Tuesday, 23 January 2018

महाराष्ट्राचा महामेरू

*महाराष्ट्राचा महामेरू*

'महाराष्ट्राचा महामेरू! मराठी जणांसी आधारू!!' असे बाळासाहेब होते. बाळासाहेब प्रत्येक मराठी माणसाला सांगत असत, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!" त्यामुळे मराठी माणसाची मान ताठ आहे. मराठी माणूस स्वाभिमानानं जगतो आहे. हिंदुत्व हेच बाळासाहेबांचं राष्ट्रीयत्व होतं! बाळासाहेब जसं बोलत तसंच ते वागत. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात ठामपणा होता, निश्चय होता. बाळासाहेबांच्या विचारांबाबत राजकारणात मतभेद असले तरी त्यांची सडेतोड वाणी देशभरातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना आवडत. परखड बोलणारे, कोणाचाही मुलाहिजा न बाळगता जे पोटात आहे तेच ओठांवर आणणारे बाळासाहेब म्हणजे जाज्वल्य हिंदुत्ववाद!

बाळासाहेब हे गुणग्राहक होते. त्यांच्या तल्लख बुद्धीला अनेक पैलू होते. एकनिष्ठ असणाऱ्या भले मग ते कोणत्याही विचाराचे असोत अशा व्यक्ती त्यांच्या नजरेतून सहसा सुटले नाहीत. बाळासाहेबांचे शब्द म्हणजे एखाद्या तीक्ष्ण बाणाहून धारदार! या शब्दांनीच त्यांनी विरोधकांना घायाळ केलं आहे. ठाकरी भाषा हे बाळासाहेबांचं प्रभावशाली अस्त्र होतं, शस्त्र होतं.

बाळासाहेब हे एक नवल करावं असेच राजकीय व्यक्तिमत्व! त्यांच्याजवळ जाणं हे  ही एक अपार समाधान, आनंद देणारी गोष्ट आहे. तशीच ताप देणारीही गोष्ट आहे. हा माणूस तुम्हाला मोकळं ठेवत नाही… तो भिनतो. तुमच्यावर त्याची हुकूमत सुरू होते. जाणीवपूर्वक बाळासाहेब हे करतात असं नाही, पण ते होतं. ही माणसं कोळ्यासारखी असतात. त्यांच्याभोवती त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक अदृश्य आणि अभेद्य जाळंच असतं. त्यात जो सापडतो तो त्याचा होऊन जातो. सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी निर्मलाताई ठोकळ यांच्यासोबत जी काही मंडळी गेली होती त्यांनाही हे जाणवलं होतं.

बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांची आठवण अजूनही पदोपदी येत असते. आज त्यांचा स्मृतिदिन. ते आज देहरूपाने जरी नसतील तरी त्यांनी मांडलेले विचार, घेतलेले निर्णय यातून त्यांचा बाणेदारपणाच नजरेस येतो. कोणासमोर सहजासहजी वाकायचे नाही. कोणी खोडी काढली तर त्याला वाघनखांचा प्रसाद द्यायचा, असे हे व्यक्तिमत्त्व होते. असे बाळासाहेब होणे नाही, असे यासाठीच म्हणावेसे वाटते. त्यांच्या स्मृतिदिनी ते नसल्याची आठवण मनात कालावाकालव करते.

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती शिवसेना आता कुठे आहे? ती बाळासाहेबांबरोबर केव्हाच अस्तंगत झाली असे खेदाने म्हणावेसे वाटते. आवाज कुणाचा.. शिवसेनेचा.. अशा घोषणा जेव्हा व्हायच्या तेव्हा प्रत्येक मराठी तरुण त्वेषाने पेटून उठायचा. कारण त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करणारी बाळासाहेब ठाकरे नावाची धगधगती ज्योत होती. आता शिवसेनेत भुसा भरलेले वाघ पाहायला मिळतात. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आपण याचे समग्र दर्शन घेतले. ज्या भाजपाला बाळासाहेब ‘कमळाबाई’ बोलायचे, तीच कमळाबाई आता वाघाला आपल्या इशा-यावर नाचवते आहे.

निवडणुकीत एकमेकांचे तोंड पाहायचे नाही. निवडणूक पार पडल्यानंतर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, सेल्फी काढायचे, असे उद्योग बाळासाहेबांनी कधी केले नाहीत. त्यामुळेच की काय सध्याचे पंतप्रधान व तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अनेकदा बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला यायचे. शिवसेना-भाजपात काहीसे बिनसले तर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन मुंबईचे विमान पकडून कलानगर गाठायचे. मातोश्रीला पोहोचल्यावर सगळे वातावरण निवळायचे. भीतीयुक्त धाक
बाळासाहेबांचा होता! आताचे पक्षप्रमुख नुसतेच गुरगुरतात. कुठे काही मिळाल्यास थेट वर्षाही गाठतात. हाच का शिवसेनेचा मराठी बाणा?

बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी देशात व राज्यात भाजपाकडून सुरू असलेल्या अराजकसदृष्य परिस्थितीवर आपल्या कुंचल्याने फटकारे मारले असते. आपल्या वाणीने मोदी असो किंवा भाजपाला पार सोलून काढले असते. तेवढी ताकद त्यांच्यात होती. कारण त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी खस्ता खाल्लेल्या होत्या. शाखा निर्माण करण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांच्याबरोबर अनेक ठिकाणी भेटी देत, वेळप्रसंगी भाषणे देत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले होते. पण आताच्या मंडळींना एसीशिवाय करमत नाही. त्यामुळे त्यांचा जनतेशी थेट संबंध नाही. सुभाष देसाई जी गाळीव नावे सांगतात, सच्चाई, रोखठोकवाले जी नावे पुढे करतात त्यांनाच ते भेटतात. त्यामुळे ज्यांनी शिवसेना वाढीसाठी लाठया-काठया झेलल्या, त्यांची अवस्था वाईट आहे.

कोणताही पक्ष जेव्हा कार्यकर्त्यांपासून तुटतो तेव्हा तो केवळ पक्षच राहतो. त्यात मायेचा ओलावा, प्रेम, आपुलकी राहत नाही. राहतो तो निव्वळ कोरडेपणा. शिवसेनेत गेल्या काही वर्षापासून जी मरगळ आलेली आहे. निष्ठावंतांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला त्याची कारणे यातही दडलेली आहेत. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा त्यांचे एक ब्रीद होते, ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ आज याच्या उलटे झालेले आहे. आज शिवसेनेत ८० टक्के ‘टक्क्यांचे’ राजकारण आलेले आहे व २० टक्के ते समाजकारण करण्याचे नाटक करीत आहेत. या राजकारणातूनच हाती आलेल्या महापालिकांवर डल्ला मारून त्यांनी त्या अक्षरश: ओरबडून खाल्लेल्या आहेत. ठाणे असो किंवा मुंबई वा अन्य महापालिका यात शिवसेनेची सत्ता आहे. या महापालिकांमध्ये शिवसेनेने कोणते भरीव काम केले आहे, याचा लेखाजोखा घेण्याची आवश्यकता आहे.

रस्त्यांवर खड्डे, गटारे तुंबलेली, परिवहन व्यवस्थेचा बो-या वाजलेला, मूलभूत सोयी-सुविधाही या महापालिकांमध्ये शिवसेनेला पुरवता आलेल्या नाहीत. असे असतानाच निवडणुकीच्या दरम्यान ‘करून दाखवले’ असे पोस्टर्स हा पक्ष लावत असतो. बाळासाहेब गेल्यानंतर विकास काय, हे शिवसेनेला माहीत आहे का? मातोश्रीच्या पाय-या जो चढतो तोच पावन होतो, असेच काहीसे वातावरण आहे. त्यात ठेकेदार असो किंवा दीडदमडीचे नेते यांचा समावेश आहे. शिवसेना नावाचा वाघ बाहेरून दिसायला रुबाबदार दिसत असेल पण तो असा आतून पोखरला गेला आहे. ते भाजपाने चांगलेच ओळखले असून त्यामुळेच की काय काही महिन्यांपूर्वी कृत्रिम वाघ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना देऊन शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीचे मूकचित्र उभे केले होते.

राजकारणात शह-काटशह असतात. प्रत्येक पक्षाला ते चुकलेले नाहीत. पण ते करत असतानाच किती लाचार व्हायचे, त्याचीही काही सीमा असते. ती सीमा ओलांडल्यास आपण लाचारांच्या रांगेत जाऊन उभे राहतो. शिवसेना बाळासाहेबांनंतर भाजपापुढे लाचार झालेली आहे. शिवसेनेतील अनेकांना सत्तेची हाव लागलेली आहे. ही हाव त्यांना स्वस्त बसू देत नाही. त्यामुळेच भाजपाने सत्ता ग्रहण केल्यावर काही दिवस विरोधकांची भूमिका स्वीकारणा-या शिवसेनेला अखेर ताटाखालचे मांजर होत मिळेल ती पदे पदरात पाडून घ्यावी लागली आहेत. अशी लाचारी बाळासाहेब असताना शिवसेनेत कधीच नव्हती, असे जुने निष्ठावंत शिवसैनिक आजही सांगतात.

बाळासाहेब आज असते तर शिवसेनेवर भाजपा वरचढ झाली नसती आणि त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला असता तर बाळासाहेबांनी त्यांना खास ‘ठाकरी भाषेत’ उत्तरही दिले असते. असा बाणेदारपणा आताच्या नेतृत्वात नाही, बाळासाहेब असताना शिवसेना-भाजपाचे सरकार होते.

आता भाजपा-शिवसेनेचे सरकार आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलल्याने जो काही गदारोळ सुरू आहे, त्यामुळे देशभरात अराजकाचे वातावरण आहे. असा महत्त्वाचा निर्णय घेताना मोदी यांनी त्यांच्या सरकारमधील घटक पक्षांना, त्यात शिवसेनेलाही विचारात घ्यायचे होते. पण ते मोदी यांनी न करता आपला हेका कायम ठेवला. आज बाळासाहेब हयात असते तर त्यांना ते शक्य झाले असते का?
-हरीश केंची, ९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...