Monday 17 February 2020

काँग्रेसचा आत्मघात...!

"काँग्रेसनं केवळ भाजपेयींना सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाराष्ट्रात घेतलेली पडती बाजू, झारखंडमध्ये बजावलेली छोट्या भावाची भूमिका, दिल्लीत ‘आप’ला केलेली अप्रत्यक्ष मदत या माध्यमातून पक्षानं स्वत:च्याच हातानं नुकसान करून घेतलंय. आगामीकाळात निवडणुका होणाऱ्या बिहार, बंगाल, तामिळनाडू राज्यांमध्येही अशीच परिस्थिती कायम राहू शकते. अशानं पक्षाची वाढ होण्याऐवजी उलट्या दिशेनं प्रवास सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता विविध तडजोडी, समझोते केलेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयोग सध्या यशस्वी होत असला तरी त्यातून काँग्रेस पक्ष वाढत नाही; ही वस्तुस्थिती आहे. उलट काँग्रेस पक्षाचं अधिक नुकसान होतंय. याकडं मात्र पक्षाची धुरा वाहणाऱ्याकडून सोयीस्कर दुर्लक्ष होतंय!"
_____________________________________

*तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं।*
*गर किसी औरको चाहोगी तो मुश्किल होगी ll*


स्व. मुकेश यांनी गायलेलं हे हिंदी चित्रपटातलं गीत काँग्रेसची आजची अवस्था स्पष्ट करणारं आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला तिसऱ्यांदा सत्ता लाभलीय. सत्तेचा दावा सांगणाऱ्या भाजपेयींचा पुन्हा एकदा दारुण पराभव झालाय. सतत २२ वर्षं भाजपेयीं सत्तेपासून वंचित आहे. आता आणखी पांच वर्षे त्यांना सत्ताहीन राहावं लागणार आहे. काँग्रेसचा तर सुपडा साफ झालाय. सतत १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसला अत्यंत अपमानास्पद स्थितीत लोकांसमोर जावं लागलेलं आहे. आपण भाजपेयींना सत्तेपासून रोखतो आहोत याचंच त्यांना कौतुक. पण पक्ष दिवसेंदिवस अधोगतीला चाललाय याकडं लक्षच नाही. पक्षाचं नेतृत्व कुचकामी ठरलंय. नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं आत्मबळ नाहीसं झालंय. पराभवाच्या गर्तेत आणि पराभूत मानसिकतेत पक्ष हरवून गेलाय. पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी केवळ चिंतन करण्याची गरज नाही तर, प्रत्यक्ष कृती करण्याची गरज निर्माण झालीय. भाजपेयींना सत्तेपासून रोखण्यासाठी प्रसंगी घेतला जाणारा कमीपणा हे पक्षाच्या अस्तित्वाला आव्हान देणारा ठरतोय. देशावर एकहाती अंमल गाजविणाऱ्या पक्षाची ही दयनीय अवस्था केवळ पक्षासाठीच नाही तर देशासाठीही घातक ठरणारी आहे. भाजपेयींना रोखण्यासाठी प्रचारातून माघार घेत आम आदमी पक्षाला केलेली मदत ही राजकीय परिपक्वता की आत्मघातकीपणा? शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या नेत्यांना सुनावलेले खडे बोल हेच स्पष्ट करतं की, पक्षनेतृत्व पक्ष सावरण्याऐवजी तो रसातळाला कसा जाईल असंच वागते आहे!

*केवळ भाजपेयींना रोखण्यासाठी हा आत्मघात*
काँग्रेसनं केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाराष्ट्रात घेतलेली पडती बाजू, झारखंडमध्ये छोट्या भावाची भूमिका, दिल्लीत ‘आप’ला अप्रत्यक्ष मदत या माध्यमातून पक्षानं स्वत:च्या हातानं नुकसान करून घेतलंय. बिहारमध्येही अशीच परिस्थिती कायम राहू शकते. अशानं पक्षाची वाढ होण्याऐवजी उलट्या दिशेनं प्रवास सुरू झाल्याचं चित्र दिसतं. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता विविध तडजोडी, समझोते केले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयोग सध्या यशस्वी होत असला तरी त्यातून काँग्रेस पक्ष वाढत नाही; ही वस्तुस्थिती आहे. उलट काँग्रेस पक्षाचं अधिक नुकसान होतंय. याकडं मात्र पक्षाची धुरा वाहणाऱ्याकडून सोयीस्कर दुर्लक्ष होतंय. नुकत्याच झालेल्या राजधानी दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ पाच टक्केही मते मिळू शकली नाहीत, शिवाय ७० पैकी ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालीय. हा खरंतर धोक्याचा इशारा मानला जातोय. दिल्लीत मुस्लीम समाजानं एकगठ्ठा मतं आम आदमी पार्टीला दिलीत. देशातला अल्पसंख्याक समाज भायपेयींवर नाराज असून, काँग्रेसऐवजी इतर कोणताही पर्याय उपलब्ध झाल्यास त्या पक्षाला अल्पसंख्यांक समाजाचं मतदान होतंय, हे लोकसभा निवडणुकीतही बघायला मिळालं होतं. यासाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पक्ष, आंध्र प्रदेशात तेलुगू देसम आणि वायएसआर काँग्रेस, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती ही उदाहरणे दिली जातात. महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं काँग्रेसला मागं टाकलंय. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चापुढंही काँग्रेसला नमतं घ्यावं लागलंय. बिहारमध्येही काँग्रेसची अवस्था बिकटच मानली जातेय. पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत आहेच. तिथं तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक यांचं वर्चस्व आहे. काँग्रेसला तिथं स्थानच नाहीये! २०१४ नंतर सुरू झालेला, पाठीशी लागलेला पराभव पिच्छा सोडत नाहीये. पराभवांच्या मालिकेमधून काँग्रेस पक्ष अद्यापही सावरलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या एकाच मुद्द्यावर पक्ष साऱ्याच राज्यांमध्ये नमती भूमिका घेत असल्याचं दिसून आलंय. यातून आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळणार कसं? असा प्रश्न पक्षातले दुसऱ्या फळीतले नेते खासगीत करू लागले आहेत.

*जनाधार नसलेल्या नेतेमंडळींचा पक्षाला विळखा*
प्रत्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. त्यासाठी राजकीयदृष्ट्या व्यवहारचातुर्य हवंय जे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडं होतं. त्यांनी पक्षाची आणि सत्तेची सूत्रं हाती येताच आपल्या जुन्या सहकाऱ्यांना दूर सारलं. इंदिराजींनी तर जुन्या खोंडांना जाणीवपूर्वक हटवलं. पण राजीवजी त्याच इंदिराजींच्या सहकाऱ्यांवर विसंबून राहिले, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच नेत्यांची सोनियाजींना साथ घेतली. या नेत्यांनी अनेकदा सोनियांना अडचणीत आणलं होतं. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षहिताऐवजी सत्तेसाठी हपापलेल्या राजीवजींच्या काळातील नेत्यांना दूर सारणं गरजेचं होतं आणि आपल्या समवयस्क, तरुण, नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, मिलिंद देवरा यासारख्या तरुणांना सोबत घ्यायला हवं होतं. पण ते झालं नाही, कदाचित या तरुण नेत्यांच्या सक्षम नेतृत्वक्षमतेची राहुलना भीती वाटली असावी. त्यामुळं त्यांना देशाच्या राजकारणातून दूर करून राज्याच्या राजकारणापुरतच सीमित केलं. त्याचा परिणाम काँग्रेसच्या अधोगतीत झालाय. हे नाकारता येणार नाही. नेतृत्वाकडून असं घडलं असलं तरी, आजही जनाधार नसलेली, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसलेली किंबहुना कार्यकर्त्यांचं पाठबळ नसलेली मणिशंकर अय्यर, चिदंबरम, सॅम पिट्रोडा यासारख्या वाचाळ नेतेमंडळींनी पक्षाला घेरलंय. तेच पक्षाला रसातळाला घेऊन जाताहेत! अशी भावना कार्यकर्त्यांची झालीय.

*पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जातोय*
राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखलं होतं. नंतर काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरतं घायाळ केलं होतं. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढं त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथं यश मिळवलं होतं. दरम्यानच्या काळात कर्नाटकात जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटकमधली काँग्रेस सैरभैर झाली आणि ते राज्य हातातून गेलं. लोकसभा निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केलं, पण त्या मोहिमेत पक्षातले बरेचशे ज्येष्ठ नेते अलिप्त होते, त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच! काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीचं चिंतेची बाब आहे आणि हे दिसूनही येतेय. दुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा आणि ३७० कलम रद्द करण्याचा कायदा असे एकापाठोपाठ एक कायदे संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही कि, त्यांनी या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचं सत्तेला जाब विचारण्याचं हक्क कसं नाकारलं जातंय, त्याची साधी सोप्या भाषेत माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढं मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असं वाटत होतं पण तसं घडताना दिसत नाही. राहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत आणि तसं मिशन प्रत्येकानं हाती घ्यायला हवं असं आपल्या अध्यक्षीय भाषणात सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताना म्हटलं होतं. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारीच केलीय. हे नेते लोकांपासून दूर राहिलेत. मतदारांशी संवाद ठेवला नाहीये. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिलेलं नाहीये. आता त्यापुढं जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडंही आकृष्ट होऊ लागलेत.

*काँग्रेसमध्ये पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय*
अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालीय? साहजिकच, १९८९ मध्ये उत्तर प्रदेशात आणि १९९० दरम्यान बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून काँग्रेसचं या राज्यांतील अस्तित्व मुख्य विरोधीपक्ष म्हणून सुद्धा उरलेलं नाही. काँग्रेसनं २० व्या शतकातच आपली पत गमावली होती. एकंदरीत १९६७ पासून काँग्रेस पक्षाचा सातत्यानं ऱ्हास होतोय, जी प्रक्रिया थांबवणं कुणाही नेत्याला शक्य झालेलं नाही. काँग्रेसची देशाला आवश्यकता आहे की नाही, किंवा काँग्रेस संपायला हवी की नाही हे वादाचे मुद्दे असू शकतात. मात्र, काँग्रेसच्या ऱ्हासातील सातत्य कुणी नाकारू शकत नाही. ज्यांना काँग्रेस संपावी असं वाटतं, त्यांनी फार काही करायची गरज नाही, कारण काँग्रेसचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झालाय. ज्यांना काँग्रेस संपू नये असं वाटतं त्यांनी मात्र काँग्रेस राज्या-राज्यांत पुन्हा कशी रुजेल याची सविस्तर चर्चा आणि विस्तारीत कृती करण्याची आवश्यकता आहे. याबाबतीत काही ठळक मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. आमदारांना भाजप आमिष दाखवत आहे, असे म्हणून उपयोगाचे नाही. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती  निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. अशीच स्थिती राहिली तर उद्या काँग्रेसची स्थिती कम्युनिस्ट किंवा शेकापसारखी होईल. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते, नेते आहेत. याखेरीज करोडो तरुण आपल्याला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या, नायकाच्या प्रतीक्षेत आहेत देशासमोरचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी व्यक्तिस्तोम न माजवणारा नेता त्याच्याबरोबर निरपेक्षपणे काम करणारे अगणित कार्यकर्ते असलेला पक्ष लोकांना हवाय. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातील विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी-शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. देशातील सर्वात जुना पक्ष सर्वात 'जुनाट' पक्ष बनता कामा नये. या देशाला काँग्रेस विचारांची गरज आहे. पण सत्तेच्या आधाराविना जनतेसाठी काम करण्याची सवय काँग्रेसनं लावून घेतली, तरच त्याला भवितव्य आहे. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय पण तसं होताना दिसत नाही. पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल!

*काँग्रेसजन हतोत्साही बनले आहेत*
देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, नेहरू-गांधीजींची कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढे आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना त्याबाबत मौन पाळलं जातंय. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. त्या नेत्यांचं स्मरण, जागरण होतच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलं. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढे ठेवण्याची गरज असताना मात्र काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतेय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडे डोळेझाक करीत इतरेजनांसारखे बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतं आहे. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपेयींनी त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना? अशी स्थिती त्यांची झालीय!

*शिवसेना समर्थ पर्याय ठरू शकते, पण...!*
आपचा विजय हा केवळ कामाचाच नव्हे तर, केलेल्या संयत प्रचाराचाही आहे. याचा बोध महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनीही घ्यायला हवाय. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारवंत आणि चळवळी उभारणाऱ्या नेतृत्वाचा समजला जातो. सुरुवातीची काही वर्षे काँग्रेसनं 'सर्वधर्मसमभाव' या विचारावर आधारित राज्य केलं त्यामुळं ती राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरली. त्यावेळी मध्यमवर्गीय काँग्रेसबरोबर होता; पण कालौघात काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव हा अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करणारा आहे असा समज मध्यमवर्गीयांमध्ये दृढ होत गेला. तो दूर करण्याचा प्रयत्न नेतृत्वानं केला नाही. 'आपल्याला पर्यायच नाही' अशा भ्रमात नेतृत्व राहिल्यानं पक्ष सामान्यांपासून दूर दूर जाऊ लागला. त्यानं मग भाजपचा पर्याय शोधला. भाजपचं नेतृत्वही 'अर्ध्या हळकुंडानं पिवळं' झालं. त्यांचं आक्रस्ताळी हिंदुत्व, तसंच स्थानिक निवडणुकातही नागरी प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर नको इतकं आक्रमक होत प्रचाराची हीन पातळी गाठली त्यामुळं मतदारांनी नाकारलं. काँग्रेसचं नेतृत्व हरवून गेलंय. त्यानं ना महाराष्ट्रात हिरीरीने प्रचार केला ना दिल्लीत. एका राष्ट्रव्यापी पक्षाची ही वाताहत लोकशाहीच्या दृष्टीनं भयावह आहे. त्यामुळं महाराष्ट्रात तरी एक मोठी पोकळी निर्माण झालीय. सध्याचं तीन पायाचं सरकार काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून राज्याचं शकट हाकताना दिसतंय. निदान कुणी आचरटपणा करत बोलत नाहीये. काँग्रेसची सावली असलेल्या राष्ट्रवादीची भिस्त एकाच खांबावर तर काँग्रेस नेतृत्वहीन! अशावेळी शिवसेनेनं योग्य पावलं उचलली नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची भरभक्कम, मजबूत फळी उभारून सक्षमता दाखवली तर निदान महाराष्ट्रात तरी एक समर्थ पर्याय उभा राहू शकतो. आपचं अनुकरण त्यासाठी इथं महत्वाचं ठरतं!

हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...