Saturday, 24 November 2018

उद्धव ठाकरेंची अयोध्यास्वारी!

"प्रभू श्री रामचंद्र यांची धर्ममर्यादा आणि राष्ट्रहिताचे प्रयत्न याचे उत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजीमहाराजांकडे पाहिलं जातं. शिवरायांच्या जन्मभूमीवरील माती घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोद्धेत रामजन्मभूमीनिर्माणासाठी दाखल झालेत ! शिवसेनेचं हे राष्ट्रीय स्तरावरचं पाऊल त्यांच्या विस्ताराचं जसं आहे तसंच ते भाजपेयींना सावरणारं देखील आहे. भाजपेयींच्या नोटाबंदी, जीएसटी, राफेलसारख्या राज्यकारभाराच्या विरोधात विरोधीपक्षांनी देशभर रान उठलंय. विरोधकांचं घोंघावणारं हे वादळ रोखण्यासाठी शिवसेनेची ढाल वापरली जाणार आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा पेटवला जाणार आहे, तो शिवसेनेच्या माध्यमातून! आपण नामानिराळे राहून अपेक्षित ते साध्य करण्यासाठी भाजपेयींनी रचलेला हा जसा डाव आहे! तसंच शिवसेनेलाही 'राष्ट्रीय' होण्यासाठी मिळालेली ही संधी आहे!"
----------------------------------------------------

*दे* शात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड या भाजपेयींची सत्ता असलेल्या राज्यात निवडणुका होत आहेत ती लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. भाजपेयींना पराभूत करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत त्यासाठी आघाडी बनवणं, निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उचलणं, हवे असलेले वा नको असलेले असे मुद्दे उपस्थित करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल सत्ताधाऱ्यांबद्धल अविश्वास निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जातंय.  सत्ताधारी भाजपेयींनी सावध भूमिका घेत, एकत्र येणाऱ्या विरोधकांना आपल्या सहकारी पक्षाच्या माध्यमातून परस्पर नेस्तनाबूत कसं करायचं असा प्रयत्न चालवलाय. त्यासाठीची व्यूहरचना भाजप आपल्या राजकीय पंडितांच्या मार्फत आखत आहे. त्यातूनच रामजन्मभूमीचा मुद्दा पुढं आणला गेलाय!

*रामजन्मभूमीसाठी शिवसेना आग्रही*
'रामजन्मभूमी' हा गेली अनेकवर्षे प्रलंबित असलेला मुद्दा निवडणुकीदरम्यान प्रत्येकवेळी समोर येतो 'मंदिर वही बनायेंगे..!' अशी घोषणा करीत लोकभावनेला हात घातला जातो. या लोकभावनेच्या आधारे लोकांपुढं जाणं भाजपेयींना नामुष्कीचं आहे. भाजपा सत्तेत असतानाही त्यांना राममंदिर बांधता आलेलं नाही. रामजन्मभूमीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु अध्यादेश काढून हा प्रश्न संपविता येऊ शकतो हे ते जाणतात पण असा अध्यादेश काढला तर विरोधकांना हाती आयतं कोलीत मिळेल. या प्रकारानं भाजपेयींची कोंडी होईल. ते हिंदुत्ववादी आहेत हे समोर येईल त्यामुळे देशातले अल्पसंख्यांक, पुरोगामी विचारांचे, डाव्या विचारांचे जे मतदार थोड्याप्रमाणात भाजपकडे वळले आहेत, असे आणि सोबत असलेले आणखी काही मतदार भाजपपासून दूर होतील, अशी भीती भाजपेयींना वाटते आहे. या प्रश्नाची सोडवणूक ,करण्यासाठी आपल्या सत्तासाथीदारांचा वापर करायचा ठरवलंय त्यासाठी शिवसेनेच्या खांद्यावर रामजन्मभूमीचं ओझं टाकलं गेलंय अशी शक्यता दिसून येतेय. रामजन्मभूमीबाबतच्या हिंदुत्ववाद्यांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. त्या अधिक तीव्र झाल्या तर भाजपला सत्तेपासून रोखले जाईल, यासाठी संघ-भाजपेयींच्या राजकीय पंडितांनी आपल्या सहकारी पक्षांची मदत घ्यायला सुरुवात केलीय. रामजन्मभूमी आणि राममंदिर हे विषय आपण स्वतः न हाताळता भाजपने हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे जवळ आलेल्या शिवसेनेकडे सोपवलं आहे आणि शिवसेनेनेही आपलं हिंदुत्व किती प्रखर आहे, हे सिद्ध करण्यासाठी हा मुद्दा आपल्या शिरावर घेतला आहे. शिवसेनेनं आपलं हिंदुत्व कधी लपवलेलं नाही. किंबहुना त्यासाठी आग्रही असतात हे आजवर अनेकदा दिसून आलंय. त्यामुळे राममंदिर निर्माणाचा मुद्दा हाती घ्यायला शिवसेनेला कोणतीचअडचण येण्याचे कारण नव्हतं.

*आज भाजपेयींना 'हिंदुत्व'अडचणीचं ठरतंय*
बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपा नेत्यांनी बाबरी आम्ही पाडली नाही तर ती शिवसेनेने पाडली असं म्हणून हात झटकले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी मात्र अगदी उघडपणे सांगितलं 'बाबरी कोणी पडली मला माहीत नाही, पण जर का ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमानच आहे...!'  त्यानंतर शिवसेनाप्रमुखांवर टीकेची झोड उठली होती. भाजपेयींचं हिंदुत्व बेगडी आहे तर शिवसेनेचं हिंदुत्व प्रखर आहे. परिणामांची पर्वा न करता हिंदुत्वासाठी शिवसेना नेहमीच आग्रही राहिलीय जे आपण अनुभवलंय. 'गर्वसे कहो हम हिंदू हैं।' हा नारा सर्वप्रथम शिवसेनेनं दिला. १९८७ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रमेश प्रभू यांच्या प्रचारात शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सर्वप्रथम आणला. त्यावेळी पुलोदचं सरकार राज्यात होतं आणि त्यात आजचा भाजप आणि तेव्हाचा जनसंघ पुलोदमध्ये होता. त्यांनी तेव्हा शिवसेनेला आणि हिंदुत्वाला विरोध केला होता, हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. हिंदुत्व लोकांनी स्वीकारलंय हे दिसून येतात त्यानंतर भाजपनं उघडपणे हिंदुत्व स्वीकारलं. भाजप राष्ट्रीय स्तरावर असल्यानं त्यांनी त्याचा गवगवा झाला. पाठोपाठ अडवाणी यांची रथयात्रा निघाली, हिंदुत्व राष्ट्रीय पातळीवर गेलं अन भाजपेयींना सत्तेचा मार्ग सापडला! तेच हिंदुत्व आज भाजपेयींना अडचणीचं ठरतंय. रामजन्मभूमीचा विषय हा त्यांच्यासाठी ' धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशी अवस्था बनलीय.

*साधू-संत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी*
आज उद्धव ठाकरे रामजन्मभूमीच्या पुनर्निर्माणासाठी अयोद्धेत पोहोचलेत. तिथं साधू-संतांच्या गाठीभेटी घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांतील स्वयंसेवक अयोद्धेला पोहोचलेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या रामजन्मभूमीपूजनाच्या प्रयत्नांना पाठींबा दर्शविलाय शिवाय त्यांचा यात सहभाग देखील असणार आहे. उध्दव ठाकरे यांची तिथं पत्रकार परिषद होणार आहे. धर्मसभा आयोजित केलीय शिवाय शरयूच्या तीरावर उद्धव ठाकरे आरती करणार आहेत. या आरतीला तिथले साधू ,संत, शिवसैनिक, संघ स्वयंसेवक, बजरंग दलाचे कार्यकर्ते, व इतर हिंदुत्ववादी संघटना, राममंदिर निर्माणाचे आग्रही मंडळी अशी पांच लाखाहून अधिक रामभक्त सहभागी होणार आहेत. रामजन्मभूमीवर राममंदिर निर्माणसाठी ठाकरेंनी शिवजन्मभूमीहून कलश नेलाय तो तिथल्या साधुसंतांकडे सोपविला जाणार आहे.शिवसेनेनं अयोद्धेत रामजन्मभूमीवर मंदिर उभारावं यासाठी आता थेट शरयू तीरावरून सरकारला आव्हान दिलंय. हे आव्हान जसं शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर नेणारं आहे तसंच ते भाजपला सावरणारं देखील आहे. सध्या भाजपेयींची सत्ता असलेल्या तीन प्रमुख राज्यात विधानसभा निवडणुका होताहेत, २०१९ ला सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका आहेत, सध्याचं देशातलं वातावरण हे भाजपविरोधी बनलेलं आहे. नोटाबंदी, जीएसटी, राफेल असे अनेक मुद्द्यांवर सरकारची कोंडी केली जातेय. या कोंडीतून भाजपेयींची सुटका व्हावी आणि मतदारांचं लक्ष या साऱ्या मुद्द्यांवरून हटावं, ते रामजन्मभूमीसारख्या भावनिक मुद्द्यावर जावं आणि त्या वातावरणात निवडणुका व्हाव्यात. अशी भाजपची इच्छा दिसतेय त्यासाठी शिवसेनेला भरीला टाकलं गेलंय.

*अध्यादेशासाठीची ही भाजपची व्यूहरचना*
शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुढे आणायचा यानिमित्ताने देशात पुढील काळात आंदोलन होतील मोर्चे निघतील आणि भाजपला लोकांच्या दबावामुळे राममंदिराचा अध्यादेश काढण्याचे मान्य करावे लागेल आणि त्याला शिवसेना पाठिंबा देईल अशी यामागची व्यूहरचना दिसतेय. राफेल प्रकरण, नोटाबंदी या सारख्या प्रकरणावरून मोदी सरकारच्या झालेल्या कोंडीतून बाहेर पडण्यास भाजपला राममंदिराचा मुद्दा वापरला जावा, असा विचार सध्या भाजपमध्ये असावा. नोटाबंदी वरून मोदी सरकारला टीकेच्या भडिमाराला सामोरे जावे लागत आहे, त्या प्रत्येकवेळी शिवसेनेनेही भाजपवरील टीका करण्याची संधी सोडलेली नाही. या सर्व मुद्द्यांना बाजूला सारणे, दूर करणे भाजपपुढे एक आव्हान आहे. त्यामुळेच या मुद्द्यांवर पडदा टाकण्यासाठी राममंदिरासारखा भावनिक मुद्दा चर्चेत आणायचा आणि परिस्थिती बदलली निवडणूक जिंकण्याचा मार्ग निर्वेध करायचा असं भाजपने ठरवलेलं दिसतोय अयोध्या वारीची ही बीजे मुंबईत अमित शहा यांच्या मातोश्रीत ठरली असावी अशी शक्यता वाटते. राममंदिराचा मुद्दा हाती घेतल्याने राष्ट्रीय राजकारणात पक्षाच्या स्थान मजबूत होईल अशी आशा सामान्य शिवसैनिकांना वाटते तर शिवसेनेच्या माध्यमातून राममंदिराच्या मुद्द्यावर रान पेटले तर त्यात इतर मुद्दे बाजूला सरतील अशी भाजपमधील नेत्यांची धारणा असावी त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी अयोध्येत आमने-सामने येण्यापेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून राममंदिराचा मुद्दा उचलायचा त्याची व्याप्ती वाढवायची अशी त्यांची इच्छा असावी असे दिसते. आता रामजन्मभूमी हे पुन्हा एकदा राजकीय रणभूमी ठरू पाहतेय. येणारा काळच काय ते ठरवेल!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...