Sunday 2 February 2020

महानायकाचा 'मूकनायक'...!

"डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत, अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी चालवलेल्या 'मूकनायक' पाक्षिकाची शताब्दी शुक्रवारी देशभरात साजरी झाली. खप होणार नसेल आणि जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळणार नसेल तर वृत्तपत्र काढण्याचं धाडस कोणी कधी करेल काय? पण तसं धाडस बाबासाहेबांनी १०० वर्षांपूर्वी केलं होतं. अस्पृश्य समाजात साक्षरतेअभावी वाचकांचा दुष्काळ होता. गरिबीमुळं वृत्तपत्राचा खप होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि बहिष्कृतांच्या वृत्तपत्राला जाहिराती, देणग्या मिळणंही दुरापास्त होतं. अशा परिस्थितीतही बाबासाहेबांनी स्वतः आर्थिक झळ सोसत मुकनायकसारखी अनेक मराठी नियतकालिके चालवली. कारण वृत्तपत्र हाताशी नसलेल्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्ष्यासारखी असते, हे त्यांनी १०० वर्षांपूर्वीच ओळखले होतं. त्यांची मुखपत्रे ही ध्येयवादी पत्रकारितेचा महामेरू होती"

*ज* र या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या आणि मानवजातीच्या चित्रपटाकडं प्रेक्षक या नात्यानं पाहिलं तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचं माहेरघर आहे, असं निःसंशय दिसेल......", हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक'च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन असावं. शंभर वर्षांपूर्वी, ३१ जानेवारी १९२० रोजी हा अंक प्रकाशित झाला. तेव्हापासून समाजात आणि पत्रकारितेत कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही म्हणावा इतका बदल झालेला नाही. आंबेडकरांचं माध्यमांशी असलेलं नातं व्यामिश्र होतं. त्यांनी स्वतः वर्तमानपत्रं सुरू केली, चालवली, संपादित केली आणि सल्लागार म्हणूनही काम केलं. इतर वेळी माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीचं वार्तांकन होत राहिलं. पोहोच आणि जवळपास एकहाती चालवलेल्या सामाजिक चळवळी यांचा विचार केला, तर आंबेडकर हे त्या काळी सर्वाधिक प्रवास केलेले राजकीय नेते असावेत. सामाजिक पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ यांच्या अभावी आंबेडकरांची चळवळ ही गरीब लोकांची चळवळ होती. काँग्रेस पक्षासारखी त्यांची स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थक वर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सर्वांत कमी संसाधनं बाळगून होता. तर, बाहेरून फारसा पाठिंबा नसताना आंबेडकरांना हा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागला. माध्यमांच्या दृष्टीने हे दखलपात्र होतं. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमविश्वात आंबेडकरांचं कार्य सुपरिचित होतं. देशांतर्गत माध्यमांमधील आंबेडकरांची उपस्थिती आणि त्यांचं संपादकीय कार्य यांबद्दल आपल्याला माहिती असतं, पण आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी झालेलं विस्तृत वार्तांकन बऱ्याच प्रमाणात अज्ञात राहिलेलं आहे. आंबेडकरांचं पत्रकारीतेतलं लेखन काव्यात्म आहे, त्यात बरीच वितंडाही आहे आणि विरोधकांना विचारपूर्वक तोडीसतोड प्रत्युत्तरं दिलेली आहेत. अस्पृश्यांवरील अत्याचार व कल्याणकारी धोरणं यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तिवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणं आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेलं आहे. आंबेडकरांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारीतेच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळतं. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणांवर दलितांच्या स्वातंत्र्याची आणि त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली असत. 'बहिष्कृत भारत'च्या १५ जुलै १९२७ रोजीच्या अंकात आंबेडकरांनी ब्राह्मणांवर टीका करताना त्यांचं शैक्षणिक प्रतिनिधित्व सर्वाधिक असल्याकडं निर्देश केला होता. उदाहरणार्थ, मुंबई प्रांताच्या उच्चशिक्षण सर्वेक्षणानुसार, प्रति दोन लाख उच्चशिक्षितांमध्ये अस्पृश्य शून्य होते, तर ब्राह्मण एक हजार होते. शैक्षणिकदृष्ट्या मागास जातींचं प्रतिनिधित्व कमीच राहावं, अशी तजवीज करणारी ती सरकारी धोरणं विध्वंसक होती. पत्रकारिता हा कायमच दलित चळवळींचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. 

*डॉ.आंबेडकर हे 'सव्यसाची पत्रकार
डॉ. आंबेडकर यांचा जन्म १८९१ चा आणि त्यांचं महानिर्वाण १९५६ चं! ६५ वर्षाचं आयुष्य बाबासाहेबांना लाभलं. डॉ.आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना करून भारतीय समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला. यापूर्वीचा कालखंड बाबासाहेबांच्या विद्यार्थीदशेचा होता. डॉ.आंबेडकर यांचा पत्रकारितेचा प्रवास ‘मूकनायक’पासून सुरू झाला. नंतर बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारतपर्यंत तो सुरूच राहिला. आंबेडकर यांच्या पूर्वी दलितांचा कैवार घेणारी १९८८ मधलं विटाळ विध्वंसक, १९०९ मधलं सोमवंशीय मित्र अशी नियतकालिकं, पाक्षिकं होती. पण बाबासाहेब यांनाही सामाजिक-राजकीय ध्येयवादासाठी हातात वृत्तपत्र असावं असं वाटत होतं; त्यामुळंच ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केलं होतं. पण त्याचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाही. या अंकातच, ‘अस्पृश्यांवर होणा-या अन्यायावर उपाय सुचविण्यासाठी आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी वर्तमानपत्रासारखी भूमी नाही’ अशी भू्मिका त्यांनी मांडली. त्यानंतर ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक काढलं. हे पाक्षिक चालवताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पाक्षिक बंद करण्यात आलं. दोन वर्षात या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक प्रकाशित झाले. ‘बहिष्कृत भारत’मधून डॉ.आंबेडकर यांनी १४५ स्फुटलेख व ३३ अग्रलेख लिहिले. ही सर्वच लेखनसंपदा मराठी भाषेचं भूषण आहे. पत्रकार डॉ.आंबेडकर यांची 'पत्रकार' म्हणून ओळख निर्माण करण्यास ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका इथं महत्त्वाची आहे. तशीच श्रेष्ठकोटीचा निबंधकार, भाष्यकार, तत्त्वचिंतक, मानवतावादी विचारवंत, द्रष्टा असे अनेक पैलू त्यांच्या या पाक्षिकातील लिखाणातून अधोरेखित होत जातात. एका माणसाच्या ठायी आर्थिक, सामाजिक, राजकीय, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान यांना कवेत घेणारा आवाका त्यांचा होता. असं असतानाच जातीयवादाविषयी प्रचंड चीड त्यांना होती. तत्कालीन पांढरपेशांची वृत्तपत्रे त्यांच्याच समांतर चालणा-या दलित वृत्तपत्रसृष्टीची दखल घेत नाहीत. किंबहुना दलितांविषयींचे विषय या वृत्तपत्रांत त्यांना वर्ज असतात. हे ओळखूनच आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ यातून आपल्या आवेशी, सत्यान्वेषी मांडणीतून दलितांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम नेटानं केलेलं आहे. आंबेडकर यांचे शिक्षण इंग्रजीतून झालंय. त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. आयुष्यातील उमेदीची वर्षे शिक्षणासाठी परदेशात घालवण्यामुळं त्यांचा मराठीशी तितकासा संबंध नव्हता, पण दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रव्यवसायाची कास धरली. त्यांची मराठी ही साजूक तुपातली नव्हती, पण मांडणीतील आग्रहीपणा, युक्तिवाद, ओजस्वीपणा वाखाणण्याजोगा होता. ज्यांच्यासाठी म्हणून हे पत्र चालवण्यात येत आहे. त्यांना ती भाषा कळावी यासाठी ते सुबोध पद्धतीनं आपला विचार मांडण्याचा प्रयत्न करीत. ‘बहिष्कृत भारत’सह त्यांचे अन्य पाक्षिकांतील अग्रलेख वाचल्यास याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीला ख-या अर्थानं प्रारंभ झाला तो महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातून! मानवमुक्ती, समानतेसाठी लढविल्या गेलेल्या या आंदोलनात आपल्या पक्षाची बाजू अधिक ठामपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून केलाय. हे आंदोलन झाल्यानंतर ‘भाला’कार ल.ब.भोपटकर, माटे यांनी आंदोलनाच्या विरोधात विखारी पद्धतीचं लिखाण केलं. त्याला आंबेडकरांनी संयमानं उत्तर दिलं. विरोधी पक्षाच्या मंडळींची मतं खोडून काढण्यासाठी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केलेला युक्तिवाद उच्चप्रतीचा आहे. आपला समतेसाठीचा लढा किती योग्य आहे, हे मांडताना त्यांनी अतिशय संयत भू्मिका घेतली होती. ‘बहिष्कृत भारत’मधील त्यांचे लेख, स्फुटलेख हे तत्त्वचिंतनाची डूब असणारं, नवा विचार मांडणारं, मानवतेचा पुरस्कार करणारं, स्त्री-पुरुष भेदापलीकडं समानतेच्या दृष्टीनं पाहण्यासाठी उद्युक्त करतात. रोटी, बेटी आणि लोटीबंदी यांच्या तटबंद्या तुटल्याशिवाय समानता अशक्य आहे, असा प्रागतिक विचारही ते मांडतात. डॉ.आंबेडकर यांचा पत्रकार हा पैलू आताशा बाहेर येत आहे. या पैलूंवर विविध कोनांतून लिखाण झाल्यास आंबेडकर यांच्यातील 'सव्यसाची पत्रकार' अधिक झळाळून उठेल

*तुकारामांचा अभंग ही बिरुदावली*
लंडनमधील द टाइम्स, ऑस्ट्रेलियातील डेली मर्क्युरी, न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्क अॅमस्टरडॅम न्यूज, बाल्टिमोर आफ्रो अमेरिकन, द नॉरफोक जर्नल, यांसारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसह काळ्या लोकांनी चालवलेल्या वर्तमानपत्रांनी आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये आणि गांधी-आंबेडकर संघर्षामध्येही बराच रस घेतला होता. राज्यघटना निर्मितीमधील आंबेडकरांची भूमिका, संसदेतील त्यांचे युक्तिवाद, सादरीकरणं, आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा त्यांनी दिलेला राजीनामा, या घडामोडींकडेही जगाचं लक्ष होतं. आंबेडकरांच्या महान वारशाविषयी माहितीचा प्रचंड साठा जुन्या आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांच्या प्रतींमध्ये जतन केलेला आहे. देशांतर्गत पातळीवर आंबेडकरांनी त्यांची सामाजिक चळवळ चालवण्यासाठी माध्यमांचा आधार घेतला. उत्कट प्रादेशिक प्रेमादरापोटी त्यांनी 'मूकनायक' या त्यांच्या पहिल्या मराठी नियतकालिकाचा आरंभ केला. 'मूकनायक'चा उद्देश स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तुराकामाचा एक अभंग अंकाच्या शीर्षस्थानी वापरला होता, तर पुढे 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाची बिरुदावली म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अभंगाच्याओळी वापरल्या होत्या. 'मूकनायक'मध्ये वापरल्या जाणारा तुकारामांचा अभंग असा:
काय करूं आतां धरूनिया भीड। निःशंक हें तोंड वाजविले।।
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित।।
'मूकनायक'चं कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी, महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना, ३ एप्रिल १९२७ रोजी आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली.त्रेचाळीस अंक प्रकाशित झाल्यावर 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक १५ नोव्हेंबर १९२९ रोजी बंद पडलं. यावेळीही आर्थिक अडचणींमुळेच नियतकालिक बंद करावं लागलं होतं. 'मूकनायक' व 'बहिष्कृत भारत' यांच्या प्रत्येक अंकाची किंमत फक्त दीड आणे इतकीच होती, आणि वार्षिक वर्गणी, टपालखर्चासह तीन रुपये होती. याच दरम्यान, १९२८ साली 'समता'चा उदय झाला आणि 'बहिष्कृत भारत'ला नवसंजीवनी मिळून २४ नोव्हेंबर १९३० रोजी 'जनता' या नावानं ते प्रकाशित होऊ लागलं. 'जनता' हे दलितांचं सर्वाधिक काळ चाललेलं दैनिक ठरलं. पंचवीस वर्षं सुरू राहिलेल्या 'जनता'चं नामकरण १९५६ साली 'प्रबुद्ध भारत' असं करण्यात आलं. आंबेडकरांच्या चळवळीला प्राप्त झालेल्या गतीशी सुसंगत हा बदल होता. १९६१ सालापर्यंत हे प्रकाशन सुरू राहिलं. तर, एकंदरित मूळचं 'बहिष्कृत भारत' हे नियतकालिक नामबदलासह ३३ वर्षं सुरू राहिलं, असं म्हणता येईल. या अर्थानं ते दलितांचं सर्वाधिक काळ सुरू राहिलेलं स्वतंत्र प्रसारमाध्यम होतं. या सर्व काळात आंबेडकरांनी चातुर्य दाखवत पुरोगामी सवर्ण पत्रकार आणि संपादकांचा वापर या कार्यामध्ये करून घेतला. त्यांनी सुरू केलेल्या अनेक नियतकालिकांचं संपादन आणि संपादन ब्राह्मण संपादकांच्या हातात होतं. देवराव विष्णू नाईक हे 'समता' आणि 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' यांचे संपादक, भास्कर रघुनाथ काद्रेकर हे 'जनता' आणि गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे हे 'बहिष्कृत भारत' आणि 'जनता' ही त्यातील काही ठळक संपादकांची नावं. बापू चंद्रसेन तथा बी. सी. कांबळे आणि यशवंत आंबेडकर यांच्यासारखे दलित नेते 'जनता'च्या संपादकीय भूमिकेला दिशा देत असत. परंतु, 'बहिष्कृत भारत'ला पुरेसे लेखक मिळत नव्हते, त्यामुळे २४-२४ रकाने भरण्याची जबाबदारी एकट्या संपादकावर पडायची. 'प्रबुद्ध भारत' सुरू होतं तोवर त्याचं संपादन यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात आणि भास्करराव काद्रेकर यांनी केलं.

*दलित पत्रकारितेला प्रारंभ*
आंबेडकरांआधी काही मोजकी नियतकालिकं अस्पृश्यांच्या जगण्याबाबत वार्तांकन करत असत. उदाहरणार्थ, महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून प्रेरणा घेऊन काही पत्रकारीतेतील प्रकल्प सुरू झाले. 'दीनबंधू' हे भारतातील पहिलं बहुजन वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी सुरू केलं. सत्यशोधक विचारांचा प्रसार करणं, हे या प्रकाशनाचं उद्दिष्ट होतं. दलितांना आणि त्यांच्या मतांना या वर्तमानपत्रात जागा दिली जात असे. काही लहानसहान अडथळे वगळता या वर्तमानपत्राने १०० वर्षांचा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास केला. महारांचे एक ज्येष्ठ नेते गोपाळ बाबा वलंगकर यांना पहिला दलित पत्रकार मानलं जातं. 'दीनमित्र', 'दीनबंधू' आणि 'सुधारक' या नियतकालिकांमध्ये त्यांनी जात व अस्पृश्यतेबद्दल केलेलं लेखन पथदर्शी ठरलं. वलंगकर अतुलनीय विद्वान होते. हिंदू धार्मिकव्यवस्थेची त्यांनी केलेली चिकित्सा 'विटाळ विध्वंसक' या पुस्तकाद्वारे १९८८ मध्ये प्रकाशित झाली. शंकराचार्य आणि इतर हिंदू नेत्यांसमोर वलंगकर यांनी सदर पुस्तकामध्ये २६ प्रश्न उपस्थित केले होते. शिवराम जानबा कांबळे यांच्यासारख्या इतर प्रमुख महार नेत्यांनीही अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला. 'सोमवंशीय मित्र' १ जुलै १९०८ रोजी हे पहिलं दलित वर्तमानपत्र सुरू करण्याचं आणि संपादनाचं श्रेय कांबळे यांना जातं. दलित चळवळीतील आणखी एक मोठे नेते आणि नागपूरस्थित इम्प्रेस मिलमध्ये कामगारांचं नेतृत्व केलेले किसन फागोजी बनसोडे यांनीही एक छापखाना सुरू केला होता, त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रकाशनं चालवता आली. त्यांनी १९१८ ते २२ या दरम्यान 'मजूर पत्रिका' आणि १९३६ मध्ये 'चोखामेळा' ही प्रकाशनं स्वतःच्या छापखान्यातून प्रकाशित केली. १९४१ साली त्यांनी चोखामेळ्याचं चरित्रही लिहिलं. 'सोमवंशीय मित्र' अस्तित्वात येण्यापूर्वी किसन फागोजी बनसोडे यांनी १९०१ मध्ये 'मराठा दीनबंधू', १९०६ मध्ये'अत्यंज विलाप' आणि १९०७ मध्ये 'महारांचा सुधारक' ही तीन वर्तमानपत्रं सुरू केली होती.दस्तावेजीय संग्रहाअभावी या नोंदींची ठोस शहानिशा अजून झालेली नाही. पण तत्कालीन विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि संशोधकीय साधनांमध्ये बनसोडे यांच्या नावावर तीन वर्तमानपत्रं नमूद केलेली आहेत. दडपलेल्या अस्पृश्य जातींना एकत्र आणणं आणि हिंदू समाजाला सुधारणेचं आवाहन करण्यासोबतच त्याची कठोर चिकित्सा करणं, यांवर सदर वर्तमानपत्रांनी लक्ष केंद्रित केलं होतं. आंबेडकरांच्या चळवळीला इतरही काही वर्तमानपत्रांनी पाठिंबा दिला होता. त्यातील काही अशी, दादासाहेब शिर्के यांनी १९२६ मध्ये सुरू केलेलं 'गरुड', पी. एन. राजभोज यांनी १९२८ साली सुरू केलेलं 'दलित बंधू', पतितपावनदास यांनी १९३२ मध्ये सुरू केलेलं 'पतितपावन', एल. एन. हरदास यांनी १९३३ सुरू केलेलं 'महारठ्ठा', १९४७ मधलं 'दलित निनाद'. विनायक नरहर बर्वे यांनी जातिव्यवस्थेविषयीच्या गांधींच्या मतांचा प्रसार करण्यासाठी 'दलित सेवक' या नियतकालिकाची सुरुवात केली.

*सामाजिक विषमतावादावर प्रहार*
सामाजिक, वैचारिक जाणिवेनं ओतप्रोत असलेले त्यांचे अग्रलेख केवळ सम्यक क्रांतीची दिशाच नव्हे, तर माणसाला प्रतिष्ठा, सन्मान बहाल करण्याचं काम करतात. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी प्रभावीपणे केलं. शिक्षण विचारही त्यात अंतर्भूत होता. यासंदर्भात बाबासाहेब म्हणतात, की मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं, शक्‍य तितक्‍या लवकर सुरू व्हावं. डॉ. आंबेडकरांनी सनातनी धर्म, जातीव्यवस्थेला ठोस युक्तिवाद आणि बिनतोड प्रतिपादन यांनी हादरे दिले. जातिधर्माच्या विषमतावादी धोरणावर त्यांनी प्रहार केला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रीय भाषा आणि ग्रंथलेखनाची भाषा वेगळी आहे. वृत्तपत्रीय मराठी भाषा उपरोधिक आहे. त्यात दृढनिश्‍चयी प्रतिपादन आहे. ही भाषा अलंकृत असली तरी बोजड नाही. त्यात वाक्‌प्रचार, म्हणी, दृष्टांत, सुविचार अशा विविधरंगी मराठी भाषेचा प्रयोग करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पाक्षिक, वृत्तपत्रातील मराठी भाषा समृद्ध होती, यात शंका नाही.  ‘मूकनायक’मधील लेखांची भाषा सहज, सोपी होती. ती जनसामान्यांची भाषा होती. दंभस्फोट करणारी ही भाषा समाजाला दिशादर्शक होती. त्यामुळेच जनसामान्यांचं परिवर्तन करता आलं. पौराणिक दाखले देत त्यातील कथांचा वापर करताना खरं-खोटं तपासून पाहिल्याशिवाय सांगत नव्हते. अशा या मराठी-इंग्रजी वैभवशाली संपन्नतेची साक्ष बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात अधोरेखित केली आहे. ‘मूकनायक’ पाक्षिकातील पत्रव्यवहारही वाचनीय असे. वर्तमानातील घडामोडींवर भाष्य करणारं लिखाण त्यात प्रसिद्ध होत असे. ‘मूकनायक’मुळे त्यावेळच्या अस्पृश्‍य, बहिष्कृत समाजाला नवी उमेद मिळाली, त्यांना झळाळी आली. त्या मूकनायक पत्रकारितेची आजच्या पत्रकारितेशी तुलना करताना मन अगदी खिन्न होतं. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांच्या नावानं महाराष्ट्र शासन पत्रकारिता पुरस्कार देतं. त्याप्रमाणे ‘मूकनायक’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं महाराष्ट्र शासनानं पत्रकारितेचा पुरस्कार द्यावा, त्यामुळं पत्रकारितेला नवं वैभव प्राप्त होईल. आणि पुरोगामी विचारांचा पत्रकारांना ऊर्जा मिळेल. "एक जात म्हणजे एक मजला असून या मजल्याला शिडी नाही. गुणवान असूनही खालच्या मजल्यावरील व्यक्तीला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही आणि अपात्र असूनही वरच्या मजल्यावरील व्यक्तीला खालच्या मजल्यात ढकलण्याची कुणाची हिंमत नाही......, असं सामाजिक आकलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'मुकनायक' च्या पहिल्या अग्रलेखात मांडलं होतं. तेव्हा ब्राह्मणेतर वृत्तपत्रं असली तरी त्यात दलितांच्या प्रश्नांना फारसं स्थान नव्हतं. ही खंत असल्यानं बाबासाहेबांनी 'मूकनायक' सुरू केलं. आजच्या पत्रकारितेतही दलित-वंचितांना फारसं स्थान नसल्याची अपराधी भावना आहे. पीडितांच्या चेहऱ्यावरील एक रेषाही बदलण्याचा प्रयत्न तळातही दिसत नाही हे शल्य आजही सलतं आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...