Sunday 21 June 2020

भारत-चीन: तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं....!

"भारत-चीन दरम्यान उपस्थित झालेल्या तणावानं तिसऱ्या महायुद्धाचा आरंभ तर होणार नाही ना? अशी भीती जगभरातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी व्यक्त केलंय. अमेरिका, ब्रिटन, इस्राएल, या देशातील माध्यमांसह अल जजीरा, सीएनएन यांनीही अशी शक्यता वर्तवलीय. यामुळं जगाचं लक्ष गलवान खोऱ्यातील हालचालींवर लक्ष केंद्रित झालंय. अमेरिका, ब्रिटन, फ्रांसनं भारताच्या बाजूनं आपलं मत मांडलंय. प्रधानमंत्र्यानी तर 'कोणीही घुसखोरी केलेली नाही' असं सर्वपक्षीय बैठकीत सांगितलंय. पण नेमक स्थिती आणि सध्याची परिस्थिती काय आहे याचा तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा धांडोळा! घुसखोरी झाली नसेल तर जवान कुठे मारले गेले? आपल्या की चीनच्या हद्दीत! हे स्पष्ट होत नाही. भारतानं जॉर्ज फर्नांडिस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर सीमेवर रस्ते तयार केले गेले, विमानतळ झालं, सियाचीन ते अरुणाचल प्रदेशापर्यंत उभं आपलं सैन्याचा वावर सहज होतोय आज तर तिथं जवान उभे ठाकल्यानं चीनला असुरक्षित वाटू लागलंय, त्यामुळंच चीननं ही 'झटापट' केलीय का? हे लोकांना समजलं पाहिजे!"
----------------------------------------------------------------------

*भा* रत चीन हे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. १९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारताचा भूभाग असलेला मोठा प्रदेश चीनच्या ताब्यात गेला, त्याला अक्साई चीन म्हटलं जातं. त्यानंतर १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशात चकमक झाली त्यात भारताचे चार जवान हुतात्मा झाले. त्यानंतर आता हे भारत चीन प्रकरण चिघळलंय. अक्साई चीनमध्ये चीननं १७९ किलोमीटरचा रस्ता भारताची परवानगी न घेता बनवलेला आहे. भारताच्या कोणत्याही लष्करी हालचालींवर तिथून चीनचं बारीक लक्ष असतं. चीन स्वतःची नियंत्रण सीमा रेषा उंचावर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण उंचावरून खाली भारताच्या हालचाली टिपता येतील असा त्याचा प्रयत्न आहे आणि भारत त्याविरुद्ध काहीही करू शकणार नाही या बाबतीतही चीन दक्षता बाळगत आहे. भारत चीन मध्ये तणाव निर्माण होण्याचं कारण म्हणजे गलवानचं खोरं! जर नकाशा पाहिला तर लक्षात येईल की काश्मीर खोऱ्यातील जो भाग चीननं घेतलाय त्याला लागूनच गलवान नदी वाहतेय आणि तो भाग हा भारताच्या सीमेत येतो परंतु चीनला त्या भागात आपलं वर्चस्व ठेवायचंय. अलीकडं चीननं त्या भागात काही तंबू ठोकले आहेत. भारताची पूर्वोत्तर सीमा ही चीनला लागून आहे. कारण तिबेट देखील चीनच्या अंतर्गत येणाराच देश आहे आणि आता चीनला भारतातील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लडाख सारखे भूभाग स्वतःच्या भूभागाखाली आणायचे आहेत. आता भारतात सध्या कोरोनाचा हाहा:कार उडाला असताना, लॉककडाऊनची परिस्थिती असताना मे महिन्यात चीननं पंगोंग त्सो सरोवर, दौलत बेग ओल्डी, गलवान खोरे, डॅम चौक याठिकाणी घुसखोरी केली. ही केवळ गस्ती दरम्यान केलेली घुसखोरी नसून भारतावर दबाव आणण्यासाठी चीननं उचललेलं पाऊल आहे. लडाख जवळच्‍या सीमारेषेजवळ चीननं चिलखती वाहनं आणि रणगाडे आणून ठेवले आहेत.

*१४हजार फूट उंचीवरचा रस्ता हा वादाचा मुद्दा*
चीन हा धूर्त आणि कावेबाज शत्रू आहे म्हणूनच त्याच्या शेजारच्या सीमा मजबूत करणं महत्त्वाचं आहे. हे पहिल्यांदा जॉर्ज फर्नांडिस यांनी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितलं होतं. चीनला लागून असलेली सीमा ही सुरक्षित नाही. तिथले रस्ते देखील मजबूत नाहीत, तिथले रस्ते मजबूत करणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा १९९० मध्ये जॉर्ज फर्नांडिस हे भारताचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं. भारतानं लडाखला लागून असलेल्या काराकोरम क्षेत्रात आता एक रस्ता करायचं काम हाती घेतलंय. मुळात हा वाद त्या रस्त्यावरूनच सुरू झालाय. चीनला त्याठिकाणी भारतानं रस्ता करू नये असं वाटतं. याचं मुख्य कारण म्हणजे भारतानं रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहनं प्रवास करतील. मुख्य म्हणजे भारताच्या लष्करी वाहनांना पूर्वी सात ते आठ तासांचा जो वेळ लागत होता तो आता फक्त ३५ ते ४० मिनिटांवर आलाय. आणि त्यांचा वचक आसपासच्या प्रदेशावर राहील ही भीती चीनला आहे. भारत सरकार हा जो रस्ता तयार करत आहे तो अरुणाचल प्रदेश ते सियाचीन पर्यंतचा आणि त्याच्यामध्ये येतं हे गलवान खोरं! गुलाम रसूल गलवान या एका शूर साहस वीराच्या नावाने ते खोरं आणि ती नदी ओळखली जाते. १८९५ मध्ये तो लेहमध्ये आला आणि त्यानं त्या भागातील युरोपियन अधिकारी आणि प्रवाशांच्या मोहिमेत धाडसाची कामगिरी केली म्हणून त्याचं नाव त्या खोऱ्याला देण्यात आलं. आता भारत जो रस्ता बनवत आहे तो दौलत बेग ओल्डीजवळ आहे. जो भाग चीनच्या भूभागाला लागून आहे. त्याचं महत्त्व हेच आहे की दौलत बेग ओल्डी हा सगळ्यात उंचावरील भारताचा एअरपोर्ट असणार आहे. जो सियाचिनच्या जवळ आहे. भारतानं दारबुक श्योक नदीजवळ हा रस्ता तयार केलाय. त्यावर एक भरभक्कम असा संपूर्ण लोखंडी पूल बांधलाय. त्यातून एक दुसरा रस्ता तयार केला आहे जो गलवान खोऱ्यात जातो. चीनचं मूळ दुखणं तो रस्ता आहे जो १४ हजार फूट उंचीवर बनवण्यात येतो आहे. तो रस्ता चीनला गलवान खोऱ्यात नको आहे. 


*चीनचा मनसुबा भारतानं हाणून पडलाय*
तो रस्ता तयार झाल्यास भारताचं त्या ठिकाणी सामर्थ्य वाढणार आहे. भारताची लष्करी वाहनं त्यावरून अत्यंत कमी वेळात LAC वर पोहोचतील. आता भारतानं संपूर्ण पुर्वोत्तर राज्यांच्या सीमांवर सैन्य तैनात केलंय. भारतानं गलवान खोऱ्यात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आता तिथं आपले तिरंगी झेंडे लावून दोन लष्करी पोस्ट निर्माण केले आहेत. सुरुवातीला त्या अत्यंत खडकाळ भागात, उंच पर्वतांमध्ये, प्रचंड थंडी असलेल्या प्रदेशात रस्ता तयार होईल याची कल्पना चीनला नव्हती. असं कधी चीनच्या राज्यकर्त्यांना वाटलं नव्हतं. परंतु तो रस्ता जसा तयार होतो आहे तशी चीनच्या मनात धडकी भरलीय. दौलत बेग ओल्डी जवळ जो एअरपोर्ट बनवण्यात आला आहे, त्यावर भारताच्या एअरफॉर्सची विमान उतरणार आहेत. त्याची चाचणी घेतली गेलीय. ४० जवान घेऊन एक विमान अत्यंत यशस्वीरीत्या त्या एअरपोर्टवर उतरलंय. तिथं भारतीय एअरपोर्टचा बेस बनवण्यात आलाय. भारत आता लडाख या परिसराचा विकास करतोय. तिथे मोठमोठाले रस्ते आणि विकास कामं होत आहेत. त्याठिकाणी देश-विदेशातील पर्यटक देखील आणले जाताहेत आणि त्या सगळ्यांना प्रवासाची परवानगी ही भारत सरकारकडून घ्यावी लागते म्हणजेच हा भाग भारताचाच आहे असा दाखवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. भारतानं काश्मीर खोऱ्यातील ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला आहे. तर लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं आहे. हीदेखील चीनसाठी डोकेदुखी झालीय. कारण त्यामुळं भारतीय सैन्याचा वावर आता तिकडं सहज होईल. काश्मीर खोऱ्यात चीन स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी CPEC रस्ता बनवतोय. जो सियाचिन ग्लेशियर जवळ आहे. चीन पाकिस्तान बॉर्डर जोडण्यासाठी चीन हा रस्ता बनवतोय. परंतु त्याचा मूळ उद्देश चोहोबाजूंनी भारताला घेरणं हाच आहे. पाकिस्तानसारखा देश भारताच्या विरोधासाठी चीनला वाट्टेल ती मदत करेल. त्या रस्त्याद्वारे भारताच्या पश्चिम भागावरही आपली सीमा आणून ठेवण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आता भारत, काराकोरम ते अरुणाचल प्रदेश हा जोडणारा जो रस्ता तयार करत आहे, त्यामुळे चीन बनवत असलेल्या CPEC रस्त्याला महत्त्व उरणार नाही. कारण आता भारताचा स्वतःच्याच रस्त्यांवरून चीनच्या सगळ्या लष्करी चौक्यांवर नजर ठेवण्यात येईल. त्या रस्त्यावरून भारताच्या लडाख आणि जम्मू काश्मीर मध्ये चीनचा शिरकाव करण्याचा मनसुबा हाणून पडला गेलाय. म्हणूनच चीन गलवान खोरं स्वतःच्या ताब्यात ठेवू पाहतोय.

*भारतानं चीनी गुंतवणुकीबाबत उचललेली पावलं*
अक्साई चीन या वादग्रस्त भूभागात गलवान खोरं आहे. लडाख आणि अक्साई चीन दरम्यान भारत-चीन सीमेच्या अगदी जवळ आहे. या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही अक्साई चीनला भारतापासून वेगळं करते. हे खोरं चीनच्या दक्षिणेकडच्या शिंजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरलेलं आहे. हा भाग पाकिस्तान, चीनच्या शिंजियांग आणि लडाखच्या सीमेला लागून असल्याने हा भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. १९६२ च्या युद्धादरम्यानसुद्धा गलवान नदीचा हा प्रदेश युद्धाचं मुख्य केंद्र होतं. गलवान खोऱ्यात भारताकडून होत असलेलं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं चीनचं म्हणणं आहे. यामागचं कारण म्हणजे भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका करारात दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलंय. मात्र, चीननं आपल्याकडच्या भागात याआधीच आवश्यक सैन्याची उभारणी केलीय आणि आता मात्र 'आहे ती परिस्थिती कायम ठेवावी', असं चीनचं म्हणणं आहे. मात्र, आपली बाजू बळकट करण्यासाठी भारतालाही लष्करी बांधकाम करायचंय. लडाखमध्ये भारताकडून रस्ता बनवला जातोय ही चीनसाठी चिंतेची बाब आहे की या चकमकीमागे दुसरं काही कारण आहे. दोन्ही देशांच्या घडामोडींवर अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांच्यानुसार लडाखमध्ये रस्ता बांधणं हे एक कारण असू शकतं पण हे एकमेव कारण नक्कीच नाहीय. भारतानं कलम ३७० रद्द करणं, काराकोरममधून चालणारा चीनचा व्यापार, सध्याची कोरोना व्हायरसची उद्भवलेली स्थिती, त्यानंतर भारतानं चीनी गुंतवणुकीबाबत उचललेली पावलं आणि चीनमधलं अंतर्गत राजकारण या संघर्षाची कारणं ठरत असल्याचं बोललं जात आहे.

*घुसखोरी नाही तर मग जवान कुठं मारले गेले?*
जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीय बैठकीतील विधान खरं मानलं तर आपण स्ट्रॅटेजीकली अत्यंत महत्त्वाचं गलवान खोरं गमावलं आणि त्यावरची चीनची अनैतिक घुसखोरी मान्य केलीय असा अर्थ निघतो. कारण मोदी म्हणाले की, भारताच्या हद्दीत कोणीही घुसलेलं नाही. इथं त्यांना चीनचं नाव पण घेण्याची हिंमत झाली नाही हे देशाचं दुर्दैव! पण, जर समजा भारताच्या हद्दीत कोणी घुसलेले नाही तर मग चीनच्या सैनिकांनी भारताच्या २० शूर जवानांना जे अमानुषपणे मारलं ते कुणाच्या हद्दीत? भारताच्या की चीनच्या? भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं चीननं नियंत्रणरेषेचा भंग केला असं जे स्टेटमेंट काढलं ते कशाच्या आधारावर होतं? त्यामुळं गलवान खो-यात चीननं आधीच घुसखोरी केली असताना आता भारताच्या हद्दीत घुसखोरी नाही म्हणणं याचा अर्थ चीनचा गलवान खो-यावरचा दावा मान्य करणं असा होतो. चीननं मोदींच्या स्टेटमेंटनंतर जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात लगेचच गलवान खो-यावर परत दावा करून भारताची आणखी नाचक्की केली. नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली हे तर सत्यच आहे पण त्या २० शूर सैनिकांच्या हौतात्म्याचा त्यांनी घनघोर अपमान केला आहे. असं मत एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलंय, याकडं देशाचं लक्ष वेधलंय!

*न्यूयॉर्क टाइम्स मध्ये भारतीय सेना अधिकाऱ्याचा लेख*
"भारत १९६२ ला चीनसोबत युद्ध हरला. हरला पण लढला. इतकं पराक्रमी लढला की 'ऐ मेरे वतन के लोगो ....' हे गाणं आजही डोळ्यांत पाणी आणतं. ह्या ६२ च्या पराभवाचा बदला भारतानं १९६७ ला नथुला भागात घेतला. परत १९७५ ला चीनच्या सगळ्या कारनाम्याना उघडं पाडत सिक्कीम देशाशी जोडून घेतला. इतकंच नाही तर अगदी कालपर्यंत नेपाळ आणि भूतान यांना व्यवस्थित सांभाळून चीनच्या कह्यात जाऊ दिलं नाही. पण आज या सगळ्यावर पाणी पडलंय. बंदुकीची एकही गोळी न झाड़ता भारतानं गलवान गमावलंय का असं वाटण्यासारखी स्थिती आहे! आज भारतीय म्हणून विचार करा. ही आपल्याला शरमेची बाब आहे. इथला मीडिया देशावर नाही तर सरकारवर प्रेम करतो. अन्यथा आज ह्या कृत्याबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारले गेले असते आणि गलवान खो-याची खरी स्थिती आपल्यासमोर आली असती. या मिडियाकडून अपेक्षा बाळगू नका. भारतीय असाल तर आता तरी किमान या खोटरड्या सरकारला जाब विचारा.
या देशासाठी अत्यंत अपमानकारक अश्या कृत्याची जबाबदारी स्वीकारून मोदी सरकारने पायउतार झालं पाहीजे. तातडीने....!" न्यूयाॅर्क टाइम्समधला हा लेख भारताच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने लिहिलेला आहे.

*६ वर्षांत राबवलेल्या परराष्ट्र धोरणाची ही परीक्षा*
भारतानं गलवान खोरं आता कायमचं गमावलं आहे. तिथे घुसून बसलेल्या चिन्यांचा दावा असा होता की, त्यांना हुसकावण्यासाठी गेलेले भारतीय सैनिक हे ‘त्यांच्या हद्दीत घुसखोरी’ करत होते. भारतीय पंतप्रधानांनी ‘भारताच्या हद्दीत घुसखोरी झालीच नाही’ असं सांगून चीनच्या दाव्याला पुष्टी देऊन टाकली आहे.
जम्मू-काश्मीरमधली ३७० कलम हटवण्याची पिटातल्या पब्लिकच्या टाळ्याशिट्या खेचणारी हिरोगिरी करताना आपण लडाखला उघडं पाडतोय आणि आता त्या मार्गानं चीनला जम्मू-काश्मीर प्रश्नातली तिसरी अधिकृत पार्टी बनायला आमंत्रण देतोय, हे लक्षात आलं नसावं आपल्या या महामहीमांच्या! त्यात चीनच्या ताब्यातला अक्साई चीन आपल्या नकाशात दाखवत राहण्याची परंपरा मोडून ‘अक्साई चीन आमचाच’, अशी गर्जना अमित शाह यांनी केली… त्याची ही फळं आहेत. डोकलामच्या तथाकथित ‘विजया’पासून चीनला नवी स्ट्रॅटेजी सापडलीय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून आत घुसखोरी करायची, भरपूर प्रदेश बळकावायचा आणि दोनपाच किरकोळ ठिकाणी पाच पावलांची माघार घेऊन दिल्लीतल्या आत्मकेंद्रित नेतृत्वाला विजयाचा ढोकळा खायला घालायचा. तेच गलवानमध्येही घडलंय, असं म्हटलं जातंय. आताही भक्तगण विजयाच्या टाळ्या पिटतीलच. त्यांच्यात सहभागी होण्याआधी नेमकं काय घडलंय याची एक बाजू समजण्यासाठी हे वाचा.
जाणकारांच्यामते सध्या भारत-चीन सीमेवर सध्या असलेली स्थिती जास्त गंभीर आहे. १९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये दोन्ही बाजूच्या लष्करात कुणीही मृत्युमुखी पडलेलं नाही. त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये ज्या घटना घडल्या त्यातही १९७५ नंतर दोन्ही बाजूला कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. आता मात्र लडाखमध्ये भारतीय जवानांचा मृत्यू होणं ही खूपच गंभीर आणि तणावपूर्ण स्थिती आहे. याचा भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर नक्कीच नकारात्मक परिणाम होणार आहे. चीनबरोबर चर्चा करत असताना भारतानं रणभूमीवरही मजबूत रहायला पाहिजे, तर संरक्षण तज्ज्ञांच्या मते ही समस्या राजकीय चर्चेतून सुटू शकते. सध्या चीनबरोबर आपली लष्करी स्तरावरची चर्चा सुरू आहे. पण त्यातून तोडगा निघेलच असं नाही. या समस्येचा तोडगा हा राजकीय आणि मुत्सद्दी चर्चेतूनच निघेल. ते पुढे सांगतात, "भारतानं गेल्या ६ वर्षांत राबवलेल्या परराष्ट्र धोरणाची ही परीक्षा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन-तीन वेळा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आहे. आता हे पाहावं लागेल की भारतानं गेल्या सहा वर्षांत चीनबरोबरच्या मुत्सद्देगिरीत जी गुंतवणूक केली आहे त्याचा मोबदला काय मिळतो आणि भारताच्या पदरात काय पडतं!"

चौकट...
*जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होतेय*

महायुद्धासाठी एखादी छोटी ठिणगी कारणीभूत ठरू शकते. ऑस्ट्रियन राजकुमार फ्रँझ फर्निनाड आणि त्याची पत्नी सोफिया यांच्याहत्येनंतर पहिलं महायुद्ध झालं होतं. ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्यातील युद्धात एकापाठोपाठ एक देश सहभागी झाले. युद्ध सुरू झालं तेव्हा वाटलं नव्हतं की ते महायुद्ध बनेल. पण एक एक करीत अनेक देश यात जोडले गेल्यानं महिनाभर रक्तरंजित युद्ध झालं पण त्याचे चटके जगाला अनेक वर्षे भोगायला लागले.
जगाच्या ललाटीतर दुसरं महायुद्ध हे पहिलं महायुद्ध संपल्यापासूनच मागे लागलं होतं. खासकरून जर्मनीचा असंतोष आणि त्यांच्यावर लादलेल्या अनेक बंधनांनी दुसऱ्या महायुद्धाची पायाभरणी जगली होती. पण दुसऱ्या महायुद्धाची खरी भूमिका १९३१मध्ये घडायला सुरुवात झाली. एकीकडे चीन-जपान यांच्या मंच्युरिया मुद्द्यावर युद्ध आरंभलं. इटलीनं ईबेसिनियाला हरवलं. १९३६ मध्ये स्पेनमध्ये सिव्हिल वॉर सुरू झालं. १९३८ मध्ये जर्मनीनं चेकोस्लोव्हाकियावर अंमल मिळवला. त्याबरोबरच उठलेल्या असंतोषानं युद्धाची ठिणगी पडली.
आजही तशीच परिस्थिती निर्माण झालीय. एकाबाजूला चीन-अमेरिकामध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. दुसरीकडं उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या संबंधात तणाव निर्माण झालाय. रशियाही आपलं गमावलेल्या वर्चस्वाला पुनरप्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. इराण-अमेरिकेतही वाद निर्माण झालाय. चीन कायमच आपल्या विस्तारवादी प्रवृत्तीनं शेजारी राष्ट्रांना त्रास देत आलाय.
नेमकं अशाचवेळी अचानक भारत-चीन दरम्यान लडाखमध्ये तणाव निर्माण झालाय. दोन्ही देशात वाटाघाटी सुरू असतानाच दोन्ही देशातल्या सैन्यांमध्ये हिंसा निर्माण झाली. या हिंसेनं जगभरातील मीडियाचं लक्ष वेधलं. भारत-चीन सारख्या अण्वस्त्रसज्ज देशामध्ये सरहद्दीवरून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली याला जगातल्या माध्यमांनी तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हटलं आहे. कारण आजही तशीच परिस्थिती आहे जशी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी होती. फरक इतकाच अशे की, चीन कोरोना सारख्या महामारी फैलावण्याच्या कारणांमुळे जगभरात व्हिलन-खलनायक ठरलाय! आणि अमेरिका, ब्रिटन, जपान सासरखे देश चीनला धडा शिकविण्याच्या मूड मध्ये आहेत.

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...