Saturday, 29 December 2018

भाजपेयीं V/S भाजपेयीं

"इंग्रजीत ज्यांना 'फायरब्रॅंड' नेते म्हणतात अशा 'तुफानी' नेत्यांची भाजपच्या टीममध्ये मोठी फौज आहे. अनेकदा असं वाटतं की, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी अशा तुफानी नेत्यांना 'थ्रो बॉलिंग' करायची सूट दिलेली दिसतेय. अशा थ्रो बोलर्समध्ये गिरिराज किशोर, योगी आदित्यनाथ, सुब्रह्मण्यम स्वामी, उमा भारती, स्मृती इराणी अशी अनेक मंडळी आहेत. असं सांगितलं जातं की, भाजपनं अशी यंत्रणाच उभी केलीय ज्यात कोणीही, थ्रो बॉलर नेत्यांनी आक्षेपार्ह, बिनबुडाचे, तथ्यहीन, वक्तव्य करायचं आणि त्यावर वादळ उठलं की, 'सॉरी' म्हणत ते पुन्हा शांत करून टाकायचं! ही सिस्टीम एनडीएच्या सरकारच्या पहिल्या वर्षात त्यांच्या आवाक्यात होती, पण आता निवडणुका आल्या असल्यानं ह्या थ्रो बोलर्स-तुफानी नेत्यांना अगदी झपाटल्यासारखं झालंय. गिरिराज किशोर यांच्या शब्दकोशात तर 'सॉरी' हा शब्दच नाही. तर सुब्रह्मण्यम स्वामी म्हणतात, ' मी एकदा उच्चारलेला शब्द मागे घेतच नाही'. उमाभारती या तर तडतडी फुलबाज्यांप्रमाणे बोलत असतात, तर स्मृति इराणी ह्या विरोधकांची बोलती बंद करणारे वाकबाण सोडत असतात."
--------------------------------------------------

*शि* स्तबद्ध पक्ष अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला देखील काँग्रेसीवळण लागलंय. त्यांच्या साऱ्या हालचाली काँग्रेसप्रमाणेच असतात. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणात या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव झाल्यानं पूर्वी धिम्या स्वरूपात असलेल्या अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्या विरुद्धचं वातावरण आता वेग धरू लागलंय. मध्यप्रदेश आणि राजस्थान इथल्या उमेदवारी वाटपात भाजपत जो गोंधळ झाला, त्यानं तिथल्या नेत्यांना इच्छुकांनी घराबाहेर पडू दिलं नव्हतं. 'केडरबेस' पार्टी आणि 'वरिष्ठांना सन्मान' देणारा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपत उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांना वेठीला धरलं जातंय. तर दुसरीकडं मोदींच्या समकक्ष असलेल्या भाजपेयीं नेत्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याचं ठरवलेलं दिसतंय. पक्षांतर्गत आणि जाहीररीत्या पक्षाला उपद्रव देत, अडचणीत आणताना ते दिसताहेत.

*भाजपेयीं थ्रो बॉलर्स...!*
इंग्रजीत ज्यांना 'फायरब्रॅंड' नेते म्हणतात अशा 'तुफानी' नेत्यांची भाजपच्या टीममध्ये सध्या मोठी फौज आहे. अनेकदा असं वाटतं की, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी अशा तुफानी नेत्यांना 'थ्रो बॉलिंग' करायची सूट दिलेली दिसतेय. अशा थ्रो बोलर्समध्ये गिरिराज किशोर, योगी आदित्यनाथ, सुब्रह्मण्यम स्वामी, उमा भारती, स्मृती इराणी अशी अनेक मंडळी आहेत. असं सांगितलं जातं की, भाजपनं अशी यंत्रणाच उभी केलीय ज्यात कोणीही थ्रो बॉलर नेत्यांनी आक्षेपार्ह, बिनबुडाचे, तथ्यहीन, वक्तव्य करायचं आणि त्यावर वादळ उठलं की, 'सॉरी' म्हणत ते पुन्हा शांत करून टाकायचं! ही सिस्टीम एनडीएच्या सरकारच्या पहिल्या वर्षात आवाक्यात होती, पण आता निवडणुका आल्या असल्यानं हे थ्रो बोलर्स-तुफानी नेत्यांना झपाटल्यासारखं झालंय. गिरिराज किशोर यांच्या शब्दकोशात तर 'सॉरी' हा शब्दच नाही. तर सुब्रह्मण्यम स्वामी म्हणतात, ' मी एकदा उच्चारलेला शब्द मागे घेतच नाही'. उमाभारती या तर तडतडी फुलबाज्यांप्रमाणे बोलत असतात, तर स्मृति इराणी ह्या विरोधकांची बोलती बंद करणारे वाकबाण सोडत असतात.

*भाजपची व्यूहरचना समजली नाही*
अनेकदा असं घडत की, हे थ्रो बोलर्स आपल्या वेड्यावाकड्या शैलीनं विरोधी पक्षाच्या नेत्यांवर बेफाम आरोप करून त्यांना अडचणीत आणतात, विरोधक अशा आरोपांनी चिडले की, मग त्यांना शांत करण्यासाठी सत्ताधारी भाजपतले वरिष्ठ नेते संतापलेल्या त्या नेत्यांना समजावण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा फार्म्युला घेऊन जातात. भाजपेयींची ही व्यूहरचना काँग्रेसचे नेते, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश वा इतर तत्सम नेते ओळखू शकत नाहीत. ज्याप्रकारे शिकारी शिकार शोधण्यासाठी कुत्र्याला मागावर पाठवतात त्याप्रमाणे ह्या तुफानी नेत्यांची फौज काँग्रेसी नेत्यांना खिंडीत गाठतात; त्यांना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आठवण करून देतात. कुणी त्यांना बोफोर्स घोटाळ्यावर आक्षेप घेत टिपण्णी करतात. तर कुणी राहुल गांधी अद्यापि सक्षम नेते नाहीत असं म्हणत त्यांच्यावर तुटून पडतात. एनडीएच्या या भूमिकेनं काँग्रेस गडबडून जाते. काँग्रेसचे नेते सारवासारवी करतात. त्यांना प्रत्युत्तर देण्याचाही काहीवेळा प्रयत्नही करतात पण भाजपेयींची ही व्यूहरचना समजायला त्यांना खूप वेळ लागतो. ही वस्तुस्थिती आहे.

*काँग्रेसकडे तसे तुफानी नेते नाहीत*

भाजपेयींच्या या व्यूहरचनेमुळेच त्यांना यश मिळालं आहे. हे तंत्र पक्षाची धुरा वाहणाऱ्यांच्या लक्षांत आलंय. पण आज अशी परिस्थिती अशी झालीय की, या तुफानी नेत्यांना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर झळकण्याचं, चमकण्याचं जणू व्यसनच लागलंय. त्यामुळं आता पक्षाध्यक्षांनी एक फतवा या नेत्यांसाठी जारी केलाय, त्यात म्हटलं आहे की, लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत, आणि राममंदिर प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कुणीही तोंड उघडायचं नाही. तोंडाला अगदी कुलूप लावायचं! प्रसिद्धीमाध्यमांचे, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी पण हुशार, चाणाक्ष असतात. रुपयांची घसरणाऱ्या किंमतीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी खरं तर अर्थमंत्री अरुण जेटली वा अर्थ सचिवांकडे गेले तर एकवेळ समजू शकतो पण ते नेमके बोलघेवड्या गिरिराज किशोर यांच्याकडे जातात. गिरिराज किशोर यांना 'जात्यात गहू दळताहेत की तांदूळ याची कल्पनाच नसते, मात्र ते लगेचच बेधडकपणे कोणत्याही मुद्द्यांवर प्रतिक्रिया देतात. रुपयाच्या घसरत्या किंमतीला ते काँग्रेसला जबाबदार धरतात अन आपलं म्हणणं पुढं रेटण्यासाठी अर्थहीन संदर्भ ते त्यासाठी देतात.

*वैचारिक गोंधळ सुरू झालाय*
काँग्रेस या बाबतीत मात्र कमनशिबी आहे की, त्यांच्याकडं अशी 'तुफानी' वक्तव्य करणारी नेत्यांची फौजच नाही. राहुल गांधींना राजकीयदृष्ट्या घडविण्यासाठी असलेल्यांनी त्यांना मार्गदर्शन असं केल्याचं जाणवतं की, जाहीर सभांतून बोलताना राग व्यक्त करायचा. अन बाह्या सरसावयाच्या! तरच भाषणाचा प्रभाव लोकांवर पडेल. काँग्रेसकडे बरेच अनुभवी नेते आहेत, पण ते काही पट्टीचे वक्ते नाहीत की, टीव्ही-फ्रेंडली नाहीत. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील त्यांचा फारसा वावर नसल्यानं भाजप जसा प्रहार सोशल मीडियावर करत असते त्याला ते प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे! सध्या भाजपेयींमध्ये वैचारिक गोंधळ सुरू झाला आहे. राममंदिर निर्माणप्रश्नी मतभेद स्पष्ट झाले आहेत. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिर निर्माणासाठी इशारा दिलाय. शिवसेनेबरोबरच साधू-संतांनीसुद्धा मोदींना  अल्टीमेटम दिलाय. अनेक खासदार २०१४ मध्ये मोदींच्या हवेत निवडून आले आहेत. त्यांना राममंदिर निर्माणाचा मुद्दा महत्वाचा वाटतो आहे, म्हणून त्यांनी पक्षाकडं आग्रह धरलाय की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता त्यासाठीचा वटहुकूम काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. बिच्चारे प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा देखील निवडणूक प्रचारादरम्यान राममंदिर निर्माणाचं जाहीरपणे आश्वासन देऊन फसले आहेत. संघातून आणि हिंदुत्ववादी संघटनेतून आलेल्या नेत्यांनी त्यासाठी पक्षातच आग्रह धरलाय. त्यामुळं त्यांच्यातले मतभेद आता जाहीरपणे होऊ लागलेत.

*खासदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय*
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पण म्हणू लागलेत की, अलाहाबादचं नाव मी प्रयागराज केलंय, मात्र मी एव्हढ्यानं समाधानी नाही. पण जेव्हा राममंदिर निर्माण होईल तेव्हाच मला मनःशांती लाभेल! आपल्याला आठवत असेल की, राममंदिर निर्माणसाठी हिन्दू आणि मुस्लिमांमध्ये  मध्यस्थ म्हणून प्रयत्न करणारे अध्यात्मगुरू रविशंकर यांनीही प्रयत्न केले होते, त्यात त्यांना यश आलं नाही. भाजपच्या काही नेत्यांनी तर अशा मध्यस्थीची कोणतीही गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ज्याप्रकारे भाजपेयीं नेते, शिवसेना, रा.स्व. संघानं मोदींवर राममंदिर निर्माणासाठी जो दबाव आणलाय, वातावरण निर्माण केलंय त्यानं मोदी-शहा यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा केलाय! प्रधानमंत्री मोदी यांनी नोटबंदी, जीएसटी या सारख्या वादग्रस्त प्रश्नांच्यावेळी पक्षातल्या वरिष्ठांना विश्वासात घेतलेलं नव्हतं. अनेक खासदारांनी या वादग्रस्त निर्णयामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघात जाणं आता महाग पडणार आहे, असं म्हटलेलं आहे. मतदारसंघात गेल्यावर तिथं लोकांचा प्रश्नांचा भडिमार होत असतो. एनडीए सरकारच्या प्रारंभी भाजप प्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीत सगळे खासदार उत्साहानं येत असत. आता मात्र निम्म्याहून अधिक खासदार काहीतरी निमित्त शोधून बैठकीला बुट्टी मारतात! याशिवाय दिल्लीच्या राजकीय क्षेत्रात अशी चर्चा आहे की, मोदींच्या दरबारात मंत्र्यांना योग्य मान-सन्मान मिळत नाही. ही चर्चा आगामी काळात अशीच सुरू राहिलीतर ती भाजपसाठी अडचणीची ठरू शकते.

*महागठबंधन अडचणीत आलंय*
निवडणुकांसाठी होणाऱ्या उमेदवारी देताना सर्वच पक्षांत असंतोष प्रकट होतच असतो. काँग्रेसची नादानी तर बघा कशी आहे! त्यांनी महागठबंधन करताना बहुजन समाजवादी पक्षाला आपल्या सोबत घेतलं होतं.  पण उमेदवारी देताना बसपाच्या एका सदस्याला काँग्रेसनं आपल्या पक्षात घेऊन त्याला काँग्रेसची उमेदवारी बहाल केली. साहजिकच मायावती रागावल्या आणि त्यांनी विरोधकांच्या  महागठबंधनाला जयभीम केला! काँग्रेसनं आपली घोडचूक सुधारली असती तर मायावती रागावल्या नसत्या. यांत आणखी भर म्हणून की काय, काँग्रेसच्या दिग्विजयसिंह सारख्या नेत्यानं 'आम्हाला कुणाची गरज नाही' म्हणत या वादात उडी घेतली. त्यामुळं विरोधकांचं महागठबंधन अडचणीत आलं. 'समय समय बलवान है, नहीं सत्ता बलवान।' ही म्हण राजकारणात वारंवार पाहायला मिळते. हे सारं राजकारण हे अळीवावरचं पाणी आहे. त्यासाठी योग्यवेळी योग्य तो निर्णय आणि योग्य ती चाल खेळायला हवी. भाजप v/s भाजप अशी स्थिती निर्माण होऊ लागलीय. त्यामुळं भाजपेयीं द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यांना एकाबाजूला पुन्हा एकदा सत्तेची सूत्रं हाती येतानाचं दिसतंय, तर दुसरीकडं कोंडलेला अंतर्गत असंतोष उफाळून येण्याची चिन्हे दिसताहेत. वाढती महागाई, तेलाच्या वाढलेल्या किंमती, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांनी त्रस्त झालेले भाजपेयीं खासदार आपल्या मतदारसंघात फिरेनासे झाले आहेत.

*इथं कुणी सुवर्णकार नाही*
भाजप विरुद्ध भाजप या वादाचा फायदा काँग्रेसपक्ष उठवू शकतो. पण काँग्रेसला चिंता आहे महागठबंधनातून बाहेर फेकलं जाण्याची! पण असं घडू नये यासाठी काँग्रेसनं आपल्या अनुभवी, वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवायला हवंय. विरोधकांच्या महागठबंधनातून मायावती आणि अखिलेश सारखे नेते बाहेर पडलेत. ममता बॅनर्जी, के.चंद्रशेखर राव, नवीन पटनाईक, ओवेसी या सारख्या नेत्यांना महागठबंधनात रस नाही. अशा परिस्थितीनं तीन राज्यात यश मिळालं असलं तरी, काँग्रेसची झोप उडवून टाकलीय. भाजप विरुद्ध भाजप याचा मोठा लाभ त्यांचा जवळचा असा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसलाच मिळू शकतो. पण या 'सुवर्णसंधी'चा फायदा उठविण्यासाठी कुणी 'सुवर्णकार' तरी हवा ना! राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या नेत्यांमध्ये असा कुणी नव्हता. भाजप विरुद्ध भाजप हे वातावरण लोकसभेच्या निवडणूकांपर्यंत सुरू राहील; काँग्रेसनं आपल्या चाणक्यांना मैदानात उतरवायला हवंय आणि अनुभवी नेत्यांना या लढाईत जबाबदारी द्यायला हवीय तरच याचा फायदा घेता येईल!

चौकट
*मनभेद, मतभेद, आणि बुद्धिभेद...!*
भारतीय जनता पक्षात एकाबाजूला योगी आदित्यनाथ, उमाभारती, स्मृति इराणी, गिरिराज किशोर, सुब्रह्मण्यम स्वामी यासारखे अमित शहा, नरेंद्र मोदी समर्थक 'थ्रो बोलर्स' आपली वाणी नको तेव्हा आणि नको तिथं परजत असतात. तर दुसरीकडं लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार, कीर्ती आझाद, अरुण शौरी, यासारखे जुने जाणते  भाजपेयीं उघडपणे अमित शहा-नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडताहेत! अगदी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावताहेत!
नुकत्याच झालेल्या पांच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आलेलं अपयशानं मोदीपर्वापासून अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आता हाती चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्यास सुरुवात केलीय असं समजतंय! अपेक्षेप्रमाणे अडवाणींसह या ज्येष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना फटकारलं खरं, पण त्यानंतर जस जशा निवडणुका जवळ येतील तसा हा संघर्ष अधिक चिघळलाय. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लालकृष्ण अडवाणी आणि यशवंत सिन्हा यांची भेट घेतल्याचंही समजतंय. पराभवामुळे दुखात बुडालेल्या भारतीय जनता पक्षात आता ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठतेच्या चार गोष्टी सुनावण्याचा फैसला केलाय!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...