Saturday, 9 December 2017

अमृतानुभवी शरद पवार!

*'अमृतानुभवी' शरद पवार...!*

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा लढवय्या नेता महाराष्ट्राने अलीकडच्या काळात पाहिला नाही. राजकीय आणि व्यक्तीगत जीवनातही अनेक संकटे आली, तरी न डगमगता त्यांनी संकटावर मात केलीय. निवडणूक निकालानंतर 'पवार संपले, पवारांचे राजकारण संपलं' असं अनेकदा म्हटलं गेलं. मात्र तत्कालीन राजकीय अपयशावर मात करून पवार पुन्हा उभे राहिले. आणि त्यांनी दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली. पवारांच्या राजकारणाचे अनेक दोष दाखविता येतील. अर्थात त्यांचे विरोधक आणि त्यांच्या विरोधाचं भांडवल करून दिल्लीकडून काही पदरात पाडून घेणारे काँग्रेसवाले सतत पवारांचे दोष दाखवीत असतात. ,प्रत्यक्षातले दोष त्याहून अधिक असले, तरीही पवारांकडे जे गुण आहेत, त्यातले निम्मेअर्धे गुण असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात सापडत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तरी 'शरद पवार' ही सहा अक्षरं वगळून कसलाही विचार करता येत नाही. ना भूतकाळाचा, ना वर्तमानाचा, ना भविष्यकाळाचा...!"
--------------------------------------------

*म*हाराष्ट्रात १९६७ मध्ये विधानसभेची निवडणूक होती तेव्हाची गोष्ट! बारामती मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं शरद पवार या राजकारणात तुलनेनं नवख्या असलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं होतं. त्याला उमेदवारी मिळू नये म्हणून बारामती तालुक्यातील काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले. तरीही यशवंतराव चव्हाणांनी या तरुणातील गुणवत्ता हेरून, पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून या तरुणाला उमेदवारी दिली. त्यामुळे तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन राजीनामा दिला. तसंच शरद पवार यांच्याविरोधात आपला उमेदवारही उभा केला. तरीही शरद पवार या निवडणुकीत तब्बल १८ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये हा सर्वाधिक मताधिक्य असलेला विजय होता.

*चढत्या कर्तृत्वाची कारकीर्द!*
आपल्या या पहिल्या निवडणुकीत केली तशी किमया शरद पवार यांनी नंतर आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा केलीय. बारामती तालुक्यातील काटेवाडी या लहानशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज दिल्लीत स्थिरावलाय. पण त्यांच्या या राजकीय प्रवासात अनेक मैलाचे दगड आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक खात्याची अनेक मंत्रिपदं, विधानसभा, विधान परिषद इथं विरोधीपक्ष नेतेपद, चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद, केंदीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री, कृषिमंत्रीपद, अशी शरद पवारांची राजकीय कारकीर्द नेहमीच चढत्या कर्तृत्वाची राहिली आहे.

*कार्यकर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव*
महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं तर, सध्या शरद पवारांइतका सर्वार्थानं व्यापक विचाराचा मोठा नेता महाराष्ट्रात दुसरा नाही. तसंच वेगळ्या शब्दात सांगायचं तर महाराष्ट्राच्या जनमानसावर असलेलं शरद पवार नावाचं गारुड गेली ५०वर्षांहून अधिक काळ कायम आहे. महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण जनतेला, तरुण आणि वयस्करांना, महिला आणि पुरुष वर्गाला, कामगार आणि उद्योगपतींना सारखेच आकर्षण असलेला शरद पवार हा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे.

*कॅन्सरशी केलेली झुंज उलगडली*
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 'राजकारण आणि गुन्हेगारी' यांच्या युतीचा मुद्दा घेऊन भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्यापर्यंतचे आरोप केले होते. शिवसेनाप्रमुख यांनीही झंझावाती दौरे करून काँग्रेसच्या सरकार विरोधात रान पेटविलं होतं. तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अशाही वातावरणात पवारांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन नामविस्तार केला होता. त्याचाही फटका मराठवाड्यात काँग्रेसला बसला आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. तेव्हा शरद पवार संपले, असं अनेकांना वाटलं. परंतु अवघ्या काही महिन्यांतच फिनिक्स पक्षाप्रमाणे पवार पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी युती सरकारची लक्तरं वेशीवर टांगायला सुरुवात केली. पवारांच्या आयुष्यात अशी अनेक स्थित्यंतरं, चढउतार आले.परंतु पवार डगमगले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई होती ती कॅन्सरबरोबरची...! त्याबाबत एकूणच गूढ होते. २००२ मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याच निष्पन्न झाल्यानंतर जवळपास १०-१२ वर्षे त्यांनी कॅन्सरशी झुंज दिली. पण ती त्यांनी कशी दिली याबाबत कुणालाच फारसं माहीत नव्हतं. त्याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. २०१२च्या अखेरीस पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी स्वतःच कॅन्सरशी केलेल्या झुंजीची कहाणी उलगडून दाखविली. तेव्हा सारेच अचंबित झाले!

*उपचारात जीभ, ओठ जळाले, दात गेले*
कॅन्सर झाल्याचं लक्षात येताच त्याविरोधात लढण्यासाठी मनाची केलेली तयारी आणि त्यावर घेतलेली मेडिकल ट्रीटमेंट यामुळं असाध्य अशा या आजारावर विजय मिळवणं शक्य झाल्याचं सांगताना पवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. "२००४ च्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना बरोबर असलेल्या डॉक्टर मित्राने मेडिकल तपासणी करुन घेण्याचा सल्ला दिला. अर्ज भरल्यानंतर घरी न जाता गाडी थेट ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये घेतली. आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ५०-५० टक्के शक्यता वर्तविण्यात आली. पण खचून न जाता पुढील उपचारासाठी परदेशात जाऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करणारे तज्ज्ञ परदेशी डॉक्टर तेव्हा मुंबईतच होते. त्यामुळं अवघ्या तीन दिवसांतच ऑपरेशन पार पडलं. मंत्रिपदाचा शपथविधी महिन्याभराने झाला. ऑपरेशननंतर ट्रीटमेंट सुरूच होती. सकाळी नऊ ते संध्याकाळी पांच मंत्रिपदाचं काम आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ लागलो. या उपचारामध्ये जीभ, ओठ जळाले. तोंडातले दात गेले. प्रचंड त्रास झाला. तरीही घाबरून न जाता उपचार घेत राहिलो. सुरुवातीला आठवड्याने तपासणीसाठी जावं लागायचं. पुढे पंधरा दिवस, महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष असं करत तीन वर्ष झाली. त्यानंतर डॉक्टरांनी 'आता कधीही येऊ नका' असं सांगत आजार बरा झाल्याचं सांगितलं."

*झुंज सुरू असतानाच सरकारशी लढा*
शरद पवार यांनी सांगितलेली कॅन्सरच्या झुंजीची ही कहाणी थक्क करणारी आहे. ही झुंज सुरू असतानाच शरद पवार महाराष्ट्रभर फिरत होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांची पाठराखण करीत होते. त्याचवेळी शेतीमालाचे बाजारातील भाव वाढत होते आणि त्याची जबाबदारी पवारांवर ढकलून काँग्रेससह सत्ता आघाडीतील सगळेच पक्ष, नेते नामानिराळे राहत होते. त्यापूर्वी तसं कधी घडलं नव्हतं. महागाईची सामूहिक जबाबदारी सरकारची असायची. परंतु महागाईच्या निमित्तानं काँग्रेसनेही कृषिमंत्री शरद पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले. आपल्याच सरकारकडून आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून होणारे हे हल्ले पवार यांनी परतवून लावले. एवढंच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी 'मंत्रिपद पणाला लावावे लागले तरी चालेल' असा निर्धार व्यक्त केला. खरं तर, ही भूमिका स्वीकारण्यात जोखीम होती. परंतु पवार यांनी त्याची पर्वा केली नाही.

*कॅन्सरसह प्रसारमाध्यमांशी मुकाबला*
कोणतीही भूमिका घेताना लोक काय म्हणतील, याचा विचार पवार यांनी कधी केलाच नाही. प्रसारमाध्यमं काय म्हणतील, हेही त्यांनी पाहिलं नाही. त्याचा फटका त्यांना बसला तरी ते आपल्या भूमिकेपासून हटले नाहीत. कारण मुळात पवार हे इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोठे केलेले नेते नाहीत.  किंवा प्रसारमाध्यमांनी हवा भरलेल्यांपैकीही नाहीत. उलट, प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचंच काम जातिनिशी केलं. त्यांच्यावर कुणीही केलेल्या कसल्याही आरोपांना शहानिशा न करता प्रसिद्धी देऊन पवारविरोध किंवा पवारद्वेष वारंवार प्रदर्शित केला आहे.  विविध राजकीय पक्षांमध्ये पवारांचे मित्र आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे निकटवर्तीय आहेत. असं असूनही त्यांनी कधी त्यांचा वापर केल्याचं ऐकिवात नाही. प्रसारमाध्यमं सातत्यानं पवारांच्यावर टीकाच करीत राहिली.  अर्थात, ही टीका विषय समजून घेऊन झाली असती, तरीही हरकत नव्हती. परंतु ही टीकाही सातत्याने अडाणीपणाने केली गेली. म्हणूनच पवारांनी काही वेळा थेटपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलणार नाही असं सांगितलं. परंतु मुद्रित माध्यमंही पवारांबाबत फार जबाबदारीने वागलीत, असं म्हणता येणार नाही. तीही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या मागे फरफटत निघाली आणि त्यांनीही पवारांना चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं. पवारांनी याची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवली. ज्या धीराने आणि निर्धाराने कॅन्सरचा मुकाबला केला तसाच त्यांनी प्रसारमाध्यमं आणि विरोधकांच्या, मित्रांच्या टीकेचाही मुकाबला केला आणि आपलं जीवन अमृतमयी करून टाकलं...!

चौकट

*डॉक्टर म्हणाले, 'सहा महिने उरलेत'*
कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर उपचार सुरू केले. पवारांवर उपचार करणाऱ्या त्या तरुण डॉक्टरने, 'साहेब, तुमचे फक्त सहा महिने उरले आहेत. काही कागदपत्रं तयार करायची असतील तर करून घ्या,' असा सल्ला दिला होता. त्यावेळी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या पवारांनी, 'तुला पोहोचवायला मी येईन,' असं सांगितलं होतं. 'आजाराने खचून न जाता मनाची ताकद आणि मेडिकल ट्रीटमेंट यांच्या जोरावर आज मी कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे.' असं पवारांनी सांगताच सारे आश्चर्यचकित झाले.

- हरीश केंची, ९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...