Friday, 5 January 2018

आपल्या पक्षीय स्वार्थासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका.



"महाराष्ट्रातली सत्ता आणि प्रशासन दलितांच्या विरोधात आहे, दलितांवर महाराष्ट्रात नानाप्रकारचे अत्याचार होत आहेत, असा अवाजवी अतिरंजित आक्रस्ताळा प्रचार करण्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसवाल्यांच्या हातात हात घालून साधनशुचितेचे सोवळं मिरवणारे समाजवादीही सामील झाले आहेत. काहींनी आक्रोश मोर्चा काढला, तर काहींनी महाराष्ट्रात पुन्हा पेशवाई सुरु झाल्याची बोंबाबोंब चालविलीय. लोकसभेत आणि विधानसभेत मंत्रीपद उपभोगलेले महात्मे संसदेत आणि विधानसभेत सभापतींसमोर धिंगाणा घालताहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सत्तेशिवाय राहता येत नाही हे सिद्ध करण्यासाठीच हे सगळं केलं जात असेल तर प्रश्न नाही, पण यामुळं लोकांच्या मनातून उतरलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणखीच उतरणीला लागणार आहे."
--------------------------------------------

 *दो* नशे वर्षांपूर्वी पुण्याजवळील भीमा कोरेगावच्या पेरणे फाट्यावर इंग्रजांच्या महार रेजिमेंटने पेशव्यांचा पराभव केला होता. या महार रेजिमेंटमधले पांचशेहून अधिक जवान मृत्युमुखी पडले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंग्रजांनी इथं विजयस्तंभ उभारला. या वीरांच्या बलिदानाचं यथा योग्य स्मारक उभं राहिलं. त्याला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला इथं लाखो लोक जमतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये इथं भेट देवून या स्तंभावर असलेलेल्या पांचशे जवानांची नांवे असलेल्या शिलालेखाचं पूजन आणि अभिवादन केलं होतं. त्यानंतर दिवसेंदिवस इथं येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. नेहमी या आंबेडकरी जनतेचं स्वागत करणाऱ्या इथल्या गांवकरी मंडळींतील काहींनी याला दगडफेक करीत गालबोट लावलं. या दुष्टबुद्धीच्या नीच मंडळींना आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी करायची कुबुद्धी उपजली. समाजाचं ऐक्य भंगावं, परस्परांबद्धल अविश्वास निर्माण व्हावा आणि या दुराव्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करता यावा म्हणून हा असा प्रकार घडलाय. आजवर अशा वागणाऱ्या माणसांना दूर सारून मराठी समाज माणुसकीच्या वाटेवर चालत राहीलाय. एक दोघांनी नव्हे, अक्षरशः शेकडों जणांनी दलितांना हिम्मत देण्यासाठी, किम्मत देण्यासाठी आपलं सारं जीवन संघर्षात लोटलंय. 'घ्या रे हरिजन घरात घ्या रे... घरात घ्या रे घरात घ्या...' असा ध्यास घेऊन आपली घरंच नव्हे तर मनंही खुली करणारे महाराष्ट्रात थोडेथोडके झालेले नाहीत. आम्ही अभिमानानं सांगतो हा महात्मा फुले यांचा महाराष्ट्र, हा कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचा महाराष्ट्र, हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा साने गुरुजींचा महाराष्ट्र! महाराष्ट्रानं अस्पृश्यता कधीच झटकलीय!

*महाराष्ट्राच्या तोंडाला काळं फासलं*
देशात सर्वाधिक मोकळं वातावरण महाराष्ट्रात आहे. वाद असतील, भेद असतील, त्याचा लाभ घेणारेही असतील, पण मराठी माणूस दलितांबद्धल दुष्टबुद्धी बाळगत नाही. असंच साधारण चित्र आहे. दलितांना त्यांचे हक्क इथं नाकारलं जात नाही. इथं दलितांवर पाशवी अत्याचार मोठ्या प्रमाणात होत नाहीत. जेव्हा कधी असा प्रकार होतो तेव्हा त्याचा तीव्र निषेधच इथं होतो; आणि ज्यांना दुःख, अवहेलना भोगावी लागते त्याच्या पाठीशी निर्धारानं बहुसंख्य समाज उभा राहतो. पण असं असताना काही सज्जनांनी साऱ्या देशाच्या समोर महाराष्ट्राच्या तोंडाला काळं फासण्याचा उद्योग नुकताच केलाय. आंबेडकरी जनतेवर दगडफेक करून आग्यामोहोळ उठवण्याचा मूर्खपणा ज्यांच्या हाती आज महाराष्ट्राची सत्ता आहे अशा पक्षांच्या कुणा कार्यकर्त्यांकडून घडण्याची शक्यताच नाही.

*राजकीय दुष्टबुद्धीचं प्रदर्शन*
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या सरकारवर बालंट यावं असं वाटणार नाही. उरात काटा सलावा तशी काहींच्या उरात ही भाजप-सेना यांची सत्ता सलतं आहे. महाराष्ट्रात अराजक आहे, कायदा-सुव्यवस्था कोसळली आहे. सर्वसामान्य माणसाला जगण्याची शाश्वती उरलेली नाही, अशा बोंब मारत गेली अडीच तीन वर्षे काँग्रेसवाले, त्यांच्या मुशीतून तयार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हताश झालेले समाजवादी विचारांची मंडळी शिमगा साजरा करत आहेत. उत्तरप्रदेशात, बिहारात, तामिळनाडूत एवढंच कशाला गुजरामध्येही दलितांवर अत्याचार करण्याची चटक लागल्यासारखे प्रकार घडत आहेत. दहशतीनं दलित गावं सोडून शहराकडं धावत आहेत. त्याची दखल राष्ट्रीय मंचावर घ्यावी असं कुणा महाभागाला वाटत नाही. पण या दगडफेकीच्या घटनेतून प्रक्षोभ माजला ही जणू काँग्रेसी, राष्ट्रवादी, आणि तथाकथित समाजवादी नेतृत्वाला पर्वणी वाटली. त्यांच्या सहाय्याला मुस्लिम नेतेही धावले. तसे लाल सलामवालेही आले. शरद पवारांनी महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतोय, असा गळा काढत या घटनेमागे हिंदुत्ववादी संघटना आहेत असं सोशल मीडियावर सांगत सगळ्या आंबेडकरी जनतेचा रोष त्या दिशेनं वळावा अशी सोय केली.वस्तुस्थिती काय आहे हे त्यांना नेमकं माहीत आहे पण रोषाला त्यांनी वाट दाखविली. या त्यांच्या कृतीनं महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर बदनाम करून राजकीय दुष्टबुद्धीचं प्रदर्शन घडवलं.

*इथं समाजप्रबोधनाचं काम मोठं*
पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली ही चूक केली असेलही, पण दलितांना झोडपायचंच असं काही धोरण पोलिसांनी राबवलं नाही. त्यांनीही संयम राखलाय. हे पोलीस इथलेच आहेत. त्यांनाही मुलं बाळं, संसार आहेत. त्यांनी कुठं काही हातघाई केली असेल तर दगडफेकी बरोबरच याचीही चौकशी होऊ द्या. पण दलितांनी साठ वर्षांनंतर सत्तेवर आलेल्या नव्या राजकीय शक्तीवर आणि प्रशासकीय सेवा करणाऱ्यांवर किती रागवायचं याचा विचार का करू नये. दलितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे ही गोष्ट आजही देशातल्या काही राज्यांतून संघटितपणे नाकारणारे समाजघटक आहेत. बिहारात-उत्तरप्रदेशात तर जंगलचा कायदा चालतोय. दलितांना तिथं कोण न्याय देणार असं मतही काही महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधानांनी व्यक्त केलं होतं. उत्तरप्रदेश बिहारची बात सोडा, तामिळनाडूत जिथं रामस्वामी पेरियार यांनी द्रविड संस्कृतीचा आवाज देऊन ब्राह्मणशाही समाजरचनेला आव्हान दिलं  तिथंही द्रविड विचारांचं सरकार असताना दलितांविरुद्ध संघटितपणे अन्याय-अत्याचार केला जातोय. महात्मा गांधींच्या गुजरातेतही दलितांचे मुडदे पाडले जाताहेत. महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी शेकडो वर्षे प्रबोधन करून इथल्या दलितांना माणूस म्हणून मानानं जगता यावं  असं वातावरण निर्माण केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातले दलित विविध क्षेत्रात आज पुढारले असल्याचं दिसतंय.

*काँग्रेसनं आंबेडकरांना हयातभर विरोध केला*
समाजाची मानसिकता बदलतीय. आज अनेक सवर्ण समाजाच्या मुली स्वेच्छेनं दलित युवकांच्या जीवनात सहभागी होत आहेत. समाज बदलण्यासाठी परस्पर सामंजस्याची आणि विश्वासाची भूमिका सर्व थरावर रुचावी-मुरावी लागते. एकदम दणादण बदल होऊ शकत नाहीत. त्यानं विध्वंस होतो. दलितांचे शेकडो वर्षाचे दुर्दैवी जीवन बदलण्यासाठी योग्य वातावरण आवश्यकच असतं. आज दलित फक्त झोपडपट्ट्यातून वा गलिच्छ वस्त्यातून राहतो असं नाही. दारिद्र्य जात बघत नाही. झोपडपट्टीतून राहण्याचं दुर्भाग्य सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकांना ग्रासतेय. यातून सुटका व्हावी म्हणून काही योजना घेऊन काम करू बघत आहे. त्या सरकारलाच धोका देण्यासाठी दलितांनी, झोपडपट्टीवासियांनी पुढाकार घ्यावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कुणाला तरी दलितांचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करून घ्यायचाय. स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष सर्वंकष सत्ता भोगून ज्यांनी स्वातंत्र्याचे सारे लाभ उठवले ते काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आज दलितांच्या अत्याचाराविरुद्ध राणाभीमदेवी आवेशात उभे ठाकले आहेत. याच काँग्रेसनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हयातभर विरोध केला होता. याच काँग्रेसवाल्यांनी दलितात गटबाजी वाढवून, दलितांच्या नेत्यांना भुलवून, पळवून आपल्या दावणीला बांधून संपवून टाकलं. दलितांचा उद्धार करण्यासाठी गांधीजींनी ज्या ज्या गोष्टीचा आग्रह धरला होता त्या त्या साऱ्या गोष्टी काँग्रेसनं सोयीस्करपणे बाजूला सारल्या होत्या. दर निवडणुकीच्या सुमारास दलितांपैकी कुणाला तरी आपल्या मायाजालात अडकवायचा आणि दलितांची मतं फोडायची हा प्रकार काँग्रेसनं केला. आपल्या सत्तेच्या काळात दलितांच्या हितासाठी ठोसपणे कुठलाही निर्णय काँग्रेसनं कधी घेतला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनभर अवमान करणाऱ्या काँग्रेसला, दलितांमध्ये भेद पाडून दलित शक्तीचा प्रभाव निवडणुकीवर पडू नये अशी कारस्थानं करणाऱ्या काँग्रेसला, आज दलितांच्या तडफदार नेत्यांना आपल्या दावणीला बांधून कुजवत ठेवणाऱ्या काँग्रेसला आज दलितांचा कळवळा फुटलाय. हे ढोंग आहे! दलितांना पुढं करून महाराष्ट्रात पुन्हा सत्तेपर्यंत जाण्याची ही चाल आहे. समाजात भेद पाडून सत्ता मिळविण्याच्या या प्रयत्नांना आपण साथ द्यायची का नाही  याचा विचार दलितांमधील सुशिक्षित तरुणांनी करायला हवाय. आणि आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायला हवाय.


महाराष्ट्रातली सत्ता आणि प्रशासन दलितांच्या विरोधात आहे, दलितांवर महाराष्ट्रात नानाप्रकारचे अत्याचार होत आहेत, असा अवाजवी अतिरंजित आक्रस्ताळा प्रचार करण्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसवाल्यांच्या हातात हात घालून साधनशुचितेचे सोवळं मिरवणारे समाजवादी विचारांची मंडळीही सामील झाले आहेत. काहींनी आक्रोश मोर्चा काढला, तर काहींनी महाराष्ट्रात पुन्हा पेशवाई सुरु झाल्याची बोंबाबोंब चालविलीय. लोकसभेत आणि विधानसभेत मंत्रीपद उपभोगलेले महात्मे, अतृप्त आत्मे संसदेत आणि विधानसभेत सभापतींसमोर धिंगाणा घालताहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सत्तेशिवाय राहता येत नाही हे सिद्ध करण्यासाठीच हे सगळं केलं जात असेल तर प्रश्न नाही, पण यामुळं लोकांच्या मनातून उतरलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणखीच उतरणीला लागणार आहे. हे का विचारात घेत नाहीत.

चौकट....
*हा तर जातीयवाद पेटविण्याचा प्रयत्न!*
महाराष्ट्रात जातीयवाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे. दलितांना चिथावून त्यांनाच बळीचा बकरा बनवण्याचं हे राजकारण राक्षसी आहे. लढायचे, मरायचे दलितांनी अन मिरवायचं दोन्ही काँग्रेसवाल्यांनी ह्या प्रकारच्या विरुद्ध दलितातच असंतोष आहे. विजयस्तंभाजवळ जे काही घडलं तर लवकर विसरलं जावं म्हणून सर्वांनीच प्रयत्न करायला हवंय. ,दलितांमध्ये कटुता जरूर आहे, आज एकाच्या घरात दुःख दाटलं आहे. आपला उमेदीचा मुलगा मारला गेल्यानं त्याचे आईवडील सैरभैर आहेत. ह्यासारखे प्रकार गावोगाव, गल्लोगल्ली व्हावेत असा नीच बेत केला जातोय. ह्या दुष्ट लोकांना आवरण्याची लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तरुणांनी एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांचा विश्वास दृढ करून आपल्या भागात कुणी दुष्ट लोकांना चिथावण्याचे काम करत नाही ना हे बघायला हवंय. आपल्या भागात शांतता राहील याची काळजी घ्यायला हवी. एकमेकाला खिजवणारे, दुःखावरची खपली काढणारे फलक न लिहिण्याची, दुसऱ्याला दुखवणारी भाषा न बोलण्याची, जातीवरून हेटाळणी न करण्याची आणि प्रक्षोभ वाढेल असं कुठलंही कृत्य न करण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. नेते कडेकोट सुरक्षेत असतात. मरतात सामान्य माणसं. प्रत्येक दंगल सर्वसामान्यांच्याच प्राणावर बेतते हे आपण लक्षात घ्यायला हवं. काही मंडळी नेमकी याविरुद्ध वागणार आहेत, त्यांना आपल्या प्रमाणेच इतरांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याची लालसा लागलीय. त्यांच्यापासून तरुणांनी दूर राहावं. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. तो कमकुवत करण्यात निदान आपला तरी सहभाग नसायला हवा!
------------------------------------

-हरीश केंची, ९४२२३१०६०९

1 comment:

  1. झाल्या घटनेचे पडसाद उमटणारच.वरील लेखात मांडलेले विचार समाजात जास्तीत जास्त खोलपर्यंत झिरपण्याची गरज आहे.

    ReplyDelete

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...