Saturday 13 January 2018

जातिभेदाची ना लाज ना लज्जा...!




 *जातिभेदाची ना लाज ना लज्जा!*

"आज देशात सर्वत्र जातीय अहंकार उफाळलाय. भीमा कोरेगाव प्रकरणात ते प्रकर्षानं जाणवलं. मराठा समाज आणि दलित एकमेकांसमोर उभे ठाकले. हे अत्यंत वेदनादायी चित्र होतं. यापूर्वी मागासवर्गीयांच्यासारख्या आम्हालाही राखीव जागा अन सवलती द्या. अशी मागणी ब्राह्मणांनी, मराठा क्षत्रियांनी, जाट-पटेलांनी करावी एवढी उचल ह्या जाती अहंकारानं खाल्लीय. जाती संस्थेचं विसर्जन हाच यावरील एकमेव उपाय आहे. डॉ. आंबेडकर यांनी जातीयता नष्ट करण्याची तरतूद केली, त्यानुसार कायदे झाले. जातीयतेला वचक बसला असं म्हणत असतानाच पुन्हा या जातीयतेनं डोकं वर काढलं. तथापि जातीयतेचं मूळ 'जातिसंस्था' आहे. ते घाव घालून नष्ट करण्याची तरतूद घटनेत नाही. म्हणूनच कायद्याला बगल देऊन जाती अहंकार माजतोय. तो राजकारणासाठी, समाजकारणासाठी वापरला जातोय."
----------------------------------------------

*न* ववर्षाच्या प्रारंभी महाराष्ट्रात जातीयता उफाळून आली. निमित्त होतं भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाचं तर त्याला किनार होती ती वढू इथल्या छत्रपती संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीचं! दुष्ट हेतूनं आणि नीच बुद्धीनं हा जातीय तणाव वाढविण्यात आला. त्यामुळं इथं दंगल झाली. त्याचं पर्यवसान महाराष्ट्र बंदमध्ये झालं. राज्यात पुन्हा एकदा जातीवादाचं तणं माजलं. निमित्त कसलंही असो; मग ते इतिहासातलं चित्रण असो, बलात्कारासारखं बीभत्स घटना असो वा राजकारणातली घडामोड असो. सर्वत्र जातिवादाचं भूत राज्यात डोकं वर काढत असल्याचं दिसतं आहे. ज्या गोष्टी गाडायला हव्यात, त्या पुन्हा उकरल्या जाताहेत. ज्या गोष्टी टाकून द्यायला हव्यात पण नेमक्या त्याच बाबी उराशी कवटाळल्या जाताहेत.

*जातीभेद हा कलंक*
जातीभेद आणि जातीयता हा धर्माला आणि राष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो नष्ट व्हावा, मानवतेची स्थापना व्हावी, यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला अशा संत आणि सुधाकरांची परंपरा राष्ट्रात आणि महाराष्ट्रात आहे. परंतु त्यांच्या कार्याची राख व्हावी अशी स्थिती इथं आहे. भक्तीभावानं जाती अहंकार गाडला जाईल आणि शिक्षणानं लोक स्वतःहून जाती विसर्जन करतील, अस संत, समाज सुधारकांना वाटतं होतं. त्यासाठी ते झटले, पण उलटंच घडलं. शिक्षणानं ओठातली जातीयता पोटात ठेवून ती सोयीनं वापरण्याचा शहाणपणा सुशिक्षितांनी आत्मसात केला; आशिक्षितांतही भिनवला; तर भक्तिगंगेत बुचकळ्या मारणाऱ्यांनी संतानाच जातीच्या गटारघाणीत बुडवण्याचा पराक्रम केला.
*कुळजातीवर्ण । हे अवघेचि अप्रमाण।।*
असं म्हणत संत ज्ञानेश्वरांनी अहंकाराच्या सोवळ्यात गुंडाळलेलं धर्मज्ञान सर्वांसाठी मोकळं केलं. त्यामुळेच वेगवेगळ्या जातीत संत निर्माण झाले. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं तसंच एकनाथ-रामदास वगळता इतर सारी संतमंडळी ब्राह्मणेतर होती. नामदेव शिंपी होते. तुकाराम वाणी होते. गोरा कुंभार होते. चोखा मेळा महार होते. हे सगळेच 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हा तुकोबांचा संदेश सांगत जातीयतेची नशा उतरवत होते. पण काय झालं? पंढरीची वारी समतेची आहे, जातीभेद गाडणारी आहे, अशी फुशारकी आजही मारली जाते. ती झूठ आहे. या वारीत संतांच्या दिंड्यांच्या नावाखाली सगळे जातीभेद व्यवस्थित सांभाळले जातात. ह्या जातिभेदातून देवही सुटला नाही.

*सगळा अधर्म नोंदणी करूनच!*
जातीची मिजास सांगत बडवे आजही विठोबाला धरुन आहेत. अनेक देवदेवता जातीच्या गुरवांच्या आणि पुजाऱ्यांच्या कब्जात आहेत. गोव्यातील बऱ्याच देवळात महाजनानं, भटानं आणि भटेतरांनी देवदर्शन किती अंतरावरून घ्यायचं ते सांगणाऱ्या आडकाठ्या आहेत. महारवाड्याचे बौद्धवाडे झाले, म्हणून इतरांची त्याकडं पाहण्याची नजर बदलली असं झालं नाही. हे ग्रामीण भागातच आहे असं नाही, ते शहरातही आहे. शहरात दलितांच्या छावण्या आहेत. तशा जात पाहून फ्लॅट विकणाऱ्या स्वयंभू उच्चवर्णीयांच्या वसाहती आहेत. बँका आहेत. सहकारी संस्था, कारखाने आहेत. तिथल्या जातीयतेला पोषक-पूरक ठरतील अशा जाती-ज्ञाती संस्था-संघटना आहेत. त्यांची संमेलनही जोरात होतात. जातीचा हा जोर दाखविण्यात कुठलीही जात मागे नाही. त्यात जातिव्यवस्थेत आपण कनिष्ठ आहोत, याची कनिष्ठाला लाज नाही आणि उच्चवर्णीयाला आपण धर्माला शेण फासण्याचा व्यवहार करतो याची शरम नाही. हा सगळा अधर्म सरकार दरबारी नोंदणी करून होतोय हे विशेष!

*जातीयतेनं डोकं वर काढलं!*
आज देशात सर्वत्र जातीय अहंकार उफाळलाय. भीमा कोरेगाव प्रकरणात ते प्रकर्षानं जाणवलं. मराठा समाज आणि दलित एकमेकांसमोर उभे ठाकले. हे अत्यंत वेदनादायी चित्र होतं. यापूर्वी मागासवर्गीयांच्यासारख्या आम्हालाही राखीव जागा अन सवलती द्या. अशी मागणी ब्राह्मणांनी, मराठा क्षत्रियांनी, जाट-पटेलांनी करावी एवढी उचल ह्या जाती अहंकारानं खाल्लीय. जाती संस्थेचं विसर्जन हाच यावरील एकमेव उपाय आहे. डॉ. आंबेडकर यांनी जातीयता नष्ट करण्याची तरतूद केली, त्यानुसार कायदे झाले. जातीयतेला वचक बसला असं म्हणत असतानाच पुन्हा या जातीयतेनं डोकं वर काढलं. तथापि जातीयतेचं मूळ 'जातिसंस्था' आहे. ते घाव घालून नष्ट करण्याची तरतूद घटनेत नाही. म्हणूनच कायद्याला बगल देऊन जाती अहंकार माजतोय. तो राजकारणासाठी, समाजकारणासाठी वापरला जातोय. राजकारण, समाजकारण तर जातीला हिशेब करूनच केलं जातंय. याच विचारानं मंत्रिमंडळातला समावेश केला जातोय. ते पुन्हा एकदा दुसऱ्या जातीच्या भल्याचा विचार करून केलं जातं. काँग्रेस दलित-मुस्लिमांच्या तोंडाला सत्तेचं चाटण लावून मराठ्याना सत्ता चाटून-पुसून खाण्यास देणार आणि शिवसेना-भाजप ओबीसींच्या बळावर दोन्ही काँग्रेसला विरोध करणार असं महाराष्ट्रातलं राजकारण आहे. सत्तापालट झाला, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागी भाजप-सेना आली वृत्ती मात्र तीच राहिली. अन्य राज्यातही असंच राजकारण आहे.

*जातिसंस्था नष्ट व्हावी*
जाती, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या भिंती तुटून पडणं हा मानवधर्म आहे. तो प्राणपणानं पाळला पाहिजे. जातीसंस्थेला वर्ण याचं अधिष्ठान आहे. त्यात स्वार्थ आहे. सामाजिक दडपण आहे. कनिष्ठांची-दुबळ्यांची अवहेलना आहे. अशी जातीव्यवस्था, जातिसंस्था ज्यांना समाज व्यवहाराची गरज वाटते. देशांतर्गत समस्या वाटते; अशांना या गरजेची आणि समस्येची वेगवेगळ्या स्तरावर काय स्थिती आहे हे तपासून पाहायला हवंय. पण तेच जातिवादाच्या चिखलात लडबडताहेत. अशावेळी सामान्य माणसानं पाहायचं कुठं? जातीसंस्थेचा इतिहास कितीही जुना असला तरी तो काही गौरवास्पद नाही. समर्थनीय नाही. तो सर्वकाळात अमानुषच आहे. कारण माणूस ही जात आहे. रंग, भाषा, प्रांत, देश, व्यवसाय ही त्याची ओळख आहे. स्त्री आणि पुरुष हा एकमेव भेद आहे. अन्य सजीव प्राण्यात असा एखादा भेद नाही. पक्षी-प्राणी-वनस्पती ह्यांच्यात असंख्य प्रकार आहेत. त्यातल्या प्रत्येक प्रकारच्या प्रवृत्तीत आणि प्रकृतीत प्रचंड तफावत आहे. त्यातला एकप्रकार दुसऱ्यासारखा नाही. म्हणूनच त्यांची विभागणी जातीभेदात आहे. प्राण्यांच्या दोन जातींच्या संबंधातून तिसरीच जात निर्माण होते. माणसाचं तसं नाही. स्त्री-पुरुष कुठल्याही जातीचे, धर्माचे, वर्ण, पंथ, प्रांतातले असले तरी त्यांच्या संबंधातून माणूसच जन्माला येतो. हा भगवान बुद्धांचा दृष्टांत भारताला जातीधर्माच्या जनावरी पाशातून सोडवणारा आहे. तथापि स्वार्थासाठी मानवतेचा नाश करणाऱ्या पाशालाच कवटाळलं जातंय. हा नादानपणा आहे. तो चव्हाट्यावर आणल्याशिवाय त्यांच्यातली अमानुषता, पशुता समस्त भारतीयांना दिसणार नाही. समजणार नाही. अस्पृश्यतेला कायद्यानं मूठमाती मिळालेली नाही. ती अस्पृश्यतेच्या विरोधातील सामाजिक तुच्छतेतून मिळाली. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या पलीकडं जाऊन मानवतेचा विचार करणारे, त्यांचं मन आणि मत प्रभावीपणे मांडणारे समाजसुधारक होते. त्यांनी नेटानं प्रहार करून अस्पृश्यतेचा चेंदामेंदा केला. हिंदुधर्म आणि हिंदुस्थानवरचा एक कलंक मिटला. जातीसंस्थेचं देखील असंच व्हायला हवं होतं. परंतु त्याबाबतचं चित्र विचित्र आहे. जातीच्या शेणसड्यात लोक आणि नेते सारखेच माखलेले आहेत. त्यामुळंच जातीअंताच्या लढ्याचा आवाज जातीय संघटनेच्या बळावर देण्याचा निर्लज्जपणा खुलेआम केला जातो. हे सगळं हळूहळू कायद्यानं अथवा शिक्षणानं होईल. हा भ्रम आहे. त्यासाठी जातीसंस्थेकडं तुच्छतेनं पाहायला हवंय. तुच्छतेनं पाहिल्याशिवाय जात सांगणारे आणि दाखवणारे भानावर येणार नाहीत. जातिसंस्था नष्ट झाल्याशिवाय हिंदुधर्म आणि हिंदुस्थान उजळणार नाही. हे सत्य पचविण्याची शक्ती ज्यांच्यात आहे त्यांनीच लढा उभारला तर जातिसंस्था उन्मळून पडतील आणि समस्त मानवतेचा वावर देशात झाल्याशिवाय राहणार नाही.

चौकट..........

*संक्रात सणाचं स्वागत करू या...!*

आज संक्रात! ही संक्रात प्रत्येकवर्षी १४ जानेवारीलाच येते. विज्ञान आणि धार्मिकता यांचा अजोड संयोग! संक्रातीचं वर्णन  प्रत्येकजण आपल्या सोयीनं करतो. ती कशी आहे, कशावर स्वार होऊन येते आहे याची वर्णनं ज्योतिषशास्त्री नेहमीप्रमाणे करताहेत. त्यानुसार उद्याची दुनिया कशी असेल, याबाबतही भाकीत केलं जातंय. उद्याच्या दुनियेची कल्पना आजकालच्या दुनियेवरून करता येईल. माणसाला नव्याची आस असावी, पण त्यासाठी सत्याचा घास घेण्याची बदमाशी नसावी. काळ हा नेहमीच दुटप्पी असतो, त्यावर स्वार झालात, तर तो तुम्हाला आपल्यालाही पुढे नेणार. त्याच्याकडे पाहात राहाल, तर मात्र तो तुमचा काळ होणार!  आगामी काळ हा ज्ञानाधिष्ठित विज्ञानाचा असणार आहे. माणसाची जात, धर्म त्याचं ज्ञान ठरवणार, पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडतंय, याचा अनुभव येतोय. भावनेचं विज्ञान असतं. त्यानुसार त्या फुलविता, विझविता, आणि वांझोटयाही ठेवता येतात.भावनेचं विज्ञान असतं, मात्र विज्ञानाला भावना नसते. विज्ञान ज्याला कळतं ते त्याचं होतं. त्यासाठी ज्ञान हवं, बुद्धीची चमक हवी. ती भावनेच्या वरचढ हवी. अशा दृष्टीनं पाहिलं की लक्षांत येतं. सध्या खूप अंधार आहे. धर्म, जात, संस्कृतीच्या अहंकारी अस्मितांना, देवभक्तीच्या भाबड्या भावनांना आपण नव्या सहस्रकात घेऊन गेल्यानं ते अधिक गडद होताहेत. धंद्याचा धर्म करण्याऐवजी धर्माचा धंदा बनविला जातोय, यातून निष्पन्न काय होऊ शकत, हे सारं तुम्ही आम्ही सहजपणे समजण्याइतपत शहाणे आहोत. आपल्यात लढण्याचं, प्रतिकार करण्याचं त्राणच राहिलेलं नाही. अशा गलितगात्र झालेल्या, गर्भगळीत झालेल्याला संक्रात कशावर बसून आली आहे. अन ती आपलं काय भलं वाईट करणार, याची चिंताच नको. जसं निवडणुकीत आपण सगळ्यांचंच, सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत करतो, अगदी तसंच सगळ्या सणावारांचं स्वागत करतो. इतकं की, आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणणंच योग्य ठरेल. असो. बोला तिळगुळ घ्या गोड बोला...!

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...