Saturday 23 December 2017

काँग्रेसमधील सोनिया युगाची अखेर!

*काँग्रेसमधील 'सोनिया युगा'ची अखेर!*

"काँग्रेसचा सूर्य अस्ताला निघाला असताना त्याला पुन्हा झळाळी प्राप्त करून देण्याचं, तेजस्वी करण्याचं श्रेय सोनिया गांधी यांच्याकडं जातं. आज पुन्हा पक्षाची तशीच अवस्था झाली असताना काँग्रेसची सूत्रं राहुल गांधींच्या हाती सोपविली जाताहेत. आजची जी कठीण अवस्था राहुल गांधींपुढे आहे, तशीच स्थिती १९ वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्यासमोर होती. विखरणाऱ्या, शकले होणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकत्र, एकसंघ आणण्याची आणि २००४ पासून २०१० पर्यंत सत्ता टिकविण्यासाठी सोनिया गांधी यांनी जे योगदान दिलं ते विसरता येणार नाही. काँग्रेसपक्षापासून अलग झालेल्यांना आणि त्यांच्या पक्षाला पुन्हा एकदा काँग्रेसच्या छताखाली आणण्यासाठी जी मुत्सद्देगिरी सोनियांनी दाखविलीय  मात्र ठराविक नेत्यांवर त्यांनी आंधळा विश्वास ठेवला यामुळेच काँग्रेसच्या पतनाला प्रारंभ झालाय. १८ वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर त्या आता राजकारणात सक्रिय राहणार आहेत की, निवृत्ती घेणार हे आगामी काळात दिसेल!"
------------------------------------------

होणार, होणार म्हणत गेली काही वर्षे डंका पिटला जात होता त्या राहुल गांधी यांचा कांग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून राज्याभिषेक अखेर झाला. त्याचबरोबर सोनिया गांधी यांचा १८ वर्षाचा दीर्घ कालखंड संपुष्टात आला. 'सोनिया युगा'चा दीड तपाचा अंत झालाय. १३२ वर्षाच्या काँग्रेसपक्षांची धुरा नेहरू गांधी घराण्याकडे ४५ वर्षे राहिलीय. त्यातही सोनिया गांधींनी दीर्घकाळ सांभाळलीय. मोतीलाल नेहरू दोन वर्षे, जवाहरलाल नेहरू ११ वर्षे, इंदिरा गांधी ६ वर्षे, राजीव गांधी ६ वर्षे, अध्यक्ष म्हणून पक्ष सांभाळला. सोनिया गांधींनी प्रारंभी इच्छा नसताना देखील सक्षमपणे काम करीत १८ वर्षे ही जबाबदारी स्वीकारली. गेले काही दिवस प्रकृती असवस्थामुळे सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतील. अशी चर्चा सुरू होती. पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. सोनिया गांधी राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आहेत.

*'विदेशी' असल्याचा कायमचा ठपका*
भारतीय संस्कृतीची परंपरा अशी राहिली आहे की, कुठल्याही मुलीचं, तरुणीचं लग्न झालं की ती पित्याच्या घरातून पतीच्या घरी जाते. तेव्हापासून ती त्या घराची सून म्हणून ओळखली जाते. परंतु सोनिया गांधी यांचा विषय निघताच भारतातील अनेक लोक विशेषतः राजकारणातील काही लोक ते स्वीकारायला तयार नाहीत. आजकाल अगदी सामान्य विदेशी तरुणीनं कुण्या भारतीयाशी लग्न केलं तर, तिनं कशा भारतीय परंपरा स्वीकारल्या आहेत याच मोठं कौतुक केलं जातं. तिच्या त्या गुणांचे गोडवे गायले जातात. पण सोनिया गांधींबाबत असं काहीच घडलं नाही. कदाचित त्या इंदिरा गांधी यांच्या स्नुषा म्हणून असेल वा गांधी-नेहरू घराण्यातील व त्या वंशाच्या राजीव गांधींबरोबर तिनं सप्तपदी घातली म्हणूनही असेल.

*प्रारंभी विरोध मग सहभाग*
असं सांगितलं जातं की, सोनिया गांधींना राजीव गांधी यांनी राजकारणात यायला नको होतं. त्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. पण इंदिराजींची हत्या, देशापुढील प्रश्न, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह या निर्माण झालेल्या परिस्थितीत सोनियांचा विरोध मावळला. राजीव गांधींनी सूत्र हाती घेतली त्यानंतर मात्र त्या राजीव गांधींची सावली म्हणूनच वावरल्या. निवडणूक असो व समारंभ सगळीकडं त्या राजीव गांधींबरोबर भारतीय पेहरावात सगळ्यांनी पाहिलंय. म्हणजेच त्या भारतीय संस्कृती, परंपरा या मनापासून जपत होत्या. पालन करीत होत्या.

*राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय*
९ डिसेंबर १९४६ रोजी सोनियाजी इटलीच्या लुसियाना या लहानशा खेड्यात जन्मल्या. शिक्षणासाठी लंडनच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर तिथं राजीव गांधींशी ओळख झाली. ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेम, आणि प्रेमातून १९६८ दरम्यान विवाह झाला. राजीव गांधीसारख्या एक मोठ्या देशाच्या  राज्यकर्त्यांच्या मुलाशी लग्न करताना त्या कुठल्या राजकीय कुटुंबातून आलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्याशी कोणताही राजनैतिक संबंधही नव्हता. त्या एक साधीसुधी गृहिणी म्हणून त्या गांधी परिवारात आल्या होत्या. इंदिराजींच्या नंतर राजीव पंतप्रधान बनले. पण बोफोर्स प्रकरणात त्यांचं नाव घेतलं गेलं त्यामुळं १९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाचा पराभव झाला. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव यांची हत्या झाली. त्यानंतर सोनिया गांधींनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं होतं. पण इकडे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याशी सल्ला मसलत केल्याशिवायच परस्पर काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचं नाव जाहीर करून टाकलं. पण सोनिया गांधींनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी राजकारणात येण्याऐवजी प्रियांका आसनी राहुल या आपल्या अपत्यांवर लक्ष केंद्रित केलं. गांधी घराण्याशी ज्या काही सामाजिक संस्था होत्या त्याच्याशी त्या जोडल्या गेल्या.

*काँग्रेसला गळती लागली*
इकडे राजीव गांधी हत्येनंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्याचा फायदा झाला अन देशात काँग्रेसची सत्ता आली. पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान बनले. बाबरी मशिद पडताना ते निष्क्रिय राहिले, त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणून पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली, असंतोष निर्माण झाला. यातूनच १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा पराभव झाला. पराभवानंतर सोनिया गांधी यांना राजकारणात सक्रिय करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. दरम्यान सीताराम केसरी  यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष बनवलं गेलं. पण पक्ष एकसंघ राहिला नाही. पक्षात फूट पडू लागली. उत्तरप्रदेशचे मोठे नेते अर्जुनसिंह आणि नारायणदत्त तिवारी पक्षातून बाहेर पडले. त्यांनी तिवारी काँग्रेसची स्थापना केली. तर तामिळनाडूतील दिगग्ज नेते जी.के. मुपनार यांनी पी. चिदंबरम यांनी बरोबर घेऊन तामिळ मनीला काँग्रेस काढली. मध्यप्रदेशातून माधवराव शिंदे काँग्रेसमधून अलग झाले. एका पाठोपाठ अनेक नेते बाहेर पडू लागले.

*सदस्य ते पक्षाध्यक्ष*
अशा विखुरलेल्या काँग्रेस पक्षाच्या संघटित करायचं, एकसंघ करायचं तर नेहरू-गांधी घराण्यातील सदस्याचीच गरज आहे हे ओळखून अनेक वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींची मनधरणी बरोबरच दबाव आणायला सुरुवात केली. त्यात नेते यशस्वी झाले. शेवटी १९९७ मध्ये कलकत्त्याच्या प्लेनरी सेशनमध्ये सोनिया गांधींना काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व दिलं गेलं. आणि त्यानंतरच्या ६२ दिवसांनी १९९८ मध्ये झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपद हे सोनिया गांधीसाठीदेखील एक मोठं आव्हान होतं. १९९९ मध्ये अटलबिहारी भाजपेयी यांच्या सरकारच्या पतनानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेचा प्रयत्न केला. परंतु समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंह यांनी सोनिया गांधी या 'विदेशी' आहेत असा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसला पाठींबा द्यायचं नाकारलं. आणि याच विदेशी मुद्यावर शरद पवार, तारिक अनवर, पी.ए. संगमा काँग्रेसपक्षातून दूर गेले.

*प्रधानमंत्रीपद नाकारलं*
त्याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला यश मिळालं. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान तर सोनिया गांधी या विरोधीपक्ष नेत्या बनल्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या 'इंडिया शायनिंग' आणि 'फिलगुड फॅक्टर' या घोषणा त्यांच्या अंगाशी आल्या. त्याचवेळी सोनिया गांधींवर स्वतःचा पक्ष एकसंघ ठेवण्याबरोबरच समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची जबाबदारीही आली. 'अबकी बारी अटलबिहारी' अशा घोषणा देत एनडीए निवडणुकीत उतरली होती. याचवेळी सोनिया गांधी यांनीं देशभरात झंझावात प्रचार दौरा केला. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विरोधीपक्षाला सोनियांचा हा प्रतिसाद चक्रावून टाकणारा होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला २०० हून अधिक जागा मिळाल्या. डाव्या पक्षांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसला पाठींबा दिला. १६ मे २००४ रोजी १६ पक्षाच्या नव्या आघाडीच्या नेत्या म्हणून सोनिया गांधी यांची एकमताने निवड झाली. आघाफीच्या नेत्या म्हणून सोनिया गांधी याच देशाच्या पंतप्रधान होणार हे जवळजवळ निश्चित समजलं जात होतं. तेव्हा देखील पुन्हा एकदा त्या 'विदेशी' असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. पण त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखणारं कोणीच नव्हतं. असं असतानाही त्यांनी आपल्या 'आपला आतला आवाज' असं म्हणत साऱ्यांनाच एक धक्का दिला. आपल्याकडं चालत आलेलं पंतप्रधानपद त्यांनी नाकारलं आणि ऐनवेळी डॉ.मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदासाठी पुढं केलं. या त्यांच्या निर्णयाला काँग्रेसजनांनी खूप विरोध केला. पण त्यांचा निर्धार कायम होता. त्यांनी पक्षाच्य नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, 'माझं कशी पंतप्रधान बनण्याचं लक्ष्य कधीच नव्हतं.' सोनिया गांधी यांच्या निर्धारापुढं साऱ्यांना नमतं घ्यावं लागलं. अखेर डॉ. मनमोहनसिंग देशाचे पंतप्रधान बनले.

*महत्वपूर्ण निर्णयाला प्रारंभ*
डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान तर सोनिया गांधी नॅशनल ऍडव्हायसरी कमिटीच्या अध्यक्ष बनल्या. युपीएच्या शासनकाळात डॉ. मनमोहनसिंग हे एक पपेट- कंठपुतली पंतप्रधान आहेत. खरं सरकार चालविण्याचं काम तर सोनिया गांधी याच करतात अशी चर्चा होत होती. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. हे देखील खरं आहे की, सोनिया गांधी यांच्या प्रयत्नानं युपीएच्या शासन काळात माहिती अधिकाराचा कायदा, मनरेगा, कॅशलेस बेनिफिट, आणि आधार यासारख्या महत्वपुर्ण योजना कार्यान्वीत झाल्या. २००८ मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावर डाव्यांनी काँग्रेसला दिलेला पाठींबा काढून घेतला. सरकार अडचणीत आलं. सोनियांनी मुत्सद्देगिरी दाखवत मुलायमसिंह यांना आपल्या बाजूला वळवलं. त्यांनी दिलेला पाठींबा आणि क्रॉस व्होटींग यामुळं युपीए सरकार बचावलं.

*भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलं*
२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरलं. प्रसिद्धी माध्यमांनी जेरीला आणलं होतं. ,पण सोनियांच्या नेतृत्वाखालील युपीएला बहुमत मिळालं. एवढंच नाही तर काँग्रेसची सदस्य संख्याही वाढली. २००९ नंतर सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होतच राहिले. २जी स्केम, कोळसा कांड, आणि काळ्या पैशाबाबतची सरकारची अनास्था या साऱ्या आरोपांनी सरकारची मोठी बदनामी झाली. त्याचा परिणाम असा झाला की, युपीएची सत्ता गेली आणि भाजपला बहुमत मिळालं. तेव्हापासून काँग्रेस पिछेहाट होण्याचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस पराभूत झाली. आसाम, जम्मू काश्मीर, तेलंगणा, आंध्रप्रदेश सारख्या पारंपारिक काँग्रेसी राज्यातही काँग्रेस पराभूत झाली. बिहारमध्ये आघाडी सरकार बनलं पण नंतर नितीशकुमार एनडीएत सामील झाल्यानं सत्ता काँग्रेसपासून दूर गेली. केवळ एकमात्र सरकार पंजाबमध्ये काँग्रेस स्थापन करू शकली.

*इतिहासाची पुनरावृत्ती*
काँग्रेसचा सूर्य अस्ताला निघाला असताना त्याला पुन्हा झळाळी प्राप्त करून देण्याचं, तेजस्वी करण्याचं श्रेय सोनिया गांधी यांच्याकडं जातं. आज पुन्हा पक्षाची तशीच अवस्था झाली असताना काँग्रेसची सूत्रं राहुल गांधींच्या हाती सोपविली जाताहेत. आजची जी कठीण अवस्था राहुल गांधींपुढे आहे, तशीच स्थिती १९ वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्यासमोर होती. विखरणाऱ्या, शकले होणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकत्र, एकसंघ आणण्याची आणि २००४ पासून २०१० पर्यंत सत्ता टिकविण्यासाठी सोनिया गांधी यांनी जे योगदान दिलं ते विसरता येणार नाही. काँग्रेसपक्षापासून अलग झालेल्यांना आणि त्यांच्या पक्षाला पुन्हा एकदा काँग्रेसच्या छताखाली आणण्यासाठी जी मुत्सद्देगिरी सोनियांनी दाखविलीय  त्यानं त्या मुत्सद्दी आहेत हे सिद्ध झालंय. कित्येक काँग्रेसजनांच्या केलेल्या चुकांबाबत त्यांची कान उघडणी करण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं. पण त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागलाय. ठराविक नेत्यांवर मात्र त्यांनी आंधळा विश्वास ठेवला यामुळेच काँग्रेसच्या पतनाला  प्रारंभ झालाय. आता काँग्रेसजनांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपविल्यानंतर त्यांना आता पुत्रप्रेम, पुत्रमोह, वंशवाद आशा आरोपांना सोनियांना सामोरं जावं लागतंय.

*संयमी आणि धैर्यवान*
इटली पासून भारतापर्यंत आणि सोनिया मायनो पासून सोनिया गांधी पर्यंतचा त्यांचा प्रवास! अनेक संकटांना सामोरं जाताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि संयमीपणा मानायलाच हवा. सासू इंदिरा गांधींच्या देहाची अतिरेक्यांनी केलेली चाळणं, पती राजीव गांधी यांच्या देहाच्या झालेल्या चिंधड्या पाहात ज्या धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या त्यानं भारतीयांच्या मनांत एक कोपरा त्यांनी निर्माण केलाय. हे मात्र खरं...!

चौकट........

*चित्रपट निघाला असता*
लंडनचे चित्रपट निर्माते जगमोहन मुंदडा यांनी सोनियांच्या जीवनावरील चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली होती. सोनिया गांधींच्या भूमिकेसाठी मोनिका बलुची या नावाच्या इटालियन अभिनेत्रीची निवड केली होती. मोनिका बलुची हिची अनेक अभिरुचीहीन फोटो त्यापूर्वी प्रसिद्ध झालेली होती. मुंदडा यांना प्रधानमंत्रीपद नाकारण्याचं धाडस दाखविण्याच्या त्यांच्या कृतीने प्रभावित केलं होतं. त्यांनी पत्रकार रशीद किडवाई लिखित 'सोनिया अ बायोग्राफी' या पुस्तकावरून फिल्म बनविण्याचं जाहीर केलं. या चित्रपटाची सुरुवात २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी भारताचं प्रधानमंत्रीपद स्वीकारायला नकार दिला त्या ऐतिहासिक क्षणापासून होणार होती. त्यानंतर केंब्रिज इथं शिकत असताना चार्मिंग प्रिन्स राजीवने सोनियांना 'पेपर नॅपकिन'वर पहिला प्रेमसंदेश कसा पाठवला, अशा अनेक घटना चित्रपटातून उलगडणार होत्या. प्रधानमंत्र्यांचा मुलगा असूनही सोनियांना स्कुटरवरून इंडिया गेटजवळ आईस्क्रीम खायला घेऊन जाणारे तरुण राजीव गांधी या चित्रपटात दिसणार होते. अशा विविध प्रसंगाचं चित्रण असलेला हा चित्रपट त्यावेळी शेकडो कोटी रुपये बजेटचा होता त्याचं चित्रण इटली, ब्रिटन आणि भारतात होणार होतं. या चित्रपटातील इतर महत्वाच्या भूमिका म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. इंदिराजींची भूमिका अभिनेत्री पेरिझाद झोराबियन या साकारणार होत्या  तर राजीवच्या भूमिकेत संजय सूरी. संजय गांधींची भूमिका झायेद खान याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी अभिषेक याकगी निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी राजीव आणि सोनिया यांची एंगेजमेंट झाली होती; ते ही या चित्रपटात दाखविण्यात येणार होतं. स्टारकास्ट निश्चित होण्यापूर्वीच मुंदडा यांनी सोनिया गांधींचं इटलीमधील जन्म घर आणि राजीव गांधी यांची हत्या श्रीपेरूम्बदूर शहरात ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी जाऊन शुटिंगची तयारीही केली होती. पण न्यायालयात स्थगिती मिळाली अन चित्रपट थांबला तो थांबलाच!


- हरीश केंची, ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...