास्पद आहे. सर्वच प्रश्न आहेत. सगळेच सोडवायचे आहेत. मात्र कुठल्या प्रश्नांना प्रथम महत्त्व द्यावयाचे हे महत्त्वाचं आहे. माणसाला प्रथम स्वत:च्या पायावर उभं राहण्याची आवश्यकता असते. त्याच्या जीवनाला स्थैर्य हवं म्हणून प्रथम नोकरी, कामधंदा, व्यवसाय त्याला मिळायला हवा. हा जीवन-मरणाचा लढा आहे. पोटापाण्याचा उद्योग प्रथम, मग बाकीचं!’’ इतकी स्पष्ट भूमिका घेऊन संघटना स्थापन करणारा नेता देशाच्या इतिहासात दुसरा झाला नसेल. आजचे नेते व त्यांचे राजकीय म्हणवून घेणारे पक्ष पाहिलं की बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेचे महत्त्व पटते. आज अनेक नेते संघटना आणि राजकीय पक्ष स्थापन करतात ते स्वत: विधान परिषदेवर वर्णी लावून पुढे मंत्री होण्यासाठी. बाळासाहेबांच्या आयुष्यात आलेल्या राजकीय तडजोडीच्या संधी त्यांनी साफ ठोकरून लावल्या व लोकांशी इमान राखले म्हणून शिवसेना आज त्याच जोशात व आवेशात ५३ वर्षांची झालीय!

*शिवसेनेनं मराठी माणसाला मर्दानगी शिकवली*
शिवसेनेनं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मर्दानगीची ओळख दिली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर शिवसेना नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, हा दरारा दिल्लीच्या वर्तुळातही निर्माण झाला आणि त्याला शिवसेनाप्रमुखांचे नेतृत्व कारणीभूत आहे. ५३ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन झाली तेव्हा ‘हे प्रकरण ५-६ महिन्यांच्या वर टिकणार नाही’ अशा पैजा लावल्या गेल्या, पण ५३ वर्षांचा टप्पा पार केलाय. शिवसेना फार तर ठाणे नगरपालिका व मुंबई महानगरपालिकेच्या पाच-पंचवीस जागांपुढे मजल मारणार नाही असे भविष्य होतं. आज शिवसेना महाराष्ट्र आणि देशातला दमदार राजकीय पक्ष आहे. तसेच दिल्लीच्या व राज्याच्या सत्तेत आहे. शिवसेनेची सत्ता असो अगर नसो तरीही शिवसेनेमुळे काय काय घडू शकते ते पहा-
स्थापनेपासून शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज बनलीय ते आजपर्यंत. शिवसेनेमुळे प्रस्थापित सत्ताधार्यांबचे धाबे दणाणले व राज्यकर्त्यांच्या अरेला कारे करणारा ‘फोर्स’ महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाला. शिवसेनेमुळे मराठी माणसाला त्याचे न्याय्य हक्क मिळाले व लाखो तरुणांना सरकारी व खासगी कंपन्यांत नोकऱ्या मिळाल्या. शिवसेनेमुळे मराठी तरुण उद्योगधंद्यात स्थिरावला. शिवसेनेमुळे सामान्य घरातला फाटका तरुण नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री झाला. शिवसेनेमुळे बेळगावचा सीमा प्रश्न ६० वर्षांनंतरही धगधगत राहिलाय. शिवसेनेमुळे महाराष्ट्र अखंड राहिला आणि विदर्भाचा लचका कुणाला तोडता आला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सतत होत राहिले. ते शिवसेनेच्या चौकी-पहाऱ्यामुळं तडीस गेले नाही.
शिवसेनेमुळे महाराष्ट्र राज्यास तेजोवलय प्राप्त झाले. मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा धगधगता ठेवून शिवसेनेने हिंदुत्वाचे रक्षण केले.
शिवसेना नसती तर अयोध्येत बाबरीचा कलंक कधीच पुसला गेला नसता. शिवसेना ही जणू महाराष्ट्राची रक्षणकर्ती म्हणूनच जन्मास आली व त्याच भूमिकेत वावरली.

*शिवसेनाप्रमुखांचीअटक पहिली व शेवटची!*
अनेक राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या हयातीत अटका झाल्या, पण सीमा आंदोलनात शिवसेनेने उडी घेताच मुंबई पेटली आणि शिवसेनाप्रमुखांना अटक झाली ती पहिल्यांदा आणि शेवटची! ‘ठाकरे यांना पकडले ही चूक झाली.’ हे मान्य झालं आणि बाळासाहेबांच्या केसालाही हात लावायची हिंमत नंतरच्या काळात सरकारनं केली नाही. शिवाजीला जन्म देणारा महाराष्ट्र राजकारणात नपुंसक ठरतोय हे बाळासाहेबांनी जाणलं आणि शिवसेनेच्या रूपानं राजकारणात आक्रमकता व शौर्याचा पुरस्कार केला. शिवसेनेच्या ५० वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार आले, पण बाळासाहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळे शिवसेना असंख्य अग्निदिव्यांतून पुढे गेली. आणीबाणीत भले भले नेते आणि त्यांचे पक्ष काँग्रेसी दडपशाहीनं नेस्तनाबूत झालं. काहींनी सरळ गुडघेच टेकले, पण दिल्लीच्या दबावाची पर्वा न करता बॅ. रजनी पटेल यांना बेधडक तडकवणारे फक्त बाळासाहेब होते. ‘‘शिवसेनेवर बंदीहुकूम बजावाल त्या दिवशी मुंबईत रजनी पटेलची प्रेतयात्रा निघेल,’’ असा जबरदस्त हल्ला करून शिवसेनाविरोधकांना थरथर कापायला लावणारे फक्त शिवसेनाप्रमुख होते! वादळाच्या अनेक तडाख्यांत बाळासाहेबांनी शिवसेना जपली. त्यांनी ती जपली म्हणून तिला पन्नाशीची झुळूक लागली.

*विरोधकांची झोप उडवली!*
खरं तर शिवसेना देशाच्या राजकारणातील आता जुनाजाणता पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष व सध्या इंदिरा कॉंग्रेसची निर्मिती शिवसेनेनंतर २५ वर्षांनी झाली. आजच्या अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा जन्म तर कालचा आहे. देशात, राजकारणात प्रादेशिक पक्षांना जे महत्त्व आज आहे त्याचे श्रेय शिवसेनेलाच द्यावे लागेल! शिवसेनेचे वैशिष्ट्य काय? शिवसेना ही संघटना म्हणून इतकी मजबूत बांधली की, सत्ता असो अगर नसो, महाराष्ट्राच्या राजकारणावर शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलेय. इतर राजकीय पुढारी सत्तेसाठी आटापिटा करीत असतात. सत्ता हेच त्यांच्या राजकारणाचे सर्वस्व असतं, पण ‘मला सत्तेची पर्वा नाही’ असे ठणकावून सांगणारे शिवसेनाप्रमुख एकमेव व एकच! नेतृत्वाचा खमकेपणा व सत्तेसाठी फालतू तडजोडी न स्वीकारण्याचे धैर्य हीच शिवसेनेची ताकद राहिलीय. मोदी यांच्या वादळात भले भले भुईसपाट झालेत. पालापाचोळ्यासारखे उडून गेलेत. भाजपनं शिवसेनेबरोबरची युती संपुष्टात आणली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एका जिगरीने लढा दिला आणि ६३ आमदार निवडून आणले. ही जिद्दच शिवसेनेला सुवर्ण महोत्सवी वर्षात पार करून आलीय. दीडशे वर्षांची परंपरा असूनही काँग्रेस निस्तेज झालीय. मोदी यांच्यामुळे भाजपच्या चेहऱ्यावर मेकअपचा तजेला आलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेस २० वर्षांत धापा टाकीत आहे. बाकी पक्ष आले व गेले, पण शिवसेना ५३ व्या वर्षात प्रवेश करतेय आणि दमदारपणे ५३ वर्षांपूर्वी शिवसेनेने भल्याभल्यांची झोप उडवली होती. आजही शिवसेनेच्या वेगाने राज्यकर्त्यांची नींद हराम झालीय! ५० वर्षांत राजकारण बदलले. पिढी बदलली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. पण एक गोष्ट मात्र तशीच आहे, ती म्हणजे शिवसेनेविषयी असलेली उत्सुकता आणि आस्था ५३ वर्षांपूर्वी होती तशीच आहे. शिवसेनेला मिळालेले यश पाहून ५३ वर्षांपूर्वी अनेक मोठे पुढारी गोंधळून गेले होते. आजही पुढाऱ्यातली नवीन पिढी शिवसेनेची आगेकूच पाहून गोंधळलेलीच आहे. तेव्हाही अनेकांची पोटं दुखत होती. ही पोटदुखी आजही कायम आहे. शिवसेना हा काय प्रकार आहे, ही उत्सुकता ५३ वर्षांनंतरही कायम आहे.

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...