Saturday 29 February 2020

हिंदुराष्ट्र आणि सावरकर...!

"सध्या देशातलं वातावरण प्रक्षोभक बनलेलं आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून समर्थक आणि विरोधक समोरासमोर उभे ठाकले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या घटना घडताहेत. हिंदू-मुस्लीम वाद उफाळून आलाय. सावरकरांचा आजवर उपमर्द करणारेच त्यांच्या सन्मानासाठी विधिमंडळ डोक्यावर घेताहेत. हे दृश्य एकाबाजूला तर दुसरीकडे देशाच्या फाळणीचा मुद्दा उगाळत, नेहरूद्वेष व्यक्त करत संसदेत आपल्या सोयीचा नवा इतिहास मांडताहेत. जुनी मढी उकरताहेत, हिंदुस्तान-पाकिस्तान याची मागणी कशी अन केव्हा झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले सावरकर नंतर कसे बदलले याचा इतिहासातल्या घटनांचा घेतलेला हा मागोवा!"
----------------------------------------------------------


*वि*. दा. सावरकरांच्या चरित्राकडं पाहता निदान १९०८ पर्यंत त्यांना ब्रिटिशांच्याविरोधात लढायचं होतं. अर्थात अशी इच्छा असणाऱ्यांना हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कार करणं आवश्यक होतं आणि तसे सावरकर होते हे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ वाचल्यावर लक्षात येतं. सावरकरांनी त्यांना अटक होऊन शिक्षा होईपर्यंत केवळ हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कारच केला नाही तर एक मुसलमान हा हिंदू इतकाच राष्ट्रवादी असू शकतो, असं म्हटलंय. बरेलीला छापून प्रसिद्ध केलेला अयोध्येच्या नबाबानं काढलेला जाहीरनामाच सावरकर मोठ्या अभिमानानं या पुस्तकामध्ये उद्धृत करतात. या देशात राहणारे हिंदू, मुसलमान, शीख हे हिंदी आहेत, असं त्या जाहिरनाम्यात म्हटलं आहे. “हिंदुस्थानातील सर्व हिंदूंनो आणि मुसलमानांनो, उठा! स्वदेश बांधव हो, परमेश्वरानं दिलेल्या देणग्यांत अत्यंत श्रेष्ठ देणगी म्हणजे स्वराज्य आणि तुम्ही अजूनही स्वस्थ बसणार काय? तुम्ही स्वस्थ बसावं अशी परमेश्वराची इच्छा नाही कारण सर्व हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या हृदयात त्याच्याच इच्छेनं या फिरग्यांना आपल्या देशातून हाकलून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली आहे. …. लहान-थोर हे सर्व क्षुल्लक भेद विसरून जाऊन त्या सैन्यात सर्वत्र समताच नांदली पाहिजे. कारण जे जे पवित्र धर्मयुद्धात स्वधर्मासाठी आपली समशेर उपसतात ते सर्व सारख्याच योग्यतेचे आहेत !  त्यांच्यात मुळीच भेद नाहीत…. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व हिंदूना म्हणतो की, उठा आणि या परमेश्वरी दिव्य कर्तव्यासाठी रणांगणात उडी घ्या !” (‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ पान ८)  या पुस्तकातली अशी उदाहरणे अनेक देता येतील. सांगायचा मुद्दा हा की, सावरकर, त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवलं जाण्यापूर्वी हिंदू-मुस्लिम एेक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. इतके कट्टर समर्थक की बंडवाल्यांनी दिल्लीच्या सिंहासनावर केलेली बादशाह बहादूरशहा जफरची नेमणूकही समर्थनीय ठरवतात. असे सावरकर ब्रिटिशांच्या तुरुंगात अंदमानला जातात त्यावेळी १८५७ त्या स्वातंत्र्य समरातील हिंदू-मुस्लिम एेक्याचा विचार आणि त्यातून इंग्रजांपुढं उभं राहिलेलं प्रचंड आव्हान या गोष्टी सावरकर जाणत होते. हा देश धर्मभेद विसरून एकत्रितपणे जोपर्यंत ब्रिटिशांविरोधात संघटीत होत नाही तोपर्यंत स्वतंत्र होणार नाही ही गोष्टही ते जाणत होते. ब्रिटिशांच्या चिथावणीनंच काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्यासाठी १९०६ साली मुस्लिम लीगची झालेली स्थापनाही त्यांना माहीत होती आणि पुढे माफी मागून सुटून आल्यावर १९१६ मध्ये मुसलमानांचं सहकार्य स्वराज्याला मिळावं म्हणून लोकमान्यांनी केलेला सिमला करारही त्यांना माहीत होता. असे सावरकर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि मुस्लीम द्वेष का करतात? बरं हा मुस्लिम द्वेष एवढ्या थराला गेला की, शत्रू पक्षातील मुस्लिम स्त्रीला शिवाजी महाराजांनी सन्मानानं परत पाठवण्याला सावरकर ‘सद्गुण विकृती’ म्हणून मोकळे झाले. “शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रविघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारांमध्ये सहस्त्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे इथं दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपति शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवऱ्याकडं पाठवलं आणि पोर्तुगीजाचा पाडाव झालेल्या शत्रूस्त्रीलाही चिमाजी अप्पानं वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडं तिला परत पाठवलं. या दोन गोष्टींचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडोवेळी मोठ्या अभिमानानं करीत असतो. पण शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी अप्पांना महंमद गझनी, घोरी, अलाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहीरच्या राजकन्या, कर्णावतीच्या कर्णराजाची कमलदेवी नि तिची स्वरुपसुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदू राजकारण्यांवर केलेले बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण, पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांचा गौरव करताना झाली नाही, हे आश्चर्य नव्हे काय ?” (सहा सोनेरी पाने, वि. दा. सावरकर, पान १४४). ही वस्तुस्थिती पाहता सावरकरांच्या विचारात झालेला बदल लक्षणीय ठरतो!

*जिनांच्या कितीतरी आधी फाळणीची मांडणी*
सावरकरांच्या सन्मानासाठी भाजपेयींनी विधिमंडळ डोक्यावर घेतलं; अशाचप्रकारे संसदेतही भाजपेयीं नेते मंडळी पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उपमर्द करण्याची एकही संधी सोडत नाहीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आणि त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही वेळोवेळी 'प्रधानमंत्री होण्यासाठीच नेहरूंनी देशाची फाळणी केलीय' असं म्हटलंय. देशातील लोकांच्या श्रद्धेबरोबरच संवैधानिक संकेत, इतिहास हे सारं धुडकावून लावलं गेलंय. पण नेहरूंच्या समर्थकांचा आवाज आज क्षीण झाला असल्यानं ही मंडळी 'खोटं बोल तेही रेटून बोल' अशीच लागताहेत. त्याला प्रतित्युत्तर दिलं जात नाही. भारतीय उपखंडातल्या द्विराष्ट्रवाद सिद्धांताचा इतिहास अभ्यासल्याविना आपल्या राजकीय सोयीसाठी कुणी काहीही बरळत असतं., पण इतिहासाचा धांडोळा घेतला तर काय दिसतं? जिना यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीची मागणी करण्यापूर्वी, १९२४ मध्ये आर्य समाजाचे नेते लाला लजपत राय यांनी हिंदू आणि मुस्लीम यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र असावं म्हणून एक भौगोलिक रचना सुचवली होती. पण आज वस्तुस्थिती पाहिली तर लक्षांत येईल की, धर्माधारित फाळणी होऊनही पाकिस्तानच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आज त्याची स्थिती आणि तिथलं वातावरण कसं आहे हे आपण जाणतोच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना ‘पंतप्रधानपद मिळावं म्हणून हिंदुस्थानची फाळणी केली गेलीय,’ अशा अर्थाचं विधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहरूंचं नाव न घेता संसदेत केलं. पंतप्रधानपदावरील जबाबदार व्यक्तीनं हे विधान केलेलं असल्यानं ते सर्वांगानं तपासून घेणं आज आवश्यक ठरतं. मोदी यांचं ते विधान दोघांनाच लागू होतं. एक ‘पाकिस्तान’कर्ते बॅरिस्टर महंमद अली जिना आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू! या दोघांपैकी मोदी आणि त्यांच्या पक्षाला अधिक घृणा कुणाविषयी आहे हे सर्वश्रुत आहे. ते वारंवार नेहरूंनी पंतप्रधानपद मिळावं यासाठी देशाची फाळणी केली, असा आरोप नेहरूंवर करत असतात. मोदी संसदेत बोलताना नेहरूंनाच लक्ष्य बनवलं होतं. केलेल्या त्या वक्तव्याबाबत असलेलं वास्तव, इतिहास, तत्कालीन परिस्थिती आणि तो तपासण्यासाठी किमान तर्कसंगता या आधारे पाहिलं गेलं तर यातील असत्य आणि तर्कदुष्टता समजून घेणं आपल्याला लक्षात येईल. भाजपेयींशिवाय इतरांच्यासाठी या इतिहासाची उजळणी आवश्यक ठरतं. पण भाजपेयींच्या आजवरच्या मानसिकतेत, धोरणात, नेत्यांच्या सततच्या वक्तव्यात जे आढळतं त्यावरून त्यांचा 'नेहरुद्वेष' प्रगट होताना दिसतं.

*सर सय्यद अहमद खान यांच्यासह अनेकांची मागणी*
देशाची फाळणी वा विभाजनाच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी हिंदुस्थान अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विराष्ट्रवाद सिद्धांताच्या मुळाशी जावं लागेल. याचं कारण आपल्याकडं आजवर लोकांमध्ये सर्रासपणे करून देण्यात आलेला समज आणि बहुसंख्यांकांना आनंदानं करून घ्यायला आवडणारा समज म्हणजे, 'देशाची फाळणी व्हावी ही केवळ महमंद अली जिना वा अन्य मुसलमान राजकारण्यांची असलेली इच्छाच होती!' हा समज करून दिला असला तरी कागदोपत्री उपलब्ध असलेला इतिहास हे काही वेगळंच दर्शवतो. हिंदुस्थानात मुस्लीम लीग, महमंद अली जिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा वि. दा. सावरकर यांच्याही किती तरी आधी 'हिंदूंसाठी स्वतंत्र राष्ट्रा'ची गरज असल्याचा मुद्दा मांडला गेला होता. या द्विराष्ट्रवादाची चर्चा एकोणिसाव्या शतकात सुरू करणाऱ्यांमध्ये जसे सर सय्यद अहमद खान होते, तसंच काही मान्यवर बंगाली हिंदूही होते. सर्वश्री राजनारायण बासू आणि नबगोपाल मित्रा यांनीही तशी मांडणी केली होती. बासू हे ख्यातकीर्त आध्यात्मिक गुरू अरविंद घोष यांचे आजोबा. विसावं शतकापूर्वी, म्हणजे मुस्लीम लीगची स्थापना, त्याला प्रत्युत्तर म्हणून निर्माण झालेली हिंदू महासभा हे पक्ष अस्तित्वात नसताना, बासू यांनी या संदर्भात 'हिंदू-मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र' याबाबतची मांडणी केली होती. स्थानिक हिंदूंमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीला लागावी यासाठी एका संस्थेची स्थापनाही त्यांनी केली. हिंदू धर्मातील जातीची उतरंड मान्य केली तरीही यात त्यांना जातिव्यवस्थेचा अभिमानच होता, हा धर्म ख्रिश्चन वा इस्लाम यापेक्षा श्रेष्ठ ठरतो, या प्रतिपादनार्थ ते काम करत. 'अखिल भारतीय हिंदू संघटना' स्थापन करण्याचं सूतोवाच हे ही सर्वप्रथम त्यांचंच! अशा संघटनेच्या मदतीनं ‘आर्याची सत्ता’ स्थापन करता येईल असं ते मानत. नबगोपाल मित्रा यांनी एक पाऊल पुढं जात वार्षिक हिंदू मेळे सुरू केले. ‘हिंदू हे स्वतंत्र राष्ट्र’ ही त्यांची धारणा होती. बंगालातील या हिंदू जागृतीनंतरच्या काळात उत्तरेत आर्य समाजींनी ही मागणी रेटल्याचं आढळून येतं. या समाजाचे भाई परमानंद हे गदर पक्ष आणि नंतर हिंदू महासभा या दोन्ही पक्षाशी संबंधित होते. इस्लाम आणि हिंदू धर्माचे अनुयायी या दोन स्वतंत्र राष्ट्रकल्पना आहेत, अशी थेट मांडणी त्यांनी केली! इतकंच नव्हे, तर काही प्रांतांतून हिंदू आणि मुसलमान यांची अदलाबदल केली जावी असेही त्यांचे प्रयत्न होते आणि त्यासाठी ते प्रक्षोभक आणि भडक प्रचार करीत असत. आफ्रिकेत जाऊन त्यांनी महात्मा होण्यापूर्वीच्या मोहनदास करमचंद गांधींच्या कार्याशी स्वत:ला जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर लाला लजपत राय यांच्याशीही ते संबंधित होते. हे इथं महत्वाचं नोंदवायला हवंय. हिंदू-मुसलमान संदर्भातील त्यांची बदलत गेलेली आणि हट्टाग्राही ठरणारी मतं त्यांच्या आत्मचरित्रातून समजून घेता येतील.

*केवळ सावरकरांना जबाबदार धरणं चुकीचं*
केवळ बासू वा मित्रा यांचाच नव्हे तर लाला लजपत राय यांचीही वाटचाल पुढं त्याच दिशेनं झालयाचा इतिहास आहे. त्यापूर्वी गदर पक्षाचे लाला हरदयाल यांना तर हिंदुराष्ट्रनिर्मिती इतकंच अफगाणिस्तानचंदेखील हिंदूकरण व्हावं असं वाटत होतं. भारत-पाकिस्तान यांच्यातील फाळणीची मागणी जिना आणि मुस्लीम लीग यांच्याकडून झाली ती १९३९ साली! तथापि त्याआधी किमान १५ वर्षे, म्हणजे १९२४ दरम्यान, लाला लजपत राय यांनी मुसलमानांसाठी वायव्य प्रांत, पश्चिम पंजाब, सिंध आणि पूर्व बंगाल अशा प्रकारची स्वतंत्र भौगोलिक रचना सुचवली होती आणि देशाच्या अन्य प्रांतांतही बहुसंख्य मुसलमान जिथं असतील तिथं त्यांच्यासाठी ‘अशा प्रकारची’ रचना केली जावी असा त्यांचा विचित्र प्रस्ताव होता. त्याच आसपास डॉ. बी. एस. मुंजे या मूळ काँग्रेसी आणि नंतर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित नेत्यानं ‘इंग्लंड ज्याप्रमाणे इंग्लिशांचं, फ्रान्स जसा फ्रेंचांचा, जर्मनी जर्मनांचा तद्वत हिंदुस्थान हा हिंदूंचा’ असं म्हणत हिंदू राष्ट्रवादाचाच पुरस्कार केला होता. त्यानंतर सावरकर यांनी ‘हिंदू महासभे’च्या १९३७ साली अहमदाबाद इथं भरलेल्या अधिवेशनात भारतात ‘हिंदूू आणि मुसलमान’ अशी दोन राष्ट्रे आहेत, असं विधान केल्याची नोंद आहे आणि ‘समग्र सावरकर’ ग्रंथात त्याचा तपशीलही आढळतो. अर्थात, या एका विधानामुळं सावरकर यांना संपूर्णपणे या वादात ओढणं अन्याय्य करणारं ठरेल. याचं कारण त्याच भाषणात त्यांनी पुढं भारताची एकता आणि अल्पसंख्याकांचं हितरक्षण आदींबाबतही भाष्य केलं. तथापि या सगळ्याचा मथितार्थ इतकाच की, मुस्लीम लीग, जिना यांनी उघडपणे पाकिस्तानची मागणी करण्याच्या किती तरी आधी हिंदुत्वाच्या भूमिकेतून द्विराष्ट्रवादाचं बीज भारतीयांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पुढे या हिंदुत्ववाद्यांच्या सुरात मुसलमान नेत्यांचा सूर मिसळला गेल्यानंतर त्या मागणीला जोर चढला आणि ‘फोडा आणि झोडा’ या नीतीनं राजकारण करणाऱ्या ब्रिटिशांनी त्या आगीत तेल ओतलं.

*क्षुद्र राजकारणासाठी हे टाळायला हवं!*
हिंदू आणि मुस्लिमांतील द्विराष्ट्रवादाचे अतिरेकी समर्थक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं विवेचन जिज्ञासूंनी अभ्यासलं तर दिसून येईल की, पंतप्रधानपद मिळावं यासाठी फाळणीचा घाट घातला गेला, हे विधान किती सत्यापलाप करणारं आणि हास्यास्पद होतं. असं म्हणण्याचं आणखी दोन कारणं आहेत. एक म्हणजे नेहरू आणि भारताचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यातील परस्पर संबंध. ते किती ‘मधुर’ होते या गॉसिपात कोणास रस आहे, हे सर्वच जाणतात. तेव्हा हे संबंध लक्षात घेतलं, तर पंतप्रधानपदावर नेहरू हेच विराजमान व्हावेत यासाठी माऊंटबॅटन यांनी तसेही प्रयत्न केले असते. त्यांचा अधिकार आणि लंडनात राणीच्या दरबारातील त्याचं असलेलं वजन लक्षात घेता ते निश्चितच यशस्वी ठरले असते. म्हणजे फाळणी झाली नसती तरीही नेहरूच प्रधानमंत्रीपदी येणं हे निश्चित होतं. तेव्हा त्यासाठी त्यांना फाळणीची अजिबात गरज नव्हती आणि दुसरा मुद्दा असा की, समजा नेहरू यांनी देश दुभंगावा, त्याची फाळणी व्हावी यासाठी प्रयत्न केला असं मानलं, तर प्रश्न असा उपस्थित होतो की, त्यांना न रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना सामर्थ्यशाली नव्हत्या का? हिंदू महासभेची स्थापना १९१५ सालची आणि त्यातून बाहेर पडून डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला १९२५ साली. म्हणजे या संघटना ४२ च्या लढ्याच्या वेळी २७ आणि १७ वर्षांच्या होत्या. म्हणजे त्या संस्था ऐन तारुण्यात होत्या. तेव्हा त्यांनी नेहरूंचे उद्योग रोखण्यासाठी का काही केलं नाही! हा इतिहास समजून घेतलं पाहिजे, कारण धर्माधिष्ठित देशनिर्मितीचं अपयश लक्षात यावे म्हणून तरी हे समजावून घेतले पाहिजे. धर्माच्या आधारे निर्माण झालेला पाकिस्तान नंतर दुभंगला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तोही इस्लामीच. पण एकत्र राहू शकला नाही. १९१९ साली फुटलेल्या ऑटोमान साम्राज्यातून अनेक देश निर्माण झाले, पण धर्म त्यांना एकत्र ठेवू शकला नाही. आजच्या पश्चिम आशियाची अवस्था लक्षात घेतल्यास हे सत्य स्पष्ट व्हावं. इतकंच काय, हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरच स्थापन झालेल्या हिंदू महासभा आणि नंतर रा. स्व. संघ या संघटनादेखील एकमतानं राहू शकल्या नाहीत. तेव्हा या इतिहासापासून काही तरी बोध घेत भाजपेयींनी फसळणीचा विषय पुन्हा नव्याने उकरून काढू नये. त्यातून भविष्यातील फुटीची बीजे रोवली जाण्याचा धोका आहे हे वेगळंच. क्षुद्र राजकारणासाठी तो तरी टाळायला हवा. पण आजकालच्या राज्यकर्त्यांना समजावून सांगणार कोण? त्यांच्याकडून सतत नेहरूद्वेष व्यक्त होत असतो. प्रधानमंत्री, गृहमंत्री यासारख्या नेत्यांची ही मुक्ताफळं ऐकल्यावर भक्तांना तर ऊत येतो. सोशलमीडियावर तर अशा भक्तांनी उच्छाद मांडलाय! त्याला नस शेंडा ना बुडखा!

हरीश केंची
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...