Wednesday 15 January 2020

सत्यशोधकी विचाराचे अनुयायी

महाराष्ट्रातलं सरकार पूर्ण रूपानं अस्तित्वात आलंय. 'देर आये दुरुस्त आये' असंच म्हणावं लागेल.काँग्रेस पक्षाला भाजपेयींनी आणि संघ परिवारानं बहुसंख्य हिंदू मतदारात आपली हिंदूविरोधी केलेली प्रतिमा पुसून टाकण्याची संधी या निमित्ताने या काँग्रेसकडं आपणहून आलीय. ती ही अशावेळी ज्यावेळेस ३७० कलम व राममंदिर प्रश्नावर देशभरात भाजप जल्लोष करतेय. या प्रश्नाच्या समस्येसाठी भाजप काँग्रेसला जबाबदार धरत आलाय. यामुळे या सरकारला काँग्रेस सत्तेतही सहभागी होतेय. राज्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाथीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर साहजिकच शिवसेनेच्या आणि त्यांच्या ज्वलंत हिंदुत्वाबद्धल सोशलमीडियावर खूप टीका झाली. त्यावर त्यांनी 'आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही!' हे स्पष्ट केलं आणि आपल्या साथीनं काँग्रेसीदेखील मवाळ हिंदुत्ववादी आहे हे ही दाखवून दिलंय.
-–––----------------------------------------


आज महाराष्ट्राच्य सत्तेच्या चौकोनातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हा त्रिकोण एकत्र येतोय. गेली ३० वर्षे या सत्तासंघर्षात चौकोनाच्या शिवसेना-भाजप विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असे दोन कोन एकत्र येऊन होत असलेला राजकीय संघर्ष आता नव्या प्रयोगात समोर येतोय. हा सत्तेचा नवीन प्रयोग मुख्यत्वे आपल्या सर्वापेक्षा प्रबळ भासत असलेल्या भाजपेयींच्या विरुद्धचा आहे. भाजप या सत्तासंघर्षात प्रबळ होण्यामागे या पक्षाकडं २०१४ पासून असलेली सत्ता हे आहे. या सत्तेचा वापर करून भाजपनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम केलं होतं. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना भाजपनं साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व तंत्राचा वापर केला. आपल्याकडं असणाऱ्या निरंकुश सत्तेचा वापर करतानाच आपला सहकारी युतीतील सत्ताधारी पक्ष कसा कायम दुय्यम भूमिकेत राहील आणि तो आपण घेतलेल्या निर्णयांना केवळ कोणताही विरोध न करता मूकसंमती देत राहील याच भूमिकेतून शिवसेनेची राजकीय ताकत मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाखालील सत्तेने केला. शिवसेनेने सुद्धा सत्तेत सहभागी होताना सरकारवर सातत्यानं टीका केली आणि वेळोवेळी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करून आपलं वेगळेपण अत्यंत कौशल्यानं टिकवून ठेवलं. आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत, भाजपला शिवसेनेनं कोंडीत पकडलं. आपल्या पाच वर्षे झालेल्या अवहेलनेचा बदला घेताना, गेली १० वर्षे युतीत कुरघोडी करून आपणाला दुय्यम स्थानावर ढकलत प्रभावी झालेल्या भाजपला आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी हातमिळवणी करीत शिवसेनेनं थेट सत्तेवर दावा केलाय. भाजपनं आपल्या आक्रमक राजकीय शैलीनं सर्वच प्रतिस्पर्धी आणि सहकारी शिवसेना यांच्या अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या या आक्रमक शैलीमुळंच आपलं आपापसातले मतभेद मिटवून एकत्र येण्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांना भाग पाडलंय.

*भाजपचं वाढलेलं बळ कमी करण्याचा प्रयत्न*
आजच्या या सत्तास्थापनेच्या खेळात शरद पवार यांचं असाधारण योगदान दिसून येतं. बऱ्याच राजकीय निरीक्षकांना आलेलं सरकार स्थिर असेल का असं वाटत असलं तरी प्रबळ प्रतिस्पर्ध्याच्या भीतीनं या तिन्ही शक्ती जोपर्यंत भाजपची ताकत निर्णायकपणे कमी होणार नाही तोपर्यंत एकत्र राहण्याचीच शक्यता आहे. एकत्र आलेल्या तीनही शक्ती भाजपचं वाढलेलं राज्यातलं बळ कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. या राजकीय त्रिकोणाच्या एकत्र येण्याचा राष्ट्रीय स्तरावरील लाभ काँग्रेसला होईल तर राज्य पातळीवर कमीअधिक प्रमाणात तीनही पक्षांना होईल. भाजप आणि पारंपरिक राजकीय अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना हे राजकीय एकत्रीकरण वैचारिक स्तरावर न टिकणारं वाटत असलं तरी शिवसेनेनं आपले परतीचे दोर कापून टाकत धाडसानं नवा पर्याय स्वीकारलाय. यामुळं या वैचारिक मतभेदाचे मुद्दे तीनही राजकीय पक्षांनी निश्चितच गृहीतच धरलं असणार आहेत. या मतभेदांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी आणि आपापल्या जाहीरनाम्यातील तरतुदी बाजूला सारत ‘किमान समान कार्यक्रम’ हे पक्ष बनवतील आणि त्यातून स्वबळावर बहुमत नसल्यानं हे तिघे ‘किमान समान कार्यक्रम’ बनवून त्यातून सुटका करू शकतात. या राजकीय एकीकरणाच्या विरोधात जनमत जाईल असं सध्या तरी कुठं दिसत नाही. काँग्रेस पक्षाला भाजपेयींनी आणि संघ परिवारानं बहुसंख्य हिंदू मतदारात आपली हिंदूविरोधी केलेली प्रतिमा पुसून टाकण्याची संधी या निमित्ताने या काँग्रेसकडं आपणहून आलीय. ती ही अशावेळी ज्यावेळेस ३७० कलम व राममंदिर प्रश्नावर देशभरात भाजप जल्लोष करतेय. या प्रश्नाच्या समस्येसाठी भाजप काँग्रेसला जबाबदार धरत आलाय. यामुळे या सरकारला काँग्रेस सत्तेतही सहभागी होतेय. महाराष्ट्राच्या राजकीय स्वरूपाला कलाटणी देणारी ही घडामोड असून याचा राष्ट्रीय राजकारणात आपणाला त्रास होईल या शक्यतेनेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यात या प्रयोगकर्त्याना पुरेशी वेळ न देता राष्ट्रपती राजवट लावल्याचे स्पष्ट आहे.

*राष्ट्रवादी भाजपेयींसोबत जाऊ शकतो*
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील हा नवा प्रयोग हाणून पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजप करणार यात कोणतीच शंका नाही. या नवीन प्रयोगात भविष्यात जर दोन पक्षात वाद झाला तर तो मुख्यत: शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होऊ शकतो कारण या दोन्ही पक्षांची महाराष्ट्रातील प्रभावक्षेत्रे समोरासमोर आहेत. तसेच भविष्यात या तीन राजकीय शक्तीपैकी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष भाजपच्या जवळ जाऊ शकतो पण ही शक्यता नजीकच्या काळात अजिबात नाही. एकंदरीत हा सत्तेचा त्रिकोण पूर्णत्वाला येताच भाजप शिवसेनेस यापासून परावृत्त करण्यासाठी मुख्यमंत्रीपदासह काँग्रेस आघाडीसोबत मिळणाऱ्या मंत्रिपदाच्या संख्येपेक्षा जास्त मंत्रीपदे व केंद्रीय सत्तेत अधिक वाटा देण्याचा प्रयत्न करेल असं वाटत होतं पण तसं घडल नाही. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात होत असलेला हा नवीन बदल जितका अधिक योग्य पद्धतीचे सत्तासंतुलन सांभाळेल तेवढा तो टिकाऊ व मजबूत राहील. हा बदल होत असताना गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आपल्या विरोधात होत असलेल्या प्रत्येक आंदोलनावेळी जनतेला अशा आंदोलनातील अशक्यप्राय गोष्टीही मान्य करण्याची आश्वासने देऊन अशी आंदोलने काही काळासाठी का होईना पुढे ढकलली आहेत. कोणत्याही मागणीला नाही म्हणायचे नाही अशा पद्धतीने फडणवीस यांनी आपल्या समोरील समस्या हाताळल्या आहेत. हे पाहता नव्या सरकारला अशक्यप्राय गोष्टी शक्य नसल्याचे जनतेला सांगण्याची हिंमत दाखवावी लागेल, कारण राज्याच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेला या शिवाय तरणोपाय नाही.

*प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीतील नाव*
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे सत्यशोधक चळवळीतील एक प्रख्यात नाव. या चळवळीच्या माध्यमातून आपल्या प्रखर आणि परखड वक्तृत्वाने त्यांनी दांभिकपणावर आसूड ओढले. समाजाला अज्ञानाच्या अंधकारात ढकलणाऱ्या तथाकथित धर्ममार्तंडांची लक्तरे आपल्या धारदार लेखनीने वेशीवर टांगली. जात-पात ही संकल्पनाच त्यांना मान्य नव्हती. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी लढा उभारला. देवदर्शनाच्या मक्तेदारीविरुद्धही त्यांनी आवाज उठवला. वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांचा त्यामुळे त्यांनी रोष ओढवून घेतला. पण आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे हटले नाहीत. बालविवाह, विधवांचे केशवपन, हुंडा याविरोधात त्यांनी तहहयात संघर्ष केला. महाराष्ट्राला समतेचा, सामाजिक उत्कर्षाचा संदेश देणाऱ्या समाजसुधारकाच्या विचारावर ठाकरे घराण्याचा पाया आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊनच नवा महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात झेप घेतली. अर्थात कालानुरूप बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण आपल्या पित्याच्या तत्त्वांना हरताळ फासला जाईल, असे कोणतेही कृत्य केले नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व देशप्रेमाचे अन् राष्ट्रभक्तीचे होते. त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेचे कधीच समर्थन केले नाही. त्यांचे बोलणे जहाल होते. त्यामुळे तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी त्यांची ओळख मुस्लिमद्वेष्टे, जहाल हिंदुत्ववादी नेते अशी निर्माण केली. जी कधीच नव्हती. त्यांचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सर्वसमावेशक होते. राष्ट्राभिमानी मुस्लिम माझा शत्रू नाही, तर देशविरोधी कृत्य करणारे मुस्लिम माझे शत्रू आहेत, असे त्यांनी शेवटपर्यंत ठणकावून सांगितले. त्यांनी प्रबोधनकारांच्या विचारांचाच वारसा पुढे नेला. इतकेच की ती मांडण्याची वा व्यक्त करण्याची पद्धत आक्रमक होती, पण विद्वेषी नव्हती.

*शारदाबाईंचा जन्मच पुरोगामित्वाचा*
पवार घराण्यालाही शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा वारसा आहे. त्या राजकीय क्षेत्रातही सक्रिय होत्या. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या शारदाबाईंचा सांभाळ त्यांच्या मोठ्या बहिणीचे पती श्रीपत जाधव यांनी केला. ते काकासाहेब म्हणून सर्वपरिचित होते. शारदाबाईंचा जन्मच पुरोगामित्वाचा पुरस्कार करणाऱ्या घरात झाला होता. कोल्हापूरहून पुण्यात येऊन त्यांनी सेवासदन प्रशालेत आपले शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर काकासाहेबांच्या पुढाकाराने बारामतीत गोविंदराव पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
काकासाहेब आणि गोविंदराव दोघेही सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे शारदाबाईदेखील या चळवळीशी जोडल्या गेल्या. काटेवाडीला शेतीच्या माध्यमातून त्यांनी आपला संसार सुरू केला. हे करीत असताना त्यांनी रूढी, परंपरेच्या जोखाडातून स्वत:ला मुक्त केले आणि सामाजिक संघर्षाचा नवा अध्याय सुरू केला. त्याच वेळी त्यांनी आर्थिक दारिद्र्यावर शिक्षण हाच रामबाण उपाय असल्याचे ताडले होते. रयत संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे रोपटे लावणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी त्यांना आपुलकी होती. रयतला त्यांनी आपल्या परीने मदत केली. त्यातून कर्मवीरांशी त्यांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले. शारदाबार्इंनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी रयतमध्येच दाखल केले. ब्रिटिश राजवटीत त्यांनी लोकल बोर्डाच्या सदस्या म्हणून केलेले काम उल्लेखनीय आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा त्यांनी प्रभावीपणे मांडत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने कामगिरी बजावली. रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी लोकल बोर्डाचे चेअरमन म्हणून भरीव काम केले. त्या पुरोगामी विचाराच्या होत्या. कर्मकांड, पूजा-अर्चा, अनिष्ट प्रथा, अस्पृश्यता यांना आपल्या आयुष्यात कधीही स्थान दिले नाही.

*दोघांनीही कर्मकांडावर आसूड ओढले.*
बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवार या दोघांनाही अशी सत्यशोधक चळवळीच्या कुटुंबाची परंपरा आहे. राजकारणात त्यांनी वेगळे मार्ग चोखाळले, ही बाब निराळी. पण त्यांच्या विचारांचे बीज एक होते. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातूनच काँग्रेसला शह देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा उदय झाला होता. शारदाबाईंचा त्याकडेच ओढा होता. शरद पवार यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग निवडला. बाळासाहेब ठाकरेही हिंदुत्वाकडे वळले, मात्र दोघांनीही सत्यशोधकच्या मूळ तत्त्वांपासून फारकत घेतली नाही. दोघांनीही कर्मकांडावर आसूड ओढले. सतत अंधश्रद्धेविरुद्ध बोलत आले. अनिष्ट रुढींवर घाव घालण्याचे काम दोघांनीही केले. आपल्या माता-पित्यांच्या विचारांचा पाया मजबूत असला की समाजात पाय रोवून कसे घट्ट उभे राहता येते, याची ही दोन कुटुंबे मोठी उदाहरणे आहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाथीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर साहजिकच शिवसेनेच्या आणि त्यांच्या ज्वलंत हिंदुत्वाबद्धल सोशलमीडियावर खूप टीका झाली. त्यावर त्यांनी 'आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही!' असं म्हणत आपल्यासोबत काँग्रेसीही मवाळ हिंदूत्ववादी आहेत हे ही दाखवून दिलं!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...