रामदास फुटाणे यांच्या कविता या सर्वसामान्यांना हसवत असल्या तरी, ते आनंददायी साहित्य नाही, पण आनंददायी साहित्यातून समाजाला काही मिळत नाही; ते फुटणेंच्या कवितेतून मिळते.त्यांची कविता गरिबांचं, असहाय्यताचं दुःख सांगते. सामाजिक चळवळींना समाजपरिवर्तनाची शक्ती देते. राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना भानावर आणते. हसविण्याबरोबरच नैतिकता शिकविते. विचार करण्याचं बळ देते. त्यांच्या प्रत्येक कवितेतून त्यांची दृष्टी कळते; तसंच समाजजीवनही कळतं." आज २६ ऑगस्ट रोजी सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात त्यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं त्यांची केलेली ही ओळख...!
--------------------------------------------
*हिरव्या रंगाचं, केशरी रंगाचं,*
*निळ्या रंगाचं रक्त,*
*बाजारात भरपूर उपलब्ध आहे!*
*पण लाल रंगाचं रक्त संपलंय,ही देशाची शोकांतिका आहे*
अशा आमच्या लिखाणाचा
खरंच त्यांना राग येईल
परंतु.... _'संपूर्ण सह्याद्री झाडाझुडपासह विकणे आहे'...._
अशी जाहिरात आली की,
महाराष्ट्रालाही जाग येईल...!
*वात्रटिकाकार नव्हे व्यंगकाव्यकार!*
व्यंगकाव्यकार रामदास फुटाणे यांच्या यासारख्या कविता आजही वाचताना त्यांच्यातील दूरदृष्टीचा सलाम करावा वाटतो. राजकारण्यांनी केवळ सह्याद्रीच नाही तर मुंबईतल्या कुलाब्यापासून नरिमन पॉईंटपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत काय काय विकायला काढलंय याची गणतीच नाही. त्यांच्या या विचारामुळे त्यांना *'महाराष्ट्राचा जागल्या'* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यांनी ज्या काही कविता लिहिल्या, तिला कुणी वात्रटिका म्हणतात, कुणी भाष्यकविता म्हणतात, फुटाणेंचा उल्लेख 'वात्रटिकाकार' असा जरी केला जात असला तरी ते स्वतःला _'व्यंगकाव्यकार'_ असंच समजतात. पण काहीही म्हटलं तरी त्यातलं निखळ कवित्व कधीच लपून राहात नाही. चिंतनाची बैठक आणि तीव्र संवेदनशीलता असल्याशिवाय विनोदी लेखनही करता येत नाही, हेच फुटाणे यांच्या कवितेतून दिसून येते. व्यंगकविता केवळ हसवणारी नसते, तर अनेकदा 'ब्लॅक कॉमेडी'प्रमाणे थोबाडीतही लगावते, याची प्रचिती फुटाणे यांच्या अनेक कवितांतून येते.
*फडकुलेसरांच्या सल्ल्याने कार्यक्रमांना प्रारंभ*
फुटाणे गेली तीसहून अधिक वर्षे कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जागल्याची भूमिका पार पाडत आहेत. छोट्या खेड्यापासून अमेरिकेपर्यंत त्यांनी _'भारत कधी कधी माझा देश आहे'_ हा कार्यक्रम सादर केलाय. ही कविता त्यांनी सर्वप्रथम १९८३ साली प्रसिद्ध केली पण सामाजिक विसंगती तीक्ष्णपणे दाखवून देणाऱ्या या कवितेचा कार्यक्रम त्यांनी १९८६ पासून करायला सुरुवात केली. ७ सप्टेंबर १९८६ फुटाणे यांचं राजकीय व्यंगकवितांवरील व्याख्यान सोलापुरात आयोजित करण्यात आलं होतं. सुमारे तासभर रंगलेल्या या व्याख्यानाचा विषय होता _'भारत कधी कधी माझा देश आहे'._ या व्याख्यानाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. निर्मलकुमार फडकुले हेही उपस्थित होते. डॉ. फडकुले यांच्यासारखा गंभीर प्रकृतीचा साहित्यिकही या व्याख्यानाने प्रभावित झाला. त्यांनी फुटाणे यांना, व्याख्यानाची लांबी वाढवून ते दीड तासाचा करण्याचा सल्ला दिला. फुटाणे यांनी तो सल्ला मानला आणि आज तीसवर्षांहून अधिक काळ लोटला _'भारत कधी कधी माझा देश आहे.....!_
*महाराष्ट्रभर कवितांचा जागर आरंभला*
_'भारत माझा देश आहे'_ या पाठयपुस्तकातल्या प्रतिज्ञेच्या अनुषंगाने वर्तमान स्थितीवर केलेले मार्मिक भाष्य या कवितेत आहे. देश, देशप्रेम, देशाभिमान वगैरे गोष्टींबद्धल खूप भाबडेपणाने बोललं जातं!परंतु कृतीच्या पातळीवर आनंदी आनंद असतो. तीसेक वर्षांपूर्वीची ही कविता आजच्या परिस्थितीतही तेवढीच समकालीन ठरते. एका व्यक्तीने केलेला कार्यक्रम सलग तीस वर्षांहून अधिक काळ सुरू राहतो, ही सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठी घटना आहे. मराठीतील काव्यवाचनाची परंपरा, तत्कालीन साहित्यिक वातावरण आणि अभिरुची यांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. विंदा करंदीकर, वसंत बापट, आणि मंगेश पाडगावकर यांनी महाराष्ट्रभर कवितेचा जागर सुरू केला होता. शालेय अभ्यासक्रमातल्या पाठयपुस्तकापुरत्या मर्यादित असलेल्या मराठी कवितेला रसिकवर्ग तयार होत होता. या तिघांनी मराठी कविता हजारो रसिकांपर्यंत पोहोचविली. करंदीकर, बापट, पाडगावकर यांच्यानंतर काव्यवाचनाची ही परंपरा पुढे नेली ती रामदास फुटाणे यांनी. त्यांना साथ होती फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आणि इतर बऱ्याच कवींची. फुटाणे यांच्या कवितेची प्रकृती अगदी भिन्न होती. वर्तमान, राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या छोट्या कविता फुटाणे यांनी लिहिल्या. १९८२ पासून ते साप्ताहिक 'जत्रा'मध्ये अशा कविता लिहीत होते. त्याआधी फुटाणे हिंदी कविता लिहीत होते. हिंदी कवी संमेलनातून सहभागी होत होते. त्यामध्ये त्यांची 'कटपीस' ही कविता गाजत होती. हिंदीप्रमाणे मराठीत विनोदी कवितांची संमेलने होत नव्हती. मराठीत वात्रटिकेची परंपरा असली तरी राजकीय व्यंगकविता नव्हती. फुटाणे यांनी वात्रटिकेचा बाज बदलून तिला राजकीय व्यंगकविता किंवा भाष्यकविता बनवलं. वरवर गमतीदार वाटणाऱ्या या कवितेचा आशय खूप खोल असतो. याबाबत पु.ल. देशपांडे म्हणतात, _'वरवर विनोदी वाटणाऱ्या या कवितांचं पाणी खूप खोल आहे'._
*फुटाणे यांचे शापित्व कवित्व प्रा.रा.ग.जाधव*
मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी फुटाणे यांच्या कवितेसंदर्भात केलेलं भाष्य खूप महत्वाचं आहे, ते म्हणतात, ' तुकोबा-रामदासांच्या कुलशीलाच्या एका धारेचे शिलेदार आहेत. ही धारा मनस्वी वृत्तीच्या संवेदनशील अशा सांस्कृतिक भाष्यकाराची आहे. तिला आध्यात्मिक उद्दिष्टांपेक्षा संस्कारलुप्त अशा मानवी शुद्रत्वाच्या तीव्र जाणिवेची आतली सल आहे. या प्रकारच्या देशीय दाहक धारेचं धनी होणं, हे खरं तर , शापित कलावंताचे भागधेय ठरते. 'शापित' अशा अर्थानं की, असा कवी अहोरात्र युद्धाच्या प्रसंगात गुरफटलेला राहतो. त्यातून त्याची कधीच सुटका होत नाही. मोठ्या कवित्वाचं मूळ अशा शापात असतं. रामदास फुटाणे या प्रकारचे शापित कवित्व होय.'
*चित्रकला शिक्षक ते व्यंगकाव्यकार*
फुटाणे हे मूळचे चित्रकला शिक्षक. चित्रपटाच्या वेडामुळे ते निर्माते बनले आणि 'सामना' चित्रपटाची निर्मिती केली. नंतरच्या 'सर्वसाक्षी' चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं. सामना चित्रपटाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. परंतु एका चित्रकला शिक्षकाने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांचं जे काही होतं, तेच फुटाणे यांचं झालं. ते कर्जबाजारी झाले. परंतु या दोन्ही चित्रपटाचं काही लाखाचं कर्ज त्यांनी केवळ कवितेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेडलं. हेही अभूतपूर्व म्हणायला हवं. _'भारत कधी कधी माझा देश आहे...'_ हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर १९९२-९३ च्या सुमारास त्यांनी या कार्यक्रमाची मोठी जाहिरात-होर्डिंग्ज महाराष्ट्रातल्या प्रमुख एसटी स्थानकावर लावली. त्यावर राजकीय, सामाजिक, व्यंगकविता लिहिल्या दलित आत्मकथनांच्या बहराच्या काळात , _'बामणांनी मटण महाग केलं, दलितांनी पुस्तक महाग केलं...'_ हे त्यांचं भाष्य खूप गाजलं. राजकपूर यांचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातील मंदाकिनीची दृश्य खूप चर्चेत होती त्यावर फुटाणे यांनी केलेलं भाष्य केवळ त्या चित्रपटापुरतं नव्हे, तर एकूण सामाजिक मानसिकतेवर प्रहार करतं.
_'उसवलेली संस्कृती,_
_हळूहळू फाटू लागते,_
_तेव्हा गावातील भिकारीनसुद्धा_
_मंदाकिनी वाटू लागते'._
या ओळींची तेव्हा खूपच चर्चा झाली.
*सामाजिक प्रबोधनाने आमदार बनवलं!*
राजकारण्यांना चिमटे काढत, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत हसत, हसवत मनोरंजन आणि प्रबोधन अशा दुहेरी पद्धतीने फुटाणे कार्यक्रम खुलवितात _'पंढरपूरची वारी आणि तमाशाची बारी'_ या दोन्ही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत. हा देश किर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही...' असं सांगत ते महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेची आठवण करून देतात . राजकीय व्यंगकविता लिहिताना ज्यांच्यावर कविता लिहिल्या त्यांनाही गंमत वाटली पाहिजे. कवितेनं कुणी जखमी होऊ नये, अशी त्यांची कविता; कधी पक्षपाती बनत नाही. उलट काँग्रेसच त्यांच्या टीकेचं सर्वाधिक लक्ष्य असते. काही वर्षांपूर्वी शरद पवार हे त्यांच्या कवितांचे मोठे गिर्हाईक होते. परंतु पवारांनीही अनेकदा स्वतःवरील टीकेचा आनंदाने आस्वाद घेतला. त्याच पवारांनी त्यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन विधानपरिषदेवर निवडून आणलं. अनामत रकमेव्यतिरिक्त एकही पैसा खर्च न करता विधानपरिषदेवर निवडून आलेले फुटाणे हे राज्याच्या इतिहासातले शेवटचे आमदार असावेत.
*जागतिक मराठी परिषदेतून कवींना स्थान*
फुटाणे हे केवळ कवी नाहीत, तर चांगले संघटकही आहेत. 'जागतिक मराठी परिषद' हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मराठी साहित्यातील ग्रंथ पुरस्कार जेव्हा दीडशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत होते, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन भैरूरतन दमाणी पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, फडकुले पुरस्कार असे घसघशीत रकमेचे पुरस्कार सुरू केले. पुणे फेस्टिव्हलमध्ये कवी संमेलन सुरू केलं. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर भ्रमंती करताना फुटाणे यांना गावोगावी नवे कवी भेटू लागले. पुण्यामुंबईपासून दूर आडबाजूलाही गंभीरपणे कविता लिहिली जाते आणि त्याची दखल कुठेच घेतली जात नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा कवींना पुण्या मुंबईत व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना त्यांनी केली माजी मंत्री प्रकाश ढेरे यांच्या सहकाऱ्यांच्या गंगा लॉज मित्रा मंडळ यांच्यावतीने १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीला कवी संमेलन आणि पुरस्कार सुरू केलं. गेली तीसेक वर्षे महाराष्ट्रातल्या नामवंत कवींना आवर्जून संधी दिली जाते. अशा कविसंमेलनाला नामवंत कवींना आमंत्रित केलं जातंच शिवाय नव्या कवींना आवर्जून संधी दिली जाते. या कविसंमेलनाला मोठी गर्दी होते.
*मनांत खदखदणाऱ्या क्षोभाचे दर्शन : अरुण साधू*
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांनी फुटाणेंच्या कवितेबद्धल म्हटलं आहे, ' फुटाणे यांच्या कवितेच्या रूपाने भारतातील सर्वसामान्य जनता देशाच्या धिंडवड्याकडे उघडया दिलाने पाहते. हे नुसतं तटस्थ निरक्षण नाही. निरीक्षणावर भाष्य करताना ही कविता या लोकांच्या व्यथा आणि खंत व्यक्त करते.आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात खदखदणाऱ्या क्षोभाचेही दर्शन घडविते. या कवितांमधून समाजाचं अत्यंत निराशाजनक आणि विदारक चित्र उभं राहतं असलं, तरी या सळसळणाऱ्या संतापामध्येच देशातील काळ्याकुट्ट अंधारातील प्रकाशाचा किरण दिसतो.
*हसण्याबरोबरच नैतिकता शिकवते!*
रामदास फुटाणे यांच्या कविता या सर्व सामान्यांना हसवत असल्या तरी, ते आनंददायी साहित्य नाही. पण आनंददायी साहित्यातून समाजला जे काही मिळत नाही; ते फुटाणेंच्या कवितेतून मिळते. त्यांची कविता गरिबांचं असहाय्यतांचं दुःख सांगते. सामाजिक चळवळींना समाजपरिवर्तनाची शक्ती देते. राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना भानावर आणते, हसविण्याबरोबरच नैतिकता शिकविते. विचार करण्याचे बळ देते. त्यांच्या प्रत्येक कवितेतून त्यांची दृष्टी कळते; तसंच समाजजीवनही कळतं. अशा या समाजाभिमुख साहित्यकाराचा आणि त्याच्या साहित्याचा, तसेच त्यांच्या जागलेपणाला अमृतमहोत्सवी वर्षात सलाम...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९
प्रभंजन साठीचा लेख....!
No comments:
Post a Comment