Saturday 15 December 2018

उद्धवजी, जरा जपून....!


"गेली साडेचार वर्षे आत्ममश्गुल होऊन सत्ता उपभोगताना त्यांना शिवसेना आठवली नाही. पण पुन्हा सत्तेची शिडी चढण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज भासणार आहे. शिवसैनिकांची कुमक लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या विनवण्या सुरू होतील. खलिते येतील. त्यांना मराठी माणसांच्या भाबडा स्वभाव ज्ञात आहे. त्याच्या मनाच्या निर्मळपणाचा त्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. मराठी माणसात दुराग्रह, हट्टी, चीडचीड हे दुर्गुण आहेत, पण कपटीपणा नाही. तो कारस्थानी नाही. पोटात तेच ओठावर हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. शत्रू संकटात असला तरीही सर्वकाही विसरून त्याला मदतीचा हात देण्याचा त्याच्यात उपजत गुण आहे. याचाच फायदा घेत ते मदतीसाठी हात पुढे करतील आणि त्याच हाताने पाठीत खंजीर खुपसतील. तुम्ही सावध व्हा! तुमच्या मित्रपक्षांकडून युतीसाठी आलेला प्रस्ताव हा रणनीतीचा भाग असू शकतो, तुम्हाला बेसावध ठेवण्याचा! सद्यस्थितीत त्यांना तुम्हीच मुख्य शत्रू वाटता, त्यामुळे तुम्हाला चर्चेत मश्गुल ठेऊन ते आपले इप्सित साध्य करून घेतील. तुम्ही गाफील राहू नका. साथ द्यायची तर उघडपणे आणि लाथ घालायची तर तीही उघडपणे हा मराठी बाणा त्यांना दाखवून द्या !"
#shivsena #uddhavthackeray
-----------------------------------------------

*शि* वसेनेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. बाळासाहेबांच्या राजकारणाचा स्वतःचा असा खास ठाकरे टच होता, त्याची उणीव जाणवू न देता शिवसेनेची वाटचाल होणे अवघड काम होतं. ते आव्हान उद्धव ठाकरे यांनी त्याच ताकदीने पेलेल्याचं आज दिसून आलं. अयोद्धेतलं उद्धवजींचं भाषण हे थेट बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करून देणारे होते. त्याच धाटणीचे होते. नेमके शब्द, ठोस निर्णय, तोच प्रहार, घणाघाती टीका जसं शिवसैनिकांना हवं अगदी तसं तडाखेबाज असं त्यांचं भाषण झालं. भाजपने युती तोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत जे यश बाळासाहेबांच्या पश्चात मिळवलं, त्या यशाने ते मस्तावले नाहीत; तर अधिक सावध झाले. म्हणूनच २५ वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने यशाच्या मस्तीत शिवसेनेला चेपण्याचा डाव टाकला. पण राजकीय अनुभवाने समृद्ध असलेल्या उध्दव ठाकरे यांनी तो शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या सांघिक बळावर उधळून लावला. बाळासाहेब असते तर जसे वागले असते तसे उध्दव ठाकरे यावेळी वागले. असं शिवसैनिकांना जाणवलं . पक्षप्रमुखाचं तेज त्यांनी आपल्या निश्चयी वाणीने आणि राजकीय खेळीनं बावनकशी असल्याचं दाखवलं.

*उध्दवजींनी प्रचंड संयम दाखवला*
सत्तेचं चाटण मिळालेल्या भाजपने 'शत प्रति शत' बरोबरच 'अब सब महाराष्ट्र' अशा घोषणा द्यायला सुरुवात केलीय. भाजपने शिवसेनेला जी वागणूक दिली ते पाहता बाळासाहेब असते तर, त्यांनी हा कमळातला भुंगा भुणभुण सुरु करतानाच चेचला असता, तसा तडाखा उध्दव ठाकरे यांनाही देता आला असता, पण त्यातून फक्त शिवसेनेची ताकद दिसून आली असती. पण उध्दव ठाकरेंनी प्रचंड संयम दाखवला. त्यासाठी प्रसिद्धीमाध्यमातून टीकाही सहन केली. शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विचारांबद्धल मतभेद असतील; पण त्यांच्या अशा या स्वतंत्र स्टाईलमुळेच गेली काही वर्षे शिवसेनेची ताकद वाढतेय. विधानसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं ते पाहता बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेची ताकद टिकून राहावी हा मतदारांचा अट्टाहास दिसून येतो. हे महाराष्ट्राचं जनमत उध्दव ठाकरे यांनी ओळखलं; म्हणूनच त्यांनी कशाचीही फिकीर न करता युती तोडण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपच्या स्वार्थीपणावर, विश्वासघातकीपणावर कठोर शब्दात टीका करु शकले. त्यांची ही भाजपवरची टीका मराठी, महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान दाखवणारा ठरला. युतीला २५ वर्षे झाली तरी शिवसैनिकांनी स्वीकारली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी जिवंतपणी मिळवलेलं प्रेम आणि लोकांची साथ आपल्या नंतर अधिक वाढविली. ती वाढती राहणार आहे, या वाढीला प्रबोधनकार ठाकरे यांचा समाज सुधारणेचा वसा आणि वारसा आहे. शिवसेना नेतृत्वाने दणका भाजपला चांगलाच लागलाय, ते हा दणका विसरणार नाहीत लोकसभा निवडणुकीत परतफेड करतील. त्यावेळी शिवसेना नेतृत्व त्याचा कसा बंदोबस्त करते यावर शिवसेनेची भाजपवरची सरशी अवलंबून आहे. सत्ता ही त्यापुढची गोष्ट आहे.

*आता ते चुचकारतील, पायघड्या घालतील*
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. तुम्हाला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू झालाय. युतीसाठी जाहीररित्या प्रस्ताव दिला गेलाय. तुम्ही सहजासहजी प्रतिसाद देणार नाही, याची शिवसैनिकांना कल्पना आहे. तुम्हाला हिंदुत्वाची शपथ घातली जाईल. भावनिक केले जाईल. नेते वेगवेगळ्या भूमिकांमधून तुमच्या समोर अवतरतील. चार-साडेचार वर्षे अवहेलना करणारे हेच नेते तुमच्यासाठी पायघड्या पसरतील. मातोश्रीच्या पायऱ्या झिजवतील. पण तुम्ही स्वबळावर ठाम राहा. आपल्या निर्णयापणासून तसूभरही विचलित होऊ नका!

*प्रतारणेच्या वेदना अनुभवल्या आहेत*
उद्धवजी, साडेचार वर्षांपूर्वीचे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे दिवस आठवा. तुम्हाला युतीच्या चर्चेत मश्गुल ठेऊन तुमच्या मित्र पक्षाने आतून स्वबळाची तयारी पूर्ण केली होती. तुम्ही भाबडेपणावर गेलात. २५ वर्षाची युती तुटणार नाही, अखेरच्या क्षणी चर्चेतून मार्ग निघेल, असा तुम्हाला विश्वास होता. पण दगाफटका झाला. तुमचा विश्वास पायदळी तुडवत त्यांनी स्वबळावर इलेक्शन लढवले. जिंकण्यासाठी साम, दंड, भेद सर्व तत्त्वे वापरली. मोठ्या साहेबांची करंगळी धरून महाराष्ट्रात राजकारण करणारा, त्यांच्या नजरेने उठबस करणारा तुमचा मित्रपक्ष त्यांच्या पश्चात मात्र कसा शिरजोर झाला, त्याने तुमच्याशी कसे दोन हात केले. याचा अनुभव गेल्या निवडणुकीत तुम्ही घेतला आहेच. त्यामुळे पुन्हा अपेक्षाभंगाने मन पोळून घेऊ नका. प्रतारणेच्या वेदना तुम्ही अनुभवल्या आहेत, त्या पुन्हा नकोत! अशी शिवसैनिकांची भावना आहे

*शिवसैनिक हीच संपत्ती, वैभव, शस्त्र अन अस्त्र*
सत्तेत राहून साडेतीन वर्षे झालेला अपमान शिवसैनिकांनी विषाच्या घोटाप्रमाणे प्यायला आहे. तुम्ही जानेवारी महिन्यात कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा केली अन शिवसैनिकांच्या मनावरील औदासीन्याचे मळभ दूर झालं. त्यांच्यात नवा उत्साह संचारलाय. शिवसैनिकांच्या धमण्यांमध्ये विचाऱ्यांच्या ठिणग्या बाळासाहेबांनी पेरल्या आहेत. त्यावर फक्त फुंकर घालण्याची आवश्यकता आहे, त्याचे ज्वालांमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत  नाही. याचा अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे. तुम्हीही जाणता, शिवसैनिक हेच शिवसेनेचे खरे वैभव आहे, तीच संपत्ती आहे. तेच शस्त्र आणि अस्त्रही!

*मराठी बाणा दाखवून द्या*
गेली साडेचार वर्षे आत्ममश्गुल होऊन सत्ता उपभोगताना त्यांना शिवसेना आठवली नाही. पण पुन्हा सत्तेची शिडी चढण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज भासणार आहे. शिवसैनिकांची कुमक लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या विनवण्या सुरू होतील. खलिते येतील. शिष्टमंडळे गठीत होतील. त्यांना मराठी माणसांच्या भाबडा स्वभाव ज्ञात आहे. त्याच्या मनाच्या निर्मळपणाचा त्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. मराठी माणसात दुराग्रह, हट्टी, चीडचीड हे दुर्गुण आहेत, पण कपटीपणा नाही. तो कारस्थानी नाही. पोटात तेच ओठावर हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. शत्रू संकटात असला तरीही सर्वकाही विसरून त्याला मदतीचा हात देण्याचा त्याच्यात उपजत गुण आहे. याचाच फायदा घेत ते मदतीसाठी हात पुढे करतील आणि त्याच हाताने पाठीत खंजीर खुपसतील. तुम्ही सावध व्हा! तुमच्या मित्रपक्षांकडून युतीसाठी आलेला प्रस्ताव हा रणनीतीचा भाग असू शकतो, तुम्हाला बेसावध ठेवण्याचा! सद्यस्थितीत त्यांना तुम्हीच मुख्य शत्रू वाटता, त्यामुळे तुम्हाला चर्चेत मश्गुल ठेऊन ते आपले इप्सित साध्य करून घेतील. तुम्ही गाफील राहू नका. साथ द्यायची तर उघडपणे आणि लाथ घालायची तर तीही उघडपणे हा मराठी बाणा त्यांना दाखवून द्या. हीच शिवसैनिकांची इच्छा!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

5 comments:

  1. खुपच छान अतिशय योग्य विश्लेषण..भाजपचा माज मोडायचाचं..जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  2. Shiv Senecha Jabardast abhyaas aahe saheb. Jay Maharashtra

    ReplyDelete
  3. बरोबर आहे दादा

    ReplyDelete
  4. Both need each other in Maharashtra

    ReplyDelete

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...