Saturday 11 August 2018

अट्रोसिटीची दुरुस्ती! दलित मतांची गस्ती!!


 देशात आजवर महापुरूषांच्या विचारांना आपल्याला हव्या त्या साच्यात त्यांना ‘मोल्ड’ करण्याचे प्रकार भारतीय इतिहासात मोठ्या प्रमाणात घडले आहेत. आता याचाच पुढील अध्याय प्रतिकांच्या पळवा-पळवीच्या माध्यमातून समोर येतो आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार आपणच असल्याचा आव आणत आपापल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सध्या सुरू झाले आहे. आज घडणाऱ्या घटनांनी तर हे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. अट्रोसिटीची कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्षांची जी धांदल आणि त्रेधातिरपीट उडाली त्यानं सगळ्यांचीच गोची झालीय. एकाबाजूला आरक्षणाचा खेळ करतानाच त्यांच्यावरच्या अट्रोसिटीच्या कडक अंमलबजावणीचा डाव साधला गेलाय याचं भान त्यांना राहिलेलं नाही. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार बनण्याच्या संधीसाधुपणा दाखवला जातोय. केवळ मतांचा गठ्ठा डोळ्यासमोर ठेऊन घेतल्या जाणाऱ्या निर्णयानं देशात अस्वस्थता पसरलीय."
----------–--------------------------------

*दे* शात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशबांधवांना वंदनीय आहेत.  व्हाटसऍपसह सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ‘हिंदुंनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत‘च्या नावाने संदेश मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होत असतात. वास्तविक पाहता हा संदेश एका व्यापक प्रपोगंडाचाच एक भाग आहे. सोशल मीडियात याला भावनात्मक स्वरूप देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र बौध्दीक भ्रम निर्माण करत बाबासाहेबांचा वारसा ‘हायजॅक’ करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायजर’ यांनी मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेषांक प्रसिध्द केले होते. यातील पांचजन्यच्या विशेषंकाला ‘युगदृष्टा’ असे नाव देण्यात आलं होतं. यात संघाच्या अनेक विचारधारा या बाबासाहेबांच्या विचारांशी कशा सुसंगत आहेत याचीच पोपटपंची करण्यात आली होती. संघाने बाबासाहेबांचे विचार हे आपल्या ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ला लागू होत असल्याचा दावा केला होता. या अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीचे अवलोकन केले असता अनेक नाविन्यपुर्ण मुद्यांचा उहापोह करण्यात आल्याचं दिसून येतं. एका लेखात बाबासाहेब संस्कृतचे कसे समर्थक होते हे सांगण्यात आलेय. ते सामाजिक समरसतेचे समर्थक असल्याचेही विवेचन करण्यात आले आहे. गोळवलकर गुरूजींसारख्या संघ नेत्यांचे बाबासाहेबांबाबतचे गौरवोद्गार यात ठळकपणे देण्यात आले आहेत. सावरकरादींंसोबतच्या बाबासाहेबांच्या स्नेहाला यातून उजाळा देण्यात आलाय. काही दिवसांपुर्वी संघाने डॉ.आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत असे जातीप्रथा निर्मुलन, ‘एक गाव एक विहीर’ अशा योजना हाती घेतल्या होत्या. याचसोबत इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता गोळवलकर, सावरकर, मदनमोहन मालविय, शामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय ते थेट मोहन भागवत यांचे विचार बाबासाहेबांच्या विचारांशी जुळवण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद म्हणून सोडून देण्याइतका नक्कीच नाही. एका दीर्घकालीन रणनितीचा तो एक भाग असल्याचे स्पष्टपणे जाणवतं आहे.

*बाबासाहेबांच्या विचारांशी सलगीचा प्रयत्न*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांच्या वारशासी नाते जोडण्याचा प्रयत्न केला असतांनाच कॉंग्रेसनेही त्यांच्या बाबासाहेबांच्या विचारांचे आपणच पाईक असल्याचं विधान केलं होतं. उत्तरप्रदेशात मायावती यांनीही निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. याचाच अर्थ आता बाबासाहेबांच्या विचारांबद्दल एकदम आत्मीयता दाखविण्याच्या आड त्यांचे विचार आणि त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याची मांडणी करण्यात आल्याचे अधोरेखित झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाने आदिवासी समुदायांमध्ये आपली पकड घट्ट केली असली तरी अनुसुचित जातींमध्ये मात्र पक्षाचा पाया कच्चा आहे. भाजपचे विचार मनुवादी असल्याने दलित समूह भाजपपासून दोन हात दुरच राहिला असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे. म्हणायला पक्षाकडे अनेक दलित चेहरे आहेत. मात्र ते आपल्या समुदायाला प्रभावीत करतील इतके सक्षम नाहीत. अलीकडच्या काळात पक्षाला बिहारमध्ये रामविलास पासवान तर महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या रूपाने दोन मातब्बर नेत्यांची साथ मिळाली आहे. यातील पासवान हे आधीदेखील भाजपसोबत होते. ‘जिकडे सत्ता तिकडे पासवान’ असे समीकरण असल्याने भाजपला त्यांच्यावर फारसा भरवसा नाही. इकडे आठवले हेदेखील अधूनमधून भाजपला इशारे देत असल्याने पक्ष त्यांच्याबाबतही सावध आहे. यातच या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर दलित समाजातील मान्यतेचाही प्रश्‍न आहेच. या पार्श्‍वभुमीवर दलित नेत्यांसोबत राजकीय हातमिळवणी करत असतांना थेट या समुदायालाच आपलेसे करण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येत आहेत. यानुसार बाबासाहेबांच्या विचारांशी सलगी दाखविण्याचा आटापिटा सुरू झाला आहे.

*गांधी-पटेल भाजपनं पळविल्यानं काँग्रेसअस्वस्थ*
 इकडे सध्या अत्यंत गलीतगात्र अवस्थेत असणार्‍या कॉंग्रेस पक्षानेही बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आपणच असल्याचे दर्शविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. खरं तर या पक्षात आज नेतृत्वापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांमधील नैराश्याला दुर करण्याचे आव्हान आहे. कॉंग्रेसने पारंपरिकरित्या महात्मा गांधीजी यांच्यासह नेहरू-गांधी कुटुंबांच्या विचारांचे वारसदार म्हणून आजवर वाटचाल केली आहे. यात सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादुर शास्त्री, नरसिंहा राव आदींपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या कामगिरीला पक्षाच्या इतिहासात अल्प स्थान देण्यात आले आहे. राव यांच्या पार्थिवाला तर पक्ष कार्यालयात ठेवण्यासही नकार देण्यात आला होता. याचाच अर्थ असा की कॉंग्रेसने नेहरू-गांधी घराण्यापलीकडे विचार केला नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीतील दणकेबाज विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा वैचारिक वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कॉंग्रेस नेते हैराण झाले. भाजपने जोरदार मार्केटींग करून या दोन्ही महापुरूषांचे वारसदार असल्याचा आव तर आणलाच पण पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत नरसिंहा राव यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून कॉंग्रेसची गोची केली. भाजप नेते अधूनमधून लालबहादुर शास्त्री यांच्या महत्तेकडे कॉंग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात. यामुळे आता शास्त्रीजींचा वारसाही भाजप हिसकावणार की काय अशी शक्यता आहे. इकडे भगतसिंग यांनाही भाजपने आपलेसे केलेय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वंशजांची नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचे प्रकरण बाहेर काढले आहे. आता तर या प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी होत असल्याने कॉंग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. यातच संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे मोर्चा वळविल्यामुळे कॉंग्रेस नेतेदेखील खडबडून जागे झाले आहेत.

खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गात प्रतिगाम्यांप्रमाणे कॉंग्रेस पक्षानही अनेकदा अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. यामुळे त्यांनी कॉंग्रेस पक्षावर अत्यंत जळजळीत टीका केली होती हा इतिहास आहे. मात्र असे असुनही स्वातंत्र्योत्तर कालखंडात दीर्घ काळापर्यंत दलित समुदाय कॉंग्रेससोबत होता यामागे अनेक कारणे होती. एक तर या पक्षाला सक्षम विरोधक नव्हता. नव्वदच्या दशकानंतर भाजपचा पर्याय आला तरी हा पक्ष उघडपणे सवर्णांचा पाठीराखा असल्याने हा समुदाय कॉंग्रेससोबत होता. मात्र एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रादेशिक पातळीवर अनेक पर्याय उपलब्ध झाले. विशेषत: उत्तरप्रदेशात मायावती यांच्यामागे हा समुदाय ठामपणे उभा राहिला. गेल्या वर्षीच्या मोदी लाटेत कॉंग्रेस आणि बसपची वाताहत झाली असली तरी आगामी निवडणुकीसाठी दलितांच्या मतपेढीवर या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. अर्थात याचमुळे कॉंग्रेससोबत बहुजन समाज पक्षही सावध झाला आहे.

*साऱ्यांचे बेगडी डॉ.आंबेडकर प्रेम*
स्वतंत्र भारताच्या इतिहासात बसपने उत्तरप्रदेश सारख्या सरंजामी विचारधारेच्या राज्यात स्वबळावर मिळवलेल्या बहुमत हे अत्यंत आश्‍चर्यकारक मानले गेले. कांशिराम यांनी अत्यंत आक्रमकतेने आंबेडकरवादी विचार उत्तर भारतात पेरला तरी तो सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसा नव्हता. यामुळे ‘तिलक, तराजू और तलवार…इनको मारो जुते चार!’ अशी गर्जना केल्यानंतर बसपाने ‘तिलक, तराजू और तलवार…सब हो गये हाथी पर सवार!’ अशी सर्वसमावेशक भुमिका घेतली. देशाच्या इतिहासात प्रथमच दलित आणि सर्वणांची एकत्र मोट आवळत मायावतींनी सत्ता स्थापन केली. मात्र त्यांचा एककल्ली कारभार आणि अनेक घोटाळ्यांनी त्या अलोकप्रिय झाल्या. चतुर मुलायमसिंग यांनी याचा लाभ उचलला. यादव आणि मुस्लीमांचे ध्रुविकरण करत त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यातील जातीचे राजकारण थेट धर्मावर आणून ठेवले. मुजफ्फरपुर दंगलीसह वादग्रस्त मुद्यांमुळे भाजपला येथे अनपेक्षित यश मिळाले. आता २०१७ साली उत्तरप्रदेशची जी विधानसभा निवडणूक झाली त्यात दलित समुहाची निर्यायक भुमिका राहीली, आणि त्यांनी भाजपला जवळ केलं हे निश्‍चित. याचमुळे भाजप, कॉंग्रेस आणि बसपा या तिन्ही पक्षांनी बाबासाहेबांचा वारसदार आपणच असल्याचा पवित्रा घेतला आहे.मायावतींनी आयोजित केलेल्या सभेत भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार तोंडसुख घेतले. बसपाच्या दबावामुळेच व्हि.पी. सिंग सरकारने बाबासाहेबांना ‘भारतत्न’ दिल्याचा दावा त्यांनी केला. इतिहासातील दाखले देत त्यांनी कॉंग्रेस-भाजपचे आंबेडकरप्रेम बेगडी असल्याचा दावा केला. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींवर टीका करत त्यांनी बाबासाहेबांच्या नावे ‘पार्क’ उभारण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. याचसोबत त्यांनी आपल्या कार्यकाळात बाबासाहेबांचे महानिर्वाणदिन अर्थात ६ डिसेंबर रोजी राज्यात शासकीय सुटीची घोषणा केली होती. म्हणजे त्यांनीही राजकीय हिताचा विचार केलेलाच होता.

*आंबेडकरी विचार 'हायजॅक' केला जातोय*
 महत्वाची बाब म्हणजे देशातील बहुतांश राजकीय पक्ष हे दलितांचे हितकर्ते असल्याचे सांगतात. मात्र या समुहाच्या खर्‍या अर्थाने उत्थानासाठी कुणी फारसे प्रयत्न केले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यात आजही दलितांवर अत्याचार होतात. मात्र स्थानिक पातळीवरून आवाज उठण्यापलीकडे काहीही होत नाही. याला एकमेव कारण म्हणजे अलीकडच्या काळात या समुदायातून अखील भारतीय पातळीवर सर्वमान्य होईल असे नेतृत्व उभे राहिले नाही. बहुतांश नेत्यांनी विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करत आपापले सवतेसुभे उभे केलेत. महाराष्ट्रातील रिपब्लीकन पक्षाच्या विविध गटांचीही हीच शोकांतिका आहे. यामुळे आता दलित मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांच्या विचारांच्या वारसाची लढाई सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार हा काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. आज धर्म,भाषा, जाती, प्रांत, संस्कृती आदींवरून विभाजनाचे फुत्कार ऐकू येत असतांना ‘संविधान हेच सर्वश्रेष्ठ’ असल्याचा विचार देणारे बाबासाहेब हे भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ विचारक, समाजसुधारक आणि मानवतावादी आहेत हे कुणी नाकारू शकणार नाही. यासाठी कॉंग्रेस, भाजप वा बसपा वा अन्य कोणत्याही नेत्यांच्या प्रशस्तीपत्रकांची त्यांना आवश्यकता नाही. मात्र बाबासाहेबांचे विचार ‘हायजॅक’ करण्यामागील कावा सुज्ञ भारतवासियांनी ओळखला पाहिजे. भारताच्या इतिहासात गौतम बुध्द यांनी प्रथम समतेचा विचार मांडला तेव्हा सनातन्यांचे पित्त खवळले होते. अर्थात प्रयत्न करूनही बुध्दाची महत्ता कमी न झाल्याने त्यांना ‘अवतार’ मानण्यात आले. याचप्रमाणे समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक मध्ययुगीन संतांचेही दैवतीकरण करण्यात आले. खुद्द बाबासाहेबांनी याला नाकारले आहे. आता मात्र त्यांचे विचार निव्वळ राजकीय स्वार्थापोटी हिसकावण्याचा जो खेळ सुरू झालाय तो त्यांच्या दैवतीकरणाकडे तर जाणार नाही ना? हा प्रश्‍नही यातून उपस्थित झाला आहे. अट्रोसिटीचे पुरुज्जीवन हे कशाचं द्योतक आहे हे न समजण्याइटके दुधखुळे कुणी राहिलेलं नाही!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...