Friday 17 August 2018

राष्ट्रवादीचा चेहरा आणि मोहरा!

काँग्रेस वा भाजपा यांचा प्रदेशाध्यक्ष राज्यातला पक्ष सांभाळतो, तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती नाही. अन्य पक्षात जितके अधिकार त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला असतात, तितके राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला असत नाहीत. शरद पवार यांना राज्याचा प्रादेशिक नेता म्हणवून घ्यायचे नाही, म्हणून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतात. साहजिकच कोणाला तरी नामधारी म्हणून प्रदेशाध्यक्ष नेमावा लागतो. जयंत पाटील यांचे स्थान त्यापेक्षा मोठे वा निर्णायक नाही. शिवाय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेतच. त्यांच्या इच्छेशिवाय राज्यातील पक्षाला कुठलेच निर्णय घेता येत नाहीत. त्यांची इच्छा प्रमाण मानूनच राष्ट्रवादी पक्ष चालत असतो. ही वास्तविकता असताना जयंत पाटील यांची नवी नेमणूक झाल्यावर जी घोषणा केली आहे, ती बुचकळ्यात टाकणारी आहे. येत्या काळात राज्यातील राष्ट्रवादीचा चेहरामोहरा बदलणार असल्याची भाषा त्यांनी केलेली आहे. त्याचा अर्थ त्यांना तरी कितपत उमगला आहे का?, अशी शंका येते. कारण मागल्या सोळा वर्षात पक्षाचा चेहरा कायम शरद पवार हाच राहिला आहे आणि त्याखेरीज अन्य दोन चेहरे कधीच अस्तंगत झाले आहेत. १९९९ सालात सोनिया गांधींना परकीय ठरवून पवार साहेब कॉग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत तारिक अन्वर आणि पुर्णो संगमा असे दोन चेहरे होते. आता अधूनमधून तारीक अन्वर दिल्लीत पवारांच्या सोबत दिसतात आणि महाराष्ट्रात तर अजितदादा व सुप्रिया सुळे वगळता पक्षाचा दुसरा चेहरा कोणी मागल्या दीड दशकात पाहिलेलाच नाही. मग चेहरामोहरा बदलणार म्हणजे नक्की काय, हे अद्याप दिसून आलेलं नाही!

कोणताही राजकीय पक्ष म्हणजे नेता नसून एक संघटना असते, असे खुलासा म्हणून सांगितले जाईल. पण राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून जो पक्ष ओळखला जातो, त्यात कार्यकर्ते कधी व कोणते होते? तिथे व्यक्तीनिष्ठेला पक्षनिष्ठा मानले गेलं आहे वा समजलं गेलं आहे. ज्यांची पवार साहेबांवर निष्ठा असेल, त्यालाच राष्ट्रवादीमध्ये स्थान असतं. कारण शरद पवार हाच पक्षाचा चेहरा राहिलेला आहे. बाकीचे सोयीनुसार वापरायचे मोहरे असतात, हे आजवरच्या पवारनितीने सिद्धच केलेले आहे. मग जयंत पाटील म्हणतात, त्यातला चेहरा बदलणार आहेत, की मोहरा बदलणार आहेत? गेल्याच लोकसभा विधानसभा निवडणूकीचा काळ घ्या. किती मोहरे इथून तिथे गेले? कोकणातले उदय सामंत किंवा केसरकर हे मोहरे शिवसेनेत गेले आणि कितीजण भाजपातही गेले? पण त्यामुळे राष्ट्रवादीचा चेहरा किंचितही बदलला नाही. पण जसजसे राजकारण उलगडत गेले, तसा खुद्द पवार साहेबांचा ‘मोहरा’ बदलत गेलेला महाराष्ट्राने पाहीला. लोकसभेपासून विधानसभेच्या प्रचारात पवारसाहेब सातत्याने भाजपाची अर्धी चड्डीवाले म्हणून टवाळी करीत राहिले आणि अर्ध्या चड्डीकडे राज्याचा कारभार सोपवणार काय, असा सवाल मतदाराला विचारीत राहिले. पण अखेरच्या क्षणी मतमोजणीतून निकाल स्पष्ट होताना त्यांनीच घाईगर्दीने राज्याचा कारभार अर्ध्या चड्डीकडे सोपवण्याचा उतावळेपणा केला. मात्र त्याचा फ़ारसा उपयोग झाला नाही. कारण राष्ट्रवादीची बाहेरून पाठींबा देण्याची ‘अर्धवट चड्डी’ परिधान करण्यातून अब्रु झाकली जात नाही, हे विनाविलंब मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘आवाजी’ घोषणेनेच तो पाठींबा नाकारला. म्हणजेच पवारांचा तो मोहरा वाया गेला. मात्र काहीही व कसेही घडले तरी राष्ट्रवादीचा चेहरा कायम राहिला आहे. मोहरे सातत्याने बदलत राहिले आहेत. म्हणूनच चेहरामोहरा बदलणार म्हणजे काय ते लक्षात येत नाही.

अर्थात या शंका विचारल्या जाणार याची जयंत पाटीलांना कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी शंकेपुर्वीच खुलासाही केला आहे. चेहरामोहरा म्हणजे पवारांचा चेहरा काढून दुसरा चेहरा आणायचा त्यांचा मानस नाही. तर केडरबेस्ड पक्ष बनवण्याचा त्यांचा विचार आहे. केडरबेस्ड म्हणजे कार्यकर्ता अधिष्ठित  संघटनेचा पक्ष असा अर्थ होतो. म्हणजे आजवर जो काही पक्ष म्हणून निवडणुका लढवत होता किंवा सत्ता उपभोगत होता, तो राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ताविहीन होता, याची कबुली जयंत पाटलांनी दिली आहे काय? असा सवाल विचारण्याचेही कारण आहे. काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात खुद्द पवारसाहेबांनीच शिवसेनेसारखे संघटन असायला हवे, अशी ग्वाही दिलेली होती. त्यात शिवसैनिक पोलिस ठाण्यात गेल्यास अधिकारी तात्काळ त्याची दखल घेतात. उलट आपला कोणी गेल्यास ढूंकून पाहिलं जात नाही, असंही सांगितलं होतं. तेव्हा साहेबांनी पक्षात आक्रमक, लढावू वा तळमळीच्या कार्यकर्त्यांची वानवा असल्याचीच अप्रत्यक्ष कबुली दिलेली होती. मग प्रश्न असा उरतो, की वीस पंचवीस वर्षे जो पक्ष चालला होता, त्यात होते कोण? ते काय करत होते? निवडणूकीचे इच्छुक व ठेकेदारीचे आशाळभूत एकत्र येऊन जमाव तयार झाला, त्यालाच राष्ट्रवादी पक्ष असे लेबल लावून कारभार चालू होता काय? पंधरा वर्षे सत्ता भोगताना कुणाला कार्यकर्त्याची गरज भासली नाही आणि निवडणूकीत दारूण पराभव वाट्याला आल्यावर केडरबेस्ड पक्षाची गरज वाटू लागली काय? त्यासाठी चेहरामोहरा बदलण्याची इच्छा झाली आहे काय? जयंत पाटील यांना अशा प्रश्नांची उत्तरं गंभीरपणे शोधणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभेतच नव्हेतर साखर कारखान्याच्या सहकारी राजकारणातही मतदार दुरावत गेला. त्यामागच्या गंभीर कारणाची मीमांसा करावी लागेल. कारण ह्या पराभवाला मुख्यत: तोच कार्यकर्ता कारणीभूत झाला, जो पक्षापासून दुरावत गेला होता.

चेहरामोहरा बदलायचा तर खेड्यापाड्यापर्यंत राष्ट्रवादी म्हणून जी गर्दी जमा झाली आहे व कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मिरवते आहे, त्यांचीच झाडाझडती घ्यावी लागेल. कारण खर्‍या कष्टाळू व निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षात येण्याचे मार्ग अशा मतलबी लोकांनी अडवून धरलेले असतात. मागल्या पंधरा वर्षात सत्तालोभी लोकांनी राष्ट्रवादी पक्षात इतकी गर्दी केली, की खर्‍या कार्यकर्त्याला तिथे स्थानच राहिले नव्हतं. पक्षाचे चेहरे म्हणून जे कोणी मोजके नेते असायचे, त्यांच्या भोवती अशाच लोभी मतलबी लोकांचा गराडा पडलेला असायचा. साहजिकच खर्‍या सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत जाण्याची सोयच उरलेली नव्हती. खेड्यापाड्यातल्या किरकोळ कामाचे वा मोठ्या टेंडर्सचे ठेकदार व त्यांचे बगलबच्चे दलाल, शुभ्र वस्त्रे परिधान करून कार्यकर्ता स्थानिक नेता म्हणून मिरवू लागले. त्यांच्या पैसा व दहशतीखाली गरीब सामान्य जनतेची मुस्कटदाबी होत राहिली. त्यांनीच मग राष्ट्रवादीला लागोपाठच्या मतदानात आपला हिसका दाखवलेला आहे. खरा कार्यकर्ता निराश व वैफ़ल्यग्रस्त होतो, तेव्हा ही स्थिती येते. एकेकाळी सामान्य कार्यकर्त्याला नावाने ओळखणारे व हाका मारून जवळ घेणारे राज्याचे संवेदनशील नेते, म्हणून पवारांचा उदय झाला होता. पण गेल्या काही वर्षात त्यालाच तडा गेला. चंद्रकांत तावरे यासारखे बुरूज सांभाळणारेच दुरावत गेले. चेहरा कायम राहिला आणि मोहरे मात्र उध्वस्त होत गेल्याने ही दयनीय अवस्था झालेली आहे. जयंत पाटील यांना ते ठाऊक नसेल असे अजिबात नाही. म्हणूनच त्यांनी चेहरामोहरा बदलण्याची भाषा वापरली असेल, तर त्यासाठी ठाम पावले उचलावी लागतील आणि चेहरे बाजूला ठेवून मोहर्‍यांची जोपासना नव्याने करावी लागेल. तरच केडरबेस्ड पक्षाची उभारणी शक्य आहे. पवारसाहेबांच्या चेहर्‍याचे मोठे फ़लक झळकवित फ़्लेक्सवरची मोहरे बनून बसलेली प्यादी कठोरपणे बाजूला करावी लागतील. तेव्हाच आगामी निवडणुकांसाठी सामोरं जाता येईल. ज्या काँग्रेस पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला गेलाय त्यांचा तरी विश्वास राष्ट्रवादीला संपादन करता येणार आहे काय?

- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

*लिंगपिसाट, कामासुर प्रज्ज्वल रेवन्ना...!*

"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...