*बाबासाहेबांचे स्मृती जागरण ...!*
"बाबासाहेबांनी आग्रहानं सांगितलेल्या अनेक गोष्टी राजरोस पायदळी तुडवून, बाबासाहेबांचा वारसा जपत असल्याची मिजास मिळवण्याचा उद्योग करणारे दलित नेते हेच दलित जनतेच्या शिरावरील बोजे आहेत. हातापायातल्या बेड्या आहेत. दलितांचे नेतृत्व करीत असल्याचा त्यांचा दावा ही स्वतःला गि-हाईक शोधण्याची त्यांची धडपड आहे. समाजालाच नव्हे, तर स्वतःलाही विकायला सदैव सिद्ध असणारे हे नेते बाबासाहेबांच्या विचारांचे आणि बाबासाहेबांच्या जनतेनेही दुश्मन आहेत. राजकारण दूर ठेवून या समाजासाठी खूप काही करता येतं हे या तथाकथित नेत्यांना मान्य नाही. दलित तरुणांच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे. राजकारणात काही करायचं असेल तर या नेत्यांच्या कळपात शिरावं लागणार. हे कळू लागल्यानं सगळ्या गटापासून दूर राहून आवश्यक समाजकार्यात गुंतवून घेणाऱ्या दलित तरुणांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे."
---------------------------------------------
*स*हा डिसेंबर.....
आंबेडकरी जनतेच्या श्रद्धेचा दिवस! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी उभ्या देशातून लोक चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. एवढ्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या या आंबेडकरी जनतेला सोयी, सुविधा फारशा मिळतच नाहीत. त्यामुळं चैत्यभूमीच्या परिसरात अस्वच्छता पसरते. या प्रकाराबद्धल कांहीं लोक वृत्तपत्रातून नाराजी व्यक्त करतात. जवळपास दरवर्षी हे चित्र दिसतं. या अस्वच्छतेबाबत जी नाराजी व्यक्त होत असते त्याचा सगळ्याच पक्षांनी, संघटनांनी विचार करायला हवाय. ज्यांना खरोखरच समरसता निर्माण करायची आहे त्यांना आपली सच्चाई दाखविण्याची संधी सहा डिसेंबरचा मुहूर्त साधून करता येईल. वेगवेगळ्या गोष्टींसाठी सप्ताह पाळले जातात. बसवाले सौजन्य सप्ताह पाळतात. बँकवाले बचत सप्ताह पाळतात. दलितांना पिढ्यानपिढ्या सवर्ण लोकांनी सर्व सेवांसाठी राबवून घेतलं. घाण साफ करण्याचा धर्म त्यांच्यावर लादला आणि ते घसन साफ करतात म्हणून त्यांनाच घाण मानून अस्पृश्य ठरविलं गेलं. या सगळ्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणा, परतफेड करण्यासाठी म्हणा अथवा आम्ही बदललो हे दाखविण्यासाठी म्हणा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मरण दिना आधी तीन दिवस आणि नंतर तीन दिवस असा समरसता सप्ताह अथवा बंधुभाव सप्ताह अथवा स्वशुद्धी सप्ताह पाळला आज चैत्यभूमी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारली तर? साने गुरुजी, सेनापती बापट स्वच्छता फेऱ्या काढत, रस्ते झाडत, गटार साफ करीत. गाडगे महाराज काँग्रेस अधिवेशनात झाडू हातात घेऊन एक प्रकारे काँग्रेसवाल्यांना 'तुम्ही घाण करा आम्ही सफाई करतो' असं सांगत सेवा धर्माचं शिक्षण देत. जिथं दलितच प्रामुख्यानं येतात, तिथं आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज आहोत असं सांगणारे आणि वागणारे सवर्ण लोकांचे जथ्थे हजर झाले तर?...तर या समाजातील पुष्कळ घाण संपेल. दुरावा संपेल. सहकार्याचे, सहजीवनाचे नवे पर्वही कदाचित सुरू होईल आणि बाबासाहेबांची चैत्यभूमी कोट्यवधी खर्चून जेवढी सुशोभित होणार नाही तेवढी, किंबहुना त्याहून अधिक सुशोभित या समरसतेनं होईल. चैत्यभूमीचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी काही करण्याचे राज्य शासनाला, महापालिकेला सुचायला हवे होते. चैत्यभूमीच्या परिसरात मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान जिथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभं राहणार आहे ते, ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, छत्रपती शिवरायांचा पुतळा, सेनापती बापट, मीनाताई ठाकरे यांचे पुतळे, साने गुरुजी विद्यालय शिवाय शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्तीस्थळ येते. शिवछत्रपती, सावरकर, साने गुरुजी, शिवसेनाप्रमुख आणि आंबेडकर यांना मानणाऱ्यांनी मनावर घेतलं तर नुसत्या चैत्यभूमीचाच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रातील घाण साफ होऊ शकते. त्यासाठी स्वच्छता अभियान करायची गरज भासणार नाही.
*आयुष्यभर घाणीविरुद्ध संघर्ष*
आंबेडकरांनी आयुष्यभर घाणीविरुद्ध संघर्ष केला. हिंदू धर्मातली, हिंदू मनातली, हिंदू समाजातली, घाण दूर करण्यासाठी त्यांनी केवळ ब्राह्मणांवरच शस्त्र धरले नाही. आपल्या समाजातल्या असलेल्या गैरगोष्टी-गैरसमज यावरही त्यांनी प्रखरपणाने हल्ले चढविले.'तव्याचा जाय बुरसा मग तो सहजच आरसा' असं बाबासाहेब आपल्या भाषणातुन, लिखाणातून नेहमी म्हणायचे. तव्यावरचा बुरसा काढला की, तवा आरश्याप्रमाणे लखलखु लागतो. हे त्यांनी बघितलं होतं. घासूनपुसून भांडीकुंडी चकचकीत करणाऱ्या दलित स्त्रियांना बाबासाहेबांचं हे म्हणणं चटकन समजायचं, पटायचं. तव्याचा बुरसा जसा घासून पुसून घालवतो तसाच माणसाचा बुरसा घालवायचा. चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगले कपडे घालायचे, आपण चांगले आहोत हे अंतरबाह्य ठसवायचं. बाबासाहेबांनी केलेला हा उपदेश आत्मसात करून हजारोंनी आपल्याला बदलून टाकलंय. प्रत्येकाची काया, वाचा, मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारीतीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? असा सवाल बाबासाहेब करायचे. आणि त्यानुसार वागण्याचं व्रत दलित बांधव घ्यायचे. साध्या साध्या गोष्टीतून माणसाचा स्वाभिमान जागवला आणि बाबासाहेब गेल्यावर साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांचे नाव घेत दलितांचे नेते बनलेल्यांनी स्वाभिमान विकून टाकला. परस्परांतले मतभेद, स्वार्थ, स्पर्धा, आणि खोटी प्रतिष्ठा यापायी दलित नेते आपसात झगडत राहिले आणि समाजाचा एकसंघपणाच त्यांनी संपवून टाकला. मग दुसऱ्याच्या आश्रयाला जाण्याची, गुलाम होण्याची वेळ नेत्यांवर आली. बाबासाहेबांनी जे कमविले होते ते गमावून दलित समाज कफल्लक झाला. एकमेकांवर कसा डाव टाकता येईल, याचा विचार करीत एकमेकांची उणीदुणी काढत एकमेकांना शिव्या देत आणि मिळेल ते हडप करीत हे नेते दिवस काढत आहेत. समाजाचे कुठलेही दुःख, कुठलेली प्रश्न सोडविण्याचं सोडाच; समजावून घेण्याचंही त्यातल्या अनेकांची कुवत नाही. राजकारण हा मोठे होण्याचा, पैसा मिळवण्याचा सोपा उद्योग आहे. असा त्यातल्या अनेकांचा समज आहे. आणि पैसा मिळविण्याचेच राजकारण स्वतःला, समाजाला विकण्याचा सोपा मार्ग धरून हे नेते करीत आहेत.
*बाबासाहेबांच्या विचारांचे दुश्मन*
दलितांचे दलितपण संपले तर आपले पुढारीपण संपेल, हे धूर्त दलितनेते ओळखून आहेत. तेव्हा दलित बांधवांनी समाजातल्या अन्य लोकांशी सदैव सात जन्माचा दावा मांडल्यासारखेच वागावं असाच उपदेश हे आत्मकेंद्रित नेते करणार. संघर्षाशिवाय मार्ग नाही असं सांगून, सदैव कसला ना कसला संघर्ष धुमसत ठेवणार आणि दलित जनतेला चटके बसले तरी आपलं साधण्यासाठी धडपडत राहणार. बाबासाहेबांनी आग्रहानं सांगितलेल्या अनेक गोष्टी राजरोस पायदळी तुडवून, बाबासाहेबांचा वारसा जपत असल्याची मिजास मिळवण्याचा उद्योग करणारे दलित नेते हेच दलित जनतेच्या शिरावरील बोजे आहेत. हातापायातल्या बेड्या आहेत. दलितांचे नेतृत्व करीत असल्याचा त्यांचा दावा ही स्वतःला गि-हाईक शोधण्याची त्यांची धडपड आहे. समाजालाच नव्हे, तर स्वतःलाही विकायला सदैव सिद्ध असणारे हे नेते बाबासाहेबांच्या विचारांचे आणि बाबासाहेबांच्या जनतेनेही दुश्मन आहेत. राजकारण दूर ठेवून या समाजासाठी खूप काही करता येतं हे या तथाकथित नेत्यांना मान्य नाही. दलित तरुणांच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे. राजकारणात काही करायचं असेल तर या नेत्यांच्या कळपात शिरावं लागणार. हे कळू लागल्यानं सगळ्या गटापासून दूर राहून आवश्यक समाजकार्यात गुंतवून घेणाऱ्या दलित तरुणांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. राजकारणात मिळणारे फायदे समाजकारणात नाहीत. प्रसिद्धी-पैसा याचा लाभ झटपट होण्याची शक्यता नाही. हे दिसत असून देखील निष्ठेनं समाजसेवा करण्याचे त्यासाठी संघटनांचा मंत्र जपण्याचे आणि राजकारणापेक्षा इतर काही करण्यासारखं खूप काही आहे हे दाखवून देण्याचं काम हे तरुण करीत आहेत. अशा तरुणांना त्यांच्या संस्थांना बळ मिळायला हवं. राजकारण न करता आंबेडकरांना अभिप्रेत असलेला नवा माणूस कसा निर्माण करता येईल याची दिशा दाखविण्याच्या दृष्टीनं असे तरुण प्रयत्न करताहेत. म्हणून त्यांच्या पाठीवर थाप पडायला हवी.
*अशा तरुणांची समाजाला गरज*
शासनाशी सर्वंकष झुंजण्यासाठी दलित एकत्र येऊ शकत नाहीत हे आता स्पष्ट झालंय. दलितांच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य ही नुसती फसवणूक असते. हे ही स्पष्ट झालंय. मग 'आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करायला तुम्ही शिकलं पाहिजे' हे बाबासाहेबांचं सांगणं हाच आदेश मानून जनतेच्या मनात असलेले ग्रह-पूर्वग्रह विवेकाने, समंजसपणाने बोलून दूर करण्यासाठी एखाद्या ह्रदयपरिवर्तन पथकाची कल्पना सुशिक्षित दलित तरुणांनी प्रत्यक्षात का आणू नये? बुद्धांचे नांव घेऊन चीन, जपान, कोरिया, जावा, सुमात्रा, श्रीलंका अशा पूर्वेकडील अनेक देशात बौद्ध तरुण गेले, त्यांनी प्रेमाने तिथल्या माणसांना जिंकले, त्यांना बुद्धांचा धर्म दिला. मग बुद्धांचा धर्म हा आपला धर्म मानणाऱ्या बाबांच्या अनुयायांनी मने जिंकण्याचे आव्हान का स्वीकारू नये? गावोगावी जाऊ, होईल तिथं विरोध शांतपणे साहू. आमच्या हृदयीचे त्यांच्या हृदयी घालण्याचा प्रयत्न करू. प्रेमानं शांतीनं सौहार्दाचे वातावरण बनवू, अशा निर्धाराने तरुणांची पथके एका पाठोपाठ महाराष्ट्रात फिरली, आक्रस्ताळी पुढाऱ्यांनी लावलेल्या आगीवर आपल्या अमृतवाणीने प्रेमाचे बंधुभावाचे सिंचन करू लागली तर..... महाराष्ट्रातले समाजऐक्य सहज घडू शकेल. हे करण्याएवढ्या कुवतीचे तरुण दलितात नक्कीच आहेत. 'एखाद्या समाजाची उन्नती ही त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू आणि उत्साही तरुणांच्या हाती असते' असे बाबासाहेब म्हणत. दलित समाजाच्या तरुणांना हे ठाऊक आहे ना! महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तरुणांनी हे स्मृती जागरण आरंभलाय असं चित्र समाजापुढं यायला हवं!
*नवं नेतृत्व उदयाला येईल*
दलितांचे नेते म्हणता येईन एवढा लौकिक गेल्या वीस वर्षांत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रा.सु गवई, नामदेव ढसाळ यांनाच मिळाला. बाकीचे सारे नेते हे जिल्हा व शहरापुरतेच! आता या चौघांची सद्दी संपत आलीय, प्रभाव कमी होतोय. त्यांच्या जनाधाराला गळती लागली आहे. त्यामुळे आठवलेंपासून कुंभारे यांच्यापर्यंत आणि आंबेडकरांपासून कवाडेंपर्यंत सारे नेते आज भुईसपाट झाले आहेत. ते ज्या विचारांचा वारसा घेऊन आले आहेत, तिथं सत्ता हा विषय दुय्यम आहे. संघटना आणि उत्थानाची चळवळ महत्वाची! मात्र दलितांचे नेते सत्तेच्या व्यवहाराला प्राधान्य देतात. त्यामुळे आठवलेंपासून कुंभारेपर्यंत आणि आंबेडकरांपासून गंगाधर गाडे यांच्यापर्यंत अनेकजण पराभूत झाले आहेत. पण त्यांचं आंबेडकरी समाजाला, जातीला तेवढं दुःख झालेलं नाही. आज दलित नेते एकत्र येतात, तेव्हा त्याकडे अपेक्षेने नाही; तर करुणेच्या भावनेनं पाहिलं जातं. दलितांची मतं आता शहरात वाढली आहेत. त्या शहरी अस्मितेत दलित अस्मिता वाहून जाताना दिसतेय. सर्व महानगरे, शहरी मतदारसंघ इथे दलितांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहेत. दलितांचे प्रश्न तर कितीतरी जास्त संख्यने वाढले आहेत. मात्र ते प्रश्न कवेत घेणारं दलित नेतृत्व नाही. बसपाकडून अपेक्षा होती. मात्र त्यांचा आता फुगा फुटला आहे. त्यात कितीही हवा भरली, तरी ती पंक्चर निघणारा नाही. दलितांमध्ये नव्या धाटणीचं नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला वेग नाही. विद्यमान नेत्यांचं कर्तृत्व तर दिसलंच आहे. अपकर्तुत्व जेवढं जास्त दिसेल, तेवढा नव्या दलित नेतृत्वाचा उदय नक्की होईल!
- हरीश केंची ९४२२३१०६०९
प्रभंजन साठीचा लेख.

No comments:
Post a Comment