Saturday 1 December 2018

राहुल गांधींची जातकुळी...!




"निवडणुकांच्या प्रचारात वैचारिक मुद्दे राहिलेलेच नाहीत. पक्षांची ध्येयधोरण, तत्व, निष्ठा, आर्थिकनिती, मूल्याधिष्ठित विचारसरणी हे प्रचारात पूर्वीप्रमाणे दिसतच नाहीत. दिसते ती वैयक्तिक चिखलफेक! सर्व राजकारण हे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठीच असल्यानं नेत्यांची छबी दाखवून मतं मागितली जातात. अशावेळी ती छबीच डागळण्याचा प्रयत्न प्रचारातून होत असतो. मोदींनी चहा विकला की नाही हे जसे चर्चिले जाते त्याहून अधिक राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाहीत! त्यांची जातकुळी कोणती आहे? हे विचारलं जातंय. कारण राहुल यांचं देवदर्शन भाजपेयींना अडचणीचं ठरतंय! भाजपच्या संबित पात्रा यांनी राहुलना गोत्र विचारलं होतं. राजस्थानमधल्या निवडणुकीदरम्यान पुष्कर इथं ब्रह्मा मंदिरात पूजा करताना राहुल यांनी आपण कश्मिरी कौल ब्राह्मण आहोत आणि आपलं गोत्र दत्तात्रेय असल्याचं त्या पुजाऱ्यांना सांगितलं. विशेष म्हणजे त्या पारंपरिक पुजाऱ्याच्या वहीत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देखील पूजा केल्याची आणि कौल दत्तात्रेय गोत्र असल्याची नोंद देखील सांपडलीय. पण राहुल गांधींचं वास्तव काय आहे? हे आपण सारे जाणतो तरी देखील ही उठाठेव कशासाठी? "
------------------------------------------------------

*मं* दिर आणि धर्माचं राजकारण करणारे सत्तेत आले पण मंदिर बनवण्याचं विसरून गेले मात्र विरोधकांचं जानवं आणि कुळ, गोत्र विचारण्यावर ते उतरलेत. याचा विरोध करण्याऐवजी मीडियानं अशा प्रश्नांना मोठी प्रसिद्धी दिली. ज्यांना याचं राजकारण करायचं आहे, ते उत्तर देतीलच; परंतु जानवं, मानसरोवरनंतर राहुल गांधींनी आपलं गोत्रदेखील सांगून टाकलंय. प्रसिद्धीमाध्यमांनी ते पहिल्या पानावर छापलं. राहुल गांधींनी सांगायला हवं होतं, की वडिलांकडून मी पारशी आहे, पारशी लोकांत जसं असतं तसा मी आहे. आई आणि आजीकडून मी जो आहे तो आहे. खरं तर माझं गोत्र तेच आहे जे वरुण गांधींचं आहे. जर वरुण गांधींच्या गोत्राचा प्रश्न येत नसेल तर माझ्याबाबत का असावा? राहुल यांना गोत्र सांगण्यासाठी आव्हान देणं यांत नवं काही नाही आणि त्यातली वास्तविकता साऱ्यांना ठाऊक आहे.

*निवडणुकीत बुद्धिभेद करण्यातच आनंद*
केवळ राहुल गांधी यांची बदनामी करतानाच नव्हे तर, नेहरू-गांधी घराण्याला बदनाम करण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले जातात त्यातील एक म्हणजे इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे मुस्लिम होते आणि त्यांचे आडनाव खान होते असा दावा केला जातो. लोकांना साधे सरळ सत्य पचवण्यापेक्षा गूढ दंतकथा आवडतात. त्यामुळेच त्यांचा यावर चटकन विश्वास बसतो. वास्तविक पाहता फिरोज गांधी किंवा नेहरू-गांधी घराणे मुस्लिम असते तरीही यात गैर काहीच नाही. पण मुस्लिमद्वेषी वृत्तीच्या लोकांना हा मुद्दा म्हणजे न जाणे कोण विकृत आनंद देऊन जातो. यासाठीच प्रचारात हा विषय चघळला जातो. राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी कोण होते हे पाहिलं तर विपर्यस्त इतिहास सोशल मीडियावर टाकून बुद्धिभेद केला जातोय हे लक्षांत येईल.

*असे होते फिरोज गांधी...!*
फिरोज जहांगीर गांधी ( सप्टेंबर १२, १९२० - सप्टेंबर ८, १९६०) हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचार विरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दोन दैनिकांचे प्रकाशक होते. याशिवाय ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला. फिरोज गांधी हे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि संजय आणि राजीव गांधी यांचे पिता होते. फिरोज गांधींचा जन्म जुन्या बॉम्बे फोर्टमधल्या तेहमूलजी नरिमन हॉस्पिटलमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव फरेदून जहांगीर घांदे - Ghandy  आणि आईचे नाव रतीमाई त्यांचे माहेरचे आडनाव कोमीसरीएट Commissariat,  त्यांच्या घराण्याचा ब्रिटिश सैन्याला रेशन पुरविण्याचा व्यवसाय होता त्यावरून हे आडनाव पडले होते. खरं तर जुन्या काळात पारशी लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना आडनावे नव्हतीच. म्हणून त्यांना आडनावे दिली गेली, ती त्यांच्या व्यवसायांवरून! उदा. लोखंडवाला, दारुवाला वगैरे. फिरोज यांचे कुटुंब मुंबईत खेतवाडी मोहल्ल्यात नौरोजी नाटकवाला भवन इथे राहत असत. त्यांचे वडील Killick Nixon या कंपनीत मरीन इंजिनिअरची नोकरी करत. त्यांना पुढे वॉरंट इंजिनिअर म्हणून बढती मिळाली. फिरोज एकूण पाच भावंडांपैकी शेंडेफळ होते. त्यांना दोराब व फरीदून जहांगीर नावाचे दोन मोठे भाऊ आणि तेहमीना केर्षाष्प व अलू दस्तुर नावाच्या दोन थोरल्या बहिणी होत्या. दक्षिण गुजरातमधल्या भडोच येथील वाडवडिलांच्या घरातून ते कामधंद्यानिमित्त मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यांच्या आजोबांचे वडिलोपार्जित घर गुजरातेत आजही कोटपारीवाड येथे आहे. १९२०च्या दशकाच्या सुरुवातीला वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबासह अलाहाबादला स्थलांतरित झाले. त्यांच्यासोबत त्यांची अविवाहित मावशी डॉ शिरीन कोमीसरीएट या देखील होत्या. त्या तत्कालीन सिंध प्रांतात कराचीमध्ये Lady Dufferin Hospital येथे शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. तिथे त्यांचे माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कुलमध्ये झाले व पुढे त्यांनी ब्रिटिश स्टाफ असलेल्या एविंग ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी घेतली.

*कमला नेहरूंच्या आजारात जवळीक*
१९३०मध्ये काँग्रेसने स्वातंत्र्य सैनिकांचे 'वानर सेना' या नावाने कृतीदल उभारले होते. पंडित नेहरूंच्या सुविद्य पत्नी कमला नेहरू आणि इंदिरा गांधी यांची फ़िरोजसोबत पहिली भेट याच एविंग कॉलेजच्या बाहेर 'वानर सेना' निदर्शने करताना झाली. त्यादिवशी कमला नेहरूंना उन्हामुळे चक्कर आली. फिरोज गांधी त्यांच्या मदतीला धावले. इंदिरा आणि कमला नेहरूंसोबत झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून दुसऱ्याच दिवशी कॉलेज शिक्षण सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. महात्मा गांधींच्या आडनावावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आडनाव बदलून घांदे-Ghandy वरून गांधी-Gandhi असं केलं. १९३०मध्ये त्यांना लालबहादूर शास्त्री, तत्कालीन अलाहाबाद जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत ९ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली गेली. त्यांना शास्त्रीजींसोबत फैजाबाद जेलमध्ये डांबण्यात आले. सुटका झाल्याबरोबर त्यांनी तत्कालीन संयुक्त प्रांतात म्हणजे आजचा उत्तर प्रदेशात शेती भाडेपट्टा माफ करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १९३२ व ३३ मध्ये त्यांना आणखीन दोनवेळा कारावास भोगावा लागला, त्यावेळी ते नेहरूंचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात. फिरोज यांनी इंदिरा गांधींना पहिल्यांदा १९३३ मध्ये लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या, म्हणून त्यांनी फिरोजना नकार दिला. त्यातच कमला नेहरू या क्षयाने आजारी पडल्या, त्यांची सेवा करण्याच्या निमित्ताने फिरोज यांची नेहरू कुटुंबियांसोबत जवळीक हळूहळू वाढत गेली. कमला नेहरूंना उपचारासाठी युरोपात नेण्याची तजवीज करणे, त्यांची काळजी घेण्यापर्यंत आणि मृत्यसमयी त्यांच्या शय्येजवळ असण्यापर्यंत फिरोज गांधींनी कमला नेहरूंची खूप सेवा केली. याचा परिणाम म्हणून इंदिरांशी त्यांची भावनिक जवळीक वाढली आणि या जोडप्याने १९४२मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. त्यांच्या या लग्नाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला, अगदी गांधीजींना मध्यस्थी करायला सांगितले. पण शेवटी हे लग्न झालेच! लग्न झाल्यावर अल्पावधीतच या जोडप्याला 'चले जाव' आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अलाहाबाद येथील नैनी मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगावा लागला. त्यानंतरची चार-पाच वर्षे काहीशी सुखद व कौटुंबिक स्वास्थ्याची म्हणावी अशी होती. याच दरम्यान १९४४ला राजीव आणि १९४६ला संजय यांचा जन्म झाला.

*फिरोजमुळे नेहरूंची प्रतिमा डागाळली*
स्वातंत्र्यानंतर फिरोज गांधी हे इतर अनेक काँग्रेसच्या नेत्यांसोबत अस्थायी सरकारमध्ये १९५०-५२मध्ये सहभागी होते. याचवेळी ते नॅशनल हेराल्ड या दैनिकाचे व्यवस्थापकीय संचालक बनले. १९५२मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते रायबरेली मतदारसंघात निवडून आले व संसद सदस्य बनले. इंदिरा गांधींनी त्यावेळी दिल्लीहून येऊन त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. या सोबतच ते नेहरूंचे कडवे टीकाकार आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेण्यासाठी ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर अनेक उद्योग घराण्यांची राजकीय नेत्यांशी जवळीक वाढली यातून अनेक आर्थिक गैरव्यवहार होत होते. १९५५ मध्ये रामकृष्ण दालमिया या बँक व विमा कंपनी संचालकाने Bennett and Coleman ही कंपनी ताब्यात घेताना निधी स्वतःच्या खाजगी खात्यात वळता केल्याचा भ्रष्टाचार फिरोज गांधींनी उघडकीस आणला. १९५७ मध्ये ते पुन्हा एकदा रायबरेली येथून निवडून आले. १९५८ मध्ये एलआयसीमधल्या हरिदास मुंढ्रा घोटाळ्याचा मुद्दा त्यांनी संसदेत लावून धरला. यावरून नेहरू सरकारची स्वच्छ प्रतिमा डागाळली. अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांना याप्रकरणी राजीनामा देण्याची नामुष्कीची वेळ आली. यावरून इंदिरा गांधी आणि त्यांच्यात काही बेबनाव झाला आणि माध्यमांना चर्चा करायला मुद्दा सापडला.

*प्रामाणिक फिरोज विरोधकांनाही आदरणीय*
फिरोज गांधी राष्ट्रीयकरणाचे कडवे पुरस्कर्ते होते. एलआयसी आणि टेल्को सारख्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा त्यांचा आग्रह होता. टेल्को टाटांच्या मालकीची होती आणि टाटासुद्धा पारशी होते त्यामुळे फिरोज गांधींना पारशी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अश्याप्रकारे प्रामाणिक नेते असणारे फिरोज गांधी त्यांच्या राजकीय विरोधकांनासुद्धा अत्यंत आदरणीय होते. १९५८ मध्ये फिरोज गांधींना पहिला हार्ट ऍटॅक आला. त्यावेळी इंदिरा गांधी त्रिमूर्ती हाऊस या पंतप्रधान निवासात त्यांच्या वडिलांजवळ राहत असत. त्यावेळी त्या भूतानच्या दौऱ्यावर होत्या. ही बातमी कळल्यावर दौरा अर्धवट सोडून त्या भारतात परतल्या आणि फिरोजना काश्मीरमध्ये विश्रांती व हवापालटासाठी घेऊन गेल्या. १९६०मध्ये दुसरा हार्ट ऍटॅक आल्याने विलिंग्डन हॉस्पिटल दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार अलाहाबादमधील पारशी समाज स्मशानभूमीत झाले. अश्यारितीने भारतीय राजकारणातील एक महत्वाचा दुवा निखळला.

*बदनामीचा भाजपेयींचा केविलवाणी प्रयत्न*
आज देशाच्या पंतप्रधानपदी एक गुजराती व्यक्ती आहे. मोदींना श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? किंवा वल्लभभाई पटेल यांच्या अंत्यविधीला नेहरू उपस्थित होते, या इतिहासाचे मूलभूत ज्ञान नाही. अर्थात संघाच्या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासावर विश्वास ठेवणाऱ्या संघ स्वयंसेवकांचे इतिहासाचे आकलन याहून अधिक असणे शक्य नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी फिरोज गांधी व इंदिरा गांधींच्या वैचारिक संघर्षाला विकृतपणे रंगवून इंदिरा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न फसल्यावर फिरोज गांधींचे आडनाव खान होते असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. बहुसंख्य जनतेला आजही फिरोज गांधी अज्ञात असल्यानेच आज विकृतपणे चर्चा केली जातेय. फिरोज गांधींचे घराणे मूळचे गुजरातचे या नात्याने राहुल गांधी देखील गुजरातचे सुपुत्र ठरतात.  इंदिरा गांधी या स्वतःला 'गुजरातची सून' म्हणवून घेत. हे या ठिकाणी विशेष महत्वाचे आहे,

*राहुल हे जन्माने व कायद्यानेही हिंदूच*
फिरोज गांधी या पारशी व्यक्तीचा नातू राहुल गांधी हिंदू-ब्राह्मण कसा?असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पारशी धर्माचे नियम याबाबतीत फार कडक आहेत. पारशी धर्म फक्त जन्मजात लाभतो, स्विकारता येत नाही. अगदी पारशी व्यक्तीशी लग्नानंतरदेखील तुम्ही पारशी बनू शकत नाही. तुमचे आई-वडील दोघेही पारशी असल्याखेरीज तुम्ही पारशी असू शकत नाही. फिरोज गांधी व इंदिरा यांचा विवाह हिंदू रितिरिवाजांनी झाला होता. यात फिरोज गांधी आणि इंदिरांचे काही दुर्मिळ फोटो आहेत. त्यात एक फोटो लग्नाचा देखील आहे. त्यात स्पष्टपणे हिंदू पद्धतीचे लग्न कर्मकांड दिसत आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आंतरधर्मीय-जातीय विवाहानंतर देखील अपत्याला आईची माहेरची जात-धर्म ओळख लावता येते. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार धर्मांतराने जात बदलत नाही. त्यामुळं राजीव गांधी हे आईकडून हिंदू ठरतात, त्यामुळं त्यांचं लग्न हे देखील इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे हिंदू पद्धतीनं झालं होतं. म्हणून राहुल गांधी हे हिंदू ठरतात. याचाच आधार घेत राहुल गांधी यांनी आपण कश्मिरी कौल ब्राह्मण आहोत आणि आपलं गोत्र दत्तात्रेय असल्याचं पुष्कर इथं पूजा करताना सांगितलंय.

*संदर्भाच्या साहाय्याने चोख उत्तर*
फिरोज गांधी यांची ही जातकुळी कोणती आहे यासाठी इंदिरा गांधी, फिरोज गांधी यांच्या समकालीन लेखकांचे ग्रंथ, शशी भूषण, रामचंद्र गुहा, लोकसभा सदस्यांची माहिती पुस्तके, फ्रॅंक कॅथरीन यांचे इंदिरा गांधींचे चरित्र, मिन्हास मर्चंट यांचे राजीव गांधींवरील पुस्तक, प्रणय गुप्ते यांनी लिहिलेलं इंदिरा गांधींचं राजकीय चरित्र, या पुस्तकांशिवाय इंडियन एक्सप्रेस, न्यूयॉर्क टाईम्स, आऊटलूक या सारखी नियतकालिक याचा संदर्भ देऊन अभिषेक माळी यांनी एक चांगला लेख लिहिलाय. त्यात या साऱ्या आक्षेपांना उत्तरं दिली आहेत.

-हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...