Friday 14 June 2019

विस्कटलेली' राष्ट्रवादी...!

"राष्ट्रीय राजकारण वेगळ्या दिशेनं रंगतेय. भाजपेयींकडे देशातील सत्तेची सर्व सूत्रं हाती आली आहेत. एकीकडे भाजपविरोधातले सारे राजकीय पक्ष एकत्र येताहेत. पण त्याचा परिणाम मात्र दिसलाच नाही. अशा वातावरणात शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावू शकतात असं काहींना वाटतंय. पण त्यांच्या पक्षाची विस्कटलेली अवस्था त्यांना अडचणीची  ठरते आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेला त्यांचा जनाधार, नेत्यांची बेफिकिरीवृत्ती, कार्यकर्त्यांची होणारी गळती, आपल्याच बालेकिल्ल्यातून होणारी पक्षाची पीछेहाट, भाजपेयींशी होत असलेली सलगी या कारणांनी मतदारांमध्ये निर्माण झालेला पक्षाच्या भूमिकेबद्धलचा संभ्रम हे सारं दूर करण्यासाठी पवारांनाच कंबर कसावी लागणार आहे. आपल्या पक्षातल्या चिल्लर नेत्यांच्या शंभर टक्के गावगन्ना राजकारणाला आवर घातला पाहिजे. वयाच्या पंचाहत्तरीचा उलटल्यानंतरही त्यांनाच आपल्या पक्षातल्या नेत्यांना वळण लावण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्याकडे अध्यक्षपद आहे, तोपर्यंतच ते शक्य आहे. आगामी काळात अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडंच राहील याची काही शाश्वती नाही आणि त्यावेळी पक्षातले छोटे मोठे नेते त्यांना जुमानतील असंही नाही. पक्ष आणि पक्षातले नेते अनेक पातळ्यांवर बिघडत चालले आहेत. पक्षाचं विसाव्या वर्षात पदार्पण झालं असताना, पक्षाला छडी हातात घेऊन त्यांनी वेळीच दुरुस्त केलं नाही तर, पक्षाचे आणि राष्ट्रवादीच्या घड्याळात कधी बारा वाजतील, याचा पत्ता लागणार नाही."
--------------------------------------------------------

*को* णत्याही राजकीय पक्षाचं मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा कालावधी जावा लागतो. किमान दशकापेक्षा अधिक काळ समोर असेल, तर त्याचं नीट मूल्यमापन करता येऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस येत्या दहा जूनला वीस वर्षाची वाटचाल पूर्ण करीत आहे आणि एकविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या चारवर्षाचा कालावधी सोडला तर स्थापनेपासून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत असलेला असा हा पक्ष आहे. त्यामुळं विरोधात राहून संघर्ष करण्याची संवय या पक्षाला नाही. राष्ट्रवादीची इथपर्यंतची वाटचाल जी झालीय त्यात फारसं समाधानकारक असं काही दिसत नाही. विधिमंडळातील संख्याबळाच्या बाबतीत चढउतार असले तरी जनमताचा पाठींबा फारसा कमी झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा चांगलं यश मिळवलं आहे. परंतु केवळ निवडणुकीतील यशापयशावरून पक्षाचं मूल्यमापन करता येत नाही. पक्षाची स्थापना झाली, तेव्हा चाळिशीच्या पुढचे सारे नेते दुसऱ्या फळीत होते. त्यामुळं पक्षात एक चैतन्य होतं. परंतु पक्षाची वीस वर्ष उलटून गेल्यानंतर मधल्या काळात एकही दखलपात्र असा नवा चेहरा 'राष्ट्रवादी'तून पुढं आलेला नाही. यावरून हा पक्षही काँग्रेसप्रमाणे कसा निबर होत चाललाय हेच दिसून येतं.

*राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यावी यासाठी धडपड*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या विसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. स्थापनेपासून राष्ट्रवादीची पाळंमुळं ही पश्चिम महाराष्ट्रात रुजलेली; तिथंही २०१४ च्या लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला फारसं यश मिळालं नाही. आपल्या मजबूत अधिपत्याखालील पुणं आणि पिंपरी चिंचवड महापालिका गमावाव्या लागल्या. त्यामुळं आता आपला गड मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पुण्याची अधिवेशनासाठी निवड केली होती.पण परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये चलबिचल असताना १९९९ मध्ये शरद पवार यांनी सोनियांचा विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली. काँग्रेसमधील असंतुष्ट नेते बरोबर येतील हे पवार यांचे त्यावेळी गणित होते, पण ते यशस्वी झाले नाही. आताही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. अशा वेळी काँग्रेसमधील असंतुष्टांना सूचक संदेश देण्याचा पवार यांचा प्रयत्न असू शकतो. देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात आघाडी होण्याची चिन्हे दिसत होती. त्यासाठी या अधिवेशनाची राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीची दखल घेतली जाईल असा होरा पवारांचा होता. पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी यानिमित्तानं जाहीर व्हावी अशीही अपेक्षा असावी. पण भाजपविरोधी महागठबंधनात फुटीचे सूर आळवले गेले. पंतप्रधानपदासाठी अनेकांनी जुळवाजुळव सुरू केली. त्यात पवारांचा शब्द शेवटचा होता, पण भारतीय मतदारांनी महागठबंधनाला नाकारलं. काँग्रेसची जशी दैन्यावस्था केली तशीच राष्ट्रवादीचीही! त्यामुळचं पवारांना रा.स्व.संघाच्या कार्य आणि प्रचार पद्धतीनं मोहिनी घातली.

*संख्याबळ घटत चाललंय!*
पक्षाच्या स्थापनेनंतर सुरुवातीचे चार महिने वगळता पावणेपंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी होता. २०१४ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाचा जबरदस्त फटका बसला. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीने सावरण्याचा बराच प्रयत्न केला, पण जनतेच्या मनातून उतरल्याने किंवा मोदी लाटेत काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. राज्यात तर राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर मागे पडला. स्थापनेनंतर पक्षानं स्वबळावर लढण्याचा दुसऱ्यांदा प्रयोग केला, पण पक्षाला यश मिळालं नाही. अगदी पक्षाचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ५८ जागांपैकी फक्त १५ जागांवरच विजय मिळाला. शरद पवार ही राज्याच्या राजकारणातील एक शक्ती असं मानलं जातं. दोन दशकांपेक्षा जास्तकाळ राज्याच्या सत्तेत पवार हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पवार यांच्याशिवाय राज्याच्या राजकारणाची पाती हलत नाही, असं नेहमी बोललं जातं. परंतु गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीत पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढताना पक्षाला प्रथमच खूपच कमी यश मिळालं. पवार यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत राज्यात चार वेळा पक्ष स्वबळावर निवडणुकांना सामोरा गेला. १९८० मध्ये अरस काँग्रेसच्या वतीने पवार लढले तेव्हा ४७ जागा मिळाल्या होत्या. १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसला ५४ जागा, १९९९ मध्ये राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये मात्र पक्षाचं संख्याबळ घटत ते ४१वर आलं. २०१९ च्या तयारीला ते लागलेत, त्यासाठी भोसरीला त्यांनी पक्षाचा मेळावा घेतला. तिथं त्यांनी संघ आणि भाजपचं, त्यांच्या प्रचार यंत्रणेचं गुणगान गायलं.

*राष्ट्रवादीबद्धल संशयाची भावना*
राज्यात भाजप सरकारच्या विरोधात 'हल्लाबोल' सारखं आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय, असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. काँग्रेस आणि भाजप या दोघांपासून समान अंतर ठेवण्याची भाषा पक्षाकडून केली जाते, पण दोघांपैकी एकाशी जुळवून घेण्यावर पक्षाचा भर आजवर राहिला आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करावे, असा सल्ला दिग्विजय सिंग यांच्यासारख्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. लोकसभेनंतर राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झालीय. राज्याची सत्ता आणि राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा राहिला पाहिजे, असा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, यासाठी प्रफुल्ल पटेल दिल्लीत कार्यरत असतात. त्यांनीच पुण्यात शरद पवार प्रधानमंत्री होतील असा विश्वास पक्षाच्या अधिवेशनात केला होता. पण राज्यातच पक्षाला मर्यादा असल्याचं लोकसभा, विधानसभा निकालांवरून स्पष्ट झालं. विदर्भाच्या जनतेला राष्ट्रवादीबद्धल आपुलकी नाही, तर मुंबईत अजूनही पक्ष उभा राहू शकलेला नाही. एकाच वेळी अनेक डगरींवर पाय ठेवण्याचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रयत्न पक्षाच्या विरोधात गेला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर, तर त्याच वेळी ओडिसा किंवा केरळात काँग्रेसच्या विरोधात पक्ष होता. २०१४ मध्ये पक्षानं एकला चलो रे ची वाट चोखाळली. पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत दोघे एकत्र आले. दहा वर्षे यूपीएचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसचा भागीदार होता, पण या काळात राष्ट्रवादीनं काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करीत. हाताला लखवा मारलाय का? असा स्वालकेला होता. दिल्लीच्या तख्ताशी शरद पवार नेहमीच जुळवून घेतात, अशी त्यांच्यावर टीका केली जाते. केंद्रात भाजपचं सरकार सत्तेत येताच राष्ट्रवादीनं भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. राज्यात भाजपेयींना बहुमताचा १४४ चा जादूई आकडा स्वबळावर गाठणे शक्य नव्हतं. तेव्हा सरकार पडणार नाही याची ग्वाही राष्ट्रवादीनंच दिली होती. आपला 'अदृश्य हात' भाजपच्या मागे उभा केला होता! निधर्मवादाची कास सोडायची नाही, पण त्याच वेळी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी जुळवून घ्यायचं, यातून पक्षाबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीमध्ये निमंत्रित करणं किंवा बारामतीमध्ये मोदींनी पवार यांचं गुणगान गायल्यानं राज्यातील भाजप-शिवसेनेच्या विरोधातील मतदारांमध्ये राष्ट्रवादीबद्धल संशयाची भावना तयार झाली होती. पक्षाच्या भूमिकेत सातत्याचा अभाव असल्यानंच राष्ट्रवादीचे राजकीय नुकसान झालं आहे, असे राजकीय निरीक्षकांकडून नेहमीच बोलले जातं

*अद्यापि भाजपशी चुंबाचुंबी सुरूच*
राष्ट्रवादीबद्धल अधिक संभ्रम तयार करण्याकरिताच काँग्रेस नेत्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाढत्या जवळिकीबद्दल हल्ला चढविण्यास सुरुवात केलीय. काहीही करून राष्ट्रवादीची जास्त वाढ होऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे या पहिल्या फळीतील नेत्यांवर चौकशीचं गंडांतर आलेलं आहे. अशावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपशी जुळवून घेण्याशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही.त्यामुळंच गेली काही वर्षे  महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक ठिकाणी सहयोग दिला-घेतला आहे.

*पक्षाची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न*
विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळं राज्यात काँग्रेस कमकुवत झालीय. ही पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता स्वत: शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांनी आतापर्यंत पक्षात वेगवेगळे प्रयोग केले. सत्ता येताच सर्व तरुण नेत्यांकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती सोपविली होती. राजकीय सारीपाटावरील सोंगट्या अलगद हलविण्याचे कसब पवारांकडे आहे. यातूनच आताही पक्षात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत छगन भुजबळ हा पक्षाचा ओबीसी चेहरा होता, पण भुजबळ अडचणीत आल्याने जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणलाय. सहकार चळवळ आणि ग्रामीण भागावरच पक्षाची भिस्त आजवर राहिलेली आहे. त्यातच मराठा समाजाचा पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी अद्यापही पुसली जात नाही.

*लोकांच्या पसंतीला उतरत नाही*
अल्पसंख्याक किंवा दलित समाजात राष्ट्रवादीबद्दल आपुलकी नाही. आजवर मराठा राजकारणावर भर असल्याने इतर मागासवर्गीय समाजाची मतं हवी तेवढी मिळत नाहीत. यामुळेच चौकशीची टांगती तलवार असतानाही इतर मागासवर्गीय समाजाच्या सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद  ठेवण्यात आलं होतं पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने दणका दिल्यानं आता पुन्हा पक्षाचं नेतृत्व मराठा समाजाकडे दिलं गेलंय. तसेच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्यात प्रयत्न केला जाईल. तरुण वर्गात पक्ष वाढविणे व सर्व समाजांचा पाठिंबा मिळेल, असे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा संच, सारी ताकद, अनुभवी नेतेमंडळी तसेच शरद पवार यांचासारखे चाणाक्ष आणि राज्याची नस ओळखणारे नेतृत्व आहे. तरीही राज्याच्या सर्व भागांतील मतदारांमध्ये राष्ट्रवादी पसंतीला उतरत नाही. हेच राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान आहे.

*पवारांनी हाती छडी घेऊन दुरुस्ती करावी*
 राजकारणात येताना समाजकारणाचाही विचार केला पाहिजे, त्याची जोड असली पाहिजे असं पवार नेहमी जाहीर भाषणातून म्हणतात. परंतु त्यांचे हे बोल म्हणजे 'शब्द बापुडे केवळ वारा' असंच असल्याचं चित्र दिसतं. राष्ट्रवादीतील किती नेते राजकारणाबरोबरच समाजकारण करतात याचा आढावा घेण्याचा प्रयत्न कधी त्यांनी केलाय का? समाजकारणाचं भाषण करायचं आणि आपल्या पक्षातल्या चिल्लर नेत्यांच्या शंभर टक्के गावगन्ना राजकारणाला प्रोत्साहन द्यायचं, अशी पवारांची नीती आजवर राहिली आहे. वयाच्या पंचाहत्तरीनंतर तरी त्यांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना वळण लावण्याचे प्रयत्न करावेत.त्यांच्याकडे अध्यक्षपद आहे, तोपर्यंत ते शक्य आहे. आगामी काळात अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडंच राहील याची शाश्वती नाही आणि त्यावेळी पक्षातले छोटे मोठे नेते त्यांना जुमानतील असंही नाही. पक्ष आणि पक्षातले नेते अनेक पातळ्यांवर बिघडत चालले आहेत. छडी हातात घेऊन त्यांनी वेळीच दुरुस्त केलं नाही तर, पक्षाचे आणि राष्ट्रवादीच्या घड्याळात कधी बारा वाजतील, याचा पत्ता लागणार नाही.

*'युवती काँग्रेस'कडेही दुर्लक्ष!*
शरद पवारांनी राज्यकर्ते म्हणून  स्त्रियांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेतलेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, महिलांना नोकऱ्यात आरक्षण, महिला धोरण जाहीर केलं. संरक्षणमंत्री असताना त्यांनी महिलांना संरक्षणदलाचे दरवाजे उघडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. असं असलं तरी सत्तेत भागीदारी करताना गेल्या वीस वर्षात ऐतिहासिक ठरेल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, हे ही लक्षांत घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्त्रियांना संघटनेत किंवा सत्ता असताना सत्तेत पदं देण्याच्या बाबतीत अनास्थाच असल्याचं दिसून आलंय. या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रवादी युवती काँग्रेस'कडं पाहावं लागेल. 'देऊ उभारी....घेऊ भरारी...!' असा नारा देत सुप्रिया सुळेंनी याचं लॉंचिंग केलं. तो प्रयोग यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. राष्ट्रवादीचं राजकारण आजही बहुतांश सरंजामी पद्धतीचंच राहिलं आहे. दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानं आणि आता सत्ता हातातून गेली तरी तीच सत्तेची गुर्मी नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसते. अशा सरंजामी नेत्यांकडून युवतींना पुढं जाण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा करणं जर जास्तीचंच ठरेल. नेत्यांच्या लेकींना संधी मिळू शकेल पण ज्यांना राजकीय गॉडफादर नाही, अशा युवतींना खरोखरच संधी मिळाली का? पक्षांकडं कोणताही कार्यक्रम नसला, नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांना सांगण्याजोगे नवं काही नसलं की, काहीतरी वेगळे फंडे काढले जातात, 'राष्ट्रवादी युवती काँग्रेस' हा त्यातलाच प्रकार आहे. स्थापनेनंतरच्या गेल्या सात वर्षात युवती काँग्रेसची फारशी चमक कुठे दिसली, असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

*'संघं' शरणं गच्छामि...!*
नुकत्याच भोसरीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची, प्रचार यंत्रणेची केवळ वाखाणणीच केली नाही तर कार्यकर्त्यांकडून त्याचं अनुकरण केलं जावं अशी अपेक्षाही व्यक्त केली! घरातून शेतकरी कामगार पक्षाचा संस्कार झालेल्या पवारांनी आजवर नेहमी संघावर, भाजपेयींवर,  त्यांच्या ब्राह्मण्यावर सतत टीका केलीय. अगदी 'हाफचड्डीवाले' 'पेशवे' म्हणून देखील हिणवलंय! पण दैवदुर्गती कशी असते पहा, निवडणुकांतून सततच्या होणाऱ्या पराभवानं त्याच पवारांना संघाचं कौतुक करायला भाग पाडलंय. एवढंच नाही तर, आपल्या कार्यकर्त्यांना संघाच्या कामकाजाचं अनुकरण करण्याचा उपदेशही द्यावा लागलाय! संघाच्या प्रचार यंत्रणेला शरण जायला सांगितलंय! काँग्रेस नेते विठ्ठलराव गाडगीळ आपल्या भाषणात कोणतीही गोष्ट स्पष्ट करताना सतत म्हणायचे 'सर्किट इज कंप्लीट...पिश्चर इज क्लिअर...! पवारांच्या संघानुनयानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं... पिश्चर इज क्लिअर...!

*संघ स्वयंसेवकांची चिकाटी पवारांना अपेक्षित*
कधीकाळी निवडणूक प्रचाराचे भाषण ठोकताना पवारसाहेब म्हणाले होते, 'हा देश हाफचड्डीवाल्यांच्या हातात देणार का?' अर्थात, त्यानंतर २०१४ ला आधी केंद्र सरकार आणि नंतर राज्य सरकारचे नेतृत्व याच हाफचड्डीवाल्यांची विचारसरणी असलेल्या भाजपेयींकडे गेलं. साहेबांचे शिपाई मात्र ५ वर्षे पारावर आणि बारवर बसून गप्पा हाणत राहिले, 'मनुवादी संघोट्यांना मतदार घरी पाठवणार,' अशी चर्चा करू लागले. पण २०१९ च्या निवडणुकीतही भलतेच झाले. इतिहासाची पुनरावृत्ती घडली! केंद्रातलं सरकार संघोट्यांच्या विचारांचे, भाजपेयींचं स्वबळाएवढं बहुमत घेऊन आलं. गेल्या ५ वर्षांत संघोट्यांची चड्डी मोठी झाली. साहेब मात्र 'पुणेरी की फुले पगडी' फिरवण्यात व्यस्त राहीले. आता आपल्याच पुरोगामी, सहिष्णू, सर्वधर्मी, समाजवादी शिपायांच्या मेळाव्यात चिंतन करताना साहेबांना मनुवादी संघोट्यांचे तोंडभरुन कौतुक करावे लागलंय. काय म्हणतात साहेब, जरा वाचू या !  ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसारखी आपल्यात चिकाटी हवी, त्यांच्याकडून जनसंपर्क कसं करायचं ते शिका! आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन् एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. संपर्कात कसं राहावं हे आरएसएस करतं तसं खरं तर आपण करायला हवं!" पण पवारसाहेब तुम्ही विसरताय संघाची 'चिकाटी' सत्ताकांक्षेची नसते... ती भरतभूमीला परमवैभवसंपन्न करण्याची आहे. ती 'चिकाटी' म्हणजे संघाची अपरिहार्यता नाही; तर, हा समाज माझा आहे, ह्या आत्मीयतेतून उफाळून येणारी ती मनिषा असते. संघ स्वयंसेवकांची 'चिकाटी' आणि त्यामागील प्रेरणा व्यक्तिप्रेम, अंधत्वाची नाही तर स्वतःच्या कार्यपद्धतीवर डोळस विश्वास बाळगल्याची आहे, सत्तेच्या शॉर्टकट्ससाठी जाती-पाती, भाषा राजकारण करण्याची ती 'चिकाटी' नव्हे. स्वयंसेवकांची 'चिकाटी' आहे, स्वदेश गौरवाची...! त्यासाठी प्रसंगी नेहरू, शास्त्री, लोहिया वा जयप्रकाश नारायण अशा प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहायची आहे. कितीही त्रास झाला तरी , प्रेम व बंधुत्वाची ती 'चिकाटी' आहे...जे आज आपले नाहीत , ते उद्या आपले होतील, याबाबतची ती 'चिकाटी' असते... हे इथं लक्षांत घ्यायला हवंय!

*संघाकडे समर्पित भावनेच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ*
खरं तर पवार जे बोलले त्यात वावगं असं काहीच नाही. विशिष्ट विचारासाठी स्वत:ला गाडून घेऊन काम करणारे कार्यकर्ते संघाकडे आहेत. ते अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते त्याग करायला कधीही तयार असतात. ते वेऴ द्यायलाही तयार असतात. त्यांना जो विचार दिलाय तो पेरण्यासाठी तन, मन, धन द्यायला तयार असतात. संघाने तशी मुळापासून बांधणीच केलीय. संघाचे स्वयंसेवक घरदार सोडून प्रचारासाठी बाहेर पडतात. परराज्यात जावून, अतिशय विपरीत परिस्थितीत काम करतात. त्यांचे हात सेवाकार्यात व्यस्त असतात. आदिवासी भागात जावून काम करतात. केरळ, बंगालमध्ये किंवा ईशान्य भारतात जावून अतिशय विपरीत परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक एकनिष्ठेनं आणि एकाग्रतेनं काम करतात. हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. अशा पध्दतीचं समर्पित काम आज कुठल्याच पक्ष संघटनेमध्ये नाही. संघानं अभिजन वर्गाचा ईझम कार्यकर्त्यांच्या अंगी पुर्णपणे मुरवला आहे. तेच त्याचे ध्येय आणि तोच त्याचा विचार!असे लाखो समर्पित कार्यकर्ते ही संघाची खरी ताकद  आहे.

*सहकारी सम्राटांचा पक्ष असंच स्वरूप राहिलं*
हे सारं सांगितल्यानंतर संघाचा विचार योग्य की अयोग्य ? हा असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मी अनेकदा, वेळोवेळी संघाच्या भूमिकेवर लिहीत आलोय. पण संघवाले ज्या पध्दतीनं काम करतात ते खरंच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असंच आहे. त्यांची माणसं ज्या पध्दतीने आपल्या विचारासाठी, ध्येय्यासाठी वैचारिक काथ्याकूट न करता झोकून देतात ते महत्वाचे आहे! त्यांच्या कार्यकर्त्यांना वृत्तपत्रात नाव यावं, फोटो यावा असले 'प्रसिध्दीपिपासू' रोग झालेले दिसत नाहीत. ते स्वतःला गाडून घेऊन काम करतात. आज असा केडरबेस दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडे नाही. थोड्याफार प्रमाणात डाव्यांचा, बसपाचा तसा बेस होता पण आता त्यांचीही वाट लागलीय. काँग्रेसचं सेवादल बंद पडून मेवादल कधी बळकट झाले ते त्यांचं त्यांनाच कऴलं नाही. आजतर पक्षच दिवाळखोरीत निघालाय. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मुळातच केडरबेस नाही. हा पक्षच साखरसम्राट, शिक्षणसम्राट, सूतसम्राट अशा सम्राट लोकांचा! सत्तेसाठी बांधलेली मोट असं त्याचं वर्णन राज ठाकरे करीत. मग अशा लोकांच्यामध्ये त्याग, सेवा, समर्पण भावना येणार कुठून? १९९९ ला पक्षाची स्थापना करताना पवारांनी राज्यातले सगळेच सम्राट उचलले आणि आपल्या दावणीला बांधले. ज्यांच्याकडे साखर कारखाने, शिक्षणसंस्था, सुतगिरण्या आहेत. ज्यांची संस्कृती ही वतनदार वा जहागिरदारांसारखी होती असेच लोक राष्ट्रवादीशी जोडले गेले. त्यावेऴी पवार हे नाव राज्याच्या राजकारणात चलणी नाणे होते. पवारांचा करिष्मा होता. त्यामुऴे हे सगळे सहकारी सम्राट त्यांच्या छत्रछायेखाली आले. सामान्य लोकांना या पक्षात थाराच नव्हता.

*सत्ता हेच राष्ट्रवादींचा आचार आणि विचार*
कार्यकर्त्यांनी संघाच्या लोकांसारखे वागायला राष्ट्रवादी पक्षाचा नेमका कोणता ध्येयवाद आहे? पक्ष स्थापनेमागची नेमकी भूमिका, धोरण, तत्व, धारणा आणि उद्देश काय? संघाने त्यांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान दिलंय. भले मग तो चुकीचा असेल पण राष्ट्रवादीचा विचार, धोरण ते काय? सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर आणि त्यांना विरोध म्हणून स्थापन झालेला हा पक्ष! पण जेव्हा सत्ता उबविण्यासाठी पवारांनी काँग्रेसच्या सोनियांना पाठींबा दिला तेव्हाच हे सारे मुद्दे गैरलागू झाले. मग आज पक्षाचे अस्तित्व नेमकं कुठल्या आधारावर आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नक्की कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या घरी जायचं? बेगडी पुरोगामीत्व घेऊन जायचं तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्यावेळी साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन भाजपेयींचं सरकार सत्तेत आणलं होतं. त्यापूर्वीही जनसंघाच्या पाठींब्यावरच पवार पहिल्यांदा पुलोदचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुऴे पुरोगामीत्व हा काही त्यांचा विचार नाही होऊ शकत. मग नेमका विचार काय राष्ट्रवादीचा? त्यांची वैचारिक भूमिका कोणती? राज्यातले सगळे सहकारी सम्राट, सगळे टगे या पक्षात एकवटले आहेत. त्यांची थाटामाटाची संस्कृती हीच पक्षाची संस्कृती झालीय. थाटमाट, बडेजाव, संपत्तीचा झगमगाट आणि दादागिरी या सगऴ्या गोष्टी राष्ट्रवादीला जन्मापासून चिकटलेल्या आहेत. पवार कार्यकर्त्यांना ध्येयवाद द्यायला कमी पडले. कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दिलाच नाही. केवळ सत्ता हाच राष्ट्रवादीचा विचार आणि ध्येयवाद आणि आधार आहे.

*पवारांभोवतीच राज्याचं राजकारण फिरत राहिलंय*
१९५६ पासून शरद पवार राज्याच्या राजकारणात आहेत. १९६७ ला ते पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत राज्याच्या राजकारणाचा तेच केंद्रबिंदू आहेत. आजवर राज्याच्या राजकारणाचा पटच त्यांच्याभोवती फिरत राहिलाय. नंतर ते राष्ट्रीय राजकारणाचा हिस्सा झाले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, सर्व क्षेत्रातला अभ्यास, व्यासंग, काम करण्याची तळमळ, चिकाटी असे अनेक दुर्मिळ गुण त्यांच्या ठायी आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक प्यादी, उंट, हत्ती आले आणि गेलेही!  पण पवार वजीर ते वजीरच राहिले! पवारांना वगऴून राज्याचे राजकारण आणि राज्यकारण कधी झालंच नाही किंवा करताच आलं नाही. सत्तापालट झाला तरी विरोधकांना पवारांना निस्तेज करता आलेलं नाही. हा इतिहास आहे!

*पवारांभोवती सत्तापिपासू लोकांची उठवळ*
पवार काँग्रेसी विचारात वाढले. घरातला आईकडून आलेला शेकापचा वारसा त्यांनी स्विकारला नाही. त्यांनी स्वत:ची नवी वाट निवडली. पवारांचे काम नक्कीच उल्लेखनिय अन ठसा उमटवणारं आहे. पण जेवढी संधी मिऴाली त्याचा विचार करता ते पुरेसं वाटत नाही. पवारांनी इंदिरा गांधींना विरोध करत काँग्रेस सोडली. राजीव गांधीच्या काऴात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. मात्र ते नेहमीच सत्तेच्या वऴचणीला राहिले हे मान्यच करावं लागेल. आज राष्ट्रवादीतले अनेकजण सत्तेच्या आडोश्याला उड्या मारताहेत. पवार साहेबांना सोडून भाजपाला मिठ्या मारताहेत. संघाच्या लोकांना नव्वद वर्षे सत्ता मिळाली नव्हती पण ते सत्ताकांक्षी वा कधी सत्तेच्या वऴचणीला जाताना दिसले नव्हते. कुठल्या पक्षाच्या चौकटी किंवा पक्षाध्यक्षांचे उंबरे झिजवताना दिसले नाहीत. आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना असे संस्कार द्यायला पवार विसरले. कारण त्यांनीच अनेकवेऴा उड्या मारल्यात मग ते हा फकीरीचा विचार रूजवणार तरी कसा! आज इतक्या वर्षानी पवार कार्यकर्त्यांना संघाचा आदर्श घ्यायला सांगताहेत. पण संघाचा आदर्श नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही घ्यायला हवाय. नेते सत्तेच्या झोकातले सम्राट राहणार अन कार्यकर्ते फकीर होणार असे चालेल का? आता कार्यकर्तेही विचार करताहेत. त्यांच्यासमोर अशाच सत्तापिपासू लोकांची उठवळ दिसते आहे.

*...तर महाराष्ट्राची एकहाती सत्ता असती*
संघाची स्थापना महाराष्ट्रात झाली तरी पुरोगामी महाराष्ट्रात तो फारसा रुजला नाही, तरी देखील संघ स्वयंसेवक मात्र १९२५ सालापासून त्यांचा विचार या मातीत रूजवण्यासाठी धडपडत होते. संघ विचार रूजवताना बंगाल, केरळमध्ये संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा बऴी गेलाय. देशाने या लोकांना सत्तर अनेक वर्षे झिडकारले तरी हे मागे हटले नाहीत. ते काम करतच राहिले. त्या विचारासाठी त्यांनी स्वत:चे जीव दिलेत. आपल्या पक्षकार्यकर्त्यांची संघाशीच तुलना करायची असेल तर पवारांनी सर्वच स्तरावर करावी. आज सिंहावलोकन करण्याची वेऴ पवारांच्यावर नक्कीच आलीय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा नातू पराभूत झालाय. निवडणूका म्हंटले की हार-जीत होतच असते. त्यात विशेष असे काही नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याला माणूस पराभूत होणे ही विचार करण्यासारखी बाब आहे. याचा दुसरा अर्थ पवारांची ताकद कमी होत चाललीय. किमान आता तरी पवारांनी स्वत: चिंतन करावं. पक्षाला, कार्यकर्त्यांना एखादे उत्तुंग ध्येय किंवा सकारात्मक विचार द्यावा. ज्या विचारासाठी कार्यकर्ते जीवाची बाजी लावतील. तन, मन, धनाने काम करतील. राष्ट्रवादीचे पुढचे आयुष्य किती किंवा भवितव्य काय? हा पक्षाच्या नेत्यांचा चिंतनाचा विषय आहे. संघ हेडगेवार, गोऴवलकरगुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्यानंतरही टिकलाय तो त्यांच्या विचारानं आणि ध्येय्यानं! पवारांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस टिकेल का? हा ही महत्वाचा प्रश्न उरतोच. सत्तेची चटक लागलेला राष्ट्रवादी हा पक्ष आज विस्कटताना दिसतोय. कारण पवारांनी सगऴे रेडीमेड सम्राट गोळा करून पक्ष स्थापन केलाय. त्यानं त्यांचा कार्यकर्ता घडवला गेलेला नाही. सत्तेची ऊब होती तोवर कार्यकर्ते घडवण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. ज्या पध्दतीनं पवार स्वतः घडले, निर्माण झाले त्या पध्दतीनं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता घडला असता तर महाराष्ट्रावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली असती.

*पुलोदच्या काळात सर्व विचारी लोक एकत्र*
संघ, भाजपा व मोदी देशासाठी अत्यंत घातक आहेत असे वादासाठी गृहीत धरले तरी काँग्रेस ही मूळच्या सर्वसमावेषक आणि लोकशाहीवादी परंपरेपासून विचलित होत आहे आणि तसा सर्वसमावेशक पर्याय आता शोधायला हवा हे आणिबाणीच्या सुमारासच संघाला ध्यानात आलं होतं. १९७७ च्या जनता पक्षाच्या यशानंही हेच अधोरेखित होत होते. सर्वोदयी, आंबेडकरवादी काही गट व समाजवादी असे सर्वच तेव्हाच्या जनसंघाच्या लोकांसमवेत सत्तेत, केंद्रात व राज्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ह्या सर्वांसमवेत समाजवादी काँग्रेसचे शरद पवारही ‘पुलोद’ रुपात सहभागी झाले. महाराष्ट्रात देखील हे समीकरण लोकांना पटणार अशी चिन्हे होती. विविध विचारधारा, अधिक काँग्रेस मधील गांधी परिवाराचा वरचष्मा नाकारणारा शरद पवार गट हे समीकरण महाराष्ट्रात तेव्हा स्वीकारार्ह होत होते. दरम्यान मुख्यत: मधू लिमये यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या मंडळींनी जनसंघाच्या सदस्यांच्या रा.स्व.संघाशी असलेल्या संबंधांना आक्षेप घेतला, जणू काही आणीबाणी विरोधी लढ्यात आणि नंतर जनता सरकार बनवताना हे माहीतच नव्हते! परिणामतः जनता पक्ष फुटला. सरकार पडले. पुढला इतिहास सर्वांनाच माहित आहे.

*हा तर दैवानं उगवलेला सूड*
“थकलो आहे जरी l
अजून मी झुकलो नाही ll
जिंकलो नसलो तरी l
अजून मी हरलो नाही ll
अरे संकटांनो,
अजून दम लावा l
कारण कमी पडलो असलो तरी l
अजून मी संपलो नाही ll”
अशा काव्यमय शब्दांत शरद पवारांनी पक्षाच्या पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. पवारांसारख्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाची कारकिर्दीच्या अखेरच्या क्षणी इतकी वाईट अवस्था होणे हे खरं तर शोकांतिकेसारखेच! आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात एक बारामती वगळता पवारांनी इतर जनतेकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ साखरसम्राट, शिक्षणसम्राटांच्या गढ्या सांभाळायच्या, जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने, कुरापती करायच्या आणि त्यावर राजशकट हाकायचं, हा पवारांचा आजवरचा खाक्या राहिला आहे. मात्र, जनता आता या सगळ्यापासून कित्येक मैल दूर विकासाच्या पथावर गेली आहे, हे कधी कळलेच नाही. आपल्या लावालावीच्या खेळ्या आताच्या काळात उपयोगाच्या नाहीत, हेही त्यांना समजले नाही. ते आपल्या जुन्याच उद्योगांच्या आधाराने सत्तापदांवर पोहोचण्याची स्वप्ने पाहत राहिले आणि राष्ट्रीयच नव्हे तर राज्याच्या सत्ताकारणातूनही बेदखल झाले. आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची ही दशा झाल्यावर संघाची दिशा स्वीकारावी लागावी, तशी वाटचाल करायची वेळ यावी हा दैवानं उगवलेला सूड म्हणायला हवा!

चौकट.......

*आजोबा आता रिटायर व्हा...!*
आई रिटायर होतेय....असं एक नाटक काही वर्षांपूर्वी रंगमंचावर आलं होतं. ते खूप चाललं. या नाटकावर मला काही लिहायचं नाही. पण एक आजोबा आता रिटायर का होत नाहीत? असा मला प्रश्न पडलाय. बरंच कर्तृत्व गाजवून झालंय. मुलं-पुतणे विविध क्षेत्रात नावांजलीत.  आपल्या विचारानं आचार करू लागलीत. परिवार चांगला फळफळलाय, पण आजोबांना स्वस्थ बसवत नाही. आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सांगितलाय. आजोबा मात्र उगाचच बाळसं आल्यासारखं दाखवत मुलांच्याच पायात लुडबुड करताहेत. वयोपरत्वे आजोबांचे काही निर्णय चुकताहेत असं दिसून येतंय. ज्यांनी आजोबांच्या कुटुंबाला आपलंसं मानलं, त्यांच्या वाढविस्तराला हातभार लावलाय, त्या कौटुंबिक संबंधाची जाणीव न ठेवता, आजोबांनी नातवालाच दूर लोटलंय! यानं केवळ घराण्याचंच नव्हे तर राजकीय पक्षाचं, वैचारिक बांधीलकीचं, मूल्याधिष्ठित राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. त्याची आजोबांना जाणीव झालेली नाही, त्यामुळं आजोबांना आता सांगावं लागतंय की, बस्स झालं आता तरी रिटायर व्हा...!!

*नातवंडांना जातीयवाद्याचं भोई व्हावं लागलंय*
'जातीयवादी गिधाडं गावाच्या वेशीवरच अडवा, त्यांना गावात येऊ देऊ नका...!' असा पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांनी रुजवला, त्या आजोबांनीच आता नातवंडांवर या जातीयवादी गिधाडांचे भोई होण्याची वेळ आणलीय. राज्यातील अनेक वजनदार घराणी मोहिते पाटील, विखे पाटील यांनी, त्यांच्या नातवांनी तर कधीच भाजपत प्रवेश केलाय. त्यालाही आजोबांचं कारणीभूत ठरलेत. आता तर त्यांनी हद्दच केलीय. सगळ्यांनाच संघाचं अनुकरण करायला सांगितलंय. हे आजोबा आहेत...आपले शरद पवार साहेब!

*सुजय, रणजित आणि पार्थ...!*
आजोबांनी आपले स्नेही असलेल्या  विखेपाटलांच्या नातवाला, मोहिते पाटलांच्या नातवाला भाजपेयीं व्हायला भाग पाडलं गेलं. आजोबांनी मावळ मतदारसंघात असाच घोळ घातला. आपला नातू पार्थ याला आधीपासून तयारी करायला सांगितली. नंतर मात्र आपण स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहणार असल्यानं पवार घराण्यातून केवळ एकचजण उभं राहील असं सांगून पार्थला उमेदवारी नाकारली. पुतण्या अजित पवारांनी पार्थची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला. अखेर त्यांनाच माघार घ्यावी लागली आणि पार्थला उमेदवारी देण्याची नामुष्की ओढवली.
माढा आणि मावळ या दोन्ही मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं. आजोबांच्या या चुकलेल्या निर्णयानं सुजय आणि रणजित यांना भाजपात जावं लागलं. पार्थला उमेदवारी मिळून पराभूत व्हावं लागलं.

*चुकीच्या निर्णयानं भाजपला पायघड्या*
शरद पवारांवर त्यांची आई शारदाबाई पवार यांचे संस्कार झालेले आहेत. त्या शेतकरी कामकरी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची विचारसरणी ही पुरोगामी होती. मूल्याधिष्ठित राजकारण हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. हे सारं पाहून शरदराव घडले. महाराष्ट्र हा शरद पवारांकडे पुरोगामी नेता म्हणूनच ओळखतो. त्यामुळंच महाराष्ट्रातला तरुण त्यांच्याकडं आकर्षिला गेला. पण त्यांच्या काही निर्णयांनी अनेकांना भाजपेयीं जाण्यास भाग पाडलं. आता विधानसभेच्या निवडणुकांच्यावेळीही याचीच पुनरावृत्ती होईल! आता आपलं राजकारण बस्स झालं...! आता रिटायर व्हा...!

-हरीश केंची.

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...