Saturday, 23 December 2017

वसंतदादांच्या नावाची इतिश्री!

 *वसंतदादांच्या नावाची इतिश्री...!*

"राजकारणात जेव्हा विचार, साधेपणा, संघटन, चारित्र्य आणि सभ्यतेला प्रतिष्ठा होती. त्याकाळाला अनुसरून वसंतदादा पाटील या व्यक्तीचं कर्तृत्व महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलं. तसंच कर्तृत्व तामिळनाडूत कामराज यांनी गाजवलं होतं. रूढार्थानं शिक्षण कमी; मात्र कर्तृत्व मोठं गाजवणाऱ्या ज्या काही व्यक्ती देशात झाल्या त्यात ही दोन नावं आदरानं घ्यावीत अशी आहेत. अफाट क्षमता आणि ऊर्जा हे या कर्तृत्ववानांचं गमक होतं. स्वार्थ असलाच तर तो लौकिकातला. मात्र एकूण समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अलौकिक. वसंतदादा त्यामुळं मोठे आहेत. त्यांच्या हयातीत त्यांच्या घरात घराणेशाहीची प्राणप्रतिष्ठा झाली. मात्र त्यामुळं त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात-राजकारणात जे काही कर्तृत्व गाजवलं, ते कमअस्सल ठरत नाही. आपल्या कर्तृत्वाचं भविष्यात कधीतरी 'मार्केटिंग' व्हावं, त्याची बाजारपेठ व्हावी, असं दादांना वाटलं नाही. त्याबाबतीत ते अद्रष्टे होते. आपल्या नावावर आपलेच वारस बोळे फिरवतील, असं त्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हतं. मात्र हे घडलंय!"
------------------------------------------
*का*ही वर्षांपूर्वी रंगमंचावर 'सूर्याची पिल्ले' हे एक सर्वांगसुंदर नाटक आलं होतं. नाटककार जयवंत दळवी यांनी 'राजकीय सूर्या'ची मुलं कशी वागतात, आपल्या वडिलांचा वारसा कसा चालवतात याची वास्तववादी मांडणी त्यात केली होती. ती कुणा नेत्यांवर बेतलेली कथा नव्हती पण राजकारणातल्या प्रत्येक नेत्याला हे आपलंच कथानक असावं अशी शंका त्याकाळी येत होती. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या वसंतदादांच्या जीवनात अगदी असंच काही नाही पण वसंतदादांच्या नंतर जे काही घडलं त्यावरुन वसंतदादांच्या नावाची त्यांच्या वारसदारांकडूनच इतिश्री झाल्याचं दिसून येतं.

*आत्मचरित्रात उल्लेखच नाही*
हे काम करण्यात शालिनीताई पाटील या दादांच्या द्वितीय पत्नी कुठेच कमी पडत नाहीत. दादांचं पहिलं लग्न मालतीबाई यांच्याशी झालं होतं. दुसरं लग्न शालिनीताई पाटील यांच्याशी झालं. दादांचा जसा हा दुसरा विवाह तसा शालिनीताई यांचाही दुसरा विवाह. त्यांचं माहेरचं आडनाव फाळके. पहिल्या सासरचं आडनाव जाधव. तर दुसऱ्या सासरचं आडनाव पाटील. तेच आडनाव त्या लावतात. वसंतदादांच्या संमतीने त्यांचा जो काही चरित्रात्मक इतिहास लिहून ठेवला गेला आहे, त्यात या दुसऱ्या पत्नीचा उल्लेख त्यांनी कुठेच करू दिलेला नाही. तसेच शालिनीताईंनी 'स्वयंसिद्धा' या नावानं जे स्वचरित्र प्रसिद्ध केलं आहे त्यात पहिल्या लग्नाचा उल्लेख नाही हे विशेष! वसंतदादा आणि डॉ. शालिनीताई यांचा संसार उण्यापुऱ्या वीस वर्षांचा. तो किती मधुर होता हे तो काळच जाणे! ताईंना पहिल्या नवऱ्यापासून चार मुलं झाली होती. तरीही दादांनी त्या चार मुलांना दत्तक घेतलं. बाप म्हणून आपलं नाव लावू दिलं. ही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली असली तरी, मुळातच हे लग्न एका करारासारखं राहिलं. ताई दादांसोबत होत्या. मात्र त्यांचं पद आणि प्रतिष्ठेसोबत त्या जास्त राहिल्या. जणू त्यांनी सत्तेसोबत विवाह केला असावा..!

*ताईंच्या विधानानं लौकिकाला तडा*
अनेक वर्षे मंत्री असलेले वसंतदादा सर्वप्रथम १९७७ मध्ये मुख्यमंत्री बनले. काही वर्षानंतर ताईंनी केलेलं वक्तव्य त्यावेळी खूपच चर्चेलं गेलं होतं. "वसंतदादा कठोर देशभक्त होते, संघटनेत तरबेज होते, मात्र सातवी पास असल्यानं त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. तो मी निर्माण केला. त्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले!" त्या धडधडीत खोटं बोलत होत्या. दादांचं कर्तृत्व फुललं ते शालिनीताईमुळे असं सांगणंच मुळी धादांत होतं. वसंतदादांचं १९४२ च्या लढ्यातील कर्तृत्व आणि धाडस हे आत्मविश्वास या शब्दाला लाज वाटावी असं आहे. शालिनीताई वसंतदादांच्या नावावर अधूनमधून पोतेरं फिरवत असतात. तर आपल्याबद्धलची सर्व माहिती समाजासमोर येऊ देत नाहीत आणि दादांच्या लौकिकाला तडा जाईल अशी विधानं त्यांनी वेळोवेळी केली आहेत. दादांनी खासगीत अनेकदा स्पष्टपणे सांगितलं होतं ते असं की, "शिक्षणाचा आणि साक्षरतेचा संबंध असतो, हे खरं मात्र त्याचा शहाणपणाशी काहीच संबंध नसतो, शिक्षण उपयोगाचं असतं मात्र त्याशिवाय अडतं असंही नाही!' त्यामुळे दादा आमदार मंत्री होऊ शकले. तेव्हा शालिनीताई ताकारीत भाकरी बडवत होत्या. दादांच्या आयुष्यात मुख्यमंत्रीपदाच्या सत्तेची पौर्णिमा उगवण्याचा अवकाश काय तो बाकी होता आणि या चांदणीताईनी म्हणावं 'हे चांदणं माझ्यामुळेच!' असं हे प्रकरण होतं. शालिनीताई दादांच्या सेक्रेटरी होत्या. सत्तेच्या घरात त्या रांधत होत्या हे खरं, मात्र त्यासाठी लागणारा शिधा आणि पाककलेचं तंत्र रेसिपी काही त्याची नव्हती. ती फक्त दादांची आणि दादांनीच होती.  सेक्रेटरींनी "मीच नेत्याला घडवलं" असं म्हणायचं, तर सारेच दप्तरदार लोकनेते झाले नसते का?

*सत्तातृष्णेचा दादांना तिटकारा*
दादांच्या सत्तेचा ताईंनी यथेच्छ उपभोग घेतला. दादांमुळेच त्या आमदार, खासदार आणि मंत्री झाल्या, हा खरा इतिहास आहे. त्यांनीच माझ्यामुळे दादा घडले, असं म्हणावं हे खरं तर व्यंग आहे, हे व्यंग दादांनी आपल्या हयातीतच ओळखलं होतं. आमदार, खासदार, मंत्री करूनही आपल्या पत्नीची सत्तातृष्णा भागत नाही. घरात नैसर्गिक न्यायाचे वारसदार असताना  त्याच 'सर्व काही आपल्या हाती हवं' , असं म्हणत आहेत हे स्पष्ट होताच दादांनी ताईंना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर दादांना आपल्या या पत्नीचा भयंकर तिटकारा आला होता. त्यामुळेच त्यांनी आपल्या दोन्ही अधिकृत अशा आत्मचरित्रात 'शालिनीताई' हा शब्दच येऊ दिला नाही. तशा सूचना लेखकांना दिल्या होत्या.

*वर्चस्वाची झाली वाटणी*
दादांच्या पश्चात त्यांच्या घरात भाऊबंदकी माजली. त्यामुळेही दादांच्या लौकिकाचं बरंच मातेरं झालं. दादांकडे कौटुंबिक शहाणपण होतं, मात्र ते धंदेवाईक वळणाचं नव्हतं. त्यामुळेच 'माझ्यानंतर काय?' या प्रश्नाचं नीटसं उत्तर तयार करून ठेवण्याची गरज त्यांना वाटली नाही. 'माझ्यानंतर माझ्या सर्वांनी माझं काम पुढं न्यावं' अशी त्यांची धारणा होती. सर्वच वारसांनी आपल्यापुरताच अर्थ घेतला. दादांचा सहकारातील वारसा त्यांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांच्याकडे आला. तर राजकीय जबाबदारी प्रकाशबापू पाटील यांच्याकडे सोपविली गेली. दादांच्या प्रेमापोटी ही वाटणी कार्यकर्त्यांनी मान्य केली. मात्र या घरात वर्चस्वाचा कली शिरला. त्याने एकेकास डसायला सुरुवात केली. विष्णुअण्णा आणि प्रकाशबापू अशी इथं वाटणी झाली. शालिनीताईंनी दोघांपासून स्वतःहून दूर झाल्या.

*भाऊबंदकी नडली*
विष्णुअण्णा आणि प्रकाशबापू यांनी सार्वत्रिक निवडणुकीत एकमेकांना पाणी पाजून झालं. राष्ट्रवादीची निर्मिती होताच दोघांना दोन घरं मिळाली. त्यामुळं दोन नवी घराणी विकसित व्हायला हवी होती, पण झालं भलतंच. दुभंगलेल्या दोन्ही घराची अबस्था अत्यंत दयनीय होत गेली. या अवनतीची लागण वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून झाली. हा कारखाना आशिया खंडातला सर्वात मोठा कारखाना. राज्यातील राज्यकर्त्यांनी या भागात नवे पाच-सहा साखर कारखाने काढून दिले. परिणामी हा कारखाना उसाच्या टंचाईने कधी तर कधी स्पर्धेमुळे हळूहळू लंगडा बनत गेला. आर्थिक संस्थानीं हात आखडता घेतल्याने कारखाण्याच्या गव्हाणीचा पट्टा दादांच्या मृत्युनंतर बंद पडला. दादांच्या आत्म्याला तळतळाट देणारा हा प्रसंग त्यांच्याच कायदेशीर वारसांनी निर्माण करून ठेवला.

*वारसा पोरासोरांनी संपवला*
इकडे कारखाना बंद होण्याच्या काही दिवस आधी अध्यक्ष असलेल्या विष्णुअण्णांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण पवारांनी त्यांना मंत्रिपदाची हुल देऊन बाद केलं. मुलगा मदन पाटील लोकसभेसाठी पराभूत झाला. अण्णांच्या आजूबाजूला जी पोरंसोरं म्हणून वावरली, ते आर.आर.पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित घोरपडे मंत्री बनले होते आणि अण्णा काहीच नव्हते. राष्ट्रवादीत असताना दादांचे हे पुतणे अत्यंत विमनस्क, नैराश्येत असताना त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्याचवेळी प्रकाशबापूंची शारीरिक अवस्था ठीक नव्हती. व्यसनानं त्यांना आतून पोखरलं होतं. २००४ मध्ये शारीरिक स्थिती नीट नसताना दादांच्या नावानं त्यांना तारून नेलं, उमेदवारी मिळाली अन निवडूनही आले. मात्र त्यांचं राजकीय आयुष्य त्यांच्या शारीरिक अंतानं संपलं.

*वैमनस्यातून दादांचं नाव पुसलं गेलं*
दादांच्या या वारसांकडून दादांचा लौकिक वाढण्यापेक्षा तो नव्या पिढीपुढे कमीच झाला. विष्णूअण्णा -प्रकाशबापूंच्या पश्चात हे घर एक व्हायला हवं होतं, दादांचं चांगलं काम आणि नांव त्यांनी टिकवायला हवं होतं. मात्र दुही माजविणारा कली अजूनही डसतच होता. दादांचे नातू मदन पाटील-प्रतीक पाटील एका बाजूला आणि मदन पाटलांच्या काकी शैलजाभाभी व त्यांचा मुलगा विशाल एका बाजूला अशी फाळणी पुढेही चालू राहिली. त्याचास फायदा बाहेरच्या लोकांनी घेतला सांगलीची बाजार समिती मदन पाटलांच्या हातून गेली पाठोपाठ अनेक वर्षे या घराण्याचं वर्चस्व असलेली महापालिकाही गेली. दूध संघ मोडला. पाठोपाठ वसंतदादा शेतकरी सहकारी बँक संपली. वसंतदादांचं नाव पुन्हा एकदा पुसलं गेलं. दादांच्या वारसदारांनी त्यांचं नांव संपवलं. विरोधकांना ते नकोच होतं. मात्र लोक रितीनुसार दादांच्या बरोबर राहिले. दादांचं नाव सांगलीतून पुसलं गेलं, तरी महाराष्ट्राच्या जनामनात ते कोरलं गेलं आहे. त्यांचं नाव चालू राजकारणात राहणार नाही. मात्र इतिहासातून ते कुणीच पुसू शकत नाही.

- हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...