Tuesday 21 January 2020

विचारभक्त की, विचारग्रस्त!

"एखाद्या राजकीय पक्षाचं यशापयशाचं मूल्यमापन हे त्यांनी मिळवलेल्या जागेवरच अवलंबून असतं. पण अमित शहा याकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतात. त्यांच्या मते, भाजप म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठीचे मशीन एव्हढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्यांची मनीषा 'पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत' आणि 'कच्छ पासून कोहिमापर्यंत नेण्याची आहे. भविष्यात काय होईल हे आताच काही सांगता येणार नाही. पण भाजपच्या स्थापनेपासूनचा कालावधी हा 'भारतीय राजकारणात वैचारिक संघर्षाच्या प्रवासाचा एक समृद्ध इतिहासाचा साक्षीदार बनलाय! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेला जनसंघ आणि त्याचं बदलतं रूप भारतीय जनता पक्ष यांच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...!"
-----------------------------------------------------

२५ सप्टेंबर १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झालीय. तेव्हापासून दर दोन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतातच होतात. जिल्ह्यास्तरावर, तालुकास्तरावर, त्याचप्रमाणे मंडल स्तरावर समित्या असतात त्यावर निवड आणि नेमणूक केली जाते. याशिवाय राज्यात पन्नासाहून अधिक पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. अशाप्रकारचे पूर्णवेळ कार्यकर्ते सर्वच राज्यात नाहीत. जिथं संघाचा कंट्रोल आहे, अशाच राज्यात पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांना या कामाचं आवश्यक तेवढंच मानधन देण्यात येतं. प्रदेशाच्या मागणीनुसार हे पूर्णवेळ कार्यकर्ते संघाकडून पुरविले जातात. बहुतेकांनी संघ प्रचारकाचं काम केलेलं असतं. राजकीय क्षेत्रात पाठवताना त्याची आवड लक्षात घेतली जाते. पक्षातर्फे जिथं पाठवलं जाईल तिथं जाणं अशी प्रमुख अपेक्षा या पूर्णवेळ कार्यकर्त्यांकडून असते. गुजरातेतील नरेंद्र मोदींना तडकाफडकी ओरिसात जावं लागलं होतं. महाराष्ट्रात असलेले रवींद्र भुसारी हे देखील संघातून आलेले भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्तेच आहेत. हे पूर्णवेळ कार्यकर्ते पक्ष प्रसारासाठी मेहनत घेत असतात. परंतु हे पूर्णवेळ कार्यकर्ते करीत असलेल्या खर्चावर आणि त्यांना हव्या असलेल्या साधनसुविधांवर काही कंट्रोल असायला नको का? आज प्रवासातला वेळ वाचविण्यासाठी कारची जरुरी नक्कीच आहे. पण त्या कारमध्ये थंडगार करणारा 'एसी' असण्याची गरज काय? भाजपमध्ये हळूहळू वाढीस लागलेल्या पंचतारांकित संस्कृतीबद्धलचा आक्षेप अनेकांच्या मनात खदखदत आहे. याची एव्हाना भाजप नेतृत्वानंही दखल घेतलीय. असं असलं तरी अन्य पक्षीयांच्या तुलनेत भाजपची संघटना शिस्त अजूनही उठून दिसते. या शिस्तीतूनच कै. वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात दीनदयाळजींचा वारसा चालवत बहुजन समाजातून नवे नेतृत्व तयार केले. यातूनच प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, महादेव शिवणकर, सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे,  नितिन गडकरी, एकनाथ खडसे आदि ग्रामीण भागातील कार्यकर्ते नेते म्हणून पुढे आले. यामुळेच पूर्वी भाजपवर भटजी-शेठजींचा पक्ष अशी जी टीका व्हायची आज तशी ती महाराष्ट्रात होत नाही.

*संन्यस्त व्यक्तीनं  संसारी व्हायचं ठरवलं*
भारतीय जनता पक्षाच्या झाडाला आज जी कांहीं फळं आली आहेत, ते रोपटं ७०ते ८० वर्षांपूर्वीचं जुनं आहे. मात्र त्या रोपट्याची बीजं 'सनातन' आहेत. तीच समरसता देठात आणि गरात बांधली आहे. या देशात पुन्हा धर्मशाही-राजेशाही रुजवण्याचा संघप्रणीत प्रयत्न हा मोठा इतिहास आहे. तथापि ३०-४० वर्षं मागे डोकावलं तरीही आजच्या भाजपच्या व्यंगाची कारणं पुढं येतात. १९८० मध्ये देशात इंदिरा गांधींची लाट होती. त्या लाटेत अनेक पक्ष वाहून गेले. भाजपही त्याला अपवाद नव्हता. पुढच्या म्हणजे १९८४ च्या निवडणुकीत भाजपचे दोनच खासदार निवडून आले. या पक्षाच्या विचारसरणीने संसदीय राजकारणात स्वतःचं स्थान पूर्वीच नोंदवलं असलं तरी, सत्तेचा खरा नफा त्यांना १९७८ मध्येच लक्षांत आला. तेव्हाच या  पक्षानं आणि त्यांच्या पाठीराख्यांनी या देशाचे सत्ताधीश होण्यासाठीचा संकल्प अधिक वेगानं राबवायला सुरुवात केली. खरा संन्यासी आपलं संन्यस्तव्रत १०० टक्के पाळू शकतो. मात्र संन्यस्त व्यक्तीनं  संसारी व्हायचं ठरवलं की, संसारातल्या षडरिपुपासून तो वेगळा राहू शकत नाही. संसारी माणसाचा आहार, भय, निद्रा, मैथुन यांचा समतोल टिकून राहतोच, असं नाही. भाजपच्या व्यक्तिमत्वाचंही तसंच झालं. एकेकाळी विचारभक्त वाटणारा हा पक्ष विकारग्रस्त झाला आहे, तो त्यामुळंच!

*संसदीय राजकारण: पैसा कमविण्याचं साधन*
नैसर्गिक शास्त्रांच्या कक्षेतील कोणत्याही सजीवाला भूक
टाळता आलेली नाही. असे सजीवच सामाजिक शास्त्रात बसणाऱ्या संघटनांचे मूळ घटक असतात. भाजपसारख्या पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते पैशाची भूक टाळू शकलेले नाहीत. पैशाशिवाय पक्ष वाढणारच नाही, हा सिद्धांत काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये अधिक वेगानं वाढला. त्यामुळंच संसदीय राजकारणात हा पैसा कमवण्याचा अधिक वेगवान मार्ग भाजपेयींना वाटला. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याचा प्रकार जाहीरपणे चर्चिला गेला होता. त्यात फसलेले सर्वाधिक खासदार भाजपचेच होते. ही पद्धत रुजवण्यातला एक महत्वाचा भागीदार म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं. हा धंदा महाराष्ट्र भाजपला नवा नाही. या पक्षाच्या अनेक आमदारांचा तो चरितार्थाचा भाग होता आणि असेलही. स्थगनप्रस्ताव, लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि प्रश्न यांचे दर ठरलेले होते. या संबंधात महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे खात्यातील निवृत्त कार्यकारी अभियंत्यांच्या आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा अनुभव दांडगा आहे. पुढं राज्य आणि केंद्रात प्रश्न विचारणारे उत्तर देण्याच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत गेले. पूर्वी उत्तर देणारे प्रश्न विचारणारे विसरून गेले. जेव्हा जी नोटांची छपाई झाली, तेवढा अर्थव्यवहार पूर्वी कधीच झाला नव्हता. तरीही भूक भागली नाही. केंद्र-राज्यातील सत्ता गेल्यावर पुन्हा भुकेनं आपला मोर्चा जुन्या व्यवसायाकडे वळवला होता.

*भाजपेयी आणि काँग्रेसी यांच्यात साधर्म्य*
मूळची भूक आणि अतिरिक्त भूक भागल्यानंतर ग्रहण केलेला पदार्थ पचवण्याची क्षमता आणि मार्ग नैसर्गिक आहेत. कष्टकरी वर्ग खाल्लेलं पचवण्यासाठी पुन्हा मेहनतीचं काम करतो. ते पचल्यानंतर विश्रांती घेतो. भाजप-काँग्रेस सारख्या पक्षांची प्रकृती थोडीशी ऐदी असल्यानं त्यांना भरपेट खाऊन लगेचच विश्रांतीची संवय असते. शिवाय या पक्षात असं भरपेट खाणाऱ्यांनाच अधिक प्रतिष्ठा असते. इथं खाण्याचा पदार्थ पैसा असतो. यात दोन्ही पक्षाचं साधर्म्य आहे. 'पैसा परमेश्वरापेक्षा मोठा असतो' हे भाजप नेते जुदेव यांचे शब्द पक्षाचं व्यवहाराचं तत्वज्ञान बनतं. असं खा खा खाऊन आलेल्या झोपेमुळे सामाजिक आणि राजकीय प्रश्नांबाबत हे दोन्ही पक्ष चरबी आलेल्या प्राण्यांसारखे वागतात. भाजपला सामूहिक निद्रा आली ती त्यामुळेच. या पक्षाच्या मानसिकतेत स्वतःच्या अस्तित्वाचं भय आहे. ज्याच्या मनात असं भय असतं, तो दुसऱ्याविषयी भय निर्माण करतो. संघ परिवार किंवा भाजपनं असंच दुसऱ्यांविषयी भय निर्माण करून आपला विस्तार केलाय. नरेंद्र मोदी हे त्यातलं सर्वात मोठं उदाहरण आहे. आहार, निद्रा, भयमुक्त असा स्वस्थ प्राणी त्यानंतर आपल्या प्रकृतीतील विकारांना जोपासत असतो. ते विकार अनेक प्रकारचे असतात. त्याच विकारांचा आविष्कार कधी चर्चेत येतो.

*भाजपचे दुर्योधन नंगे झाले..!*
भाजपच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पसारा वाढला. असलं तंत्रज्ञान स्वस्त झाल्यानं मध्यमवर्ग खुश झाला. जागतिकीकरणामुळे ती बाब थांबविता येण्यासारखी नव्हतीही. मात्र माध्यमतज्ञांनी ज्याचं वर्गीकरण हॉट केलं आहे. त्या दृकश्राव्य कॅमेतयामुळे भाजपच्या ११ खासदारांना प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात आणि खासदार निधीची टक्केवारी मागताना कॅमेऱ्यात पकडलं. ज्याला माध्यमक्राती म्हटलं गेलं ती भाजपच्या अर्थानं प्रतिक्रांती झाली. ज्यांना सबसे तेज म्हणून गौरवलं, आपली छबी आणि छब्या सतत झळकत ठेवल्या, त्या आजतकने भाजपच्याच सर्वाधिक दुर्योधनांना नंगं केलं. केंद्रात सत्ता असताना ज्या स्टार समूहासाठी भाजपच्या परवानगीच्या पेनमध्ये जास्त शाई भरली.

 *जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष*
भाजप हा आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. हा भाजपच्या पारंपारिक विकासाबरोबरच पिढी दरपिढी झालेल्या बदलाचा हा एक परिणाम आहे. अटलबिहारी-लालकृष्ण अडवाणी यांच्याही पेक्षा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा कार्यकाळ हा आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ काळ म्हणायला हवाय. या कालावधीला ' भाजपचा सुवर्णकाळ' म्हणायला हरकत नाही. पण अमित शहा असं म्हणायला तयार नाहीत. अनेक वक्तव्यातून आणू पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीतून ततानी स्पष्ट केलं की, भाजपचा सुवर्णकाळ येणं अद्यापी बाकी आहे. एखाद्या राजकीय पक्षाचं यशापयशाचं मूल्यमापन हे त्यांनी मिळवलेल्या जागेवरच अवलंबून असतं. पण अमित शहा याकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतात. त्यांच्या मते, भाजप म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठीचे मशीन एव्हढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्यांची मनीषा 'पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत' आणि 'कच्छ पासून कोहिमापर्यंत नेण्याची आहे. भविष्यात काय होईल हे आताच काही सांगता येणार नाही. पण भाजपच्या स्थापनेपासूनचा कालावधी हा 'भारतीय राजकारणात वैचारिक संघर्षाच्या प्रवासाचा एक समृद्ध इतिहासाचा साक्षीदार बनलाय! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेला जनसंघ आणि त्याचं बदलतं रूप !

*- हरीश केंची*
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...