Saturday 27 June 2020

संघ आणि गांधीजी...!

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संघटनांच्या सदाशयतावर एकतर्फी विश्वास ठेवायला गांधीजी तयार झाले होते. त्यांना वाटत होतं की या संघटनांचा वापर हा भारताच्या बहुलतावादी आत्मा आणि राष्ट्रहितासाठी अनुरूप संस्कारित केला जाऊ शकतो. याला काही लोक महात्मा गांधी यांचं भोळेपणा म्हणत होते. काही गांधीजींची दूरदर्शिता असं म्हणत होते. तर काही गांधीजींनी अतिरेक पूर्ण उदारता असं म्हटलं होतं. अशा लोकांनी गांधीजींचे पूर्ण भाषण ऐकलं होतं, ज्यात गांधीजीनी संघाच्या त्या सभेमध्ये महत्वपूर्ण विचार दिले होते. संघाच्या सभेत गांधीजींनी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली होती. ती ही होती की, "संघ एक सुसंघटित अनुशासित शक्ती आहे त्यांची शक्ती भारताच्या उपयोगात आणता येईल व त्याच्या विरोधही केलं जाऊ शकेल. संघाच्या विरोधात जे आरोप लावले जात आहेत यात काही सत्य आहे की नाही हे मी जाणत नाही. हे संघाचं काम आहे की त्यांनी आपल्या सुसंगत अशा कामांनी त्यांच्यावर होणारे आरोप खोटे सिद्ध करायला हवेत!"
-------------------------------------------------------------------

*गां* धीजींनी आपल्या जीवनात अनेक वेळा संघाच्या बाबतीत आपलं मत व्यक्त केलेलं होतं, पण संघाच्या शिबिरामध्ये जाऊन तिथं त्यांनी व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. ही १९३४ च्या डिसेंबरमधली घटना आहे. गांधीजींना त्यावेळी वर्ध्यात जमनालाल बजाज त्यांनी आमंत्रित केलेले होतं. गांधीजी बजाजांच्या एका दुमजली घरात मुक्कामाला होते. अगदी त्याच्या घरासमोर एक मोठं असं मैदान होतं. ती सारी बजाज यांची संपत्ती होती आणि त्यावेळी त्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिवाळी शिबिर सुरू होतं. जवळपास पंधराशेहून अधिक स्वयंसेवक या शिबिरासाठी सहभागी झाले होते. जवळपास आठवडाभर गांधीजींनी आपल्या खोलीतून उत्सुकतेनं या शिबिरातल्या स्वयंसेवकांचं निरीक्षण केलं. हे स्वयंसेवक अथक शारीरिक श्रम करत होते. त्यांनी ज्याप्रकारे मैदान साफ केलं, तंबू उभारले आणि ओबडधोबड मैदानाला एका विशाल आणि सुव्यवस्थित शिबिरस्थळाचं रूप दिलं होतं. हे सर्व पाहून गांधीजींना या शिबिराला भेट देण्याची, स्वयंसेवकांजवळ जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आपले सचिव महादेव देसाई यांना त्याबाबत व्यवस्था करायला सांगितलं. महादेवभाई देसाई यांनी संघाचे प्रमुख डॉ. हेडगेवार यांचे सहयोगी अप्पाजी जोशी यांच्याशी संपर्क साधला. अप्पाजी जोशी यांनी लगेचच गांधीजींना या शिबिरासाठी आमंत्रित केलं या घटनेची नोंद संघाचे मुखपत्र असलेल्या 'पांचजन्य' चे माजी संपादक देवेंद्र स्वरूप यांनी आपल्या एका लेखात केलेला आहे.

*संघ शिबिरात गांधीजींचा स्वयंसेवकांशी संवाद*
दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबर १९३४ रोजी सकाळी सहाच्या दरम्यान महात्मा गांधी त्या शिबिरात पोहोचले. त्यांनी तिथं जाऊन सर्वप्रथम जिथं जेवण बनवलं जातं त्या स्वयंपाकघराचं निरीक्षण केलं. जेवण बनवणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. बकाल स्वरूप त्याच्या त्या शिबिरामध्ये महात्मा गांधींनी शिबिरासाठी म्हणून खास करून जे प्रभाग तयार केले होते, त्याचीही त्यांनी पाहणी केली. ह्या शिबिराचा, स्वयंसेवकांच्या गणवेशाचा, भोजनाचा आणि निवासाची केलेली व्यवस्था आणि खर्च याची त्यांनी माहिती घेतली, तेव्हा त्यांना लक्षांत आलं की, हा सारा खर्च स्वयंसेवक स्वखर्चाने करत होते. आणि स्वयंसेवकांशी गप्पा मारताना लक्षांत आलं की, या स्वयंसेवकांना आपल्या एकमेकांची जातदेखील ठाऊक नव्हती. त्यादिवशी डॉक्टर हेडगेवार तिथं उपस्थित नव्हते. पण दुसऱ्या दिवशी ते स्वतः महात्मा गांधींनी शिबिराला भेट दिली हे कळल्यानंतर गांधीजींना भेटण्यासाठी ते वर्ध्यात बजाजांच्या घरी आले. संपूर्ण गांधी वाङ्मयात याचा कुठे उल्लेख दिसत नाही. पण तब्बल जवळपास तेरा वर्षानंतर संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करणाऱ्या महात्मा गांधी यांनी स्वतः ही गोष्ट स्पष्ट केली होती.

*गांधीजी विरोधकांशीही संवाद साधत*
भारताच्या फाळणीच्या काळात सांप्रदायिक उन्माद प्रचंड प्रमाणात वाढला होता. सगळीकडे दंगलीच्या, खून खराबा याच्याच बातम्या येत होत्या. हिंदू , मुसलमान आणि शीख यांच्याशी संबंधित संघटना आणि अनौपचारिक असे समूहगट ह्या भूमिका बजावत होत्या. या दरम्यान गांधीजींजवळ संघाच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या. गांधीजींचा स्वभाव हा केवळ ऐकीव बातम्यांवर, गोष्टीवर विश्वास ठेवणारा नव्हता. ते हलक्या कानाचे नव्हते. ती त्याची खासियत होती. ते आपल्या विरोधक असलेल्यांशीही ते संवाद साधत आणि त्याबाबतीत ते तत्पर असत. म्हणून हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही त्यांचा कुठलंही पूर्वग्रह दूषित असं मत नव्हतं. नोव्हेंबर १९४७ मध्ये जेव्हा काठीयावाडमध्ये काही दंगलीच्या घटना घडल्या तेव्हा गांधीजींकडे एकाच घटनेच्या दोन परस्परविरोधी बातम्या आल्या होत्या. ३ डिसेंबर १९४७ ला प्रार्थनासभेत गांधीजी श्रोत्यांना संबोधित करताना म्हणाले होते की, "सध्या घडणाऱ्या घटनांबाबत काँग्रेसमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे की, काँग्रेसवाले असं करत नाहीत. हिंदू , हिंदू महासभा आणि संघाच्या लोकांचं म्हणणं असं होतं की ते मुसलमानांना कोणतीही इजा पोहोचत नाहीत. ते कोणतंही नुकसान करून करत नाहीत, त्यांनी कोणाचंही घर जाळलं नाही.अशावेळी मी कुणाचं ऐकू? काँग्रेसची, मुसलमानांची, हिंदुमहासभेची की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची? आपल्या देशात असं झालंय की, खरं काही समजणं खूप अवघड होऊन बसलं आहे." इथं लक्षांत येतं की, गांधीजी कधीही कुणाबद्धल कोणतंही मत बनवत नाहीत. कुणाबद्धलही दुराग्रह बाळगत नाहीत. त्यांनी नेहमीच संवादावरच विश्वास ठेवलाय. चर्चेनेच मार्ग सुटतात ही त्यांची धारणा होती. हिटलरशी पत्रांच्या माध्यमातून, मुसोलिनींना इटलीत जाऊन भेटणाऱ्या गांधीजींनी सावरकर आणि गोळवलकर या दोघांशी संवाद सुरू ठेवलेला होता. संघाच्या भेटीमागे आजवर जे ज्ञात होते त्याहून अधिक संघाला समजून घेण्यासाठी, त्यांची कार्यपद्धती पाहण्यासाठी आणि संघ स्वयंसेवकांना भेटण्यासाठी, संवाद साधण्यासाठी तब्बल १३ वर्षानंतर पुन्हा एकदा १६ सप्टेंबर १९४७ रोजी संघाच्या स्वयंसेवकांच्या सभेत जाण्याचा निर्णय गांधीजींनी कदाचित निर्णय घेतला असेल, असे दिसते. त्यावेळी गांधीजी दिल्लीच्या भंगी वस्ती मध्ये राहत होते आणि संघाचा कार्यक्रमही तिथेच आयोजित करण्यात आला होता. गांधीजींनी आपल्या भाषणात संघाच्या स्वयंसेवकांना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गांधी म्हणाले होते, "काही वर्षापूर्वी मी वर्ध्यामध्ये संघाच्या एका शिबिरात गेलो होतो. तेव्हा संघाचे संस्थापक हेडगेवार हे जिवंत होते. स्वर्गीय जमनालाल बजाज यांनी मला त्या तिथल्या संघाच्या शिबिरात नेलं होतं आणि तिथं मी स्वयंसेवकाचं कडक अनुशासन, साधेपणा आणि अस्पृश्यतेला दिलेली सोडचिठ्ठी पाहून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. तेव्हापासून माझी संघाबाबतची उत्सुकता वाढली होती. मी असं नेहमी मानत आलो आहे की, जी संस्था सेवा आणि आत्मत्याग या आदर्शानं प्रेरित असेल तर त्यांची ताकद ही वाढणारच असते. परंतु त्याचा सच्च्या स्वरूपात उपयोग व्हावा. त्याबरोबरच पवित्रता आणि स्वतःच्या ज्ञानाचं संयोजनही आवश्यक आहे. अशा प्रकारचा त्याग या दोन्ही बाबींचा अभाव असेल तर समाजासाठी ते अनर्थकारी सिद्ध झालेलं आहे.

*मी सनातनी हिंदू: गांधीजी*
त्या सभेत महात्मा गांधींचे स्वागत करताना संघाच्या एका नेत्यानं गांधींना 'हिंदू धर्मात जन्म घेतलेली एक महान व्यक्ती' असं संबोधलं होतं. संघाच्या त्या कार्यकर्त्यानं गांधीजींचा ज्या पद्धतीनं उल्लेख केला, त्या संदर्भात गांधींजींनी हिंदू धर्माचा सार सांगताना म्हटलं होतं की, "मी असा दावा करतो की, मी सनातनी हिंदू आहे. मी 'सनातन' या शब्दाचा मूळ अर्थ जो आहे तो मी इथं घेतोय. हिंदू शब्द हा सहीसही मुळातला आहे का? हे कुणी कुणालाच माहिती नाही. कारण हा शब्द आपल्याला दुसऱ्यांनी दिलेला आहे आणि दुसऱ्यांनी तो आपल्या स्वभावानुसार सोपवला आहे. हिंदू धर्मानं जगातल्या सर्व धर्माच्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत, स्वीकारल्या आहेत. म्हणून हा काही वर्जनशील धर्म होत नाही. त्यामुळं इस्लाम धर्म वा इस्लामधर्मीय अनुयायांशी भांडण होऊ शकत नाही.जसं सध्याच्या काळात चालू आहे.!" "हिंदुनी हे समजून घेतलं पाहिजे की हिंदुस्थानात केवळ हिंदूंनाच राहायला हवंय, दुसरं कुणी राहायला नकोय आणि गैर हिंदु म्हणजे खास करून मुसलमानांना इथं राहायचं असेल तर त्यांनी हिंदूंचे गुलाम म्हणून राहिलं पाहिजे! असं घडलं तर ते हिंदू धर्माचा नाश करताहेत असं दिसून येईल. आणि याच प्रकारे जर पाकिस्तानातल्या लोकांनी जर पाकिस्तानात फक्त मुसलमानांसाठीच जागा आहे आणि गैर मुसलमानांना गुलाम बनवले गेलं तर हिंदुस्थानातुन इस्लामचं नामोनिशान संपलं जाईल!"

*गांधीजी-गोळवलकर गुरुजींची भेट*
गांधीचे पुढे म्हणाले की, "काही दिवसापूर्वी मी आपल्या गोळवलकर गुरुजी यांची भेट घेतली होती, त्यांनी सांगितलं होतं की, कलकत्ता आणि दिल्लीच्या जातीय दंगलीबाबत संघाच्या बाबतीत ज्या काही तक्रारी माझ्याकडं आल्या होत्या त्यांनी त्यांच्या कानावर टाकल्या. गुरुजींनी त्यावेळी मला त्याला आश्वासन दिलं होतं की, ते संघाचे प्रत्येक सदस्याचं उचित आचरण असेलच वा तो योग्यरीत्या वागेल याची खात्री देऊ शकत नाही, जबाबदारीही घेऊ शकत नाही. तरीही संघाची नीती हिंदूंची आणि हिंदू धर्माची सेवा करण्याची मात्र आहे. ते इतर दुसऱ्या कुणाला नुकसानकारक काम करणार नाहीत. संघ कधीच आक्रमणावर विश्वास ठेवत नाही. अहिंसेवर त्याचा विश्वास नसला तरी आत्मरक्षा कशी करावी हे मात्र संघ शिकवतो. प्रतिशोध घेणं हे इथं शिकवलं जात नाही." वस्तुतः काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी आणि डॉक्टर दिनशॉ मेहता यांच्या मध्यस्थीनं गोळवळकर गुरुजी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबाबत १२ सप्टेंबर १९४७ च्या प्रार्थनासभेत गांधीजीनी म्हटलं होतं की, "मी असे ऐकलंय की संघाच्या हातून काही रक्तरंजित घटना घडल्या आहेत. त्यावेळी गुरुजींनी मला आश्वासन दिलं होतं की, ही गोष्ट खोटी आहे त्यांची संस्था-संघ कोणाच्याही विरोधात नाही त्यांचा उद्देश मुसलमानाचे हत्या करण्याचा नाही. केवळ आपल्या सामर्थ्यावर हिंदुस्थानची रक्षा करायची हाच त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा उद्देश इथं शांतता प्रस्थापित करण्याचा आहे! गुरुजींनी मला जे सांगितलं, त्यांचा तो विचार घेऊन त्यांच्या विचार मी तुमच्यासमोर सांगतो आहे!" त्यानंतर गांधीजींनी ही चर्चा 'हरिजन' या साप्ताहिकात प्रसिद्ध केली होती. काही असू द्या तेव्हा हिंदू महासभा आणि संघ यांची प्रतिमा मुसलमान विरोधी झालेली होती आणि हिंदू धर्म याचा अर्थ देखील राजनैतिक स्वरूपात घेतला गेलेला होता. हिंदुस्थान हा केवळ हिंदूंचा देश होण्याचा आग्रह आणि प्रभाव सर्वसामान्यांवर पडला होता. तेव्हा दुसरीकडं महात्मा गांधी सर्वसमावेशक आणि सहअस्तित्व असलेला हिंदू धर्म याची चर्चा करीत होते. ते 'केवळ हिंदुस्थान हिंदूंसाठी' या विचाराचीही त्यांनी टीका केली होती. यासाठी ते हिंदूमहासभा आणि संघ यांचं लक्ष बनवलेलं होतं.

*आपण दोषविरहीत राहायला हवंय*
१६ सप्टेंबर रोजी संभाजी संघाच्या एका सभेत पुन्हा एकदा हिंदू धर्मावर आपला विचार सांगताना त्यांनी म्हटलं होतं की, "मला म्हटलं जातं की तुम्ही मुसलमानांचे दोस्त आहात आणि हिंदू आणि शिख यांच्या दुश्मन! हे खरं आहे की, मुसलमानांशी माझी दोस्ती आहे जसे पारशी लोकांशी आणि इतर लोकांशीही आहे. असा तर मी माझ्या वयाच्या १२ व्या वर्षापासूनच आहे, पण जे लोक मी हिंदू आणि शिखांचे दुश्मन आहे असं म्हणतात मला समजून घेत नाहीत. मी कधीही कोणाचाही दुश्मन होऊ शकत नाही. हिंदु आणि शीख यांचा तर अजिबात नाही!" या भाषणानंतर संघाच्या स्वयंसेवकांना गांधीजींनी प्रश्न केला 'हिंदू धर्म हा पापी लोकांना मारण्याची परवानगी देतो का की नाही? जर देत नसेल तर गीताच्या दुसऱ्या अध्यायात भगवान कृष्ण यांनी कौरवांचा नाश करण्यासाठी उपदेश का देत आहेत? त्यांचा तो उपदेश आज कशा प्रकारे घेतला जाईल?' पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात गांधी म्हणाले की, 'हिंदू धर्मात त्या संदर्भात परवानगी आहेही आणि नाहीही! पुण्यवंताला मारण्याचा प्रश्न येईल तेव्हा आपण असा निर्णय घेतला पाहिजे की ह्यात पापी कोण आहे? दुसऱ्या शब्दात आधी आपण स्वतः दोष विरहित बनायला हवे. तेव्हाच अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. जो स्वतः पापी आहे तो दुसऱ्याला सजा देण्यासंदर्भात निर्णय कसा घेऊ शकतो? त्याबाबतचा अधिकार कसा प्राप्त होऊ शकतो?' ते पुढे म्हणाले की, 'दुसरा प्रश्न आहे पापी लोकांना सजा देण्याचा अधिकार जो गीतेमध्ये सांगितले गेलाय, त्याचा प्रयोग केवळ योग्य नाही तो केवळ सरकारचा अधिकार आहे. हे सरकार आपणच आणलेलं आहे. आपण स्वतः निर्णय घ्यायचा आणि स्वतःलाच सजा द्यायची तर सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे दोघेही विवश होऊन जातील. दोघेही देशाचे मान्यवर असे सेवक आहेत त्यांना आपली सेवा करू द्या. कायदा आपल्या हातात घेऊन त्यांच्या त्या प्रयत्नांमध्ये अडचणी उभा करणे योग्य नाही!'

महात्मा गांधीजींचेसुद्धा या विषयावरील स्वतंत्र चिंतन आहे. ‘हिंद स्वराज्य’, या पुस्तकात ते प्रकट झाले आहे. गोरे इंग्रज गेले आणि त्याची जागा काळ्या इंग्रजांनी घेतली, तर त्याला स्वराज्य म्हणता येणार नाही, असे गांधीजी पुस्तकात सांगतात. म्हणून आपण कोण आहोत, आपली संस्कृती कोणती, आपली विचार परंपरा कोणती, अहिंसेचे आपल्या जीवनातील स्थान कोणते? यांत्रिकीकरण, भोगवाद, भांडवलशाही, या विदेशी कल्पना जशाच्या तशा आपल्याला घेता येतील का? आणि जर घेतल्या तर भारत, भारत राहील का? हे गांधीजींचे प्रश्न आहेत. संघ सुरू करत असताना डॉ. हेडगेवारांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केला की, आम्ही कोण आहोत? आमचे स्वातंत्र्य का गेले? स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आम्हाला काय केले पाहिजे? डॉ. हेडगेवारांनी मार्ग धरला, हिंदू संघटनाचा. हा देश हिंदूंचा आहे. हिंदू संस्कृती ही या देशाचा प्राण आहे. धर्म या देशाचा आत्मा आहे. म्हणून हे हिंदूराष्ट्र आहे. हिंदूराष्ट्राची अनुभूती एकेका हिंदूमध्ये जागी केली पाहिजे.

*हिंद स्वराज्य’मध्ये त्यांचा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा*
गांधीजींनी रुढार्थाने ‘हिंदू संघटन’ हा शब्द कधी वापरला नाही. ‘हिंदूराष्ट्र’ हा शब्ददेखील त्यांच्या लिखाणात सापडत नाही. पण ते स्वतःला ‘कट्टर हिंदू’ म्हणवून घेतात. हिंदू धर्माचा त्यांना ज्वलंत अभिमान आहे, असे तेच सांगतात. ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकात हिंदूंची सांस्कृतिक मूल्ये आणि त्याच्या समोरील आव्हाने याची ते चर्चा करतात. पुस्तकाला नाव मात्र ‘हिंदू स्वराज्य’ असे देत नाहीत, ‘ राजकीय चळवळ उभी करायची होती. चळवळीत सर्वांना सहभागी करून घ्यायचे होते. इंग्रज, मुसलमानांना राजकीयदृष्ट्या वेगळे पाडण्यात यशस्वी झाले होते. मुसलमानांचे राजकीय हितसंबंध हिंदुपेक्षा वेगळे आहेत, ही गोष्ट त्यांनी मुसलमानांच्या मनात भरविली. मुसलमानांना बरोबर घेतल्याशिवाय राजकीय आंदोलन शक्य होणार नाही, म्हणून गांधीजींनी मुसलमानांना जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांची खिलाफत चळवळ आपली मानली. त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या त्यांनी मान्य करायला सुरुवात केली. आपण मोठे भाऊ आहोत आणि मुसलमान लहान भाऊ आहेत, त्यांना सांभाळून घेतले पाहिजे, असे त्यांनी मानले. मुस्लीम समाजाची मानसिकता, त्यांनी जगभर साम्राज्य निर्माण केल्यामुळे वेगळ्या प्रकारची झाली आहे. ते आडदांड असतात, अशा प्रकारचे मत त्यांनी नोंदविले आहे. हिंदी समाजाचा विचार करता गांधीजींनी काही गोष्टी अद्भुत केल्या आहेत. डरपोक हिंदूंना त्यांनी निर्भय हिंदू करण्यात यश मिळविले. त्यासाठी आपल्याला बारडोलीचा सत्याग्रह, देशभर झालेला मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, यात भाग घेणार्‍या हिंदूंच्या धैर्य आणि शौर्याच्या कथा वाचाव्या लागतील. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे, आपली भगवद्गीता, आपली उपनिषदे, आपले तत्त्वज्ञान याविषयी समाजात फार मोठी जागृती केली. गांधीजी म्हणत असत की, “भगवद्गीता माझी आई आहे. ती माझ्या प्रश्नांची उत्तरे मला देते. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात. मानवी सेवेचा संदेश संतांची चरित्रे देतात.” अनेक बुद्धिमान तरुण या विषयाकडे वळल्याचे लक्षात येते. आचार्य विनोबा भावे हे त्यातील एक होते. आचार्य नरेंद्र देव, आचार्य शंकरदेव, दादा धर्माधिकारी, यांचे वर्णन जसे गांधीवादी या शब्दाने करतात, तसेच ते हिंदू तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असे करता येते.

*गांधीजींचं उपोषण आणि सात अटी...!*
१५ नोव्हेंबर १९४७ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत गांधीजीनी हाच विचार दुसऱ्यांदा मांडला ते म्हणाले की, "मी संघाच्या बाबतीत बर्‍याच काही प्रतिकूल गोष्टी ऐकतो आहे. आज घडणाऱ्या अनेक दुर्दैवी घटनांच्या मागे संघ आहे. आपण हे विसरता कामा नये की, लोकमतामध्ये हजारो तलवारीपेक्षाही जास्त प्रबळ शक्ती असते. हिंदुधर्माची रक्षा ही केवळ रक्तपात आणि हत्या केल्यानं होत नाही. आता आपण सारे स्वतंत्र आहोत, आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं आहे. असंच आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्यामध्ये माणुसकी असते. तुम्ही सक्षम आहात, नेहमी जागरूक आहात पण एक दिवस असा येईल आपण चूक करत आहोत त्यानं आपल्याला पश्चाताप होईल! त्यामुळे हा सुंदर असा पुरस्कार आपल्या हातून निघून गेलेला असेल. मी आशा करतो एक दिवस असा येईल!' अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर १९४७ ला पुन्हा सभेमध्ये गांधीजी म्हणाले होते की, "हिंदुमहासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या बाबतीत जे काही मला सांगावं लागलं आहे त्यांनं मला खूप दुःख होतंय. मी दुःखी होतो, माझी चूक मला समजली होती. मी संघाच्या प्रमुखांशी भेटलो, संघाच्या बैठकीत सहभागी झालो, तेव्हापासून मला त्यांच्या बैठकीत जाण्यापासून रोखण्यात येतेय. माझ्याकडे संघाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारीची पत्र आलेली आहेत!" सांप्रदायिक दंग्यासाठी, त्या रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी १३ जानेवारी १९४८ ला महात्मा गांधीजींनी उपोषण करण्याची घोषणा केली. सहा दिवस उलटत नाहीत तेव्हा त्यांच्या पोटाचं दुखणं सुरू झालं. १८ जानेवारीला देशाच्या विविध संघटना ज्यात हिंदू-मुसलमानांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. अशा शंभराहून अधिक प्रतिनिधींनी भेट घेऊन उपोषण मागं घ्यावं अशी विनंती केली, तेव्हा गांधीजींनी सात अटी टाकल्या त्या सर्वांनी सर्वच्या सर्व सात अटी मान्य केल्या आणि सांप्रदायिक सौहार्द स्थापित करण्यासाठी एक घोषणा पत्रावर सह्याही केल्या. यात संघाचे स्वयंसेवक ही सहभागी झाले होते. झोपूनच गांधीजी म्हणाले की, "जी प्रतिज्ञा मी केली होती ती पूर्ण करण्यासाठी काहीसा वेळ लागेल असं वाटत होतं. पण हे दिल्लीच्या नागरिकांनी त्यात हिंदू महासभा आणि संघाच्या नेत्यांचाही सहभाग असल्यानेच, त्यांच्या सद्भावना यामुळे हे अपेक्षित वेळपूर्वीच पूर्ण झालं." म्हणजे आपल्या निधनाच्या केवळ बारा दिवस आधी महात्मा गांधी हिंदू महासभा आणि संघाच्या प्रति असलेल्या आपल्या सर्व पूर्वग्रहदूषित मतांना, विचारांना एका बाजूला सोडून द्यायला तयार झालेले होते!

*भारतीय लोकांत संवाद कमी होत चाललाय*
आणि या दोन्ही संघटनांच्या सदाशयतावर एकतर्फी विश्वास ठेवायला तयार झाले होते. त्यांना वाटत होतं की या संघटनांचा वापर हा भारताच्या बहुलतावादी आत्मा आणि राष्ट्रहितासाठी अनुरूप संस्कारित करत जाऊ शकतं. याला काही लोक महात्मा गांधी यांचं भोळेपणा म्हणत होते. काही गांधीजींची दूरदर्शिता असं म्हणत होते. तर काही गांधीजींनी अतिरेक पूर्ण उदारता असे म्हटलं होतं. अशा लोकांनी गांधीजींचे पूर्ण भाषण ऐकलं होतं, ज्यात गांधीजीनी संघाच्या त्या सभेमध्ये महत्वपूर्ण दिलं होतं. संघाच्या सभेत गांधीजींनी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली होती. ती ही होती की, "संघ एक सुसंघटित अनुशासित शक्ती आहे त्यांची शक्ती भारताच्या उपयोगात आणता येतात व त्याच्या विरोधही केलं जाऊ शकतं. संघाच्या विरोधात जे आरोप लावले जात आहेत यात काही सत्य आहे की नाही हे मी जाणत नाही. हे संघाचं काम आहे की त्यांनी आपल्या सुसंगत अशा कामांनी त्यांच्यावर होणारे आरोप खोटे सिद्ध करायला हवेत!" या दरम्यान गांधीजींचे सचिव राहिलेले प्यारेलाल यांनी आपल्या 'गांधीजी द लास्ट फेज' पुस्तकात म्हटलं आहे की, त्यात एक प्रसंग रेखाटला आहे गांधींबरोबर राहणाऱ्या लोकांमधील काही लोकांनी त्यांना सांगितलं, संघाची मंडळीनी वाह शरणार्थी शिबिर, ज्यात हिंदू आणि शीख अशा दोघांचं शिबिर होतं त्यात त्यांनी खूप चांगलं काम केले आहे. अनुशासन, साहस आणि कठीण असं कष्टदायक असं काम केलंय आणि आपल्या क्षमतेचा त्यांनी लोकांना परिचय करून दिला. यावर गांधीजी त्यांना अडवत म्हणाले की, हे विसरू नका की, हिटलर आणि नाझी मुसोलिनी यांच्या अधीन असलेल्या अतिरेकी लोकांमध्येही अनुशासन, साहस आणि अशी कार्यक्षमता होती. प्यारेलाल यांनी असं लिहिलं आहे की, त्या संवादांमध्ये महात्मा गांधीजींनी संघाची 'सर्वाधिकारवादी दृष्टिकोन हवं असलेलं सांप्रदायिक संघटन' अशी व्याख्या केलेली होती. काही असो या संघाच्या प्रती गांधीजींचे विचार आणि प्रयत्न आम्हाला एवढं शिकवतात की लोकतंत्र म्हणजेच लोकशाहीत असलेल्या कोणत्याही संघटना, समूह यांच्याशी संवादाच्या बाबतीत काहीही अस्पृश्यता व तशी प्रवृत्ती ठेवता येत नाही. भारतीय लोकशाही ही त्याची मूळ समस्या आता संवादहीनता ही बनलेली आहे. परिवार आणि समाज याबाबतीत राजनीतिमध्ये संवादहीनता ही स्थिती हळूहळू बनायला लागली आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा विनाशकारी सैन्यशक्ति असलेल्या देशांमध्येही ही संवादहीनता दिसू लागली आहे. विचार आणि प्रेमाची शक्ति याहून अधिक मनुष्य जवळ दुसरी कोणतीही शक्ती नाही. विचार आणि प्रेम यांची शक्ती यातूनच असमाध्येय परिस्थितीमध्ये संवाद होऊ शकतो आणि राहू शकतो मनुष्याचे अस्तित्व याच बाबतीत कायम आहे. वाद होण्यासाठी तरी किमान संवाद होऊ द्या. आपण केव्हापर्यंत आपल्या जनतेला आपल्या संपूर्ण राजकीय खेळात फसवत राहू!

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...