Saturday, 23 December 2017

सोनियांच्या जीवनावरील चित्रपट निघालाच नाही...

*सोनियांच्या जीवनावरील चित्रपट निघालाच नाही*

सोनिया गांधी.....!
२००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव करून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवून राजीव गांधींची हत्या व इतर अनेक कारणांमुळे अशक्त झालेल्या काँगेसला नवसंजीवनी दिली. सत्ताग्रहणाचा क्षण जवळ येताच 'अंतरात्म्याचा आवाजा'ला साक्षी ठेवून त्यांनी प्रधानमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली. लोकप्रियताही प्रचंड वाढली. सत्तेवर नसलेल्या सोनिया गांधींचा मात्र सर्वाधिक प्रभाव होता.

*न्यायालयाने स्थगिती दिली*
सोनिया गांधींचं हे प्रभावशाली व्यक्तिमत्व सिनेमाच्या पडद्यावर आणण्यासाठी काही फिल्म निर्माते पुढे सरसावले होते. लंडन मधील सिनेनिर्माता जगमोहन मुंदडा यांनी 'सोनिया गांधी' नावाचा चित्रपट काढण्याची सर्व तयारी पुर्ण केली. याशिवाय भारतातील प्रमोद तिवारी आणि दिनेशकुमार यांनीही 'सोनिया-सोनिया' या नावाचा चित्रपट तयार करीत असल्याची घोषणा केली होती. मुंदडा यांच्या चित्रपटात सोनिया गांधी यांचे जीवनचरित्र मांडले जाणार होते. परंतु तो तयार होण्यापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर जगात सर्वत्र चित्रपट बनविले जातात. त्यापैकी काही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजकीय वाद निर्माण होतात. हा सिनेमा वादात आणायला कारणीभूत ठरले ते नसीम खान नावाचे कुणी सामाजिक कार्यकर्ते.नसीम खान हे स्वतःला नेहरू-गांधी परिवाराशी जवळीक असल्याचा दावा त्यावेळी त्यांनी केला होता. मुंबईच्या सेशन कोर्टात सोनियांच्या जीवनावरील चित्रपट निर्माण करण्याला विरोध दर्शविणारा अर्ज केला. त्या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की, 'भारतीय राजकारण्यांच्या जीवनावर चित्रपट बनवून त्यांचं अयोग्य प्रकारे चित्रण करण्याची फॅशनच आली आहे. सोनिया गांधींबाबत असंच होण्याची धास्ती मला वाटते. देशासाठी अपरिमित त्याग करणाऱ्या सोनिया गांधींचा राजकीय पराभव करण्यासाठी उत्सुक असलेल्या विरोधकांना अशी फिल्म म्हणजे एक साधन मिळेल.'

*रशीद किडवाई यांच्या पुस्तकाचा आधार*
लंडनचे चित्रपट निर्माते जगमोहन मुंदडा यांनी त्यांच्या योजनेनुसार जुळवाजुळव सुरू केली होती. सोनिया गांधींच्या भूमिकेसाठी मोनिका बलुची या नावाच्या इटालियन अभिनेत्रीची निवड केली होती. मोनिका बलुची हिची अनेक अभिरुचीहीन फोटो त्यापूर्वी प्रसिद्ध झालेली होती. मुंदडा यांना प्रधानमंत्रीपद नाकारण्याचं धाडस दाखविण्याच्या त्यांच्या कृतीने प्रभावित केलं होतं. त्यांनी पत्रकार रशीद किडवाई लिखित 'सोनिया अ बायोग्राफी' या पुस्तकावरून फिल्म बनविण्याचं जाहीर केलं.

*धैर्यवान महिलेचं चित्रण*
सोनिया गांधींच्या भूमिकेसाठी कार्ला गुगिनो, ऐश्वर्या रॉय, प्रीती झिंटा, आणि मोनिका बलुची या अभिनेत्रींचा विचार झाला. इटालियन अभिनेत्री मोनिका सोनियांच्या भूमिकेला व्यवस्थित न्याय देऊ शकेल असं वाटल्याने मुंदडा यांनी तिच्याशी चित्रपटाच्या स्क्रिप्टविषयी चर्चाही केली. या चित्रपटात सोनिया गांधींचं चित्रण राजकारणी म्हणून करण्याऐवजी, पतिप्रेमासाठी भारतात येणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूनंतर भारतातच ठामपणे राहून समाजजीवनात भाग घेणाऱ्या धैर्यवान महिला, असं करण्यात येणार होतं

*इटली, ब्रिटन आणि भारतात शूटिंग*
या चित्रपटाची सुरुवात २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी भारताचं प्रधानमंत्रीपद स्वीकारायला नकार दिला त्या ऐतिहासिक क्षणापासून होणार होती. त्यानंतर केंब्रिज इथं शिकत असताना चार्मिंग प्रिन्स राजीवने सोनियांना 'पेपर नॅपकिन'वर पहिला प्रेमसंदेश कसा पाठवला, अशा अनेक घटना चित्रपटातून उलगडणार होत्या. प्रधानमंत्र्यांचा मुलगा असूनही सोनियांना स्कुटरवरून इंडिया गेटजवळ आईस्क्रीम खायला घेऊन जाणारे तरुण राजीव गांधी या चित्रपटात दिसणार होते. अशा विविध प्रसंगाचं चित्रण असलेला हा चित्रपट त्यावेळी शेकडो कोटी रुपये बजेटचा होता त्याचं चित्रण इटली, ब्रिटन आणि भारतात होणार होतं.

*अनेक प्रसंगांची जुळवाजुळव*
कुटुंबातील तीन व्यक्तीचं अकाली आणि धक्कादायक मृत्यू सोनिया गांधींना पाहावं लागलं होतं. दीर संजय गांधी विमान अपघातात गेले तर सासूबाई इंदिरा गांधी पती राजीव गांधी यांची निर्घृण हत्या झाली. कौटुंबिक धक्क्यातून धैर्याने बाहेर पडून, भाजप आघाडीचा पराभव करण्याचं यश
 प्राप्त करणाऱ्या आणि चालून आलेलं प्रधानमंत्रीपद नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या सोनिया गांधी या चित्रपटात दिसणार होत्या. त्याचबरोबर राजीवबरोबरचे कोलेजमधले दिवस, इंदिरा गांधींची पहिली भेट हे प्रसंग त्या स्क्रिप्टमध्ये लिहलेले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनियांना राजकारणात का यावं लागलं, हे सर्व घटनाचक्र चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार होते.

*अनेक अभिनेत्री तयार*
सोनिया गांधी यांची भूमिका करायला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री तयार झाल्या होत्या. पण शेवटी मोनिका बलुची याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्यावेळी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्माते जगमोहन मुंदडा म्हणाले होते, की ' या चित्रपटाविषयी माझी मोनिकाशी प्रदीर्घ चर्चाच झाली आहे. तिलाही या चित्रपटात काम करण्याचा जबरदस्त उत्साह आहे.'

*प्रमुख भूमिकांसाठी निवड*
या चित्रपटातील इतर महत्वाच्या भूमिका म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. इंदिराजींची भूमिका अभिनेत्री पेरिझाद झोराबियन या साकारणार होत्या  तर राजीवच्या भूमिकेत संजय सूरी. संजय गांधींची भूमिका झायेद खान याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेसाठी अभिषेक याकगी निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी राजीव आणि सोनिया यांची एंगेजमेंट झाली होती; ते ही या चित्रपटात दाखविण्यात येणार होतं. स्टारकास्ट निश्चित होण्यापूर्वीच मुंदडा यांनी सोनिया गांधींचं इटलीमधील जन्म घर आणि राजीव गांधी यांची हत्या श्रीपेरूम्बदूर शहरात ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी जाऊन शुटिंगची तयारीही केली होती.

*मोनिका बलुची*
सोनिया गांधींची भूमिका करणाऱ्या मोनिकाचा जन्मही १९६८ मध्ये इटलीतील एका छोट्या गावात झाला. कायद्याची सल्लागार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या मोनिकाने आधी मॉडेलिंग व्यवसायात प्रवेश केला. १९८८ पर्यंत मोनिका प्रसिद्ध मॉडेल झाली. फॅशनची दुनिया असलेल्या मिलान शहरात ती गेली आणि अभिनयाच्या क्षेत्रातही उतरली. १९९२ मध्ये मोनिका बेलूचीने 'ड्रॅक्युला' चित्रपटातून अमेरिकन सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर इटलीत 'आय मिनिसी - द हिरोज' या चित्रपटात तिनं काम केलं. नंतर पुन्हा अमेरिकेत जाऊन मोनिकाने बस्तान बसवलं. मोनिकाची सुपर हीट फिल्म म्हणजे 'मेट्रिक्स'. या चित्रपटानं तिला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. १९९५ मध्ये मोनिकाने  टीव्ही फिल्म 'जोसेफ'मध्ये बेन किंग्जलेसह काम केलं होतं. १९९६ मध्ये फ्रेंच सिनेमा 'ला अपार्टमेंट' मधील अप्रतिम कामाबद्धल मोनिकाला प्रचंड लोकप्रियता लाभली. या सिनेमातील रोमँटिक भूमिकेसाठी तिला पारितोषिक मिळालंच पण फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट कॅसल हा जीवनसाथीही लाभला. या दाम्पत्याला एक मुलगी देखीलही होती.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...