Thursday 15 November 2018

...तर सोन्नलगी झळाळून निघेल!




सोलापुुर...! सोन्नलगी....!
एक चेहरा नसलेलं गांव! असं सर्वसाधारणपणे विचारवंतांमध्ये म्हटलं जातं. आजची सोलापूरची, स्थिती, परिस्थिती आणि अवस्था हे त्याचं प्रमुख कारण असलं पाहिजे. ज्यांना सोलापूरची जडणघडण, सांस्कृतिक, सामाजिक वारसा, त्याचं रूप, रंग, स्वर, नाद आणि उपजत असलेलं रांगडेपण हे ज्याला भावतं, त्याला सोलापूर आपलंसं वाटतं हे खास! आजच्या औद्योगिक, आर्थिक, व्यावसायिक कारणानं सोलापूरवर मळभ आलंय, ते नव्या पिढीच्या प्रयत्नानं, राजकीय इच्छाशक्तीच्या जोरानं आणि सोलापूरतून बाहेर पडलेल्या लाखो चाकरमान्यांच्या सहभागानं नक्की दूर होईल, हे मात्र निश्चित!

*बाहेर पडलेल्यांना गांव खुणावत असतं*
सोलापूरची भौगोलिक रचना, पाऊस, पाणी, निसर्गाचं वरदान या सगळ्या बाबींचा विचार केला तर इथल्या नव्या पिढीला उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर नाईलाजानं, दुखीमनानं पडावं लागलं आहे. असं असलं तरी आपल्या गावाचं वैशिष्ट्य राखत तो तिथं समरस झालाय. त्याला आपलं गांव खुणावत असतं,  पण त्याला इथं  येण्याचं कारण सापडत नाही. तो येण्याची संधी शोधत असतो, ती संधी त्याला उपलब्ध करून दिल्यास त्याची नाळ इथं कायमची जोडली जाईल हे खास!

*सोयी-सवलती, तंत्रज्ञान उपलब्ध व्हावीत*
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं एक सुंदर गांव आहे. इथं मराठीबरोबरच कानडी, तेलुगु, उर्दू या भाषाभगिनी आनंदानं नांदतात. याला हजारो वर्षांची परंपरा आहे. इतिहास आहे. हा इतिहास इथल्या रांगड्या लोकांनी मनापासून जपलाय; त्यामुळंच सोलापूर सोडून गेलेल्यांना इथं परतण्याची ओढ लावतो. सोलापूर हे तशा अर्थानं एक मागासलेलं गांव म्हटलं पाहिजे. लातूर, बारामतीचा विकास होतो, पुण्या-मुंबईच्या धर्तीवर साऱ्या सुविधा येतात पण सोलापूरला त्या अत्यंत मंदगतीनं येतात हे मान्यच करायला हवं. इथल्या तरुणाईला आकर्षित करणारी तंत्रज्ञान इथं तसं सावकाशीनं अवतरतात. ह्या सारी सोयी-सुविधा, तंत्रज्ञानं उपलब्ध करता येईल का? याचा विचार सगळ्याच स्तरावर व्हायला हवाय. ही वेळ आता आलीय आताच आपण सावरलो नाही तर, नंतर त्याला खूप उशीर झालेला असेल!

*औद्योगिकीकरणाची गंगा अवतरली नाही*
राज्याचा विचार करता औद्योगिक विस्तार मोठ्याप्रमाणात झालाय. मुंबई-पुणे, मुंबई-ठाणे-नाशिक ही शहरे औद्योगिकीकरणामुळे एकच झाली आहेत. त्यांच्या सीमा संपुष्टात आल्यात. नागपूर, नगर, औरंगाबाद इकडं उद्योगांनी आपलं जाळं निर्माण केलंय. त्यामानानं या औद्योगिकीकरणाची गंगा सोलापुरात अवतरलीच नाही. ती का अवतरली नाही याचा मागोवा घेतला तर लक्षांत येतं की, इथं पाणी नाही, वीज नाही, दळणवळणाची साधनं नाहीत म्हणून उद्योजक इथं येण्यास नाराज असतो. ही साधनं उपलब्ध झाली तर उद्योजक इथं येऊ शकतो. त्याला विश्वास निर्माण होईल असं वातावरण तयार व्हायला हवंय.

*माहिती तंत्रज्ञान उद्योग येणं सहज शक्य*
इथं कोणते उद्योग येऊ शकतात हे पाहावं लागेल. पाण्याची असुविधा असल्यानं, आणि पाण्याबाबत आपण परावलंबी असल्यानं अशाप्रकारचे उद्योग इथं औद्योगिक वसाहती, शिवाय सरकारी सवलती असताना देखील उद्योजक फिरकले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.  म्हणजे पाण्याशिवाय जे उद्योग उभे राहतील असे उद्योग आणायला हवेत. अशा उद्योगांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाची क्षेत्रं, आय टी उद्योगात सोलापुरातील तरुण मोठ्यासंख्येनं आहेत. या क्षेत्राला पाणी लागत नसलं तरी, वीज समान दाबानं हवी असते. इंटरनेटचा स्पीड हवा असतो. तो इथं उपलब्ध होणं शक्य झालंय. इथं असलेल्या पॉवर ग्रीड सेंटरमुळं समान दाबानं वीज मिळू शकते. आता ब्रॉडबँडमुळं इंटरनेटची सुविधा देखील मिळू लागलीय.

*दळणवळणाची साधने वाढायला हवीत*
या सुविधा जरी मिळाल्या तरी उद्योजकांना दळणवळणाच्या सुविधा हव्या असतात. मुंबई-पुणे हा एक्स्प्रेस हाय वे आहे आणि आता पुणे सोलापूर महामार्ग चार पदरी झालाय. याशिवाय रेल्वेचा मार्गही दुपदरी झालाय. नाही ती केवळ विमानसेवा! सोलापूरहून मुंबईकडे जाणारा सोलापूरकर उद्योजक विमानापेक्षा रेल्वेचं बरी म्हणतो, कारण रात्री रेल्वेत बसलो की, सकाळी मुंबईत! मग हवं कशाला विमान? त्यामुळं इथं सुरू झालेली विमानसेवा बंद पडलीय. ती पूर्ववत होईल याकडं लक्ष द्यायला हवंय.

*केवळ विमानसेवेचीच कमतरता*
सोलापूर हे एक असं शहर आहे की, माहिती-तंत्रज्ञानाचे, आय टी चे उद्योग जिथं मोठ्याप्रमाणात आहेत. अशी सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई ही शहरं मुंबई पुण्याहून जाण्यासाठी सोलापूरहूनच जावं लागतं. मुंबई-पुण्यातल्या उद्योजकांना तसं सोलापूर जवळच शहर आहे. त्याच बरोबर सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई यांना देखील सोयीचं जाणार आहे. त्यामुळं या उद्योजकांना सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरू शकतं. त्यांची प्रमुख कार्यालयेही इथं सुरू करणं त्यांना सोयीचं जाऊ शकतं. हे या उद्योजकांना पटवून दिलं पाहिजे. अडचण आहे ती केवळ दळणवळणाची! विमानसेवा जर तत्परतेनं कार्यरत झाली तर या उद्योगांसाठी पायाभूत सेवा उपलब्ध होईल. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी 'स्लीपर घालणाऱ्यासाठी विमानसेवा उपलब्ध' करून देण्याची घोषणा केलीय. इथं आपल्याला तर उद्योजकांसाठी विमानसेवा हवीय!

*पर्यटन क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यायला हवं*
या माहिती-तंत्रज्ञानाच्या उद्योगाशिवाय इथल्या लोकांना सामावून घेणारा दुसरा उद्योग आहे तो म्हणजे पर्यटनाचा...! सोलापूर शहर हे तसं आध्यात्मिक शहर म्हणायला हवं. शहरात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरचं मंदिर आहे. ३६ एकर क्षेत्रफळ असलेलं एक सरोवर ज्याला सिद्धेश्वर तलाव म्हणतात. त्यांची संक्राती दरम्यान जी यात्रा असते त्याचं मार्केटींग करायला हवंय. आणखी एक आराध्य दैवत म्हणजे रुपाभवानी!  शहरात भुईकोट किल्ला आहे. सोलापूरच्या चारी दिशेला तीर्थक्षेत्रे आहेत. तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुडल संगम, अरण, मंगळवेढा अशी अनेक ठिकाण आहेत. त्याशिवाय इथं ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, अशी इतकी ठिकाणं आहेत की, त्याचं जर मार्केटिंग केलं तर इथल्या लोकांना मोठा व्यवसाय मिळेल. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची जत्रा ज्या काळात असते त्या 'संक्राती'च्या काळात असा एक उत्सव करता येईल की,  सोलापूरतून बाहेर गेलेले सारे सोलापूरकर इकडे यावेळी परततील. हा सोलापुरातला सर्वोत्कृष्ट काळ असतो. हिवाळा असतो, वातावरण आल्हाददायक असतं. स्थानिक सोलापूरकरांची एखादी समिती स्थापन करून एक उत्सव *'सोलापूर जातरा'* आयोजित करता येईल. यासाठी इथल्या हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे टुरिस्ट कार, ट्रॅक्स, बसचालक, याशिवाय इतर उद्योजक, व्यावसायिक यांना एकत्रित करता येईल. संक्रांतीच्या पांच दिवसात विविध उपक्रम राबविण्यात येऊ शकतात.

*चाकरमान्यांसाठीचा हा सर्वोत्तम काळ*
संक्रांतीच्या काळ हा वर्षारंभाचा काळ असतो. त्यामुळं हा उत्सव '२५ डिसेंबर ते १५ जानेवारी' या काळात संपन्न होऊ शकतो. वर्षाअखेरीचा आणि वर्षारंभाचा हा कालावधी, चाकरमान्यांना सुट्ट्या या काळात मिळू शकतात. ज्यांना वर्षातील सुट्ट्या संपवायच्या असतात वा नव्या वर्षातल्या रजा मिळू शकतात. मुलांना डिसेंबरच्या अखेरीस नाताळच्या सुट्ट्या असतात.यामुळं त्यांना इथं येणं सोयीस्कर ठरतं.

*इथं असं करता येणं शक्य आहे...!*
● इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी या काळात आपले दर कमी ठेवले तर पर्यटक इथं वास्तव्याला सहजपणे येतील. शिवाय जर कुणाची घर रिकामी असतील तर ती 'होम स्टे' साठी उपलब्ध करून येतील, त्यातून इथल्या नागरिकांना उत्पन्न मिळू शकेल.
● टुरिस्ट व्यावसायिकांनी छोट्या एक दिवसाच्या तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, कुडल संगम अशा तीर्थक्षेत्राच्या सहली आयोजित केल्या तर पर्यटकांना ते सहाय्यभूत ठरेल.
● या काळात संध्याकाळी नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव, मुलांसाठीचे करमणुकीचे उपक्रम आयोजित करता येईल.
● हिप्परगा तलाव व इतर तलावाच्या काठांवर गणपतीपुळे इथल्यासारखे तंबू, टेंट उभारता येतील, तिथं वास्तव्याबरोबरच नौकाविहार करता येईल.
● सोलापुरच्या खाद्यसंस्कृतीची एक वेगळी ओळख आहे. कडक भाकरी, शेंगा चटणी, मटणाचे विविधप्रकार यासाठी देखील खाद्य महोत्सव करता येईल. त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
● इथल्या चादरी, टॉवेल्स या बरोबरच बचत गटाची विविध उत्पादने यांचा एक बाजार उभा करता येईल. यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते.
● या काळात हुरडा उपलब्ध होतो त्यामुळं हुरडा पार्टीचं आयोजन करता येईल. शेतकऱ्यांसाठी एक वेगळा उद्योग मिळेल.
●इथं चित्रकलेची मोठी परंपरा आहे शुभरायांपासून सपार, द्यावरकोंडा, यल्ला-दासी, नव्या काळातले धोत्रे असे अनेकजण आहेत त्यांच्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवता येईल.
● साहित्यिकांसाठी एखादं संमेलन, ग्रंथप्रदर्शन, चर्चा-परिसंवाद आयोजित करता येईल.
●इथं चित्रकलेची मोठी परंपरा आहे शुभरायांपासून सपार, द्यावरकोंडा, यल्ला-दासी, नव्या काळातले धोत्रे असे अनेकजण आहेत त्यांच्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवता येईल.
● साहित्यिकांसाठी एखादं संमेलन, ग्रंथप्रदर्शन, चर्चा-परिसंवाद आयोजित करता येईल.

*आयटीडीसी व एमआयडीसीचे सहकार्य घेता येईल*
 अशा उपक्रमांनी 'सोलापूर जातरा' हा देशात अशाप्रकारे साजरा होणाऱ्या
अशा अनेक बाबी आहेत की, त्याचा वापर जातरासाठी करता येईल, प्रत्येक सोलापूरकरसाठी यात काही न काही सहभाग घेता येईल. व्यावसायिक, उद्योजक यांना व्यवसाय उपलब्ध होईल. वर्षभराचे उत्पन्न यावेळी होईल. यासाठी इथलं सरकारी, निमसरकारी प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका, विविध महामंडळ, व्यावसायिक, नाट्य-चित्रपट कलावंत, चित्रकार, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांना यात सहभागी करून एक समिती स्थापन करता येईल.
अशा अनेक बाबी आहेत की, त्याचा वापर जातरासाठी करता येईल, प्रत्येक सोलापूरकरसाठी यात काही न काही सहभाग घेता येईल.

*या वैभवाचंही स्मृती जागरण होईल*
याशिवाय सोलापूरच्या वैभवाच्या अनेक मानदंड आहेत. इथला भुईकोट किल्ला, पंचांगकर्ते दाते, सुंदरीवादक जाधव, लोकशाहीर रामजोशी, हरिभाई देवकरण शाळा, नॉर्थकोट शाळा, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहादूर मुळे, स्वामी रामानंद तीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद  व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, नानासाहेब चक्रदेव, बाबासाहेब वारद त्यांचे इंद्रभवन, सर अब्दुल लतीफ, व्ही.आर.कुलकर्णी, मारुती चितमपल्ली, जयकुमार पाटील, पुजारी, सरदेशमुख, बोल्ली अशी अनेकांचं स्मृती जागरण इथं यावेळी करता येईल.

*प्रामाणिक प्रयत्नांची गरज*
हे सारं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती, नागरिकांचा सहभाग हवाय! सोलापूर हे एक पर्यटन स्थळ होऊ शकेल एवढं वैभव इथं लपलं आहे, दडलं आहे ते यानिमित्तानं झालं तर पुन्हा 'सोन्नलगी' झळाळून निघेल अशी खात्री वाटते.

-हरीश केंची.
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...