Saturday 30 December 2017

लालूप्रसाद अँड सन्स पेढीला घरघर...!


 *'लालूप्रसाद यादव अँड सन्स' पेढीला घर घर!*

लालूप्रसाद यादव......!
एक वादग्रस्त व्यक्तिमत्व...! भारतीय राजकारणातला 'समाजवादी विचारधारा'चा एक खास चेहरा. समाजवादी आंदोलनाला शिखरावर पोहोचविणाऱ्यांपैकी एक! लालूंनी राजकारणातलं 'मर्म' त्यांनी चांगलं ओळखलं होतं. जनतेच्या मनावर राज्य करतानाच 'समाजवादी गाथा'तील दुसरा चेहरा लोकांसमोर आला. गोरगरीब, दीनदुबळे, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यांच्या बाता करणाऱ्या लालूंच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झालीत. काहींत सजा झालीय, काहींत होताहेत अन काहींच्या चौकशा सुरू आहेत. बेनामी संपत्ती, मुख्यमंत्रीपदाच्या, रेल्वेमंत्रीच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार समोर आलाय. स्वतः सत्तेपासून दूर राहून आपल्या पत्नी, मुलगा, मुलगी यांना सत्तेवर विराजमान करीत केलेला राज्यकारभार आता संपुष्टात आलाय. लालूंनी उघडलेलं 'लालूप्रसाद अँड सन्स' या पिढीचा बाजार उठलाय! ते स्वतः कारागृहात पोहोचलेत आता इतर कुटुंबियांना गजाआड करण्याच्या वाटा त्यांनीच खुल्या केल्या आहेत.
---------------------------------------------

फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेपावणारा राजकीय नेता अशी स्वतःची ओळख प्रस्थापित करणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईतील अखेरची फेरी सुरू झालीय. स्वतः गुन्हेगार सिद्ध झाल्यानंतर लालूप्रसाद यांनी आपल्या पत्नीसह मुलाबाळांना राजकारणात पुढं केलं. पण त्यांचे पराक्रमी पुत्र, कन्या हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.  बिहारमधली लालूंच्या राजकीय पेढीच्या अंताला प्रारंभ झालाय.! भारतीय राजकारणात प्रत्येक स्तरावर प्रत्येक नेता आपल्या बुद्धिकौशल्याची छाप पाडत असतो. तेच त्यांचं राजकारण असतं. असे अनेकजण भारतीय संसदेनं पाहिलेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वतंत्र पक्षाचे पिलू मोदी हे नेते अत्यंत हजरजबाबी आणि राजकीय खेळी करण्यात निष्णात होते. एकदा का संसदेत ते बोलायला उभे राहिले की, सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी होत असे. त्यानंतरच्या काळातही अनेक मान्यवर दिग्गज संसदेनं पाहिलेत. आणीबाणीपूर्वी आणि नंतर समाजवादी विचाराचे राजनारायण हे ही असेच बुद्धिमान आणि चलाख राजकारणी होते. जनता पक्षाच्या राजवटीत त्यांची ओळख एक विनोदी पात्र अशीच बनली होती. पण राजकीय खेळी आणि चाल खेळण्यातले ते मातब्बर समजले गेले. त्यांनी इंदिरा गांधी यांना निवडणुकीच्या राजकारणात पराभूत केलेच शिवाय न्यायालयातही त्यांना पराभूत केलं होतं.

*राजकीय आखाड्यातील कसलेला मल्ल*
वर्तमानकाळात असेच एक नेते म्हणून लालूप्रसाद यादव हे ओळखले जातात. रांगडी ग्रामीण भाषा, तसाच पेहराव, राहणी आणि वागणूकही तशीच! पण त्यांना राजकारणाच्या आखाड्यातील कसलेले मल्लच म्हटलं पाहिजे. ते असा काही शड्डू ठोकून उभं राहात की, त्यांच्या विरोधकांना त्यांच्या जनाधाराला कधी धक्का लावता आलेला नाही. बिहारच्या युवा जनता दलाच्या कार्यकर्ते, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत नेतृत्व करणारे, कर्पूरी ठाकूर यांचे पट्टशिष्य असलेले लालूप्रसाद बिहार राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजविली. कधी काळी त्यांनी प्रधानमंत्री बनण्याची स्वप्नेही पाहिली. आणीबाणीनंतरच्या अस्थिर राजकारणात त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती. लालूप्रसाद यांच्या विस्तारलेल्या या राजकीय साम्राज्यातील मायाजालात स्वतःच फसले आहेत. त्यांनी कारागृहांची वाट धरलीय याचा परिणाम म्हणजे त्यांचे राजकीय जीवन अस्ताकडे चाललंय याची जाणीव त्यांना होऊ लागलीय चारा घोटाळ्यात यापूर्वी त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं, त्यांची रवानगी कारागृहात झाल्यानंतर ते आता संपले असंच वाटत होतं. पण आपल्या राजकीय कुटनीती आणि कौशल्यानं त्यांनी आपली राजकारणातली जागा पुन्हा हस्तगत केली, आपला ताबा ठेवला. बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या राजकीय अस्तित्वाचा ढोल बडवीत त्यांनी लक्षणीय यश मिळवलं. विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवित ते पुन्हा प्रकाशमान नेते म्हणून लोकांसमोर आले. स्वतः गुन्हेगार ठरल्यानं आणि निवडणूक लढविण्यास अपात्र ठरल्यानं त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी, कन्या मीसाभारती, पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी यांना आपले राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलं. आणि पुन्हा एकदा राजकारणाची सूत्रं हाती घेतली. पण आपल्या कार्यकर्तृत्वाचा फेरा लालूंना कारागृहात घेऊन गेला, तर त्यांचे राजकीय वारसदार कुटुंबीय यांना देखील भ्रष्टाचारविरोधी कायद्यानं चारीबाजूनं घेरलं आहे.

*बेनामी संपत्ती जप्त*
चारा घोटाळ्यात रांची न्यायालयानं झारखंड संबंधित केसची सुनावणी मंजूर झाली; त्यात पूर्वी शिक्षा झालेल्या लालूंचा समावेश केला गेला होता. कायद्यातील अनेक कलमं त्याच्या भोवती फिरत होती. पाठोपाठ आयकर आणि ईडीनं पाटण्यासहित अनेक ठिकाणी छापे टाकले. लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची जमीन, घर, बंगले, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल याबाबत माहिती घेऊन १७५ कोटींची बेनामी मालमत्ता जप्त केली. कन्या मीसाभारती, पुत्रद्वय तेजप्रताप आणि तेजस्वी यांची आयकर खात्याच्या उपायुक्त कार्यालयात सात तासाहून अधिक काळ चौकशी केली होती.

*मुलानं तोडले अकलेचे तारे*
लालूंचे हे दोन्ही पुत्र राजकारणाचा काहीही अनुभव नसताना बिहार विधानसभेत निवडून आले. बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या महागठबंधनात लालूंचं वर्चस्व होतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून देत उपमुख्यमंत्रीपद आणि मालदार खाती ताब्यात ठेवली. 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अशी आपल्याकडं म्हण आहे. त्याप्रमाणे राजकारणातही त्यांच्या राजनीतीचा चुणूक दिसल्याशिवाय राहत नाही. लालूंचे हे दोन्ही पुत्र राजनीतीत अत्यंत अडाणी आणि भ्रष्टाचारी असल्याचं सिद्ध झालं. एका पत्रकार परिषदेत तेजप्रताप यांनी अकलेचे तारे तोडले. 'आपल्याला उच्चशिक्षित सनदी अधिकाऱ्यांना हुकूम सोडताना संकोच वाटत नाही का?' त्यावर उपमुख्यमंत्री असलेल्या तेजप्रतापांनी अजब उत्तर दिलं, ' त्यांत संकोच कसला? शिकण्याची, शिक्षित होण्याची गरज ही दिवाणाला, मुनिमला असते, राजा तर जन्मजात शिक्षित आणि सर्वगुणसंपन्न असतो. तो कसल्याही पदाचा भुकेला नसतो.' त्यांनी स्वतःला राजा संबोधलं होत, त्यांच्या या उत्तरावर खूपच टीका झाली. प्रसिद्धीमाध्यमं आणि सोशल मीडियावर तर लालूंच्या कुटुंबियांची लक्त्तरं लटकावली होती.

*महागठबंधन उभं केलं*
त्यावेळी विधानसभा निवडणुक ही लालूंसाठी अवघड आहे असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा सफाया झाला होता शिवाय लालूंचाही दारुण पराभव झाला होता. लालूंची जी हक्काची जागा समजली जाते होती त्या जागेवर कन्या मीसाभारती हिचाही सपाटून पराभव झाला. लालूंचा उजवा हात समजले जाणारे रामकृपाल यादव हे भाजपात दाखल झाले. त्यांनी त्यामुळे लालूंच्या व्हॉटबँकेत भाजपसाठी पाचर मारली, अशी चर्चा त्यावेळी होती. पण लालूंनी आपल्या राजकीय कौशल्यानं आपला जनाधार अद्यापि संपलेला नाही हे दाखवून दिलं. सर्वप्रथम त्यांनी आपल्या निष्ठावंतांची टीम उभी केली. आपल्या वागण्या-बोलण्यात सुधारणा केली. त्याचबरोबर आपले जुने सहकारी असल्याचं सांगत त्यांनी मुलायमसिंह यांच्याशी केवळ दोस्तानाच केला नाही तर नातेसंबंध प्रस्थापित केले. लालूंनी आणखी एक राजकीय खेळी खेळली, दोन दशकाहून अधिक काळ आपल्याशी वैर धरलेल्या नितीशकुमार यांना मुलायमसिंह यांच्या माध्यमातून मोहित करून सोबत घेतलं.

*क्लुप्त्या वापरून जनाधार घट्ट केला*
नितीशकुमार यांच्यानंतर काँग्रेसचं समर्थन मिळविण्यासाठी राहुल यांच्या 'गुडबुक'मध्ये येणं गरजेचं होतं. राहुलच्या मनांत लालूंबद्धल अढी होती, दुराग्रह होता. पण लालूंनी सोनियांच्या समोर अशी काही ब्लु प्रिंट सादर केली की, सोनियांनी राहुलची नाराजी असतानाही महागठबंधनात सहभागी होण्याला मान्यता दिली. अखेरच्या क्षणी भाजपच्या इशाऱ्यावर मुलायमसिंह यांनी लालूंची साथ सोडली. पण लालूंनी संयम राखीत कुठेही कटुता येऊ दिली नाही. निवडणूक प्रचारात नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी निवडणूक दरम्यान बिहारसाठी खास पॅकेज जाहीर केलं. त्याची लालूंनी मिमिक्री करीत यथेच्छ टिंगल आपल्या सभांतून केली. त्यामुळं लालू पुन्हा एकदा देशभरात चमकू लागले. या साऱ्या क्लुप्त्यांनी लालूंनी आपला जनाधार अधिक घट्ट केला.


*राबडीदेवी, तेजप्रताप, तेजस्वी*
चारा घोटाळ्यात ते पहिल्यांदा कारागृहात गेल्यानंतर त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून प्रथम थोरला मुलगा तेजप्रताप याला पुढं आणलं. राबडीदेवी यांना पक्षप्रमुख बनवलं. पण तेजप्रताप याला फारसं काही जमलंच नाही. त्याचं दुबळपण लगेचच लक्षात आलं. त्यानं लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी विरोधी उमेदवाराचा जाहीर कौतुक केलं. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. त्याची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती देखील अत्यंत सामान्य होतं. अनेक जिल्हे हे आपलीस राज्यात नाहीतच अशी मुक्ताफळे उधळली होती. त्याची खूप चर्चा झाली. चाणाक्ष लालूंना तेजप्रताप याचा कमकुवतपणा लक्षात आला. त्यांनी लगेचच तेजप्रताप याला दूर केलं आणि तेजस्वीला राजकारणात आणलं. तेजस्वी हा तेव्हा क्रिकेटमध्ये तेव्हा आपली कारकीर्द घडविण्यासाठी संघर्षशील होता. ते सोडून त्याला राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळावं लागलं.

*तेजप्रताप ऐवजी तेजस्वी*
तेजस्वीचं शिक्षण फक्त नववीपर्यंत झालेलं आहे. तो आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हील संघात राखीव खेळाडू राहिलाय. क्रिकेट त्याच्यासाठी सर्वस्व होतं. राजकारणात त्याला फारसा रस नव्हता. मीसाभारतीचा झालेला पराभव, तेजप्रताप याने केलेला भ्रमनिरास यामुळं लालूंनी तेजस्वीला पुढं केलं. बिहारची सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी तेजस्वीला उपमुख्यमंत्री बनवलं गेलं. क्रिकेटपटू असल्यानं शिक्षण कमी असलं तरी त्याच इंग्रजी चांगलं होतं. फेसबुक ट्विटरवर तो सतत कार्यरत असतो. पूर्वी प्रसिद्धी माध्यमात क्रिकेटपटूचे फोटो पाहण्यात मग्न असलेला तेजस्वी आता स्वतःची छबी पाहून खुश असतो. तेजस्वीनं लवकरच सगळ्याबाबींवर ताबा मिळविला पण तेजप्रताप याचा विक्षिप्तपणा काही कमी झाला नाही.

*बलात्काऱ्याची पाठराखण*
राजपचा आमदार राजवल्लभ यादववर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तेव्हा तेजप्रतापनं मंत्री असतानाही त्याची पाठराखण केली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 'बलात्काराच्या तक्रारीत तथ्य आहे' असं म्हटल्यानंतर त्यानं 'मी अशा या एफआयआरला मानत नाही' अशी टिपण्णी केली होती. नितीशकुमार यांनी या टिपण्णीवर तेजस्वीच्या माध्यमातून लालूंचं लक्ष वेधलं. तेजप्रताप त्यावेळी पक्षाध्यक्ष होता. या प्रश्नातलं गांभीर्य पाहून आरोपी आमदार रामवल्लभ यादव याला बडतर्फ केलं शिवाय तेजप्रताप याला मौन बाळगण्याचं सूचना केली.

*ईडीचे छापे*
बिहारमध्ये अशा घटना फारसं गांभीर्यानं घेतलं जात नाही. तसं नसतं तर लालूंसारख्या भ्रष्टाचारी, विनोदी राजकारण्याला जनाधार मिळालाच नसता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. काळ बदलला, मानसिकता बदलली. नितीशकुमार यांनी कायदा सुव्यवस्था आटोक्यात आणली, गुंडांवर वचक बसवला. बदलत्या परिस्थितीत फारकाळ सत्ता साथीदार असलेल्या लालू आणि राजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. नितीशकुमार यांनी भाजपेयींशी सोयरीक केली. भाजपेयींनी बऱ्याच दिवसापासून लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांची बाहेर काढण्यात व्यग्र होते. अखेर ईडीने छापे घातले. त्यांत लालूप्रसाद आणि त्यांचे कुटुंबीय अलगदपणे अडकले. सध्या नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत. पण सत्तासाथीदार भाजपेयी आहेत. त्यामुळं लालूप्रसाद आणि कुटुंबीय यांच्यामागे शुक्लकाष्ट लागलंय. त्यामुळं राजकीय अस्ताच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू झालंय. मीसाभारती, तेजप्रताप, तेजस्वी एवढंच नाहीतर राबडीदेवी देखील गजाआड होतील अशी स्थिती आहे.

- हरीश केंची
९४२२३१०६०९

*चौकट*

*संसदेतून बडतर्फ होणारे पहिलेच राजकारणी*
अभाविपच्या साथीनं पाटणा विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष बनलेल्या लालूंचा राजकीय प्रवास खूपच वेधक असा आहे. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये केवळ अडविली नाहीतर त्यांना अटक करणाऱ्या लालूंनी भाजपेयींकडे जाण्याचे आपले सारे दरवाजे आपणहून बंद करून टाकले. तोपर्यंत ते दलितांचे नेते होते, अडवाणींना अटक करुन ते मुस्लिमांचेही नेते बनले. त्यामुळं बिहारवर त्यांची जबरदस्त पकड राहिली. त्यामुळेच भ्रष्टाचाराचे मार्ग चोखाळले गेले. बेनामी संपत्ती प्रकरणी त्यांना ५ वर्षांची सजा झाली आणि ११ वर्षे संसदेत येण्याचा मार्ग बंद झाला. सजा सुनावल्यावर संसदेतून बडतर्फ होणारे लालू हे पहिलेच राजकीय नेते!

३ वर्षांहून अधिक काळ एखाद्याला सजा झाली तर त्याला निवडणूक लढविण्यास बंदीची तरतूद असलेला निवडणूक लढविण्यासंदर्भातील कायदा बदलणारा अध्यादेश मनमोहनसिंग यांनी काढला होता तो लालू यांना वाचविण्यासाठी! लालू हे त्यावेळी मनमोहनसिंग यांचे सहकारी होते. राहुल गांधींना हे समजलं त्यांनी थेट पत्रकार परिषदेत येऊन तो फाडून टाकला होता. राहुल यांच्या वागण्याची चर्चा त्यावेळी खूप गाजली. त्यामुळे लालूंचे संसदेत येण्याचे मार्ग बंद झाले. दुर्दैवाने याच लालूंना बिहारात महागठबंधनसाठी राहुलकडेच जावं लागलं.

१९९४ मध्ये खोटी बिलं सादर करून गुमला, रांची, देवघर, पाटणा, डोरांडा, लोहरदगा या कोषागारातून जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या नावावर ९५० कोटी रुपये काढून भ्रष्टाचार केल्याचं उघड झालं. त्यामुळं लालूंना सजा झालीय. चारा घोटाळ्यात जामीन होण्यापूर्वी १९९७ मध्ये १३५ दिवस, १९९८ मध्ये ७३ दिवस, २००० मध्ये ११ दिवस तर उत्पन्नापेक्षा जादा संपत्ती प्रकरणी २००२ मध्ये १दिवस लालू जेलची हवा खाऊन आलेत. देवघर कोषागार प्रकरणी ३जानेवारीला सजा सुनावण्यात येणार आहे. याशिवाय इतर केसेस आहेतच.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...