Saturday 18 November 2017

गुजराती विकासाधिष्ठित राष्ट्रवाद...!



*गुजराती 'विकासाधिष्ठित राष्ट्रवाद!'*

"नरेंद्र मोदींच्या राजकारणातल्या कर्तृत्वानं अफाट रूप धारण केलं आहे. सर्व प्रस्थापित समीकरणांना त्यांनी खोटं ठरवलंय. तो एक यशाचा नमुना ठरलाय. भाजपमध्ये एवढं कर्तृत्व आजवर कुणालाही दाखविता आलेलं नाही. त्यामुळं मोदी त्या विचारांच्या दृष्टिकोनातून कौतुकास पात्र आहेत. मात्र यशाचा हाच फार्म्युला कायम ठेवून आणि ते ज्या मुद्द्यांचा पुरस्कार करून चालतात. ते घेऊन सततची वाट चालता येईल, असं नाही. अनेक जातींचा एकत्र गोफ गुंफून एका जाती-धर्माचा समुदायाचा द्वेष करणं, हे लोकशाहीतल्या राजकीय पक्षाचं लक्षण नसतं. द्वेषाचं रूपांतर हिंसेत होणं, हे तर कदापीच समर्थनीय नसतं. त्यातून हिटलर वा मुसोलिनी वा त्यांची संस्कृतीचं तयार होते. त्यातून काही प्रश्न सुटण्याऐवजी अनेक प्रश्न निर्माण होतात. मोदींची आजवरची वाटचाल परिस्थितीनुरूप घडलं असं म्हटलं, तर काही समजून घेता येतं. परंतु मोदींचं गतकर्तृत्व हा विषय कधीच समर्थन करण्यासारखा नाही. त्यांच्या कर्तृत्वाचं 'कल्चर'च करायचं असेल, तर ती बाब नागर समाजाला परवडणारी नाही. ती अमानवीकरणाकडे जाणारी वाट ठरू शकते. तूर्तास मोदींनी पहिले पाढे पुन्हा घोकू नये, एवढंच आपण म्हणू शकतो."
------------------------------------------

*ज*नसंघ ते जनतापक्ष आणि त्यानंतर पस्तीस वर्षात भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय शाखेचं नांव आहे. या शाखेनं वेळेवेळी आपलं नांव बदललं आहे. नेते बदलले आहेत. चेहरे बदलले आहेत. मात्र विचाराचं सूत्र कधीच हरवलेलं नाही. ते हरवत चाललंय असं अधून मधून चित्र निर्माण केलं जातं. मात्र त्याचवेळी ते अधिकच घट्ट केलं जातं. २००४ च्या लोकसभेच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपला 'कायाकल्प' करण्याची संधी दिली. त्यावेळी मोदींनी गुजरात राज्य पुन्हा जिंकून आपण राष्ट्रीय दर्जाचे नेते आहोत हे सिद्ध केलं. त्या विजयानंतर मोदींचा पक्षातला दर्जा उंचावला गेला. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय शाखेच्या नेतृत्वाचा आणि पुढील पंचवीस-तीस वर्षाच्या कार्यक्रमांचा प्रश्न त्यांनी मिटवून टाकला. इतरमागास समाजातला एक नेता आपला कार्यक्रम इतका यशस्वी करून दाखवतो, याबद्धल संघाला त्यावेळी प्रचंड आनंद झाला असावा. संघाच्या या नव्या संकल्पनेचं नांव होतं 'विकासाधिष्ठित राष्ट्रवाद'. संघाच्या या संकल्पनेची वरून दाखवत नसले तरी बिनचूक अंमलबजावणी सत्तेत असलेले संघीय करीत आहेत.

*गुजरातचा राजकीय पट*
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रसारमाध्यमातून प्रचार मोहिमेत काँग्रेस पक्ष आघाडी घेत असल्याचं चित्र उभं नेहमीप्रमाणे केलं जातं आहे. पण पूर्वीच्या निवडणुका विचारात घेतल्या तर प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. आणि घडत नव्हतं. आताही असंच घडेल अशी शक्यता आहे. यापूर्वीचा गुजरातमधील चार निवडणुकात घेतले गेलेले सर्व एक्झिट पोल आणि प्री-पोल सर्व्हे फोल ठरलेले आहेत. *वास्तवाच्या दूर जाऊन किंवा चुकीची गृहीतकं मनी ठेवून विश्लेषण केलं, तर निष्कर्ष चुकीचा ठरतो, असं अनेकदा दिसून आलंय. खुद्द काँग्रेसचं आणि सर्वेक्षण करणाऱ्यांचे निष्कर्ष का चुकले? गुजरातचा निकाल असा का लागला?* हे समजून घेण्यासाठी परंपरागत दृष्टीनं विचार करून उपयोग नाही. त्यासाठी वास्तवाला भिडलं पाहिजे. आजवरचा गुजरातचा राजकीय पट समजून घेतला पाहिजे. अन्य राज्यात अनेक पक्ष अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात तर किमान सहा प्रमुख पक्ष आहेत. गुजरातमध्ये तसं नाही. तिथं जनता दल संपल्यानंतर फक्त काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष आहेत. कधी काळी हे राज्य काँग्रेसला मानणारं होतं. मात्र जसं जसं या पक्षाचं नेतृत्व दुबळ होतं गेलं आणि राज्यातलं नेतृत्व संपत गेलं, तेव्हापासून काँग्रेसचा पाया खचत गेला. या पक्षानं १९८५ मध्ये बहुमत मिळवलं होतं. ५५ टक्के मतंही मिळवली होती. मात्र त्यानंतरच्या १९९०च्या निवडणुकीत या पक्षाची सत्ताच गेली. गेल्या २५ वर्षात या पक्षाला तिथं बहुमत मिळालेलं नाही. आता तर मतांची टक्केवारी २८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी इतरत्र कमी होते अन वाढते. गुजरातेत ती सातत्याने कमी का होतेय? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या विद्यमान अवस्थेवर प्रकाश टाकतं. गुजरातवर अनेक वर्षे माधवसिंह सोळंकी, अमरसिंह चौधरी यांचं राज्य होतं. क्षत्रिय, ओबीसी, मुस्लिम आणि आदिवासी यांच्या जातींचा समूह एकत्र करण्यात या दोघांना यश आलं होतं. केंद्रीय नेतृत्व या दोघांना एकमेकांच्या विरोधात वापरून वर्चस्वही ठेवत होतं. चिमणभाई पटेलांनी या समीकरणांचा १९९०मध्ये सर्वप्रथम पराभव केला. भाजपची या प्रयत्नात पटेलांना साथ होती. उत्तरप्रदेशातलं काँग्रेसचं ठाकूर-ब्राम्हण-मुस्लिम असं जे समीकरण होतं, ते जसं नेमकं १९९० मध्ये उध्वस्त झालं. तसं गुजरात काँग्रेसचं त्यावेळी झालं आहे.

*अकार्यक्षम अहमद पटेल*
सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल हे गुजरातचे. ते सोनिया गांधी यांना काय राजकीय सल्ला देत असतील, हे त्या दोघांनाच माहीत. तथापि, गुजरातच्या बाबतीत पटेलना काहीच समजत नसावं किंवा समजत असल्यास त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची क्षमता नसावी. त्यामुळेच काँग्रेसला या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अहमद पटेलांनी पक्षासाठी कितीही पैसा गोळा केला, तो कितीही ओतला; शंकरसिंह वाघेला यांच्यापासून केशुभाई पटेल आणि दिनशा पटेलांपासून कांशीराम राणा यांच्यापर्यंत सर्वजण त्यांचे खातेदार असले, तरीही कांहीच उपयोग होणार नव्हता आणि आजवर झालंही तसंच!

*भाजपचा चेहरा मोदीच!*
गुजरातची दंगल ही त्यानंतरच्या काळात राजकारणाचा विषय राहिलेला होता. त्या दंगलीचे उपविषय प्रत्येक निवडणुकीत समोर आले होते. आताही ते येताहेत. गोध्रापासून सोहराबुद्दीन प्रकरणापर्यंत अनेक विषयांची पुनरुक्ती होणं हे अपरिहार्य असलं, तरी त्यामुळं काही राजकारण बदलणार नव्हतं आणि नाही. उलट असे मुद्दे कधीही उलटे-सुलटे परिणाम करू शकतात, हे लक्षात घेतलं गेलं नाही असंच आज पण घडतंय. गुजरातमधल्या दंगलींचा पुरस्कार हा भाजपसाठी त्या राज्यात उपयोगाचा ठरत आलाय. असं असताना काँग्रेसनं ते कारण आणखी घट्ट केलं. या कारणांचा काँग्रेसला देशात अन्यत्र विशेषतः मुस्लिम मतांसाठी उपयोग झाला असेल, मात्र त्यामुळे हिंदूंना आपण अधिक संख्येने तिकडं ढकलत आहोत, हे लक्षांत घेतलं गेलं नाही. सोनिया गांधींचं 'मौत के सौदागर' हे विधान त्यामुळेच मोदी यांना आक्रमक होण्यासाठी मदतदायी ठरलं. एकूणच जातीयवाद कसा समजून घ्यायचा? त्याचा कसा मुकाबला करायचा? हे काँग्रेस पक्षाला उमगलेलं नाही. खरं म्हणजे, आजचं राजकारणच काँग्रेसपक्षाला उमगलेलं नाही, आजचं गुजरातमधलं राजकारण काँग्रेसपक्षांच्या नेतृत्वाला कळतं का? हाच खरा मुद्दा आहे. आजही इंदिरा गांधीसारखं कर्तृत्व आणि राजीव गांधींएवढं बहुमत आणि पंडित नेहरूंएवढा जनाधार आपणास आहे असं समजून या पक्षाचे कारभारी मस्तीत वागतात. नेतृत्वाचा भ्रम जोपासतात. भ्रमाचे भोपळे पुनः पुन्हा फुटताहेत, ते त्यामुळेच!, त्या तुलनेत भाजपचं राजकारण सामूहिक हुशारीने आणि पुन: पुन्हा फोफावणार आहे. जातीयवाद हे त्यांच्या विचाराचं सूत्र आहेच. मात्र तो जातीयवाद ते बेमालूमपणे व्यवहारात आणतात.भाजपातील अतिमागासवर्गाचे नेते जेव्हा त्यांची भाषा बोलतात तेव्हा त्यांचा राजकारणाला व्यापक आधार मिळणार आहे. हे गृहीत धरायचं असतं. *मोदी जातीनं कोण आहेत? हा प्रश्न समाजशास्त्रज्ञानी चर्चेस घ्यावा. भाजपच्या लेखी मोदी कोणता कार्यक्रम राबवताहेत? ते कोणती भाषा बोलताहेत, हेच महत्वाचं असतं. संघाच्या राजकीय यशाचं हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. दंगलीला पाठीशी घालणारा आणि विकासाची भाषा बोलणारा असाच चेहरा त्यांना हवा होता तो त्यांना मिळाला आहे.*

*महाजनी खेळी मोदींच्या पथ्यावर*
मोदींनी गुजरातमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रामध्ये आणलं होतं. काही सभाही घ्यायला लावल्या होत्या. तेव्हा मोदी महाराष्ट्रात फारसे परिणामकारक ठरले नव्हते. शिवाय प्रमोद महाजनांना मोदींचा महाराष्ट्रातला हस्तक्षेप मान्य नव्हता. कारण मोदी गुजरातेत येण्यापूर्वी दिल्लीच्या राजकारणात होते. पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. दिल्लीतील पत्रकारांशी चांगले संबंध होते. मोदींचा दिल्लीतला वाढता प्रभाव महाजनांना अडचणी निर्माण करणारा ठरत होता. म्हणून महाजनांनी गुजरातेतला निर्माण झालेला चिमणभाईविरुद्धच्या असंतोषाची संधी साधली आणि गुजरामधील नेतृत्व बदलाचा डाव टाकला. दिल्लीत वरचढ होऊ लागलेल्या मोदींना ते गुजराथी असल्यानं त्यांना गुजरातेत पाठविण्याचा निर्णय पक्षाला घ्यायला लावला.पक्षावर महाजनांची पकड होती. मोदी गुजरातेत जायला तयार नव्हते. मग महाजनांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भरीला टाकलं. त्यांनी मोदींना 'तू गुजरातेत जावं हा माझा आदेश' असल्याचं सांगितल्यानं मोदींना गुजरातेत जावं लागलं. ते जरा नाखुषीनच तिथं गेले पण जाताना महाजनांना त्यांनी बजावलं होतं. 'मी जातोय गुजरातेत, पण मी जोवर तिथं आहे, तुम्ही तिकडं फिरकायचं नाही!' दुर्दैवाने थोड्याच दिवसात महाजनांचं निधन झालं. मोदींच्या कार्यकाळात महाजन गुजरातेत गेले नाहीत. मोदींना महाजनांवर राग होताच त्याचा अनुभव गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांनी घेतला होता. पण नाराजीनेच गुजरातेत गेलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रारब्धात दिल्लीचं राजकारण होतं आणि त्याचा मार्ग गुजरातेतून होता. हे काळानचं सिद्ध केलं.

*नेतृत्वहीन भाजपला नेतृत्व मिळालं*
गुजरातेत मोदींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या भाजपेयींनी मुंबईत आणि महाराष्ट्रभर पसरलेला गुजराती समाज नव्यानं भाजपशी जोडला जाण्याची शक्यता आहे हे जाणलं. महाजनांच्या निधनानंतर नेता नसणारा, आधार नसलेला पक्ष अशी भाजपची स्थिती झाली होती. केंद्रात वा राज्यात सत्ता नाही, कोणताही परिणामकारक कार्यक्रमही नाही. त्यामुळं कार्यकर्तेही हतबल झाले होते. भाजपचा गुजरातेतला मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. त्यावेळी महाराष्ट्रातलं भाजपचं स्वरूप मुंडे-गडकरींचा पक्ष अशी झाली होती. मोदींच्या विजयानं ते स्वरूप, वा राज्यातील पक्षाची ओळख बदलण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा विचार पक्षाच्या 'थिंग टॅन्क' मध्ये सुरू झाला. दरम्यान गडकरी दिल्ली पक्षाध्यक्ष म्हणून गेले. पक्षाच्या थिंक टॅन्कच्या विचाराला आकार येताचमोदींच्या लोकप्रियतेचा वापर करण्याचे पक्षानं निश्चित केलं. नवा शोध सुरू झाला, नवं नेतृत्व आकाराला आलं. पक्षाची राज्याची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे आली. त्यानंतर मोदींनी दिल्लीतली सत्ता खेचून आणली. गुजरातेतलं नेतृत्व देशाचं नेतृत्व बनलं. राज्यात उत्साह संचारला, शिवसेनेशी युती संपुष्टात आली. महाराष्ट्रातही भाजपेयी मजबूत बनले, पक्षाच्या नेतृत्वापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं नेतृत्वही आलं! हे सारं घडलं ते गुजरातच्या निवडणुकीच्या निकालातून!

*मतदारांपुढे भावनिक प्रश्न*
देशातील राजकारणावर मोदींचं निर्विवाद असं वर्चस्व निर्माण झालंय.  त्याची सुरुवात गुजरातमधून झाली आहे हे वास्तव विरोधीपक्षांच्या नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळं काँग्रेसनं गुजरातच्या निवडणुकांना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींच्या वाऱ्या तिकडं सुरू आहेत. प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रचार मोहिमेतून मोदींना गुजरात आणि देशात यश मिळालं. नितीशकुमारांना बिहारमध्ये मिळालं. त्या प्रशांत किशोर यांच्या निवडणूक प्रचार तंत्राचा वापर राहुल गांधी आणि काँग्रेसनं आरंभलाय. तसा त्यांनी प्रशांत किशोरांचा उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत केला होता तिथं ते अपयशी ठरले, तरी देखील त्यांचाच सल्ला घेत, त्यांच्याच तंत्राचा वापर करीत राहुल यांनी गुजरातेत प्रचार मोहीम चालविलीय. त्याला प्रसिद्धीमाध्यमे भरघोस प्रसिद्धी देताहेत. याने भाजपेयी थोडेशे सावध झाले आहेत. मोदी आणि अमित शहा यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय. कोणतीही रिस्क त्यांना घ्यायची नाही या जिद्दीनं ते उतरले आहेत. गुजराती मतदारांच्या दृष्टीनं हा भावनिक असा प्रश्न निर्माण झालाय. ज्याच्याकडे देशाने नेतृत्व सोपवलयं त्या आपल्या गुजराती माणसांच्या पाठीशी उभं राहायचं की निर्माण झालेल्या वातावरणाबरोबर जायचं!

*चौकट*

 *लैंगिक व्हिडीओ क्लिप*
गुजरातला काँग्रेसमुक्त करणारा समाज म्हणून पाटीदार-पटेल यांच्याकडे पाहिलं जातं. त्या समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करून रान पेटवलं होतं, भाजपच्या विरोधात शस्त्र उगारलं होतं. हा समाज आता भाजपच्या विरोधात जातोय असं चित्र निर्माण झालंय.  त्यांच नेतृत्व २३वर्षीय हार्दिक पटेल या तरुणाकडं आहे. त्या हार्दिक पटेल याच्या लैंगिक व्हिडीओ क्लिप्स सध्या गुजरातेत पसरविल्या जात आहेत. त्या भाजपनं तयार केल्या आहेत असा आरोप हार्दिक आणि इतरांनी केला आहे. भाजपकडे तसा व्हिडीओ क्लिप करण्याचा इतिहास आहेच. मोदींना विरोध करणाऱ्या सुनील जोशी या संघ प्रचारकाची अशीच लैंगिक व्हिडीओ क्लिप केली होती. गुजरातचा प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या जोशींना अखेर राजकारणातून हद्दपार व्हावं लागलं आहे. तसं करण्यासाठी मोदी आग्रही होते हे विशेष...!

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...