Tuesday, 21 January 2020

कोण होता करीम लाला?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला या भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की हा करीम लाला नेमका होता तरी कोण? आपण या बातमीतून जाणून घेऊ हा करीम लाला कोण होता.
अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं की आपल्यासमोर हाजी मस्तान किंवा दाऊद या दोघांची नावं येतात. मात्र करीम लाला हा मुंबई गुन्हेजगतातला पहिला डॉन होता. हाजी मस्तानही करीम लालाचा उल्लेख डॉन असाच करत असे. करीम लालाचा जन्म १९११ मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार मध्ये झाला. करीम लाला यास पश्तून समुदायाचा शेवटचा राजा असेही संबोधले जाई. साधारण १९३३-३४ च्या सुमारास करीम लाला मुंबईत आला. सुरुवातीला कुंटण खान्याला मुली पुरवण्याचा व्यवसाय त्याने केला. त्यानंतर तस्करी, जुगार या बेकायदा धंद्यामध्ये जम बसवण्यास करीम लालाने सुरुवात केली. करीम लाला गरजूंना मदतही करत असे. मात्र एक काळ असा होता की त्याच्या नावाने मुंबई अंडरवर्ल्ड चळाचळा कापत असे. 



पाकिस्तानातील पेशावरमधून करीम लाला मुंबईत आला होता. त्याने हिऱ्यांचीही तस्करी केली. १९४० पर्यंत करीम लालाची गुन्हे जगतावर पकड होती. तस्करीमध्ये त्याचा जम बसला होता. मुंबईत दारुचे गुत्ते आणि जुगाराचे अड्डेही करीम लालानेच सुरु केले. ४० च्या दशकामध्ये हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ लागलं. ज्यामुळे ४० च्या दशकानंतर करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन या तिघांचा प्रभाव होता. करीम लाला आणि सिनेजगताचेही संबंध होते. अभिनेत्री हेलन ही एकदा मदतीसाठी करीम लालाकडे आली होती. हेलनचा एक मित्र पी. एन. अरोरा हेलनचे पैसे घेऊन फरार झाला होता. निराश झालेल्या हेलन यांनी दिलीप कुमार यांना फोन केला. त्यांनी तिला करीम लाला यास भेटण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी एक पत्रही करीम लालाला लिहिलं होतं. करीम लालाने या प्रकरणात लक्ष घातलं ज्यानंतर हेलन यांना त्यांचे पैसे परत मिळाले होते.

दाऊदला फटकवल्याची चर्चा
तस्करीच्या धंद्यात जेव्हा दाऊदचा उदय झाला तेव्हा करीम लाला अस्वस्थ झाला. दोघांमधलं शत्रुत्व अनेकदा समोर आलं होतं. एकदा दाऊद करीम लालाच्या हाती लागला. ज्यानंतर करीम लालाने दाऊदला चांगलंच फटकवलं होतं. बेदम मारहाण झाल्याने दाऊदला काही जखमाही झाल्या होत्या. अंडरवर्ल्डमध्ये दाऊद येण्याआधी रक्तपात, खून या घटना घडत नसत. मात्र १९८१ मध्ये करीम लाला गँगने दाऊदचा भाऊ शब्बीर याची दिवसा ढवळ्या हत्या केली. ज्यामुळे चिडलेल्या दाऊदने गँगवॉर सुरु केलं. १९८६ मध्ये दाऊदच्या गुंडांनी करीम लालाचा भाऊ रहीम खान याला ठार केलं आणि शब्बीरच्या खुनाचा बदला घेतला. अशी सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला करीम लाला शेवटच्या दिवसात खितपत पडला होता. १९ फेब्रुवारी २००२ ला मुंबईत त्याचं निधन झालं. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला आणि हाजी मस्तान यांना भेटत असत. ही बाब मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे असा दावा हाजी मस्तानचा मानलेला मुलगा सुंदर शेखर याने केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी एका जाहीर मुलाखतीमध्ये इंदिरा गांधी मुंबईत आल्या की करीम लालाची भेट घेत असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन बराच वाद निर्माण झाला. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचं वाक्य मागे घेतलं. आता मात्र हाजी मस्तानच्या मानलेल्या मुलाने म्हणजे सुंदर शेखरने संजय राऊत जे बोलले ते काहीच चुकीचं नाही असं म्हटलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले सुंदर शेखर?
” हाजी मस्तान आणि करीम लाला यांची भेट इंदिरा गांधी घेत असत. इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लाला यांना दोन दिवस आधीच समजत असे. मी इंदिरा गांधी यांना करीम लाला आणि हाजी मस्तान यांची भेट घेताना पाहिलं आहे. त्यांच्यात काय चर्चा होत होती ते कधी समजलं नाही. कारण मी तेव्हा लहान होतो. मला लांबून सगळं दिसायचं . या तिघांनाही चर्चा करताना मी पाहिलं आहे. ७० ते ८० च्या दशकातली ही गोष्ट आहे. ”
राष्ट्रपती भवनातला फोटो समोर आला आहे. राष्ट्रपती भवनात करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती ही बाबही खरी आहे. करीम लाला आणि हाजी मस्तान या दोघांसोबतही मी राहिलो आहे. मी ब्राह्मण असूनही या दोघांनी मला सांभाळलं असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर इंदिरा गांधी मुंबईत येणार असल्या की करीम लाला यांना समजत असे. मी त्यांच्यासोबत गेलोही होतो तेव्हा मी इंदिराजींना पाहिलं आहे असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे. सुंदर शेखर म्हणतात, ” तो काळ असा होता की हाजी मस्तान निघाले की त्यांना पाहण्यासाठी लोक दुतर्फा जमत हेदेखील मी पाहिलं आहे. फक्त इंदिरा गांधीच नाहीत तर अनेक काँग्रेसचे नेते त्यांना भेटत असत. निवडणूक प्रचारातही हाजी मस्तान आणि करीम लाला यांची महत्त्वाची भूमिका होती”

अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या कथित भेटीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आहे. मात्र, आम्ही जेव्हा याची छाननी केली तेव्हा या दोघांची एकच भेट मुंबईत नाही तर दिल्लीत झाल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा मानसपुत्र सुलेमान मिर्जा याने मात्र राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. तर, मराठीतील ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर आणि राम पवार यांनी मात्र मुंबईत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा केला आहे.

करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची दिल्लीत भेट झाल्याची जी माहिती आली आहे. त्याचा संदर्भ हा लेखक, अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या पद्मभूषण पुरस्कार वितरण संमारंभातील आहे. ही घटना १९७३ सालची. अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना १९७३ साली जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला जाणार होते. त्यावेळी करीम लाला यांनी चट्टोपाध्याय यांच्याकडे राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि करीम लाला यांचे मैत्रीचे संबंध असल्याने चट्टोपाध्याय त्यांना घेऊन दिल्लीला आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी देशातीन प्रसिद्ध लोक आले होते. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही समावेश होता. पुरस्कार वितरणानंतर लोक जेव्हा आपापसात चर्चा करत होते, त्यावेळी करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. सोबतच त्यांच्यासोबत फोटोही काढला. करीम लाला याने पठाणांचा नेता म्हणून त्याची ओळख करुन दिली. इतर अंडरवर्ल्ड डॉन प्रमाणेच करीम लाला याचेही चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या या एकमेव भेटीव्यतिरीक्त या दोघांची भेट झाली असल्याचे पुरावे मिळत नाहीत.

राऊतांचे विधान खरे आहे : हाजी मस्तानचा मुलगा सुलेमान मिर्जा
संजय राऊतांच्या विधानाला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा मुलगा सुलेमान मिर्जाने दुजोरा दिला आहे. करीम लाला हे पक्के काँग्रेसी होते. मुंबईतील कार्यक्रमावेळी इंदिरा गांधी त्यांना भेटण्यासाठी येत असल्याचा दावा केला आहे. सोबतच इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये चर्चा होत असल्याचंही सुलेमानने म्हटलं आहे. करीम लाला हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने निवडणुकीच्या काळातही ते काँग्रेसला मदत करत होते. काँग्रेसचे तत्कालीन नेते मुरली देवरा, वसंतदादा पाटील, वसंत नाईक यांच्या बंगल्यावर करीम लाला नेहमी येत-जात असल्याचा दावाही सुलेमान मिर्जाने केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील हाजी मस्तान आणि करीम लाला यांचे चांगले संबंध असल्याचे सुलेमान मिर्जाने सांगितले.

मुंबईत एकही भेट झाल्याचे पुरावे नाही : ज्येष्ठ पत्रकार
करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट झाली, या राऊतांच्या विधानामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. करीम लाला इंदिरा गांधी यांना भेटला अशी चर्चा होती. पण पुरावा नाही. एकदा दोनदा करीम लाला इंदिरा गांधींना लग्न समारंभात भेटल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याबद्दल ठोस पुरावे नाहीत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनी दिली. ते म्हणाले, हाजी मस्तानला मी स्वतः दोनवेळा मंत्रालयात आलेलं पाहिलं आहे. त्यावेळी काँग्रेस नेत्यांना भेटायला तो यायचा. हाजी मस्तानने पक्ष देखील काढला होता. मात्र, तो निवडणुकीत पडला. जयप्रकाश नारायण चळवळीच्या वेळेस हाजी मस्तान शरण आला होता. पण त्याचे काँग्रेस पक्षतील नेत्यांशी चांगले संबंध होते.

शरद पवार यांच्यावरही आरोप झाले -
शरद पवार हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर देखील अंडरवर्ल्डच्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप झाले आहेत. मात्र ते सिद्ध झाले नाही. पण, अनेक पक्षातील नेत्यांचे हाजी मस्तानशी चांगले संबंध होते. इंदिरा गांधी इतक्या मोठ्या होत्या. त्या हाजी मस्तानला कधीच पायधुनी या ठिकाणी भेटायला येणं शक्य नसल्याचे सांगत राऊत यांच्या वक्तव्य फेटाळले आहे.

ज्येष्ठ पत्रकार राम पवार म्हणतात...
करीम लाला आणि इंदिरा गांधी यांचा जो फोटो मिळाला आहे. त्यात हरिभाऊ चटोपाध्याय यांना जेव्हा पद्मश्री मिळाला तेव्हाचा आहे. चटोपाध्याय आणि करीम लालाचे संबंध चांगले असल्याने त्यांच्यासोबत ते दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. मात्र, इंदिरा गांधी करीम लाला भेटायला यायची याबाबत कुठल्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार राम पवार यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की मी अनेक लोकांशी चर्चा केली. करीम लाला मंत्रालायत यायचा त्याचा काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. मुरली देवरा त्याच्या भागातून निवडून यायचे मात्र त्यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते हे सांगणे अवघड आहे. एखादी दंगल शांत करण्यासाठी हे राजकीय नेते या लोकांशी भेटत होते. याबाबत काहीच दुमत नाही. राजकीय कामासाठी हाजी मस्तान हे मंत्रालयात येत होते. मात्र, इतका आदर त्यांना दिला जायचा असं काही नव्हतं. त्यावेळेसचे राष्ट्रपती जेलसिंग १९७४ ला मुंबईत जातीय दंगली झाल्या त्यावेळेस आले असताना त्यांच्या जीपमध्ये हाजी मस्तान होता. मग ते जेलसिंग यांना माहीत होतं की नाही? हे माहीत नाही. राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध असतात. पण त्याचे पुरावे मात्र मिळत नाही. कारण, राजकीय सपोर्ट असल्याशिवाय अंडरवर्ल्डमधील लोक इतके मोठे होऊच शकत नाही. मुस्लीम मतदार संघामध्ये अंडरवर्ल्डच्या या लोकांचं दबदबा होता. त्यामुळे अंडरवर्ल्डचे हे लोक राजकीय नेत्यांच्या जवळचे जवळचे झाले होते.



No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...