Friday, 17 August 2018

करुणानिधी: कलाईग्नर...!

'कलाईग्नर'म्हणजे कलेतील विद्वान! अशी ओळख असलेला नेता! देशात हिंदीचा प्रभाव गाजविणाऱ्या उत्तरभारतीयांच्या विरोधात उभं ठाकून, हिंदीविरोधी राजनीती स्वीकारून दक्षिण भारताच्या राजकारणावर, तामिळी लोकांवर करुणानिधी नावाचं गारुड जवळपास ७६ वर्षे वावरत होतं. दक्षिण भारतीय राजकारणातले प्रमुख विरोधी नेता म्हणून उभारी घेतलेले आणि त्याचबरोबर ब्राह्मणवाद विरोधी राजनीतीचे प्रतीक बनून राहिलेले करुणानिधी! त्यांचा कलेतील विद्वत्तेपासून राजकारणातील पितामह पर्यंतचा जीवन प्रवास अत्यंत रोचक असा राहिलेला आहे!"
------------------------------------------
द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके चे प्रमुख मुथुवेल करुणानिधी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानं दक्षिणी राजकारणातल्या एका प्रदीर्घ कालखंडाचा अंत झालाय. करुणानिधी देशातल्या सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक होते. पांच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले करुणानिधी हे ६० वर्षे विधानसभेचे सदस्य होते. गेल्या २६ जुलैला त्यांनी डीएमके चे प्रमुख म्हणून ५० वर्षे पूर्ण केले होते. राजकारणातली षष्ठयब्दी आणि पक्षप्रमुखपदाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे देशातले ते एकमेव नेते होते.

त्यांनी आपल्या किशोरावस्थेपासूनच सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला होता. त्यांची घरची सांपत्तिक स्थिती तशी फारशी चांगली नव्हती, पण विद्याभ्यासात विद्यार्थी म्हणून मात्र ते प्रचंड हुशार होते. त्यांचे कुटुंबीय तामिळनाडूतलं पारंपरिक वाद्य 'नादस्वरम' वाजवून आपलं गुजराण करीत. त्यामुळं संगीताप्रति त्यांची रुची असणं स्वाभाविक होतं. पण लहानपणी संगीत शिकण्यासाठी गेलेल्या करुणानिधी यांना जातीयवादाचा अनुभव यायला लागला. त्यांना त्यांच्या जातीमुळे फारशी वाद्ये वाजविण्याचे शिक्षण दिलं जात नव्हतं, यांचं त्यांना खूप त्रास होत होता. त्याचबरोबर कथित खालच्या जातीतल्या मुलांना कमरेच्यावर कोणतंही वस्त्र घालून मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, या साऱ्या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. जातीयतेचा विरोधात विद्रोह तेव्हापासूनच जागा झाला. त्या विद्रोहातूनच ते राजकारणाकडे आकृष्ट झाले. ते पेरियार यांच्या 'आत्मसन्मान' आंदोलनाशी जोडले गेले आणि द्रविडियन लोकांना आर्य ब्राह्मणांच्या विरोधी आंदोलनात सहभागी झाले. १९३७ साली तामिळनाडूत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणी विरोधात करुणानिधी उभे ठाकले. त्यावेळी ते फक्त १४ वर्षाचे होते. त्या आंदोलनात त्यांनी हिंदी विरोधी घोषणा लिहिल्या. त्या खूपच गाजल्या. तेव्हापासून राजकारणासह लेखनाच्या कारकीर्दीलाही प्रारंभ झाला.

करुणानिधी यांनी द्रविड आंदोलनापूर्वी विद्यार्थी संघटना 'तामिळनाडू तमिळ मनावर मंडलम' ची स्थापना केली. त्यानंतर १९४२ मध्ये 'मुरसोली' नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. त्यावेळी ते कोईम्बतुर इथं राहात आणि नाट्यलेखन करीत. त्यांच्या त्या धारदार लेखनशैलीनं पेरियार आणि अण्णादुराई यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याकाळी दक्षिण भारतातील राजकारणात पेरियार आणि अण्णादुराई ही जबरदस्त नावं होती. सी.एन.अण्णादुराई यांनी दक्षिण भारतातील ऐक्याच्या आधारे १९६२ मध्ये अलग 'द्राविडनाडू'ची मागणी केली होती. ती मागणी चिरडण्यासाठी मग वेगळा कायदा करावी लागला होता. करुणानिधी यांच्या लेखनशैलीनं प्रभावित झालेल्या या दोन राजकीय नेत्यांनी पक्षाचं मुखपत्र 'कुदीयारासु' याचं संपादक म्हणून जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नेत्यांत बेबनाव झाला त्यानंतर पेरियार आणि अण्णादुराई या दोघांचे मार्ग स्वतंत्र झाले. करुणानिधी यांनी अण्णादुराई यांच्यामागे जाण्याचा निर्णय घेतला. १९४९ मध्ये दोघांनी मिळून नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचं नांव ठेवलं 'द्रविड मुनेत्र कळघम - डीएमके' करुणानिधी पक्षाचे कोषाध्यक्ष बनले.

राजकारणाबरोबरच करुणानिधी यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि 'राजकुमारी' नामक चित्रपटात संवादलेखन केलं, त्या संवादांना लोकांनी डोक्यावर घेतले. त्या संवादातून त्यांनी सामाजिक न्याय आणि प्रगतिशील समाज यांच्यावर कोरडे ओढले होते. करुणानिधी पूर्णतः राजकारणाशी जोडले गेले होते तरी चित्रपट उद्योगाशी असलेलं नातं तोडलं नव्हतं. १९५२ मध्ये 'परासाक्षी' नावाचा चित्रपट बनवला तो चित्रपट आर्य ब्राह्मणवादाच्या विरोधी विचारधारेवर आधारित होता. चित्रपटाच्या घणाघाती संवादातून त्यांनी अंधविश्वास, धार्मिक कट्टरता, सामाजिक व्यवस्था यावर प्रहार केले होते.

१९४७ पासून थेट २०११ पर्यंत ते चित्रपट उद्योगाशी संबंधित होते. दुसरीकडं स्वतःची राजकीय खेळीकडे झेपावत पहिल्यांदा १९५७ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली. आणि तामिळनाडूतल्या कुलीथालई या मतदारसंघातून  ते विजयी झाले.तामिळनाडूच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून जाणाऱ्या पंधरा सदस्यांमध्ये एक  करुणानिधी होते. तर आयुष्यातील शेवटची निवडणूक २०१६ मध्ये थिरुवायूर इथून लढविली होती. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवून त्या सर्वच्यासर्व जिंकल्या

त्यानंतरच्या दशकात तामिळनाडूत जबरदस्त उलथापालथ झाली. १९६७ मध्ये त्यांचा पक्ष डीएमके ला राज्यात पूर्ण बहुमत मिळालं. अण्णादुराई पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर आजतागायत काँग्रेसला तिथं कधीच यश मिळालं नाही की त्यांचं पुनरागमन झालं नाही. त्याकाळात करुणानिधी नामक तारा तामिळनाडूच्या राजकारणात अखंडरित्या तळपत होता. अण्णादुराई यांच्या मंत्रिमंडळात अण्णादुराई आणि नेंदूनचेझियन यांच्यानंतरचे महत्वाचे स्थान करुणानिधी यांचे होते. डीएमकेच्या पहिल्या सरकारात करुणानिधी यांच्याकडं लोकनिर्माण आणि परिवहन खातं सोपविण्यात आलं होतं.

परिवहन मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील खासगी बस वाहतुकीचं राष्ट्रीयकरणं केलं आणि राज्यातल्या सर्व गावापर्यंत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभी केली. ती त्याच्या कार्यकर्तृत्वातली एक मोठी उपलब्धी समजली जाते. दुसरीकडं तमिळनाडूची सत्ता त्यांच्या हाती येण्यासाठी जणू आसुसलेली होती. सत्ता स्वीकारल्यानंतर दोनच वर्षानंतर १९६९ मध्ये अण्णादुराई यांचं निधन झालं. त्यानंतर करुणानिधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. १९७१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा करुणानिधी मुख्यमंत्री बनले. त्यांच्या समग्र राजकीय कारकिर्दीत १९६९-७१, १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-२०११ अशाप्रकारे ते पांच वेळा मुख्यमंत्री बनले.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे मित्र आणि महाराष्ट्रधर्म...!

"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...