Saturday 17 November 2018

काँग्रेसी हतोत्साही बनलेत...!

"सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपेयींनी त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना? अशी स्थिती त्यांची झालीय!"
-------------------------------------------------

*दे* शात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, नेहरू-गांधीजींची कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढे आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना त्याबाबत मौन पाळलं जातंय. गेल्यावर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्ष संपन्न झालं आणि उद्या १९ नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दीवर्ष संपेल. या दोन्ही वर्षात काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह होता. त्या नेत्यांचं स्मरण, जागरण झालंच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलं. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढे ठेवण्याची गरज असताना मात्र काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतंय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडे डोळेझाक करीत इतरेजनांसारखे बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतं आहे. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी,राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय!

*आयर्न लेडी म्हणून इंदिराजींची ओळख*
१९७० ते १९८० च्या दशकात भारताच्या इंदिरा गांधी, इंग्लंडच्या मार्गारेट थॅचर, इस्रायलच्या गोल्डा मायर आणि श्रीलंकेच्या सिरिमावो भंडारनायके या चार महिलांचे नाव राष्ट्रप्रमुख म्हणून जगभर गाजत होतं त्याच सर्वार्थाने श्रेष्ठ असलेल्या इंदिरा गांधी यांची ओळख 'आयर्न लेडी' अशी केली जात होती. इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष उद्या सोमवारी संपतेय. (इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ आणि मृत्यू ३१ ऑक्टोबर १९८४ तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५वी जयंती पाठोपाठ म्हणजे पंडित नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ आणि मृत्यू २७ मे १९६४) स्वातंत्र्यानंतरची सतरा वर्षे पंडित नेहरू हे देशाचे प्रधानमंत्री होते. त्यानंतर दोन वर्ष लालबहादूर शास्त्री हे प्रधानमंत्री होते. आणि त्यांच्यानंतर १९६६ ते १९७७ अशी अकरा वर्षे इंदिरा गांधी या देशाच्या प्रधानमंत्री होत्या. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात लादलेल्या आणीबाणीमुळे काँग्रेसची तीस वर्षांची सत्ता गेली परंतु त्यानंतर आलेलं जनता पक्षाचे सरकार जेमतेम अडीच वर्ष टिकलं आणि पक्षांतर्गत राजकारणात कोसळलं. दरम्यान इंदिरा गांधींनी प्रचंड कष्टांनी देश पिंजून काढला आणि 1980च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा बहुमताने सत्ताधारी केलं आणि त्या प्रधानमंत्री झाल्या पण त्यानंतर देशातल्या कुठल्याही शहरात गावात गेल्यावर उघड्या मोटारगाडीतुन लोकांची मानवंदना घेणाऱ्या इंदिरा गांधींनी बंद बुलेट-प्रुफ गाडीतून फिरू लागल्या. त्यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त अधिक कडक झाला. तरीही त्यांची ३१ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकांनीच गोळ्या घालून हत्या केली. हत्या करणारे शीख होते. कारण इंदिरा गांधींनी पंजाबातील अमृतसरच्या सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून अतिरेकी भिंद्रनवाले यांच्यासह खलिस्तानवाद्यांचा खातमा केला होता. लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली झालेली सुवर्णमंदिरातली कारवाई 'ब्लू स्टार ऑपरेशन' म्हणून गाजली. पुढे अरुणकुमार वैद्य यांचीही पुण्यात त्यांच्या निवासस्थानाजवळ हत्या झाली.

*राजीव गांधींची निघृण हत्या झाली*
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विक्रमी मतांनी पुन्हा सत्ताधारी पक्ष झाला. राजीव गांधी प्रधानमंत्री बनले. आज सार्वत्रिक झालेल्या माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात ते प्रधानमंत्री असतानाच्या काळात झाली आहे. तथापि बोफोर्स तोफा खरेदी घोटाळा प्रकरणी विश्वनाथ प्रतापसिंग यांनी काँग्रेस पक्षात बंड घडवून आणल्याने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. मात्र त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर आलेली जनता दलाची सत्ता विश्वनाथ प्रतापसिंग आणि चंद्रशेखर हे दोन प्रधानमंत्री होऊनही दोन वर्षात कोसळली. त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्ताधारी झाली ती नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली. परंतु त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी देशभर झंझावाताप्रमाणे प्रचार सभा करणाऱ्या राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरारुम्बुदूर इथं भर सभेत मानवी बॉम्बने २१ मे १९९१ ला हत्या केली गेली. हत्या करणारे 'तामिळ वाघ-लिट्टे' या संस्थेचे सदस्य होते. राजीव गांधींनी प्रधानमंत्री असताना श्रीलंकेतल्या जाफना भागातील लिट्टेच्या-तामिळ वाघांच्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्करी कारवाई केली होती, त्याचा बदला त्यांचा खून करून घेण्यात आला होता.

हा इतिहास काय सांगतो तर, १९४७ ते १९९१ या ४४ वर्षातील चाळीस वर्षे देशात काँग्रेसची सत्ता होती आणि त्यातील ३८ वर्षे नेहरू गांधी घराण्याची सत्ता होती. राजीव गांधी हयात असते तर त्यांची वयाची पंचाहत्तरी साजरी झाली असती.

*राजकीय द्वेष विकृतीचा पातळीवर गेलाय*
आता पंडित नेहरूंच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानंतर इंदिरा गांधी  जन्मशताब्दी वर्ष संपत आलेलं आहे कोणत्याही राजकीय पक्षासाठी असे ऐतिहासिक योग स्वतःचीच नव्याने शोधयात्रा सुरु करण्यासाठी महत्त्वाचे असतात परंतु काँग्रेसने पंडित नेहरू शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष वाया घालवलं २०१४ पासून केंद्रात सत्तेवर आलेलं नरेंद्र मोदी सरकार म्हणजे स्वतः मोदी आणि त्यांच्या भाजप परिवाराच्या तमाम अनुयायांच्या राजकारणाचा पायाच मुळी नेहरू द्वेष हा आहे. परंतु कसबी 'डबल स्टॅण्डर्ड' असलेले मोदी स्वतः नेहरू बनण्यासाठी प्रयत्नशील दिसतात. नेहरूंच्या एकेका खुबीचं अनुकरण करतात आणि काँग्रेसला नालायक ठरविण्यासाठी त्याच नेहरूंचा पराकोटीचा द्वेषही करतात. त्यांचे अनुयायी आणि त्यांच्या पक्षाचे एक पदाधिकारी सोशल मीडियावर नेहरूंचे चारित्र्यहनन करणारी छायाचित्रे पोस्ट करतात. नेहरू आपली बहीण राजलक्ष्मी पंडित आणि पुतणी नयनतारा सहगल यांना प्रेमाने भेटत असल्याचा फोटो 'लफडी' या नावानं सोशल मीडियावर टाकून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल भाजपचा एकही नेता दिलगिरीचा चकार शब्द काढत नाही. राजकीय द्वेष असा विकृतीचा पातळीवर पोहोचला आहे. 

*नेहरूंनंतर इंदिरा गांधीही द्वेषाच्या बळी*
नेहरू पाठोपाठ भाजप परिवाराचं द्वेषाचं आणखी एक व्यक्तिमत्व इंदिरा गांधी या आहेत! इथेही पुन्हा तेच म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः इंदिरा गांधींसारखे कणखर प्रधानमंत्री असल्याचे दाखवतात, त्यासाठी मोदी भक्त 'नोटाबंदी'च्या निर्णयाची तुलना इंदिरा गांधी यांनी १९६९ मध्ये घेतलेल्या 'बँकांच्या राष्ट्रीयीकरणा'च्या निर्णयाशी करतात. परंतु दुसरीकडे मोदी व त्यांचे भक्त इंदिरा गांधींचा द्वेषही करतात. निवडणुकांमध्ये सातत्याने होणारा पराभव सोशल मीडियावर होणारी टवाळी यामध्ये काँग्रेसचे नेहरू शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष वाया गेलं. इंदिरा गांधी जन्मशताब्दीच्या वर्षातही राहुल गांधी यांना सूर गवसला असं दिसत नाही. त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तोंडचं पाणी पळवलं आणि कर्नाटकात राजकीय खेळी करून भाजपला रोखलं हे त्यांचं काही प्रमाणात म्हणावं लागेल. आता ते पक्षाध्यक्ष बनलेत. काँग्रेससाठी प्रतिकूल अशा अनेक गोष्टी घडताहेत.  आजच्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, भाजपचा धैर्यानं मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला हे दोन्ही दोन्ही स्मृतीवर्षं निश्चितच प्रेरणादायी ठरलं असतं!

*इंदिराजींच्या कणखरतेचं दर्शन*
निवडणुकीतील जय-पराजय महत्त्वाचे असले तरी तेच सगळं काही नसतात. निश्चित भूमिका घेऊन रणांगणात ठामपणे उभे राहणे हे सत्तेपेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. गुजरात निवडणुकीच्या काळात पहिल्यांदा असा ठामपणे काँग्रेस पक्ष  उभा राहताना दिसला. ही इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षाच्या तोंडावर काँग्रेसची चांगली सुरुवात म्हणायला हवी. कोणतीही व्यक्ती राजकारणात प्रबळ असते तेव्हा तिच्याभोवती खुशमस्करे असतातच. भाजपा नेते माजीमंत्री आणि आता उपराष्ट्रपती असलेल्या व्यंकय्या नायडू यांनी नरेंद्र मोदी हे परमेश्वरी अवतार आहेत असं म्हटलं होतं. त्याच धर्तीवर इंदिरा गांधींच्या काळात देवकांत बरुआ 'इंदिरा इज इंडिया' असं म्हणाले होते. यावर तेव्हा विरोधकांनी व प्रसारमाध्यमांनी खूप टीका केली होती. परंतु त्यापूर्वी आपण किती कणखर आहोत ते इंदिरा गांधी यांनी १९७१च्या पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावून दाखवलं होतं. आज सत्तेवर असलेल्या भाजप परिवाराचे चेले चमचे पाकिस्तानला पोकळ धमक्या देतात आणि जम्मू-काश्मीरमधल्या भारतीय नागरिकांना पाकिस्तानला पाठविण्याची भाषा करतात अशावेळी इंदिरा गांधी यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. त्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला असा धडा शिकवला, की त्याचे दोन तुकडे केले आणि 'बांगलादेश' नावाचा स्वतंत्र देश निर्माण केला.

*अघोषित आणीबाणीसदृश्य स्थितीचं काय?*
पाकिस्तानची ताकत अर्ध्यावर आणणाऱ्या या कामगिरीचे श्रेय सर्वस्वी इंदिरा गांधी यांना जातं! मात्र काँग्रेसनं या शौर्याचं कधी भांडवल केलं नाही किंवा त्याचे ढोल वाजवले नाहीत. त्यावेळी संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना 'दुर्गा' असं संबोधलं होतं. परंतु इंदिरा गांधी यांच्या या शौर्याकडे दुर्लक्ष करून आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आजही केला जातोय. इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये घटनात्मक मार्गाने आणीबाणी आणली होती. तथापि ती लोकशाहीची हत्या होती. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आज लोकशाही पायदळी तुडवून अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण केली जाते आणि आपल्या निंदनीय कृत्यांच्या समर्थनासाठी आणीबाणीची ढाल पुढे केली जातेय, त्याचं काय?

*आणीबाणीच्या निर्णयाची कहाणी*
इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीची हकीकत ही मोठी नाट्यमय आहे. २५ जून १९७५ च्या सकाळी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांना फोन करून दिल्ली प्रधानमंत्री निवासस्थानी तातडीने बोलावून घेतलं. त्यांच्याशी देशातील परिस्थितीबाबत दोन तास चर्चा केली. इंदिरा गांधींचे मत बनलं होतं की, देशात सगळीकडे बेशिस्त वाढलीय, बिहार आणि गुजरात विधानसभा भंग झालीय. विरोधी पक्षांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत याला पायबंद घालायचा तर आपल्याला कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन 'सीआयए'च्या मदतीने भारतात सत्तांतर घडवून आणू शकतील, अशी भीतीही त्यांनी सिद्धार्थ रे यांच्याशी केलेल्या चर्चेत व्यक्त केली होती. देशाला एका शॉक ट्रिटमेंट' गरज आहे, यावर इंदिरा गांधी ठाम होत्या. सिद्धार्थ शंकर रे हे कायद्याचे जाणकार होते. त्यामुळे इंदिराजींनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. यावेळी 'थोडा अभ्यास करून सांगतो' असं म्हणून रे थोड्यावेळाने परत आले. "देशांतर्गत गडबड-गोंधळ मुकाबला करण्यासाठी घटनेतील कलम ३५२ नुसार आणीबाणी लागू करता येऊ शकते" असा सल्ला सिद्धार्थ यांनी इंदिरा गांधींना दिला. यावर मंत्रिमंडळाची बैठक न घेताच इंदिराजी आणि रे राष्ट्रपती भवनात गेले. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांची भेट घेतली, त्यांना आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली. नंतर इंदिराजींचे सचिव पी. एन. धर यांनी या संदर्भातील 'ड्राफ्ट' तयार केला आणि तो घेऊन आर. के. धवन राष्ट्रपती भवनात पोहोचले. आणीबाणीचा काळा अध्याय तिथून सुरू झाला. तथापि तो राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी अडचणींचा होता. बाकी समस्त जनतेसाठी सुकाळ ठरावा असाच होता. भ्रष्टाचाराला चाप बसला. भडकावू स्वातंत्र्य पिंजऱ्यात गेले. साठेबाजांना वस्तूंचा पुरवठा मोकळा करावा लागला. सरकारने ठरवलेल्या भावातच वस्तूंची विक्री करावी लागल्याने महागाईची जागा स्वस्ताईने घेतली. बेकायदेशीर कर्ज गुन्हा ठरल्याने दामदुप्पट व्याज देणारे कर्जमुक्त झाले. अर्थात हे सारे घडवून आणण्यासाठी 'आणीबाणी'ची आवश्यक होत नव्हती परंतु 'आणीबाणी'मुळे, त्या घटनेमुळे देशातील लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. आणीबाणीच्या विरोधात जनतेने जनता पक्षाला निवडून दिलं. मात्र जनता पक्षाला सरकार चालवता आलं नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकांनी पुन्हा इंदिरा गांधी यांना निवडून दिलं.

*इंदिराजींचं कार्यकर्तृत्वाचं सोनेरी पान*
आणीबाणीच्या कटू स्मृती वजा केल्यास इंदिराजींच्या आयुष्यात कर्तुत्वाची अनेक सोनेरी पाने आहेत प्रत्येक पान देशप्रेमाचा, धर्मनिरपेक्षतेचा, शौर्याचा, कणखरपणाचा आणि  निर्णय क्षमतेचाही अध्याय आहे.  'इंदिरा इज  इंडिया' हे अतिशयोक्तीच असलं, तरीही  एकेकाळी  'गुंगी गुडिया'  म्हणून  हिणवल्या गेलेल्या  इंदिराजींचा प्रवास  हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असाच आहे! तो आजही सामान्य लोकांमध्ये आहे. 
-हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

  1. खूप छान लेख आहे लेख नाही काँग्रेस रुपी अर्जुनाला निवडणुकीच्या युध्दात श्रीकुष्णाने(तुमच्या रुपात) दिलेला द्रुष्टात आहे.

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...