Sunday 26 January 2020

महाराष्ट्रधर्म आणि शिवमुद्रा..!

"शिवाजी महाराजांचं राज्य हे 'हिंदवी स्वराज्य' होतं. हिंदवी ही भौगोलिक संकल्पना आहे. ते हिंदुत्ववादी स्वराज्य नव्हतं. हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे. हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. युरोपातल्या विचार प्रणालीनुसार आपल्याकडेही हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे असं वाटणा-यांनी ती केलीय. यात सावरकर प्रमुख होते. आज मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांचा फोटो दिसला आणि प्रबोधनकारांचाही! प्रबोधनकारांनी ब्राम्हणी हिंदुत्वाबद्धल शेलक्या शब्दांत काय लिहून ठेवलंय ते प्रत्येकानं स्वतःच शोधून वाचावं. मग हे दोन्ही फोटो एकाच रांगेत ठेवण्याचा मनसेचा भोंगळपणा लक्षात येईल. राज ठाकरे जर शिवमुद्रेसोबत ‘हिंदवी’ स्वराज्याच्या, 'महाराष्ट्रधर्मा'च्या दिशेनं जाणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. ‘हिंदुत्वा’च्या दिशेनं जाणार असतील तर शिवरायांच्या विचारांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ काढला गेलाय असंच म्हणावं लागेलं!"
__________________________________________

*कों* बडा जसा डोक्यावर तुरा मिरवतो तसं हिंदुत्व मिरवणारी काही मंडळी सध्या दिसताहेत. हिंदुत्व हे खरं तर धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासारखं हवं. ते असायला हवंय, पण दिसायला हवंच असं मात्र नाही. अंगात रक्त आहे हे दाखवण्याचं मार्ग वेगळं आहेत. कडकड कडे वाजवत फडफड फडाड आसूड स्वतःवरच उडवत, दाभणानं दंडाला भोसकून रक्ताच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्ष्म्या ररस्त्यानं कधीमधी फिरतात. भाबड्या बायाबापड्या त्यांना नमस्कार करतात. चार पैसेही देतात. हिंदुत्वाच्या कडकलक्ष्म्या असाव्यात असं कुणालाच वाटणार नाही, पण सध्या हिंदुत्वाचं प्रदर्शन करण्याची क्रेझ आहे, हे नाकारता येणार नाही. नको तिथं हिंदुत्व दाखवून हिंदुत्वाला सवंग बनवत आपला स्वतःचा भाव वाढवून घेणारे सध्या दिसताहेत. त्यामुळं कुणी सत्तेसाठी रंग बदलल्याची टीका करतोय तर आपला रंगच नव्हे तर, अंतररंगही भगवंच असल्याची ग्वाही देतोय! मी सांगतोय ते एकाच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या दोन वारसदारांनी केलेल्या वक्तव्याबाबत! एकानं 'शिवमुद्रे'चा ध्वज करून 'हिंदवी स्वराज्या'चा ध्यास, 'महाराष्ट्र धर्म' जागविण्याची आस दाखवलीय. तर दुसऱ्यानं आपण काँग्रेसीबरोबर गेलो असलो तरी आपलं अंतरबाह्य मन हे भगवं असल्याचंच म्हटलंय!

*मनसेला १४ वर्षाचा वनवास संपवायचाय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या १३-१४ वर्षांत अनेक स्थित्यंतरं अनुभवली. यशापयशाचा अनुभव घेतलाय. प्रारंभी मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिळालेलं यश राजकीय पक्षांना हेवा वाटावं असंच होतं. आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. अर्थात या यशाचे मानकरी एकटे राज ठाकरे होते. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात त्यांच्या निमित्तानं एका सक्षम नेतृवाचं पदार्पण झालं होतं. राज यांच्या झंझावाती नेतृत्वानं मुंबई, ठाणं, पुणं, नाशिक इथं अक्षरश: वादळ निर्माण केलं होतं. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वानं तरुणाईला वेडं केलं होतं. 'मराठी हृदयसम्राट' अशी उपाधी दिली गेली. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनंही लक्षवेधक ठरली. टोल आंदोलन त्यापैकीच एक, पण मनसेचं हे यश औटघटकेचं ठरलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत २०१४ मध्ये मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मनसेचीही वाताहत झाली. एकटी शिवसेना आपलं अस्तित्व दाखवू शकली. नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशभर हिंदुत्वाचा माहोल पसरला होता. त्यात राज यांचा मराठीचा-प्रादेशिकवादाचा मुद्दा नकळत मागं पडला. शिवसेना त्यावेळी भाजपाविरोधात लढली खरी, पण त्यांना हिंदुत्वानंच तारलं हे नाकारता येणार नाही. याच मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेनं नंतर एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मनसे मात्र या पराभवानंतर दिशाहीन झाली. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच गेला, त्यांची एकाधिकारशाही वाढत गेली. नोटबंदीच्या निर्णयानंतर तर कधी काळी मोदींचे प्रशंसक असणारे राज ठाकरे त्यांचे कट्टर विरोधक बनले. राज यांनी संधी मिळेल तिथं मोदींवर तोंडसुख घेतलं. पुढं तर राज यांचं राजकारण मोदी विरोधावर केंद्रित झालं. मोदींच्या निर्णयाचे राज यांनी जाहीररीत्या वाभाडं काढलं. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींविरोधात प्रचाराचं रान उठवलं, पण मोदींच्या लोकप्रियतेवर ओरखडादेखील आला नाही. मोदींविरोधी मतांचं ध्रुवीकरण होईल, असं वाटलं होतं. लोकसभेत मनसेनं उमेदवार उभे केले नव्हते, मात्र विधानसभेत त्यांना एका आमदाराच्या पुढे यश मिळालं नाही. मोदींविरोधी राज यांची चाल अयशस्वी ठरली. हे खरं असलं तरी राज यांच्या नेतृत्वाची जादू तसूभरही कमी झाली नाही. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम आहे. एका हाकेनं लाखोंचा जनसमुदाय एकत्र आणण्याची किमया, ताकद त्यांच्यात आहे. परंतु पक्ष म्हणून मनसेच्या मागील १४ वर्षाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर सत्तेच्या सारीपाटावर त्यांच्या पक्षाचे अस्तित्व शून्य आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. आपल्या पक्षाला उभारी देत त्याचं नव्यानं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आज एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या विचारांना नवी दिशा देत पक्षाची कक्षा रुंदावत आहेत. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणानं त्यांना ही संधी दिली आहे. भाजपाची साथ सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीला सामील झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकमेकांवर उभा असलेला हा सत्तेचा डोलारा टिकवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या विचारांशी ठाम आहेत. शिवसेनेलाच आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एक ना अनेक मुद्दे शिवसेनेला बासनात गुंडाळून ठेवावं लागताहेत. शिवसेनेची ही राजकीय अगतिकता एक संधी असल्याचं जाणवल्यानं राज यांनी शिवसेनेचेच ध्येय धोरण स्वीकारून आवेशानं पुढं सरसावलेत!

*शिवसेनेची अगतिकता मनसेची संधी*
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी मनसे सज्ज झालीय. पूर्वी शिवसेनेलाही मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाचा मुलामा चढवला तेव्हाच त्यांना यशाचा गड सर करता आला होता. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत मनसे आज भगवा ध्वज हाती घेतेय. मनसेनं त्यासाठी बाळासाहेबांचा जन्मदिन निवडला, हा केवळ योगायोग नव्हे तर त्यामागं व्यूहरचना दिसतेय. बाळासाहेबांचा वारसा मानली जाणारी शिवसेना त्यांच्याच विचारापासून कशी दूर गेलीय, हे सांगतानाच मनसे हीच खरी त्यांच्या विचारांची वारसदार आहे, हे या यानिमित्तानं राज ठाकरे यांना अधोरेखित करायचंय. बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उभी केली, अगदी त्याप्रमाणेच शिवछत्रपतींना अभिप्रेत हिंदुत्व हीच राज ठाकरे यांची संकल्पना असणार आहे. सर्व जातीधर्माच्या शिलेदारांना सोबत घेऊन 'हिंदवी स्वराज्या'ची भगवी पताका फडकावण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. कधीकाळी सावरकरांच्या नावावर राजकारण करणारी शिवसेना सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच धक्का देणारी होती. नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदवही-एनआरसी यावरही शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिळवलेत. बांगलादेशी मुस्लिमांना या देशातून हाकललं पाहिजे, ही शिवसेनेची कधीकाळची मागणी आज इतिहासजमा झाल्याचं पाहायला मिळतेय. सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यालाच बगल द्यावी लागतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आहे. त्यातून हिंदुत्वाचं आक्रमकपणे प्रतिनिधित्व करणारी संघटना ही स्वत:ची ओळखच शिवसेना गमावून बसेल, हे राज ठाकरे यांनी ओळखलंय. पण केवळ हिंदुत्व पक्षाला नवी उभारी देऊ शकेल का? हा खरा प्रश्न आहे! मनसेला हिंदुत्वाची कास धरल्यानं आपसूकच सीएए, एनआरसी या मुद्द्यांवर समर्थनाची भूमिका घ्यावी लागलीय. त्यामुळंच येत्या ९ फेब्रुवारीला 'मोर्चाला उत्तर मोर्चानं' म्हणत मोर्चा काढला जाणारंय. यातून भाजप आणि मनसे नैसर्गिकरीत्या जवळ येतीलही. मनसेला नसली तरी भाजपला महाराष्ट्रात मित्रपक्षाची गरज आहे. भाजपची 'हिंदुत्व विचारसरणी' असली तरी त्यात आक्रमकपणा नाही. आतापर्यंत शिवसेनेला पुढं करीत त्यांनी आपला आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा राबवलाय. मनसे कदाचित आता त्यांची ती अपेक्षा पूर्ण करू शकेल, असं त्यांना वाटतं. हिंदुत्व अंगिकारल्यास मनसेला जवळ घेण्याचा भाजपचा निश्चितच प्रयत्न राहील. राज ठाकरे एक फायरब्रॅण्ड नेते आहेत. जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडं आहे. तरुणाईत 'हिंदवी स्वराज्या'चं स्फुलिंग फुलवणाऱ्या नेत्याची भाजपला गरज आहे. सीएए आणि एनआरसीवरून काँग्रेसनं ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरून रान उठवलंय, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारी आक्रमक संघटना भाजपाला मित्र म्हणून हवीय. त्यामुळं भाजप मनसेसाठी पायघड्या टाकेल. राज यांना भाजपसोबतची आपली भूमिका ठरवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली काही वर्षे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या धोरणांना 'लाव रे तो व्हिडीओ'नं टोकाचा विरोध केलाय, त्यावर लोकांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणारंय. राज या सर्वातून कसा सुवर्णमध्य काढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!

*तर ती 'महाराष्ट्रधर्मा'शी प्रतारणा ठरेल!*
शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजमुद्रा तयार केली होती. या राजमुद्रेवर प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
असा उल्लेख होता. याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे असा आहे. शिवाजी महाराज सर्वांचेच आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. गाडीच्या काचेवर ते बोटातल्या अंगठीवर शिवमुद्रा असते. लोकं ती सर्रास अभिमानानं वापरतात. ही मुद्रा वापरणं चुकीचं असूच शकत नाही. ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्यांची ओळख अभिमानानं आपल्या सतत सोबत ठेवणं यात काहीच चूक नाही. मनसेनं त्यांच्या झेंड्यात शिवमुद्रा आणण्यात म्हणून काहीच गैर नाही. फक्त शिवमुद्रेसोबत एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येतेय याचं भान मनसेनं असू द्यावं. ही जबाबदारी प्रामुख्यानं शिवरायांच्या विचारांची आहे. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी 'माझ्या तमाम मराठी बांधवांनो, ऐवजी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो....!! अशी केलीय. यात हिंदुत्व वगैरेचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचं राज्य 'हिंदवी स्वराज्य' होतं. हिंदवी ही भौगोलिक संकल्पना आहे. ते हिंदुत्ववादी स्वराज्य नव्हतं. हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे. हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. युरोपातल्या फॅसिस्ट विचार प्रणालीनुसार आपल्याकडेही हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे असं वाटणा-यांनी ती केलीय. यात सावरकर प्रमुख होते. आज मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांचा फोटो दिसला आणि प्रबोधनकारांचा पण! प्रबोधनकारांनी ब्राम्हणी हिंदुत्वाबद्दल शेलक्या शब्दांत काय लिहून ठेवलं आहे ते प्रत्येकानं स्वतःच शोधून वाचावं. मग हे दोन्ही फोटो एकाच रांगेत ठेवण्याचा मनसेचा भोंगळपणा लक्षात येईल. राज ठाकरे शिवमुद्रेसोबत ‘हिंदवी’ राज्याच्या दिशेनं जाणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. ‘हिंदुत्वा’च्या दिशेनं जाणार असतील तर शिवरायांच्या विचारांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणावं लागेल. शिवरायांचं राज्य हे सगळ्यांचं होतं. त्यात जश्या सगळ्या जातींच्या लोकांना स्पेस होती तशीच धर्माच्याही होती. मुळात शिवकालीन संघर्ष हा धार्मिक नव्हताच. तो राजकीय होता एतद्देशीय आणि परकीय असा होता. त्यामुळं शिवरायांच्या विरोधात अनेक हिंदू सरदारही लढले आणि शिवरायांच्या बाजूने अनेक मुस्लिम सरदार लढले. आजच्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित हिंदू' विरुद्ध 'मुस्लिम चष्म्यातून शिवकालीन संघर्ष' बघणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणं आहे. राज ठाकरेंनी ते करू नये. पूर्वी भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेनेची मदत हवी होती. यातून तब्बल पंचवीस वर्षं मान अपमान गिळून भाजप ‘धाकटी’ होऊन राहिली. बाळासाहेबांना भाजपच्या ह्या धूर्तपणाचा पुरता अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी भाजप-सेना संबंधात कधी आपला ‘अप्पर हॅन्ड’ सोडला नव्हता. उद्धव यांची २०१४ ला मजबुरी झाली पण संधी मिळताच भाजपची खोड त्यांनी २०१९ ला मोडली. भाजपला हाच वेग कायम राहिला तरी एकहाती महाराष्ट्र जिंकायला अजून काही काळ जावा लागेल. तोवर त्यांना राज्यात एका सशक्त ‘धाकल्या’ची गरज आहे. राज यांना ही स्पेस खुणावतेय का हा खरा प्रश्न आहे. जर असं झालं तर राज जे काही ‘महाराष्ट्र धर्म’ वगैरे बोलताहेत त्यांच्याशीही प्रतारणा ठरेल आणि त्या ‘शिवमुद्रे’सोबतही! त्यामुळे मराठी मतांसाठीचा हा राज यांचा नवा प्रयोग, प्रयत्न बारकाईनं बघितला पाहिजे. जर तो ‘हिंदवी’ दिशेने गेला तर आनंद, जर तो ‘हिंदुत्व’ दिशेनं गेला तर मात्र क्लेशदायक असणारंय.

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...