"महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात त्या काळात जे काही घडलं होतं त्याला उद्देशून अत्रे यांनी हा लेख नक्कीच लिहिला नसावा. त्यातली खंत केवळ राजकीय नाही ती सर्वव्यापी आहे आणि आज असे अनुभवायला मिळते आहे की, ही खंत खरीच आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तृत्वाला आज जणू अवकळा आलीय. महाराष्ट्राची महानता मराठी माणूस मोडीत काढून जणू मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात अलौकिक बुद्धिमत्तेची माणसं गेल्या पन्नास वर्षात झाली नाहीतच असं म्हणता येणार नाही. पण सुमार बुद्धीच्या, सुमार कर्तृत्वाच्या माणसांनी महाराष्ट्राच्या पटावर कटीची स्थाने घेरून मांडलेल्या व्यूहाने मोठ्या माणसांच्या मोठ्या कर्तृत्वाचा गळा घोटला आहे. महाराष्ट्र एकेकाळी नररत्नांची खाण असल्यासारखा होता आणि तो होता तेव्हाच तो भारताचा आधार होता. महाराष्ट्राचा आत्मा त्याच्या शरीरात झोपी गेलाय की काय, अशी शंका त्यांना आली होती."
-----------------------------------------------
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र पुरुष आचार्य अत्रे यांची १३ ऑगस्टला जयंती होती. त्यावेळी त्यांचं काही साहित्य वाचावं म्हणून जुने लेख वाचत होतो. त्यातला 'महाराष्ट्र कालचा आणि आजचा' या शीर्षकाखाली एक वाचला त्यात त्यांनी म्हटलं होतं, "आम्हाला महाराष्ट्राबद्धल फार वाईट वाटते. अतिशय वाईट वाटते. काय या महाराष्ट्राच्या नशिबात आहे कांहीं कळत नाही. पण महाराष्ट्राचा भविष्यकाळ फार खडतर आहे यांत शंका नाही. कित्येकवेळा हा महाराष्ट्र नष्ट होणार की काय, असे सुद्धा आम्हाला भय वाटते..." राज्यातलं सध्याचं वातावरण, निवडणूक होण्याची शक्यता याची चिंता डोक्यावर घेऊन मी हे लिहितोय असं वाटलं ना तुम्हाला? प्रिय वाचकहो, तसं काही नाही! निवडणुकीत काय होणार याची मला मुळीच चिंता नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी कोलमडली अथवा सेना भाजप कोलमडली तरी त्याचं मला सुखदुःख नाही. भलती ओझी डोक्यावर घेऊन कशासाठी आपलं डोकं पिकवून घ्यायचं? कुणी आलं तरी आपल्याला जहागिरी मिळणार नाही की कांहीं मिळण्याचा प्रश्न नाही. पण राजकारणावर आपली बुद्धी इकडंतिकडं कलू न देता जे वाटेल ते, वाटतं तितक्या पोटतिडकीनं लिहायची आतां सोय उरली नाही. आजवर जे मी लिहिलं ते माझ्या मनाला पटलं म्हणूनच. प्रसंगी शरद पवारांबद्धल टीका करतानाच त्यांच्याबद्धल चांगलं ते चांगलं म्हटलं आहे. शरद पवारांची काम करण्याची तडफ, त्यांचा लोकसंपर्क, त्यांची सर्व प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची धडपड, प्रतिस्पर्ध्याचे मर्म हेरून नेमका त्यावर घाव घालण्याची त्यांची कुवत आणि राजकारणासाठी सर्वशक्तीनिशी झुंजण्याची त्यांची तयारी महाराष्ट्रातच नव्हे, तर साऱ्या भारतात अतुलनीय आहे. महाराष्ट्रात त्यांच्या जवळपासही येऊ शकेल असा कुणीही नेता सत्ताधाऱ्यांत नाही तसाच विरोधी पक्षातही नाही. मुंडे-महाजन ह्या जोडीनं काही प्रमाणात पवारांचंच अनुकरण करून काही काळापूर्वी पक्षाला ताकद दिली होती. पवारांना जसं त्यांच्या पक्षानं अडचणीत आणलं तसंच मुंडे महाजनांना त्यांच्याच पक्षाच्या सुमार कुवतीच्या पण फाजील महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी संकटात आणलं होतं. गाडीखालून चालणाऱ्या कुत्र्याच्या कुवतीच्या काही जणांनी पक्ष जणू आपल्याच बळावर चालतोय अशा मिजाशीत विरोध केला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. अशा या सामान्य बुद्धी-शक्ती-कर्तृत्वाच्या माणसांना आलेलं महत्व हीच महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वात दुःखाची आणि चिंतेची बाब आहे.
*महाराष्ट्राचा आत्मा जागवायला हवा*
या लेखात आचार्यांनी विविध क्षेत्रात फालतू मंडळींचे स्तोम वाढत असल्याबद्धलची चिंता व्यक्त केलीय. आचार्य अत्रे हा असामान्य कुवतीचा-बुद्धीचा माणूस होता. ढुंगणावर रेषा उमटली म्हणून हा माणूस मोठा झाला नव्हता त्यांचा मोठेपणा त्यांच्या बुद्धीच्या-परिश्रमाच्या आणि अचल निष्ठेनं केलेल्या प्रयत्नांच्या साक्षात पायावरच उभा होता. आचार्य या लेखात म्हणतात, "महाराष्ट्र हा लोकोत्तर बुद्धीचा पूजक आहे. सामान्य बुद्धीला, गुणाला अन कर्तुत्वाला महाराष्ट्रात मान नाही. ज्ञानेश्वर-तुकारामांपासून तो सानेगुरुजी नी विनोबा भावे यांच्यापर्यंत किंवा छत्रपती शिवरायांपासून तो लोकमान्य टिळक आणि विनायकराव सावरकरांपर्यंत गेल्या कित्येक शतकातील महाराष्ट्रातील देवघरातील सर्व दैवतं तुम्ही तपासून पाहा- प्रत्येक क्षेत्रामधील पाहा, प्रत्येक कार्यामधील बघा, अद्वितीय आणि अलौकिक अशा माणसांच्या चरणांवर महाराष्ट्रानं आपलं डोकं वाकविलं आहे. कोणत्याही क्षेत्रातला माणूस असो, त्याला बुद्धीच्या कसोटीवर महाराष्ट्रातली माणसं अगोदर घासून पाहतात, अन मग तो बावनकशी निघाला तरच त्याला महाराष्ट्रामध्ये मान मिळतो. अशी ही आजपर्यंतची महाराष्ट्राची परंपरा आहे. ज्यालाच आम्ही महाराष्ट्राचा आत्मा म्हणतो!..." हा महाराष्ट्राचा आत्मा नष्ट होणार, असं भय वाटून आचार्य अत्रे व्याकुळ झाले होते. आत्मा नष्ट झाला तर नुसते शरीर जगून काय उपयोग? असा प्रश्न त्यांना पडला होता. या गोष्टीला जवळजवळ ५० वर्षे होऊन गेली असतील. ह्या पन्नास वर्षात जे काही महाराष्ट्रात घडलं आहे ते आचार्य अत्र्यांना वाटणारी चिंता विसरावी अशी निश्चित नाही.
*भलते नखरे महाराष्ट्र चालू देत नाही*
"सामान्य बुद्धीची किंवा गुणांची माणसं प्रतिष्ठेला चढून जर ज्ञानाचा किंवा शहाणपणाचा भलताच आव इथं आणू लागली तर महाराष्ट्र त्याचे वाभाडे काढतो, त्याची भंबेरी उडवतो नी त्यांना साफ भिरकावून देतो. कुणाचे भलते नखरे महाराष्ट्र कधीच चालू देत नाही. विनाकारण कुणाचे फाजील लाड महाराष्ट्र कधीच करत नाही. सोंगाचा नि ढोंगाचा तर महाराष्ट्र कट्टर दुष्मन आहे. मंबाजी-तुंबाजी किंवा सालोमालो यांची या महाराष्ट्रात कधीच डाळ शिजणार नाही. प्रत्येक गोष्टीवर कठोर तर्काचा नि प्रखर वास्तवतेचा शोधक प्रकाश टाकवयाचा हा मुळी महाराष्ट्राचा स्वभावधर्मच आहे....लपवाछपवी मराठी माणसाजवळ नाही. जे मनांत येईल ते स्वच्छ आणि तसेच्या तसे सांगून टाकायचे. मग ऐकणाऱ्याला काय वाटेल किंवा त्याचे काय दुखेल याची मराठी माणसं पर्वा करत नाहीत...." अत्रे या लेखाच्या अखेरीस म्हणतात,' सत्य, स्वातंत्र्य, आणि क्रांती या उत्त्युच्च मानवी मूल्यांचा हव्यास जीवनात निर्माण करणारी 'अलौकिक बुद्धी' हा महाराष्ट्राचा खरा प्राण आहे. हा महाराष्ट्राचा आत्मा निस्तेज होत चालला आहे. आणि तो तसाच निस्तेज होत होत नष्ट होईल की काय, अशी आम्हाला भय वाटू लागले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आजकाल इतक्या क्षुद्र माणसांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि इतक्या सामान्य गुणांचा उदो उदो होऊ लागलाय, की केवळ असामान्यांची आणि अलौकिकांची पूजा करणाऱ्या ह्या महाराष्ट्राचा आत्मा त्यांच्या शरीरात झोपी गेला आहे काय, अशी शंका आम्हाला येते."
*मोठ्या माणसांच्या कर्तृत्वाचा गळा घोटला गेला*
हा लेख महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात त्या काळात जे काही घडलं होतं त्याला उद्देशून अत्रे यांनी नक्कीच लिहिला नसावा. त्यातली खंत केवळ राजकीय नाही ती सर्वव्यापी आहे आणि आज असे अनुभवायला मिळते आहे की, ही खंत खरीच आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तृत्वाला आज जणू अवकळा आलीय. महाराष्ट्राची महानता मराठी माणूस मोडीत काढून जणू मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात अलौकिक बुद्धिमत्तेची माणसं गेल्या पन्नास वर्षात झाली नाहीतच असं म्हणता येणार नाही. पण सुमार बुद्धीच्या, सुमार कर्तृत्वाच्या माणसांनी महाराष्ट्राच्या पटावर कटीची स्थाने घेरून मांडलेल्या व्यूहाने मोठ्या माणसांच्या मोठ्या कर्तृत्वाचा गळा घोटला आहे.
*हिशोब द्यायची देखील एक फॅशन झालीय*
महाराष्ट्राचे भाग्य विधानसभेवर निवडून येणाऱ्या २८८ लोकांच्या हातात आहे? ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खरोखरच महाराष्ट्राच्या कल्याणच्या प्रश्नावरच लक्ष दिले जाते? निवडून गेलेले विधानसभेत कितीवेळ असतात, काय बोलतात, कसे बोलतात याकडे मराठी माणूस कधी लक्ष देतो? आमदार म्हणून जे निवडून येतात ते करतात काय? याचा आढावा वर्षाच्या अखेरीस मतदार घेतात? काही आमदार आपल्या कामाचा हिशेब दरसाल आपल्या मतदारांना देतात ही गोष्ट खरी आहे, पण हा हिशोब द्यायचीसुद्धा एक फॅशन झालीय असा अनुभव अनेकांनी दिलेले हिशोब चाळल्यावर येतो. घडलेल्या कामाचे श्रेय उपटण्याचा आणि न झालेल्या गोष्टींची जबाबदारी झटकण्याचा प्रकार चतुराईने या हिशोबापत्रकात दिलेला असतो आणि ह्या पत्रिका दिमाखदार छापून घेण्यासाठी प्रायोजकदेखील मिळवलेले असतात. योजक आणि प्रायोजक मिळवण्याच्या खुब्या आत्मसात करणं हाही राजकीय हुशारीचाच भाग आहे. अशा खुब्या हेरणारे हुशार महाराष्ट्रात खूप पसरलेत.
*सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी*
मराठी भाषा, मराठी अर्थकारण, मराठी उद्योग, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी पत्रकारिता, या सर्व क्षेत्रातही मराठी राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार माणसं कटीवर स्थानापन्न झाली आहेत. ती गाजत आहेत. वाजत आहेत. पण महाराष्ट्राची मात्र सर्व क्षेत्रात पिछेहाटच होत आहे. शिखरापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग असतात. एक सरपटत सरपटत अडथळे टाळत वरपर्यंत जाण्याचा, दुसरा शिखराकडे झेपावून शिखरावर विराजमान होण्याचा. अशी झेप घेऊन शिखर गाठणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढा समाज जिवंत. तेवढे समाजात चैतन्य अधिक. कारंज्यात उडणारे पाण्याचे फवारे जसे सारखे वरवर जात असल्याचं भासतं, अशी उत्तुंग कर्तृत्वाकडे झेपावणाऱ्या माणसांची कारंजी समाजात असावी लागतात. कारंजातला वर झेपावणारा प्रत्येक थेंब काही क्षणातच खाली येत असतो, पण खालून वर उसळणारे दुसरे थेंब ह्या खाली येणाऱ्या थेंबांचे अस्तित्व जाणवूच देत नाहीत. ते त्याला वरवर झेलत ठेवतात. असा वर जाणाऱ्यांचा जोश खाली कोसळणाऱ्यांनाही सावरतो. निदान त्यांचे कोसळणे आपल्या पोटात सामावून टाकतो. अशी कारंजी आपोआप कुठं उसळतही असतील, पण ती घडवावी लागतात हेच खरं! हे घडविणारे असतात साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, भाष्यकार, प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घडविणारे कर्मवीर, महर्षी, महात्मे! महाराष्ट्र एकेकाळी अशा नररत्नांची खाण असल्यासारखा होता आणि तो जेव्हा तसा होता तेव्हाच तो भारताचा आधार होता. महाराष्ट्राचा आत्मा त्याच्या शरीरात झोपी गेलाय की काय, अशी शंका आचार्य अत्रे यांना आली होती. महाराष्ट्राचा आत्मा नक्की झोपलाय, त्याला झोपवण्याचे काम गेल्या पन्नास वर्षात पुरे झाले आहे, असं म्हणण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. थोडं मागं वळून बघितलं तर किरीतरी प्रेरणादायी माणसं आपल्याला दिसतात. सभोवताली असलेल्यात असे प्रेरणेचे जितेजागते स्रोत मात्र दिसत नाहीत. कवि अनिलांची एक कविता आहे. वारंवार आता तीच आठवते.
सारेच दीप कसे मंदावले आता।
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने।
असे कुठे तेज नाही
थिजले कसे आवाज सारे।
खडबडून करील पडसाद जागे।
अशी कुणाची साद नाही
सारे या द्या जीव या वाणीवर।
अशी वाणी निघत नाही
भावनांना चेव नाही
यौवना आव्हान नाही।
संघर्ष नाही, झुंज नाही
जावे ज्या मागे बेधडक।
असा झुंजार वीर नाही
कामी यावा देह जिथे।
असा रणसंग्राम नाही
प्रेते उठतील अशा।
मंत्राचा उदघोष नाही
आशांचा हिरमोड आणि बंडाचा बिमोड
सारी कडेच तडजोड होऊन
सारेच कसे सरदावले आता ।
हे दीप कसे मंदावले आता
- हरीश केंची
९४२२३१०६०९
सर वास्तव स्थिती मांडलीत तुम्ही!
ReplyDeleteसुंदर!
सुंदर मीमांस।।
ReplyDelete