Thursday, 16 January 2020

सावरकर : तुम्हींसे मुहब्बत, तुम्हींसे लडाई...!

"विधानसभेत भाजपेयींनी 'मी सावरकर' असं लिहिलेल्या टोप्या घालून सावरकरांना 'भारतरत्न' देण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे उत्तर दिलंय. पण सत्य काय आहे? या टोपीखाली कोणतं आणि कसलं डोकं आहे. हे समजलं तर ती टोपी डोक्यावर ठेवणार नाहीत. भाजपेयींनी सावरकरांचं उदात्तीकरण करायचं ठरवलंय पण त्यानिमित्तानं जो इतिहास समोर येतोय. त्यातली वास्तविकता ही सावरकरप्रेमींना म्हणायला लावतेय, 'तुम्हींसे मुहब्बत, तुम्हींसे लडाई...!'
-------------------------------------------------------------------
*स्वा* तंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला सातत्यानं सहाय्यक ठरलेल्या आणि स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादींचं सरकार सध्या केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आलं आहे. हे हिंदुत्ववादी देशभक्तीचा आणि राष्ट्रवादाचा सारा ठेका यांच्याकडंच असल्यासारखं देशप्रेमाच्या आरत्या आवेशानं आळवतात आणि यांच्याखेरीजचे सारेच लोक देशद्रोही म्हणजे पाकिस्तानी असल्याचं जाहीर करतात. परंतू, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांच्या योगदानाचा विषय काढल्यावर मात्र त्यांच्याकडं तोंड वर करू बोलायला जागा नसते आणि जे काही सांगितलं जातं त्यातील खोटेपणा अगदी सर्वसामान्य लोकांच्याही ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. कारण स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेला कोणताच नेता हिंदुत्ववाद्यांकडं नाही. डॉ. हेडगेवार, मा. स. गोळवलकर, डॉ. मुंजे, पं.मदनमोहन मालवीय यांच्याबद्धल कितीही आदरानं वा उदात्तपणे उल्लेख संघानं केला तरी संघ परिवाराच्या बाहेर कुणाला यांची नावं फारशी ठाऊक नसतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडं एक नाव असतं ते म्हणजे सर्वश्रुत असे वि. दा. सावरकर! इंग्लंडमध्ये सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. ते इंडिया हाऊसमध्ये राहत होते. त्याचे अध्यक्ष शामजी कृष्ण वर्मा होते असं आपल्याला सांगितलं जातं. पण उपाध्यक्ष अब्दुल्ला सुरावर्दी होते हे मात्र सांगितलं जात नाही. तसेच तिथून सावरकरांनी १९ ब्राउनिंग पिस्तुलं भारतात पाठवली हे आवर्जून सांगतात. पण त्याआधीही ८० हून अधिक पिस्तुलं एका मुसलमान सेवकाकरवी पाठवण्यात आली होती हे आपल्याला सांगितलं जात नाही. या ठिकाणी सावरकरांनी मदनलाल धिंग्रा या तरुणाला एक पिस्तुल देऊन त्याच्याकडून कर्नल वायलीची हत्या करून घेतली. याच काळात त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहिलं होतं. कर्नल वायलींच्या खूनामध्ये सावरकरांचा हात आहे, असा संशय ब्रिटिशांना होता. त्यामुळं सावरकर लंडन सोडून पॅरिसला येऊन राहिले. मदनलाल एकाकी तुरुंगात पडला आणि पुढं फासावर गेला. नाशिकला ब्रिटीश अधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती हत्या सावरकरांनी अमीन याच्यामार्फत पाठवलेल्या पिस्तुलानं करण्यात आली होती. सावरकर पॅरिसला होते. ते स्वतः काही करत नाहीत केवळ बोलतात अशी चर्चा त्यांच्याच संघटनेतील सहकारी करू लागल्यानं सावरकर पॅरिसहून पुन्हा लंडनला आले. त्यांना परत आणत असताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात बोटीच्या स्वच्छतागृहातून समुद्रात उडी मारली आणि पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. पण पलायनाचा हा त्यांचा प्रयत्न फसला. सावरकरांच्या नावावर हा एकमात्र प्रयत्न जमा असूनही हिंदुत्ववादी त्यांना  ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणतात. हा वीर शब्दाचा अपमान आहे. कारण पुढे त्यांच्यावर दोन खटले चालवून त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा देण्यात आल्या आणि ४ जुलै १९११ रोजी त्यांची रवानगी ५० वर्षांसाठी अंदमानला करण्यात आली. अंदमानात गेल्यावर या वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागण्याचा सपाटा लावला आणि केवळ ९ वर्ष १० महिन्यांतच त्यांना माफी देण्यासाठी भारतात परत आणण्यात आलं. याच काळात अंदमानात शेकडो स्वातंत्र्यसैनिक हालअपेष्टा भोगत होते. त्यातील अनेकांना अंदमानातच मृत्यू आला. असं असताना सावरकर म्हणजे अंदमान असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न म्हणजे इतर देशभक्तांचा अपमान आहे.

रा.म.आठवले, भा.कृ.केळकर, मो.शि.गोखले, सदाशिव रानडे, रघुनाथ भोपे, गोविंदस्वामी आफळे, शि.ल. करंदीकर अशा अनेकांनी सावरकरांच्या हयातीत त्यांच्यावर लेखन केलं. पण ते सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांच्या पलीकडे गेलं नाही. सावरकरांच्या पश्चात द.न.गोखले यांनी अत्यंत प्रभावीपणे सावरकरांच्या जीवनाचं आणि विचारांचं रहस्य उलगडलं. हे सारं आजवरचं लेखन हे सोवळी पाशात अडकलेलं होतं. ते सोडविण्याचं काम शेषराव मोरे यांनी केलं. 'सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग', 'विचारकलह', या त्यांच्या ग्रंथातून शेषरावांच्या सावरकर यांच्या विषयीच्या अभ्यासाची साक्ष मिळते. त्यातून ते सावरकरभक्त नाहीत हे स्पष्टपणे, ठळकपणेे दिसतं. त्यांचं 'अप्रिय पण...!' या नावाचं सदर दैनिक सामनामधून बरीच वर्षे प्रकाशित होत होतं. त्याचं पुढं ग्रंथात रुपांतरही झालं. त्यातही त्यांच्या तटस्थतेचं दर्शन घडतं. मूळचे रा.स्व.संघाचे पण मतभेदांमुळे 'सावरकरवादी' झालेल्या धों.वि.देशपांडे, दि.वि.गोखले, स.ह.देशपांडे, ग.वा.बेहेरे यांनी शेषरावांना वेळीच समीक्षकी प्रशस्ती, प्रसिद्धी देऊन 'सावरकरवादी' करून टाकलं. परंतु शेषरावांनी आपला बुद्धिवाद आणि तार्किकता केवळ सावरकरांना शुद्ध करून घेण्यासाठीच वापरलेली नाही. त्यांच्या 'विचारकलह' या ग्रंथातील खरा 'सावरकर' मांडण्याचं काम अनुयायांनी केलंच नाही! 'शाहू महाराज : ब्राह्मणशाहीला शह देणारा हिंदू सुधारक : मराठा समाजाची स्थिती व भवितव्य' हे लेख आवर्जून वाचावं असे आहेत. इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, आणि विचारपद्धती याचा सुरेख संगम त्यांच्या लेखनातून दिसतो. त्यांना वैचारिक तटस्थतेचे फटके नक्कीच बसले असतील. डावा-उजवा-मध्यम, हिंदू-हिंदुत्ववादी, समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी, सावरकरवादी, अशा नाना प्रकारचे वैचारिकवाद, समीक्षापद्धती देशात आहेत. त्या माध्यमातून साहित्य, विचार आणि समीक्षा क्षेत्रात राजकारण खेळणारेही आहेत. १८५७ मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात हिंदुस्थानात उठाव झाला होता. त्यावर सावरकरांनी 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. त्यावर १८५७ च्या शताब्दी निमित्तानं इतिहास संशोधक न.र.फाटक यांनी 'हे स्वातंत्र्यसमर नव्हतं तर ते शिपायांचं बंड होतं.' हे स्पष्ट करणारा  ग्रंथ लिहिला होता. अशीच समीक्षा करणारं प्रबोधनकार ठाकरे यांचं भाषणही आहे. सावरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रकाशित केला म्हणून ब्रिटिश सरकारनं सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली याला गोळ्या घालून मारलं. तर नाशकात कलेक्टर जॅक्सनला अनंत कान्हेरेनं पिस्तूलानं उडवलं. १९१० मध्ये नाशिकच्या प्रकरणातील ही पिस्तुलं सावरकरांनी पाठवली म्हणून त्यांना अटक झाली. तिथून सावरकरांना आणतानाच त्यांनी मार्सेलीस खाडीत उडी मारली. पण सावरकरांना तिथून पळ काढता आला नाही. ब्रिटिश सोल्जरांनी त्यांना पकडलं. भारतात आणलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या काळ कोठडीत डांबलं. तिथं त्यांना मणामणाच्या बेड्यांत अडकवलं होतं. तेलाच्या घाण्याला कसं जुंपलं होतं; याच्या दर्दभऱ्या कहाण्या आहेत. तथापि सावरकरांनी शिक्षेची ९ वर्षे १० महिने झाल्यानंतर 'ब्रिटिश सरकार विरोधात कोणतंही काम करणार नाही,' असा माफीनामा देऊन स्वतःची काळकोठडीतून सुटका करून घेतली. अर्थात, अंदमानातली ९ वर्षे १० महिने ही शिक्षा काही कमी नाही. हा इतिहास आहे. त्याचं समर्थन सावरकरांनी कधी केलं नाही. किंबहुना सावरकरभक्तांच्या फुकाच्या फुसक्या युक्तिवादानं सावरकरांची अधिक बदनामी झाली. सावरकर कठोर बुद्धिनिष्ठ होते, पण ते विज्ञाननिष्ठ होते. हा शुद्ध भ्रम आहे. ते विज्ञाननिष्ठ असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा निर्णय जाहीर करताच, आंबेडकरांची उडी हिंदुधर्मातच! 'बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे' अशी शेंडीला गाठ मारणारी भाषा सावरकरांनी वापरली नसती. अवतार ही कल्पना विज्ञाननिष्ठेतेत बसत नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तर सावरकरांची कठोर बुद्धिनिष्ठताही पातळ झाली. म्हणूनच त्यांनी पत्थरी देवदेवतांच्या आरत्या लिहितात तशी शिवरायांवर आरती लिहिली.... 'जय देव जय देव जय श्री शिवराया....'. दलित-दलितेतर एकत्र यावेत, यासाठी सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत तिथं 'पतित पावन मंदिर' स्थापन केलं. म्हणजे सोवळ्याची; दलित-मागासांना प्रवेश नसलेली मंदिरं तशीच ठेवली; आणि पतितपावन हे तिसरंच मंदिर निर्माण केलं.  तथापि कुणाला पतित म्हणणं हे चूक; त्याच्यापेक्षा पतितपावन करून घेणं , महाचुकच! असो!

सावरकरांच्या चरित्राकडं पाहता निदान १९०८ पर्यंत त्यांना ब्रिटिशांच्याविरोधात लढायचं होतं. अर्थात अशी इच्छा असणाऱ्यांना हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कार करणं आवश्यक होतं आणि तसे सावरकर होते हे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ वाचल्यावर लक्षात येतं. सावरकरांनी त्यांना अटक होऊन शिक्षा होईपर्यंत केवळ हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कारच केला नाही तर एक मुसलमान हा हिंदू इतकाच राष्ट्रवादी असू शकतो, असं म्हटलंय. बरेलीला छापून प्रसिद्ध केलेला अयोध्येच्या नबाबानं काढलेला जाहीरनामाच सावरकर मोठ्या अभिमानानं या पुस्तकामध्ये उद्धृत करतात. या देशात राहणारे हिंदू, मुसलमान, शीख हे हिंदी आहेत, असं त्या जाहिरनाम्यात म्हटलं आहे. “हिंदुस्थानातील सर्व हिंदूंनो आणि मुसलमानांनो, उठा ! स्वदेश बांधव हो, परमेश्वराने दिलेल्या देणग्यांत अत्यंत श्रेष्ठ देणगी म्हणजे स्वराज्य आणि तुम्ही अजूनही स्वस्थ बसणार काय ?  तुम्ही स्वस्थ बसावे अशी परमेश्वराची इच्छा नाही कारण सर्व हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या हृदयात त्याच्याच इच्छेनं या फिरग्यांना आपल्या देशातून हाकलून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली आहे. …. लहान-थोर हे सर्व क्षुल्लक भेद विसरून जाऊन त्या सैन्यात सर्वत्र समताच नांदली पाहिजे. कारण जे जे पवित्र धर्मयुद्धात स्वधर्मासाठी आपली समशेर उपसतात ते सर्व सारख्याच योग्यतेचे आहेत !  त्यांच्यात मुळीच भेद नाहीत…. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व हिंदूना म्हणतो की, उठा आणि या परमेश्वरी दिव्य कर्तव्यासाठी रणांगणात उडी घ्या !” (‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ पान ८)  या पुस्तकात अशी उदाहरणे अनेक देता येतील. सांगायचा मुद्दा हा की, सावरकर त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवले जाण्यापूर्वी हिंदू-मुस्लिम एेक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. इतके कट्टर समर्थक की बंडवाल्यांनी दिल्लीच्या सिंहासनावर केलेली बादशाह बहादूरशहा जफरची नेमणूकही समर्थनीय ठरवतात. असे सावरकर ब्रिटिशांच्या तुरुंगात अंदमानला जातात त्यावेळी १८५७ त्या स्वातंत्र्य समरातील हिंदू-मुस्लिम एेक्याचा विचार आणि त्यातून इंग्रजांपुढे उभं राहिलेलं प्रचंड आव्हान या गोष्टी सावरकर जाणत होते. हा देश धर्मभेद विसरून एकत्रितपणे जोपर्यंत ब्रिटिशांविरोधात संघटीत होत नाही तोपर्यंत स्वतंत्र होणार नाही ही गोष्टही ते जाणत होते. ब्रिटिशांच्या चिथावणीनेच काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्यासाठी १९०६ साली मुस्लिम लीगची झालेली स्थापनाही त्यांना माहीत होती आणि पुढे माफी मागून सुटून आल्यावर १९१६ मध्ये मुसलमानांचं सहकार्य स्वराज्याला मिळावं म्हणून लोकमान्यांनी केलेला सिमला करारही त्यांना माहीत होता. असे सावरकर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि मुस्लीम द्वेष का करतात ? बरं हा मुस्लिम द्वेष एवढ्या थराला गेला की, शत्रू पक्षातील मुस्लिम स्त्रीला शिवाजी महाराजांनी सन्मानानं परत पाठवण्याला सावरकर ‘सद्गुण विकृती’ म्हणून मोकळे झाले. “शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रविघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारांमध्ये सहस्त्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे इथं दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपति शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवऱ्याकडं पाठवलं आणि पोर्तुगीजाचा पाडाव झालेल्या शत्रूस्त्रीलाही चिमाजी अप्पानं वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडं तिला परत पाठवलं. या दोन गोष्टींचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडोवेळी मोठ्या अभिमानानं करीत असतो. पण शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी अप्पांना महंमद गझनी, घोरी, अलाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहीरच्या राजकन्या, कर्णावतीच्या कर्णराजाची कमलदेवी नि तिची स्वरुपसुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदू राजकारण्यांवर केलेले बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण, पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांचा गौरव करताना झाली नाही, हे आश्चर्य नव्हे काय ?” (सहा सोनेरी पाने, वि. दा. सावरकर, पान १४४).

त्यांच्या देशभक्तीपासून मुस्लिमद्वेष, हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करून मुस्लिम, ख्रिश्चन यांना दुय्यम ठरवणे आणि मग द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडण्यापर्यंत झालेला मत बदल सध्याच्या वातावरणात लोकांपुढे येणं गरजेचं आहे. त्यांच्या मतपरिवर्तनाचं उत्तर सावरकरांच्या दयेच्या अर्जावर क्रॅडॉक यांनी केलेल्या टिपणीत आहे. “हे त्या दर्जाचे धोकादायक कैदी नाहीत, ते …. परिस्थितीशिवाय त्यांच्या कैदेतील आचरणावरही अवलंबून असेल आणि १०-१५ वा २० वर्षांनंतर परिस्थिती काय असेल हे कोणालाही सांगता येणार नाही. त्यासाठी मी त्यांना इतकाच सल्ला दिला की, त्यांनी तुरुंगातील शिस्तीचे पालन करून उपलब्ध पुस्तके वाचून आपल्या कैदी जीवनाला वर उचलण्याची जी संधी मिळाली आहे त्यासाठी त्याचा उपयोग करावा. ” (Savarkar Myths and Facts, Shamshul Islam, p 44) त्यानंतर सावरकरांनी अंदमानमध्ये आपलं वर्तन आदर्श कैद्यासारखं ठेवलंय. तुरुंगातील कोणत्याही आंदोलनापासून स्वतःला अलिप्त ठेवलं. इतकंच नाही तर त्यांच्याबरोबर ज्यांना एकाच खटल्यात शिक्षा झाली त्या कैद्यांपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवण्याची विनंती, इतरांच्या चुकीची शिक्षा त्यांना न देण्याची विनंती दिलेल्या दयेच्या अर्जात केलीय. त्यांच्या या आदर्श वागणूकीची बक्षिसी ब्रिटीश सरकारनं त्यांना दिली. त्यांची ५० वर्षांची शिक्षा कमी करून त्यांना ९ वर्षे १० महिन्यांत भारतात आणण्यात आलं. त्यानंतरची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याची आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय न ओलांडण्याची अट घालून रत्नागिरीत ठेवण्यात आलं. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे की, सावरकर तुरुंगामध्ये गेल्या गेल्या माफी मागू लागले. पहिला माफीचा अर्ज ३० ऑगस्ट १९११ ला म्हणजे अंदमानला गेल्यावर केवळ ५७ व्या दिवशी केलाय. त्यांनी जो कोलू चालवण्याचा उल्लेख केला जातो तो कोलू तोपर्यंत त्यांनी चालवलाच नव्हता. तसंच त्यासाठी आवश्यक शारीरिक पात्रता सावरकरांकडे नव्हती. सावरकरांनी एकूण पाच दयेचे अर्ज केले आहेत. त्यांच्या पत्नीने आणि वहिनीने त्यांच्या सुटकेसाठी अर्ज केले आहेत. सावरकरांनी आपली सुटका ब्रिटिशांची माफी मागून करून घेतली आणि ही लीन-दीन होऊन मागितली याचं एकच उदाहरण पुरेसं आहे. १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहिलेल्या माफीनाम्यांत ते लिहितात की, “….परंतु जर आम्हाला सोडण्यात आले तर लोक सहज प्रेरणेने दंड देणे आणि सूड घेणे यापेक्षा क्षमा करणे आणि सुधारणे हे अधिक जाणणाऱ्या सरकारचा आनंदाने आणि कृतज्ञतेने जय जयकार करतील शिवाय संविधानिक तत्वांवर ते माझे परतणे भारतातील आणि भारताबाहेरील एकेकाळी माझ्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहणाऱ्या त्या भरकटलेल्या तरुणांना पुन्हा मार्गावर आणेल. मी सरकारची सेवा जशी सरकारला आवडेल त्या पद्धतीने करायला तयार आहे कारण माझे संविधानिक मार्गाने इमानदारीचे आहे म्हणून माझी भविष्यातली वर्तणूकही तशीच असेल अशी माझी आशा आहे मला कैदेतून सोडवण्याच्या तुलनेत मला कळले ठेवल्याने काहीच मिळणार नाही केवळ सर्वशक्तिमान दयावान बनू शकतो आणि म्हणून अतिव्ययी मुलगा मायबाप सरकारच्या दारी करण्यावाचून काय करू शकेल ? ” हे नुसते क्षमापत्र नाही तर वाघाचं पार कोकरू झाल्याचा पुरावा आहे आणि हे कोकरू आपल्या विरोधात जाणार नाही याची खात्री झाल्यावर कोकराला मुक्त केलं गेलंय. क्रॅडॉच्या वरील टिप्पणीनुसार, “१०, १५ वा २० वर्षानंतर परिस्थिती काय असेल हे कोणालाही सांगता येणार नाही” अशी एक ओळ आहे. १९२० मध्ये सरकारला हिंदू-मुस्लीम ऐक्य फूट पाडण्यासाठी मनुष्याची गरज होती. ही गरज सावरकर पुरी करतील यासाठी ब्रिटिश सरकारनं त्यांना मुक्त केलं होतं. कारण अंदमानमध्ये बुद्धिवादी सावरकरांची शुद्धीची चळवळ ब्रिटिशांनी बघितली होती. सावरकरांवर राजकारणात भाग घेण्यास बंदी होती. परंतु सावरकर १९२४ मध्ये ती रत्नागिरी वास्तव्यास येताच काही आठवड्यातच रत्नागिरीत हिंदू महासभेची शाखा सुरू करण्यात आली. ती सुरू करण्यासाठी सावरकरांचे बंधू बाबाराव यांचा पुढाकार होता. सावरकर रत्नागिरी राहाण्यास येणं आणि हिंदू महासभेची शाखा सुरू होणं हा काही योगायोग नव्हता आणि ही गोष्ट ब्रिटिशांच्या नजरेतून सुटणारीही नव्हती. पण त्याला ब्रिटिशांनी हरकत घेतलेली नाही कारण ह्यासाठी सावरकरांची सुटका करण्यात आली होती.

शि. ल. करंदीकर, धनंजय कीर यांच्यासारखे सावरकर यांचे चरित्रकार सावरकरांच्या माफीवर काही बोलत नाहीत आणि अन्य समर्थक गनिमी कावा होता असं त्यांच्या माफीचं उदात्तीकरण करतात. य. दि. फडके काहीशा अशाच मताचे आहेत. ते लिहितात की, “आधी नाशिक मध्ये आणि नंतर लंडनमध्ये केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाबद्दल कारावासात तात्यांनी फेरविचार केला आणि त्यामुळे सरकारकडे त्यांनी क्षमायाचना वजा पत्रे पाठवली असा काहींचा समज झालेला दिसतो. १९५८ साली मुंबई सरकारनं भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा दुसरा खंड प्रकाशित केला. त्यात ३० मार्च १९३० रोजी अंदमान-निकोबार बेटाच्या मुख्य आयुक्तांना पाठवलेला अर्ज प्रसिद्ध केला आहे. या अर्जात निष्ठापूर्वक सरकारशी सहकार्य करण्याची भाषा वापरली आहे. पण ती भाषा शब्दशः खरी धरता कामा नये. तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागील त्यावेळचा राजकीय संदर्भ, तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते. पन्नास वर्षे अंदमानच्या कोठडीत राहून जीवित यात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त व बिनशर्त मुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांना वाटले की ते सुटकेसाठी अर्ज करीत. या व्यवहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्‍वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. १९३७ पर्यंत हा खेळ ते खेळत होते.”   (शोध सावरकरांचा य. दी. फडके ५०-५१) फडके यांचा युक्तिवाद मान्य करायचा तर सावरकरांना धोरणी, व्यवहारी वगैरे म्हणता येईल. पण ‘वीर’ का म्हणायचं? आणि सावरकरांना वीर म्हणायचं तर जे सावरकरांपेक्षा श्रेष्ठ कामगिरी करून फासावर लटकलेल्या आणि अंदमानातील ज्यांनी छळ सोसला, माफी मागितली नाही त्या खऱ्या वीरांना काय म्हणायचं? सावरकरांनी माफी मागून करून घेतलेली सुटका गनिमी कावा होता तर महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी क्रांतिकारक १९२० ते १९४७ ही सत्तावीस वर्ष काय करत होते?  याबाबत नरहर कुरुंदकर लिहितात “ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याशी फक्त वैरच केले ते तुमचे जिव्हाळ्याचे जिवलग असतात. निदान हैदराबादचा लढा हा तर मुस्लिम विरोधी होता भारताची एकात्मता निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढ्यात काय भाग घेतला, शक्ती लहान असणे हा गुन्हा नसतो. स्वातंत्र्यलढा सुरू असताना शक्तींना न वापरणे हा मात्र गुन्हा असतो. निझामावरती बॉम्ब फेकणारा हा पुन्हा गांधींचा जयघोष करणारा असतो. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रझवी दिसला नाही. निझाम व जिना दिसले नाहीत. इसवी सन १९२० नंतर इंग्रजांच्या ही विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी गांधींसाठीच होती ! ”  ( शिवरात्र नरहर कुरुंदकर पा. १९) श्रीकांत शेट्ये यांनी 'माफीवीर सावरकर' या पुस्तकातून प्रसिद्ध केले आहेत. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामे दिले आहेत ते असे आहेत.... ते म्हणतात, "मी घराबाहेर पडून बिघडलेला, उधळ्या, खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित राहण्यासाठी माझी अंदमानच्या तुरूंगातून सुटका करावी. मी १९११ मध्ये दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी विचार करणे माझी सुटका केली तर, इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लागेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील." "एकदा मी स्वतः सरकारच्या बाजून झालो, की मला गुरुस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे, भारतातील आणि परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजून येतील. माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल. त्या पद्धतीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईलं. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पिता रुपी ही सरकारच्या दरबारातच नाही येणार तर कुठे जाणार? अशा प्रकारच्या माफीनामा सावरकरांनी ब्रिटिश सरकारला गुंगारा देण्यासाठी लिहिला होता, असं सावरकरवादी म्हणतात. अशांनी सावरकर यांचा १४ नोव्हेंबर १९१३ चा हा माफीनामा भारत सरकारच्या पुरातत्व विभागात पहावा असं श्रीकांत शेट्ये यांनी पुस्तकात नमूद केले आहे. श्रीकांत शेट्ये यांनी सावरकरांचे दोनच माफीनामे पुढे आणले. शोधानुसार सावरकरांनी इंग्रज सरकारकडं एखाद-दुसरं माफीपत्र दिलं नाही, तर एकूण सात माफीपत्रं दिली आहेत. सावरकरांचा अतोनात छळ झाला म्हणून त्यांनी माफी मागितली, हेही खोटं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी काही तारखांचे पुरावे दिले आहेत. सावरकर ४ जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले आणि माफी मागणारे पहिले पत्र ३० जुलै १९११ रोजी लिहिलेलं आहे. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होतं. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवलं नव्हतं. म्हणजे त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणालाच भेटता येत नव्हतं. सावरकरांना पन्नास वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा झाली होती. पण प्रत्यक्षात ते ९ वर्षे १० महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः ७ माफीपत्र लिहिली आणि त्यांच्या पत्नीनं त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडून तीन माफीपत्र दिली. सावरकर यांच्या पत्रांची भाषा पाहिली तर, ते किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलामण करणारी आहे हे लक्षात येते. आणि ती वाचून आश्‍चर्यही वाटतं. स्वातंत्र्य आंदोलनातलं त्यांचं योगदान केवळ तितकंच मर्यादीत आहे. ते १९०९ मध्येच संपलं होतं. १९०९ पर्यंतच्या कामाचा गौरव कोणाला करायचा असेल तर तो जरूर करावा. पण त्याचवेळी अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा आणि हाल-अपेष्टा सहन करत ज्यांनी प्राण सोडले पण ब्रिटिशांची माफी मागून सुटका करून घेतली नाही त्या शेकडो क्रांतीकारकांचा आधी सन्मान करावा. त्यांच्यापुढं तर सावरकरांचं कार्य फारच थिटे ठरतंय. सावरकरांच्या त्यागाचा गौरव करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जगात वाल्याचा वाल्मिकी झाला तरच तो वंदनीय असतो. पण वाल्मिकीचा वाल्या झाला तर त्याची तुलना अन्य दरोडेखोरांबरोबरच करावी लागते. सावरकरांनी आधी काय केलं त्यापेक्षा त्यांनी नंतर काय केलं यावरच त्यांचं मूल्यमापन करणं भाग आहे. आज हिंदुत्ववादी त्यांचे उदात्तीकरण करतात ती त्यांची गरज आहे, सत्य नव्हे !
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...