Saturday, 8 June 2019

'संघं' शरणं गच्छामि...!

"राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातल्या भोसरी गावात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची, प्रचार यंत्रणेची केवळ वाखाणणीच केली नाही तर कार्यकर्त्यांकडून त्याचं अनुकरण केलं जावं अशी अपेक्षाही व्यक्त केली! घरातून शेतकरी कामगार पक्षाचा संस्कार झालेल्या पवारांनी आजवर नेहमी संघावर, भाजपेयींवर,  त्यांच्या ब्राह्मण्यावर सतत टीका केलीय. अगदी 'हाफचड्डीवाले' 'पेशवे' म्हणून देखील हिणवलंय! पण दैवदुर्गती कशी असते पहा, निवडणुकांतून सततच्या होणाऱ्या पराभवानं त्याच पवारांना संघाचं कौतुक करायला भाग पाडलंय. एवढंच नाही तर, आपल्या कार्यकर्त्यांना संघाच्या कामकाजाचं अनुकरण करण्याचा उपदेशही द्यावा लागलाय! संघाच्या प्रचार यंत्रणेला शरण जायला सांगितलंय! काँग्रेस नेते विठ्ठलराव गाडगीळ आपल्या भाषणात कोणतीही गोष्ट स्पष्ट करताना सतत म्हणायचे 'सर्किट इज कंप्लीट...पिश्चर इज क्लिअर...! पवारांच्या संघानुनयानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं... पिश्चर इज क्लिअर...!"
--------------------------------------------------

 *क* धीकाळी निवडणूक प्रचाराचे भाषण ठोकताना पवारसाहेब म्हणाले होते, 'हा देश हाफचड्डीवाल्यांच्या हातात देणार का?' अर्थात, त्यानंतर २०१४ ला आधी केंद्र सरकार आणि नंतर राज्य सरकारचे नेतृत्व याच हाफचड्डीवाल्यांची विचारसरणी असलेल्या भाजपेयींकडे गेलं. साहेबांचे शिपाई मात्र ५ वर्षे पारावर आणि बारवर बसून गप्पा हाणत राहिले, 'मनुवादी संघोट्यांना मतदार घरी पाठवणार,' अशी चर्चा करू लागले. पण २०१९ च्या निवडणुकीतही भलतेच झाले. इतिहासाची पुनरावृत्ती घडली! केंद्रातलं सरकार संघोट्यांच्या विचारांचे, भाजपेयींचं स्वबळाएवढं बहुमत घेऊन आलं. गेल्या ५ वर्षांत संघोट्यांची चड्डी मोठी झाली. साहेब मात्र 'पुणेरी की फुले पगडी' फिरवण्यात व्यस्त राहीले. आता आपल्याच पुरोगामी, सहिष्णू, सर्वधर्मी, समाजवादी शिपायांच्या मेळाव्यात चिंतन करताना साहेबांना मनुवादी संघोट्यांचे तोंडभरुन कौतुक करावे लागलंय. काय म्हणतात साहेब, जरा वाचू या !  ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांसारखी आपल्यात चिकाटी हवी, त्यांच्याकडून जनसंपर्क कसं करायचं ते शिका! आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन् एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. संपर्कात कसं राहावं हे आरएसएस करतं तसं खरं तर आपण करायला हवं!" पण पवारसाहेब तुम्ही विसरताय संघाची 'चिकाटी' सत्ताकांक्षेची नसते... ती भरतभूमीला परमवैभवसंपन्न करण्याची आहे. ती 'चिकाटी' म्हणजे संघाची अपरिहार्यता नाही; तर, हा समाज माझा आहे, ह्या आत्मीयतेतून उफाळून येणारी ती मनिषा असते. संघ स्वयंसेवकांची 'चिकाटी' आणि त्यामागील प्रेरणा व्यक्तिप्रेम, अंधत्वाची नाही तर स्वतःच्या कार्यपद्धतीवर डोळस विश्वास बाळगल्याची आहे, सत्तेच्या शॉर्टकट्ससाठी जाती-पाती, भाषा राजकारण करण्याची ती 'चिकाटी' नव्हे. स्वयंसेवकांची 'चिकाटी' आहे, स्वदेश गौरवाची...! त्यासाठी प्रसंगी नेहरू, शास्त्री, लोहिया वा जयप्रकाश नारायण अशा प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहायची आहे. कितीही त्रास झाला तरी , प्रेम व बंधुत्वाची ती 'चिकाटी' आहे...जे आज आपले नाहीत , ते उद्या आपले होतील, याबाबतची ती 'चिकाटी' असते... हे इथं लक्षांत घ्यायला हवंय!
*संघाकडे समर्पित भावनेच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ*
खरं तर पवार जे बोलले त्यात वावगं असं काहीच नाही. विशिष्ट विचारासाठी स्वत:ला गाडून घेऊन काम करणारे कार्यकर्ते संघाकडे आहेत. ते अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते त्याग करायला कधीही तयार असतात. ते वेऴ द्यायलाही तयार असतात. त्यांना जो विचार दिलाय तो पेरण्यासाठी तन, मन, धन द्यायला तयार असतात. संघाने तशी मुळापासून बांधणीच केलीय. संघाचे स्वयंसेवक घरदार सोडून प्रचारासाठी बाहेर पडतात. परराज्यात जावून, अतिशय विपरीत परिस्थितीत काम करतात. त्यांचे हात सेवाकार्यात व्यस्त असतात. आदिवासी भागात जावून काम करतात. केरळ, बंगालमध्ये किंवा ईशान्य भारतात जावून अतिशय विपरीत परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक एकनिष्ठेनं आणि एकाग्रतेनं काम करतात. हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. अशा पध्दतीचं समर्पित काम आज कुठल्याच पक्ष संघटनेमध्ये नाही. संघानं अभिजन वर्गाचा ईझम कार्यकर्त्यांच्या अंगी पुर्णपणे मुरवला आहे. तेच त्याचे ध्येय आणि तोच त्याचा विचार!असे लाखो समर्पित कार्यकर्ते ही संघाची खरी ताकद  आहे.

*सहकारी सम्राटांचा पक्ष असंच स्वरूप राहिलं*
हे सारं सांगितल्यानंतर संघाचा विचार योग्य की अयोग्य ? हा असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मी अनेकदा, वेळोवेळी संघाच्या भूमिकेवर लिहीत आलोय. पण संघवाले ज्या पध्दतीनं काम करतात ते खरंच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असंच आहे. त्यांची माणसं ज्या पध्दतीने आपल्या विचारासाठी, ध्येय्यासाठी वैचारिक काथ्याकूट न करता झोकून देतात ते महत्वाचे आहे! त्यांच्या कार्यकर्त्यांना वृत्तपत्रात नाव यावं, फोटो यावा असले 'प्रसिध्दीपिपासू' रोग झालेले दिसत नाहीत. ते स्वतःला गाडून घेऊन काम करतात. आज असा केडरबेस दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडे नाही. थोड्याफार प्रमाणात डाव्यांचा, बसपाचा तसा बेस होता पण आता त्यांचीही वाट लागलीय. काँग्रेसचं सेवादल बंद पडून मेवादल कधी बळकट झाले ते त्यांचं त्यांनाच कऴलं नाही. आजतर पक्षच दिवाळखोरीत निघालाय. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मुळातच केडरबेस नाही. हा पक्षच साखरसम्राट, शिक्षणसम्राट, सूतसम्राट अशा सम्राट लोकांचा! सत्तेसाठी बांधलेली मोट असं त्याचं वर्णन राज ठाकरे करीत. मग अशा लोकांच्यामध्ये त्याग, सेवा, समर्पण भावना येणार कुठून? १९९९ ला पक्षाची स्थापना करताना पवारांनी राज्यातले सगळेच सम्राट उचलले आणि आपल्या दावणीला बांधले. ज्यांच्याकडे साखर कारखाने, शिक्षणसंस्था, सुतगिरण्या आहेत. ज्यांची संस्कृती ही वतनदार वा जहागिरदारांसारखी होती असेच लोक राष्ट्रवादीशी जोडले गेले. त्यावेऴी पवार हे नाव राज्याच्या राजकारणात चलणी नाणे होते. पवारांचा करिष्मा होता. त्यामुऴे हे सगळे सहकारी सम्राट त्यांच्या छत्रछायेखाली आले. सामान्य लोकांना या पक्षात थाराच नव्हता.

*सत्ता हेच राष्ट्रवादींचा आचार आणि विचार*
कार्यकर्त्यांनी संघाच्या लोकांसारखे वागायला राष्ट्रवादी पक्षाचा नेमका कोणता ध्येयवाद आहे? पक्ष स्थापनेमागची नेमकी भूमिका, धोरण, तत्व, धारणा आणि उद्देश काय? संघाने त्यांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान दिलंय. भले मग तो चुकीचा असेल पण राष्ट्रवादीचा विचार, धोरण ते काय? सोनिया गांधीच्या परदेशी मुद्द्यावर आणि त्यांना विरोध म्हणून स्थापन झालेला हा पक्ष! पण जेव्हा सत्ता उबविण्यासाठी पवारांनी काँग्रेसच्या सोनियांना पाठींबा दिला तेव्हाच हे सारे मुद्दे गैरलागू झाले. मग आज पक्षाचे अस्तित्व नेमकं कुठल्या आधारावर आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नक्की कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या घरी जायचं? बेगडी पुरोगामीत्व घेऊन जायचं तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्यावेळी साहेबांनी बिनशर्त पाठींबा देऊन भाजपेयींचं सरकार सत्तेत आणलं होतं. त्यापूर्वीही जनसंघाच्या पाठींब्यावरच पवार पहिल्यांदा पुलोदचे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुऴे पुरोगामीत्व हा काही त्यांचा विचार नाही होऊ शकत. मग नेमका विचार काय राष्ट्रवादीचा? त्यांची वैचारिक भूमिका कोणती? राज्यातले सगळे सहकारी सम्राट, सगळे टगे या पक्षात एकवटले आहेत. त्यांची थाटामाटाची संस्कृती हीच पक्षाची संस्कृती झालीय. थाटमाट, बडेजाव, संपत्तीचा झगमगाट आणि दादागिरी या सगऴ्या गोष्टी राष्ट्रवादीला जन्मापासून चिकटलेल्या आहेत. पवार कार्यकर्त्यांना ध्येयवाद द्यायला कमी पडले. कमी पडले म्हणण्यापेक्षा त्यांनी तो दिलाच नाही. केवळ सत्ता हाच राष्ट्रवादीचा विचार आणि ध्येयवाद आणि आधार आहे.

*पवारांभोवतीच राज्याचं राजकारण फिरत राहिलंय*
१९५६ पासून शरद पवार राज्याच्या राजकारणात आहेत. १९६७ ला ते पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत राज्याच्या राजकारणाचा तेच केंद्रबिंदू आहेत. आजवर राज्याच्या राजकारणाचा पटच त्यांच्याभोवती फिरत राहिलाय. नंतर ते राष्ट्रीय राजकारणाचा हिस्सा झाले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, सर्व क्षेत्रातला अभ्यास, व्यासंग, काम करण्याची तळमळ, चिकाटी असे अनेक दुर्मिळ गुण त्यांच्या ठायी आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक प्यादी, उंट, हत्ती आले आणि गेलेही!  पण पवार वजीर ते वजीरच राहिले! पवारांना वगऴून राज्याचे राजकारण आणि राज्यकारण कधी झालंच नाही किंवा करताच आलं नाही. सत्तापालट झाला तरी विरोधकांना पवारांना निस्तेज करता आलेलं नाही. हा इतिहास आहे!

*पवारांभोवती सत्तापिपासू लोकांची उठवळ*
पवार काँग्रेसी विचारात वाढले. घरातला आईकडून आलेला शेकापचा वारसा त्यांनी स्विकारला नाही. त्यांनी स्वत:ची नवी वाट निवडली. पवारांचे काम नक्कीच उल्लेखनिय अन ठसा उमटवणारं आहे. पण जेवढी संधी मिऴाली त्याचा विचार करता ते पुरेसं वाटत नाही. पवारांनी इंदिरा गांधींना विरोध करत काँग्रेस सोडली. राजीव गांधीच्या काऴात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. मात्र ते नेहमीच सत्तेच्या वऴचणीला राहिले हे मान्यच करावं लागेल. आज राष्ट्रवादीतले अनेकजण सत्तेच्या आडोश्याला उड्या मारताहेत. पवार साहेबांना सोडून भाजपाला मिठ्या मारताहेत. संघाच्या लोकांना नव्वद वर्षे सत्ता मिळाली नव्हती पण ते सत्ताकांक्षी वा कधी सत्तेच्या वऴचणीला जाताना दिसले नव्हते. कुठल्या पक्षाच्या चौकटी किंवा पक्षाध्यक्षांचे उंबरे झिजवताना दिसले नाहीत. आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना असे संस्कार द्यायला पवार विसरले. कारण त्यांनीच अनेकवेऴा उड्या मारल्यात मग ते हा फकीरीचा विचार रूजवणार तरी कसा! आज इतक्या वर्षानी पवार कार्यकर्त्यांना संघाचा आदर्श घ्यायला सांगताहेत. पण संघाचा आदर्श नेत्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही घ्यायला हवाय. नेते सत्तेच्या झोकातले सम्राट राहणार अन कार्यकर्ते फकीर होणार असे चालेल का? आता कार्यकर्तेही विचार करताहेत. त्यांच्यासमोर अशाच सत्तापिपासू लोकांची उठवळ दिसते आहे.
*...तर महाराष्ट्राची एकहाती सत्ता असती*
संघाची स्थापना महाराष्ट्रात झाली तरी पुरोगामी महाराष्ट्रात तो फारसा रुजला नाही, तरी देखील संघ स्वयंसेवक मात्र १९२५ सालापासून त्यांचा विचार या मातीत रूजवण्यासाठी धडपडत होते. संघ विचार रूजवताना बंगाल, केरळमध्ये संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा बऴी गेलाय. देशाने या लोकांना सत्तर अनेक वर्षे झिडकारले तरी हे मागे हटले नाहीत. ते काम करतच राहिले. त्या विचारासाठी त्यांनी स्वत:चे जीव दिलेत. आपल्या पक्षकार्यकर्त्यांची संघाशीच तुलना करायची असेल तर पवारांनी सर्वच स्तरावर करावी. आज सिंहावलोकन करण्याची वेऴ पवारांच्यावर नक्कीच आलीय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा नातू पराभूत झालाय. निवडणूका म्हंटले की हार-जीत होतच असते. त्यात विशेष असे काही नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याला माणूस पराभूत होणे ही विचार करण्यासारखी बाब आहे. याचा दुसरा अर्थ पवारांची ताकद कमी होत चाललीय. किमान आता तरी पवारांनी स्वत: चिंतन करावं. पक्षाला, कार्यकर्त्यांना एखादे उत्तुंग ध्येय किंवा सकारात्मक विचार द्यावा. ज्या विचारासाठी कार्यकर्ते जीवाची बाजी लावतील. तन, मन, धनाने काम करतील. राष्ट्रवादीचे पुढचे आयुष्य किती किंवा भवितव्य काय? हा पक्षाच्या नेत्यांचा चिंतनाचा विषय आहे. संघ हेडगेवार, गोऴवलकरगुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्यानंतरही टिकलाय तो त्यांच्या विचारानं आणि ध्येय्यानं! पवारांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस टिकेल का? हा ही महत्वाचा प्रश्न उरतोच. सत्तेची चटक लागलेला राष्ट्रवादी हा पक्ष आज विस्कटताना दिसतोय. कारण पवारांनी सगऴे रेडीमेड सम्राट गोळा करून पक्ष स्थापन केलाय. त्यानं त्यांचा कार्यकर्ता घडवला गेलेला नाही. सत्तेची ऊब होती तोवर कार्यकर्ते घडवण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. ज्या पध्दतीनं पवार स्वतः घडले, निर्माण झाले त्या पध्दतीनं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता घडला असता तर महाराष्ट्रावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली असती.

*पुलोदच्या काळात सर्व विचारी लोक एकत्र*
संघ, भाजपा व मोदी देशासाठी अत्यंत घातक आहेत असे वादासाठी गृहीत धरले तरी काँग्रेस ही मूळच्या सर्वसमावेषक आणि लोकशाहीवादी परंपरेपासून विचलित होत आहे आणि तसा सर्वसमावेशक पर्याय आता शोधायला हवा हे आणिबाणीच्या सुमारासच संघाला ध्यानात आलं होतं. १९७७ च्या जनता पक्षाच्या यशानंही हेच अधोरेखित होत होते. सर्वोदयी, आंबेडकरवादी काही गट व समाजवादी असे सर्वच तेव्हाच्या जनसंघाच्या लोकांसमवेत सत्तेत, केंद्रात व राज्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ह्या सर्वांसमवेत समाजवादी काँग्रेसचे शरद पवारही ‘पुलोद’ रुपात सहभागी झाले. महाराष्ट्रात देखील हे समीकरण लोकांना पटणार अशी चिन्हे होती. विविध विचारधारा, अधिक काँग्रेस मधील गांधी परिवाराचा वरचष्मा नाकारणारा शरद पवार गट हे समीकरण महाराष्ट्रात तेव्हा स्वीकारार्ह होत होते. दरम्यान मुख्यत: मधू लिमये यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या मंडळींनी जनसंघाच्या सदस्यांच्या रा.स्व.संघाशी असलेल्या संबंधांना आक्षेप घेतला, जणू काही आणीबाणी विरोधी लढ्यात आणि नंतर जनता सरकार बनवताना हे माहीतच नव्हते! परिणामतः जनता पक्ष फुटला. सरकार पडले. पुढला इतिहास सर्वांनाच माहित आहे.

*हा तर दैवानं उगवलेला सूड*
“थकलो आहे जरी l
अजून मी झुकलो नाही ll
जिंकलो नसलो तरी l
अजून मी हरलो नाही ll
अरे संकटांनो,
अजून दम लावा l
कारण कमी पडलो असलो तरी l
अजून मी संपलो नाही ll”
अशा काव्यमय शब्दांत शरद पवारांनी पक्षाच्या पराभवानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. पवारांसारख्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाची कारकिर्दीच्या अखेरच्या क्षणी इतकी वाईट अवस्था होणे हे खरं तर शोकांतिकेसारखेच! आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात एक बारामती वगळता पवारांनी इतर जनतेकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ साखरसम्राट, शिक्षणसम्राटांच्या गढ्या सांभाळायच्या, जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने, कुरापती करायच्या आणि त्यावर राजशकट हाकायचं, हा पवारांचा आजवरचा खाक्या राहिला आहे. मात्र, जनता आता या सगळ्यापासून कित्येक मैल दूर विकासाच्या पथावर गेली आहे, हे कधी कळलेच नाही. आपल्या लावालावीच्या खेळ्या आताच्या काळात उपयोगाच्या नाहीत, हेही त्यांना समजले नाही. ते आपल्या जुन्याच उद्योगांच्या आधाराने सत्तापदांवर पोहोचण्याची स्वप्ने पाहत राहिले आणि राष्ट्रीयच नव्हे तर राज्याच्या सत्ताकारणातूनही बेदखल झाले. आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची ही दशा झाल्यावर संघाची दिशा स्वीकारावी लागावी, तशी वाटचाल करायची वेळ यावी हा दैवानं उगवलेला सूड म्हणायला हवा!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...