Saturday 25 November 2017

नव्या गांधींकडे पक्षाची धुरा!

*नव्या 'गांधीं'कडे पक्षाची धुरा*

"पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी कुणाच्या डोळ्याने हा देश पाहणार आहेत. कोणत्या दृष्टीनं पाहणार आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी भारत फिरून पहावा अशी आपली इच्छा असली तरी त्यांचे सल्लागार त्यांना काय सल्ला देणार हे महत्वाचं आहे. नव्यानं 'कमर्शिअल अडव्हायझर' असलेल्या प्रशांत किशोर त्यांना काय करायला लावणार हे पहावं लागेल. असं असलं तरी राहुल गांधींनी पहावं असं या देशात खूप काही आहे. कालाहंडी, मेळघाटात अजूनही तोच भारत आहे. जो महात्माजी, नेहरु आणि इंदिराजी यांच्या काळात होता. नथुराम, रझाकार, सु-हावर्दी यांच्या वारसदारांच्या 'सातबारा'वर अजून आळं झालेलं नाही, म्हणजे ती परंपरा खंडित झालेली नाही. लोकशाही क्रान्तीवाले लाल सलाम वीर आता बंदूक क्रान्ती करायचीय, असं म्हणताहेत. पूर्वी एकाच निजामाने स्वतंत्र राष्ट्राचा हट्ट धरला होता. आता सर्वच राज्यात निजामांचे वारस निपजले आहेत. महात्मा गांधींसाठी बिर्ला हे एक साधन होतं. आताचे बिर्ला सोनिया-राहुल गांधींना साधन मानतात. गांधीजी, पंडित नेहरु आणि इंदिराजींनी कार्यकर्त्यांच्या नजरेतून आणि त्यांना बरोबर घेऊन हा देश पाहिला. त्याबाबतीत राहुल गांधींना अनुकरण करावं लागणार आहे. पण त्यांच्या पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं केव्हाच श्राद्ध घातलं गेलंय. राहुल गांधींना भारत समजून घ्यायला ती एक मोठीच अडचण ठरणार आहे!"
-------–-----------------------------------


*शे*सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा आता राहुल गांधी या 'नव्या गांधी' कडे सोपविली जाणार आहे. ते गेली दहा बारा वर्षे तसे राजकारणात आहेत पण त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जनमानसात फारसा दिसत नाही. पण आता गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुक प्रचारात त्यांना थोडासा सूर सापडल्याचे दिसताच पक्षधुरीणांनी त्यांच्या मस्तकावर 'अध्यक्षपदाचा मुकुट' चढवायचं ठरवलं आहे. पण ही जबाबदारी स्वीकारताना त्यांना भारत, त्यातली माणसं आणि विशेष म्हणजे पक्ष समजला आहे का? त्यांना समजून घेतलं आहेका? गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे ही सूत्रं आल्यानंतर महात्मा गांधींनी गोखले यांना संपून भारत समजून घेण्याची सूचना केली होती. त्या सुचनेनंतर त्यांनीभारतयात्रा केली. तेव्हा कुठे त्यांना भारत थोडाफार समजला. गांधीजींनी आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला भारतभ्रमण करण्याचा सल्ला दिला. पंडित नेहरूंनीही भारताचा अनुभव घेतला. इंदिरा गांधींनीही काँग्रेसच्या सरचिटणीस, अध्यक्ष असताना तेच केलं. मात्र गेल्या चाळीस-पन्नास वर्षात काँग्रेसच काय, सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला कधी भारत देश प्रत्यक्षात समजून घ्यावासा वाटला नाही. काहींच्या भारतयात्रा भारताला जागे करण्याऐवजी पेटवणाऱ्या ठरल्या. खऱ्या भारताचं सर्वांनाच विस्मरण झालेलं आहे. अशावेळी राहुल गांधींकडे काँग्रेस पक्षाच्या धुरा येते आहे. त्यांनी गोपालकृष्ण गोखले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी मार्गक्रमण केल्याप्रमाणे भारतभ्रमण करायला हवं आहे. राहुल गांधींना भारत समजेल तो दिवस त्यांच्या पक्षानं धन्य व्हावा असा असेल!

*देशाचा शोध आणि बोध नाही*
भारत हा खंडप्राय देश आहे. एखाद्या राजकीय पक्षानं लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करावं असं जगात फक्त इथंच घडलं आहे. अनेक भाषा अनेक राज्य, त्यांची भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता, हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. काँग्रेससारख्या एका पक्षानं ही विविधता आपल्या पोटात सामावून घेणं, ही बाब वाटते तेवढी सोपी नव्हती. तरीही या पक्षानं काही काळ हे शक्य करून दाखवलं. अर्थात हे शक्य कशामुळे झालं? तर त्यावेळच्या नेतृत्वाला भारत समजला होता! भारतानं त्या पक्षाला, त्यांच्या नेतृत्वाला समजून घ्यावं असा तो काळ होता. आज ती बाब भूतकाळ झाली आहे. काँग्रेसपक्षांची विद्यमान अवस्था त्यांना नव्या भारताचा शोध न लागल्यामुळे आणि बोध न झाल्यानेच झाली आहे. आज राहुल गांधींनी भारत समजून घ्यायचा, तर त्यांना ते शक्य होईल का? या गांधींना भारतानं समजून घ्यावं का? यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पत्रकार मार्क टूली वा 'अंतरनाद' मासिकाचे भानू काळे हे आपल्या पुस्तकाचे म्हणतात तसा आजचा भारत खूपच बदललेला आहे. तो समजून घ्यायचा तर, सुरुवात मुळाक्षरापासून करावी लागेल.

*राष्ट्र संकल्पनाच धोक्यात आणली*
महात्मा गांधीजींनी जेव्हा भारताचं नेतृत्व केलं. नेहरू घराण्याने जेव्हा या देशावर राज्य केलं. तेव्हा या देशात 'राष्ट्र' या संकल्पनेचं अस्तित्व जाणवावं इतकं प्रबळ होतं. 'राष्ट्र' हाच लोकांचा, त्यांच्या नेत्यांचा अनेक बाबतीत प्राधान्यक्रम होता. काश्मीरचे शेख अब्दुल्ला असोत नाहीतर आसामचे गोपीनाथ बार्डोलोई असोत, त्यांनी देश एकसंघ होण्यासाठी केलेले प्रयत्न आजच्या मेहबुबा मुफ्ती वा सोनोवाल यांना माना खाली घालायला लावणारे आहेत. 'देश आधी नंतर राज्य' हे त्यांचं म्हणणं नेमकं उलट झालं आहे. के. कामराजांच्या राज्यात द्रमुकच्या करुणानिधींना वा अण्णा द्रमुकच्या राज्यकर्त्यांना राष्ट्रहितापेक्षा प्रथम राज्यहित महत्वाचं वाटतं. आणि सरदार पटेलांचे वारसदार नरेंद्र मोदी हे आजवर राज्यालाच महत्व देत होते. असं का होतं हे राहुल गांधींना समजून घ्यावं लागेल. त्यात आपल्या पक्षाच्या चुका किती, हे शोधावं लागेल. प्रादेशिक भावना आणि कट्टरतावादाचं खतपाणी आपल्याच पक्षानं पुरवलं नाही ना? हे तपासून पाहावं लागेल.

*पक्षाचा 'कार्यकर्ता'च मेला आहे!*
राहुलजींच्या काँग्रेस पक्षानं एकेकाळी या देशातल्या सर्व राज्यात राज्य केलं होतं. काँग्रेस हा एकच पक्ष असा होता, की जो देशभर राज्य करीत होता. आज ती स्थिती राहिलेली नाही. ईशान्य भारतातल्या राज्यात या पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. उत्तरेतल्या बड्या राज्यात पक्षाची संघटना नाही.  देशभरात अत्यंत दयनीय अवस्था आहे. ही अवस्था का झाली? आज पक्षाच्या नेतृत्वाला भारत समजून घ्यावा लागतो, तो नकाशाच्या आधारे आणि माणसांशी संपर्क करावा लागतो तो मध्यस्थाच्या करवी, पक्षाची संघटना चालवावी लागते, ती नोकर-निष्ठावंतांच्या आधारे! आताशी पक्ष मूळ स्वरूपात राहिलेला नाही. पक्षातला कार्यकर्ता मेला आहे. त्यामुळे सोनिया-राहुल यांच्यापर्यंत खरा भारत पोहोचतच नाही. खऱ्या भारताचं प्रश्न त्यांना समजतच नाहीत. त्यावरची उत्तरं सुचत नाहीत. परिणामी, वास्तव बदलत नाही. काँग्रेसपक्षापुढं जे थिजलपण आलं आहे, ते त्यामुळेच! त्यात पुन्हा सोनिया-राहुल यांच्या अनुभवाचे, क्षमतेचे, मानसिकतेचे असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळेही त्यांना भारत समजत नाही.

*तेवढा वकुबच उरला नाही*
महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना भारत कळला होता. कारण त्यांच्या क्षमता, ग्रहणशक्ती मुळातच अतिव्याप्त होत्या. प्राच्यविद्या, तत्वज्ञान आणि इतर सामाजिक शास्त्रांच्या माध्यमांतून त्यांनी भारताला समजून घेण्याची एक पद्धती विकसित केली होती. त्यामुळे या देशातल्या लोकांच्या भावभावना त्यांना चांगल्याच परिचित होत्या. या घराण्याविषयी मोठं आकर्षण आणि प्रेम जनमानसात अनेक वर्षे टिकून होतं. नेता कधी पक्षांपेक्षा मोठा असत नाही. मात्र हे तिघेही त्याला अपवाद ठरले. परिणामी, प्रसंगी पक्षसंघटनेला बाजूला ठेऊन ते लोकांशी संवाद साधत होते. त्यामुळेच इंदिरा गांधी यांना १९७१ आणि १९८० चे राजकीय विजय नोंदविता आले. भारत त्यांना कळला होता आणि भारतानेही त्यांना समजून घेतलं होतं. राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपविली जाणार आहे त्यांना हा सारा संदर्भ कधीच विसरता येणार नाही. भारत समजून घ्यायचा तर भारताच्या लोकांचा इतिहास माहिती हवाच. मात्र त्यांच्या विद्यमान अवस्थेवर उपाय तो कोणता? हे ही त्या व्यक्तीला कळायला हवं. त्याबाबतीत राजीव गांधी अपुरे पडले होते. सोनिया गांधींना त्या बाबतीत नैसर्गिक मर्यादा होत्या आणि आहेत. तेवढा वकूबही नव्हता. तूर्तास राहुल गांधी तो वकूब प्राप्त करत आहेत, असं समजून चालावं लागेल. मात्र राहुलजींच्या भोवतीचं पर्यावरण, वर्तुळ त्यांनी भारत समजून घ्यावा असं नाही. त्याबाबतीत अनेक मुद्दे मूलभूत स्वरूपाचे असे आहेत.

*पक्ष संघटनाच उरली नाही*
काँग्रेस पक्षानं या देशात संसदीय लोकशाहीरूपी राजसत्ता आणली, हे त्या पक्षाचं ऐतिहासिक काम आहे. त्या लोकशाहीत कल्याणकारी राजव्यवस्थेचा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष अस्तित्वात आणून दाखवला. भारत समजून घेतल्याने आणि त्या भारताला काय हवं आहे? हे नेतृत्वाने ओळखल्याने असं घडलं होतं. आता मात्र तसं नाही. राहुल गांधींना भारत समजून घ्यायचा, तर त्यांच्याच पक्षानं बदललेलं वास्तव मुळापासून समजून घ्यावं लागेल. आज या पक्षाला संसदीय लोकशाहीबद्धल सर्वाधिक प्रेम आहे, मात्र पक्ष संघटना नाही. लोकांना कल्याणकारी राज्यच हवं आहे. मात्र आजच्या काँग्रेस पक्षालाच तो कार्यक्रम जुनाट वाटतो. सरकार पुरस्कृत विकास, असं या पक्षानं आपलं तत्वज्ञान बनवलं आहे. 'पक्षाला भारत कळत नाही आणि त्यामुळेच भारत या पक्षाला जुमानत नाही!'

*कार्यकर्त्यांचं श्राद्ध घातलं गेलंय*
राहुल गांधी कुणाच्या डोळ्याने हा देश पाहणार आहेत. कोणत्या दृष्टीनं पाहणार आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी भारत फिरून पहावा अशी आपली इच्छा असली तरी त्यांचे सल्लागार त्यांना काय सल्ला देणार हे महत्वाचं आहे. नव्यानं 'कमर्शिअल अडव्हायझर' असलेल्या प्रशांत किशोर त्यांना काय करायला लावणार हे पहावं लागेल. असं असलं तरी राहुल गांधींनी पहावं असं या देशात खूप काही आहे. कालाहंडी, मेळघाटात अजूनही तोच भारत आहे. जो महात्माजी, नेहरु आणि इंदिराजी यांच्या काळात होता. नथुराम, रझाकार, सु-हावर्दी यांच्या वारसदारांच्या 'सातबारा'वर अजून आळं झालेलं नाही, म्हणजे ती परंपरा खंडित झालेली नाही. लोकशाही क्रान्तीवाले लाल सलामीवीर आता बंदूक क्रान्ती करायचीय, असं म्हणताहेत. पूर्वी एकाच निजामाने स्वतंत्र राष्ट्राचा हट्ट धरला होता. आता सर्वच राज्यात निजामांचे वारस निपजले आहेत. महात्मा गांधींसाठी बिर्ला हे एक साधन होतं. आताचे बिर्ला सोनिया-राहुल गांधींना साधन मानतात. गांधीजी, पंडित नेहरु आणि इंदिराजींनी कार्यकर्त्यांच्या नजरेतून आणि त्यांना बरोबर घेऊन हा देश पाहिला. त्याबाबतीत राहुल गांधींना अनुकरण करावं लागणार आहे. पण त्यांच्या पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं केव्हाच श्राद्ध घातलं गेलंय. राहुल गांधींना भारत समजून घ्यायला ती एक मोठीच अडचण ठरणार आहे!

*दरबारी नेता की, जनाधार असलेला कार्यकर्ता*
राहुल गांधी यांनी खरंच भारत समजून घेतला अन त्यांना तो समजला, तर ते काँग्रेस पक्षाच्या हिताचं होईल. कारण सर्वसामान्यांना हवी असलेली जी विश्वासार्हता हवी आहे, त्या बाबतीत या घराण्यातील व्यक्तीला अजून तरी पर्याय नाही. भारत समजणं म्हणजे या देशातले लोक समजणं. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला लगेचच या देशात बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, त्यांच्या शोध-बोधातून अनेक समस्यांचं निराकरण होईल आणि काही समस्यां नव्यानं निर्माण होणार नाहीत. लोकशाहीवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. आज आपल्यासमोर विकासाचं प्रतिमान जागतिकीकरणाचं आहे. ते सर्व लोकांच्या हिताचं नाही हे स्पष्टच आहे. राहुल गांधींच्या भारतगमनातून, शोध आणि बोधातून कदाचित नव्या प्रतिमानाच्या पर्यायाचा विचार केला जाईल. लोकांच्या प्रगतीचं उलट फिरलेलं चाक पुन्हा सुलट केलं जाऊ शकतं. त्या पर्यायावर काँग्रेसला यावंच लागेल. कारण, विद्यमान व्यवस्थेत आपल्याला काहीच स्थान नाही, याबाबतीत काँग्रेसच्या मूळच्या जनाधारांना पक्की खात्री आहे. परिणामी, ते या पक्षापासून दूर गेलेत. राहुल गांधींनी भारत समजून घेताना आपला पक्षही कळेल. 'दरबारी नेता श्रेष्ठ की, जनाधार असलेला कार्यकर्ता मोठा', यातला फरक उमजून येईल. त्याचा त्यांच्या पक्षाला संघटनात्मक लाभच होईल. भारताची अव्यक्त ओळख वर्णनापलीकडची आहे. त्यांचं दर्शन राहुलना झालं तर? हा देश निश्चितच पुढं जाईल. पण राहुल गांधींना भारताचा शोध घेण्याचा मार्ग स्वतःलाच शोधायचा आहे.


*चौकट*

*जात वास्तव समजून न घेतल्याने काँग्रेसची ही अवस्था*

"एक काळ असा होता की, काँग्रेस पक्षात होणारा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार वादातीत होता, अयोध्या प्रकरणानंतर मात्र या काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेबद्धल गंभीरप्रश्न निर्माण केले गेले. या देशातील अल्पसंख्य या पक्षावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. बहुसंख्य त्याच मुद्द्याच्या बाबतीत या पक्षाचा द्वेष करतात. काँग्रेसचा ढोल असा दोन्हीबाजूनं फुटला आहे. तो त्या पक्षाला, त्या नेतृत्वाला देश न कळल्यामुळेच! त्याच बरोबर या पक्षानं 'जात वास्तव' समजूनच घेतलं नाही. राहुल गांधींनी, भारत समजून घ्यायचा तर, या देशातल्या जाती-पाती पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्यांचा पोहरा कोरडाच राहील. या बाबतीत काँग्रेसपक्ष सपशेल नापासच ठरला आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना ते भान चांगलं होतं. त्यांनी जाती तोडल्या नाहीत. मात्र त्या जाती एकमेकांच्या अंगावर जाणार नाहीत, याची काळजी घेतली. त्यांच्या बुद्धिबळात प्रत्येक जातीला स्वतःच एक घर होतं, त्यात त्या जाती आत्ममश्गुल होत्या. इंदिराजींच्या पश्चात हा पट उध्वस्त झाला. भारत समजून घ्यायचा, तर राहुल गांधींना जातींचं पुस्तक 'हँडबुक' म्हणून सतत जवळ ठेवावं लागेल!"


- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...