Sunday 29 October 2023

NDA आणि INDIA त घुसमट !

"विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात येडीयुरप्पा यांना दूर ठेवण्यानंतर तिथं आलेला अनुभव लक्षात घेऊन भाजपने त्यातही मोदी-शहांनी आपला ताठरपणा सोडून मध्यप्रदेशात शिवराज चौहान, राजस्थानात वसुंधरा राजे, उत्तराखंडात रमण सिंह यांच्याशी तडजोड केलीय. त्यामुळं यशाचा सोपान गाठता येईल असा विश्वास निर्माण झालाय. तर दुसरीकडे India आघाडीतल्या समाजवादी पक्ष, आम् आदमी पक्ष यांच्याशी काँग्रेसचा निर्माण झालेला वितंडवाद, त्यावर काँग्रेसनं बाळगलेलं मौन यामुळं India च्या यशाचा जो फुगा फुगवला गेला होता त्याला टाचणी लागलीय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दिवसागणिक यशाचा अंदाज हेलकावे खातोय, आलेख वरखाली होतोय. यामुळं सर्वच पक्षात अस्वस्थता निर्माण झालीय. यशाची चव चाखण्याची तयारी झालेल्या सर्वच पक्षांत घुसमट वाढलीय!"
-------------------------------------
*पा* ण्याच्या खळखळाटाप्रमाणे राजकीय वास्तवाच्या लाटा सध्या उफाळून येताहेत. येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये जर काँग्रेसला मोठं यश मिळालं तर काँग्रेस पुन्हा एकदा मजबूतीनं उभी राहीलेली असेल. अशावेळी काँग्रेसच्या अधिपत्याखाली आलेल्या India आघाडीतल्या छोट्या प्रादेशिक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरलीय. त्यामुळं या सर्वच पक्षांचे हे नेते चिंतित बनलेत. जर काँग्रेस या निवडणुकांच्या माध्यमातून शक्तिशाली बनली, मजबूत झाली तर मग काँग्रेसची भूमिका आगामी काळात काय असेल? याची चिंता त्यांना लागलीय. त्यामुळं कुणाच्या अधिपत्याखाली इतर पक्षांनी यायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे भाजपतली नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही यशस्वी जोडी अधिक मजबूत होताना दिसतेय. मात्र पक्ष म्हणून भाजप कमजोर होताना दिसतोय. पण पाच राज्याच्या निवडणुकीत जर मोदी शहा ही जोडी मजबूत राहिली नाही; भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही तर पक्षातूनच त्यांना आव्हान देण्यासाठी दुसरं कुणीतरी उभं राहण्याची शक्यता निर्माण झालीय. जर असं खरंच घडलं तर देशातल्या राजकारणाची नवी समीकरणे निर्माण होण्याची चिन्हे दिसताहेत. पाच राज्याच्या निवडणुकांपूर्वीच India आघाडीतले प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या विरोधात आपला सवतासुभा उभा करताना दिसताहेत. होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या छोट्या आणि प्रादेशिक पक्षाऐवजी थेट राष्ट्रीय पक्षाच्या साथीला जाण्याची मतदारांची मानसिकताही आकार घेऊ लागलीय. काँग्रेसचे राहुल गांधी जी राजकीय खेळी खेळू इच्छिताहेत, त्यानं India आघाडीतल्या पक्षाच्या खांद्यावर बसून आगामी काळात आपला पक्ष मजबुत करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शंका इतरांना वाटतेय. या पाच राज्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंड होतानाही दिसतेय, त्या बंडाने उग्र रूप तर धारण केलं आणि ज्याची धग दिल्लीतल्या केंद्र सरकारला तर लागणार नाही ना? या साऱ्या वातावरणात एक मोठी समस्या ही देखील येऊ शकते की, २०२४ च्या निवडणुकीत सत्तेसाठी २७२ हा जादुई आकडा मोदी शहा गाठू शकले नाहीत तर, आणि पाच पन्नास खासदार कमी पडले तर तेव्हा काय स्थिती होईल? India चे सरकार अस्तित्वात तर येणार नाही ना? किंवा India आघाडीतले प्रादेशिक पक्ष, संघटना यांनी जर काही वेगळा निर्णय घेतला वा नवीन गठबंधन आघाडी तयार केली ते काय? कारण इंडिया आघाडीत आलेल्या अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी विधानसभा निवडणुकीत जाहीर केलीय. यावर मात्र काँग्रेसनं मौन पाळलंय. अखिलेश यांनी उघडपणे काँग्रेसवर टीका केलीय तर केजरीवाल यांच्या कोणत्याच क्रियेला काँग्रेस प्रतिक्रिया देताना दिसत नाही. या साऱ्या घडामोडीत ममता बॅनर्जी, नितीशकुमार काय विचार करत असतील? काय हे दोघे एकमेकाविरोधात तर नाहीत ना? दोघांचीही प्रतिमा सारखीच आहे तेव्हा आगामी काळात जर बहुमत मिळाले नाही तर India ला बहुमत मिळविण्यासाठी इतर पक्षाची मोट बांधण्याचे काम उभं राहीलं तेव्हा प्रश्न काँग्रेसचा राहणार नाहीतर India आघाडीतल्या इतर पक्षांचा राहील. अशावेळी जी चर्चा होत होती की, नितीशकुमार यांना India आघाडीचं संयोजक, निमंत्रक बनवलं जावं तेव्हा त्याला काय ममता बॅनर्जी विरोध का करत होत्या? ममता बॅनर्जी बंगालमध्ये डाव्यांना दूर सारून काँग्रेसची केवळ ४-५ जागावर बोळवण करू पाहताहेत. ही खेळी त्या का खेळताहेत? ह्या साऱ्या घडामोडीत या पुढं काय घडणार आहे त्याचे संकेत आज दिसताहेत.
पाच राज्यांच्या जिथं निवडणुका होताहेत तिथं हळूहळू बदलून जी परिस्थिती निर्माण होतेय, त्यात तेलंगणातही केसीआर आणि भाजप हे जवळ आले आहेत असं जर मतदारांच्या लक्षांत आलं तर इथंही काँग्रेस मजबुतीने आगेकूच करण्याची शक्यता आहे. देशात जवळपास १८-२० प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांच्याकडे लोकसभेच्या १५० हून अधिक जागा आहेत. दुसरीकडे काँग्रेसची स्थिती इतकी नाजुक आहे की, India आघाडीचं नेतृत्व असो नाहीतर प्रत्येक राज्यातलं त्यांचं स्थान असो. सोबत आलेले पक्ष हे बरेचसे काँग्रेसमधून निर्माण झालेले आहेत. त्यामुळं त्यांना आणि भाजपला आपल्या ताकदीवर आव्हान देण्यासाठी हळूहळू उभे राहतेय. २०२४ ला निवडणुकीनंतर काँग्रेस आणि भाजप अशा स्थितीत जर असतील की, सरकार बनविण्यासाठी या प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागेल, तेव्हा हे प्रादेशिक पक्षाचं महत्व वाढणार आहे अशावेळी ते कुणाच्या पाठीशी उभे राहतील हे पाहणं देखील महत्वाचं आहे. एक कमजोर भाजपच्या की, मोदी वजा भाजपच्या की मजबुतीकडे वाटचाल करणाऱ्या काँग्रेसच्या? जरा याच्या मुळाशी जाऊ या. १८-२० प्रादेशिक पक्ष असं जे काही आहेत त्यापैकी नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी, केसीआर हे तिघेही India आघाडीत नाहीत. ते आपण तटस्थ असल्याचे दाखवत असले तरी ते छुप्या रीतीने मोदी-भाजपच्या बाजूने आहेत. या तिघांबाबत असं म्हटलं जातं की, जे सत्तेत येतील त्यांच्या सोबत ते असतील. यानंतर विचार करू या, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, शरद पवार यापैकी ममता आणि नितीशकुमार हे अनेक वर्षे भाजप बरोबर राहिलेले आहेत. शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. त्यांची असलेली समाजवादी विचारसरणी ही त्यांना भाजपसोबत जाऊ देणार नाही. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सत्तेपासून बराच काळ दूर राहिल्याने पक्षांतर्गत काही संकट निर्माण झाली आहेत, अशा वातावरणात मोठा भाऊ म्हणून त्यांना आता वावरता येणार नाही. कारण त्यांचं सगळं राजकारण हे काँग्रेसवरच अवलंबून आहे. समाजवादी आणि काँग्रेस यांच्यात जो वाद आरंभलाय, या पार्श्वभूमीवर India आघाडी शांत राहिलीय. आता असा प्रश्न उभा राहिलाय की, भाजप विरोधातला एक मोठा मतदारांचा गठ्ठा कोणाकडे जाणार? काँग्रेसकडे जाणार की, काही वेगळा प्रयोग करत उत्तरप्रदेशात राजकारण केलं जाणार आहे? इथं काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जो वाद आहे तो बिग ब्रदर कोण आहे याचा! अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात आहे. शरद पवार हे काँग्रेसला आपल्या मार्गदर्शनानुसार राजकारण करण्यासाठी आग्रही आहेत. आपण सांगू तसं काँग्रेसनं वागावं अशी त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांची मोठी विचित्र अवस्था आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मोदी-शहा यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी शिवसेना फोडली, एवढंच नाही तर त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनाही दोन गटात विभागून टाकलं. पण ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होईल भाजपचं नेतृत्व मोदी-शहा यांच्याकडं असणार नाही आणि भाजप सत्तेच्या दिशेनं वाटचाल करत असेल तर उद्धव ठाकरे काय करणार? यानंतर तेजस्वी यादव, आरजेडीचं राजकारण भाजपच्या साथीला जाणार नाही. त्यांच्याकडे आज एकही खासदार नाहीत. हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चा देखील भाजपच्या सोबत जाणार नाही. त्यांच्याकडे केवळ एक खासदार आहे. तेजस्वी यादव, हेमंत सोरेन आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठाकरेंची ताकद मोठी आहे. त्यांच्यासोबत भावनात्मकदृष्ट्या आणि संवेदनशीलतेने लोक त्यांच्यासोबत आहेत. भले मग एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हं मिळवलं असलं तरी लोक त्यांच्यासोबत नाहीत. ठाकरे यांची ताकद हिंदुत्व, मराठी माणूस याबरोबरच शरद पवार, काँग्रेसच्या सोबतीने पुरोगामी मतदार सोबत आल्याने ती आणखी वाढलीय. मायावती आज तरी शांत आहेत. त्यांच्याकडे १० खासदार आहेत. पण गेल्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षासोबत युती केली होती. हे लक्षांत घ्यायला हवं. द्रमुकचे स्टॅलिन काँग्रेसच्या सोबतच राहतील. अकाली दल कोणत्या दिशेने जातील हे काही सांगता येणार नाहीं त्यांच्याकडे दोन खासदार आहेत. केजरीवाल यांच्याकडे एक खासदार आहे. काँग्रेसकडून दिल्ली आणि पंजाबची सत्ता हिसकावून घेतली असल्यानं काँग्रेस त्यांना थारा देत नाही. संजय सिंग यांना अटक केल्यानंतर संसदेत त्यांच्यामागे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार पाठीशी उभे राहिले. त्याच शरद पवारांना केजरीवाल भ्रष्टाचारी म्हणून आरोप करत होते.
अशी चर्चा केली जातेय की, २०२४ मध्ये भाजप विना मोदी, शहाच्या दिशेनं वाटचाल करतेय. त्यांना पर्याय म्हणून भाजपकडून दोनच नेते महत्वाचे आहेत. एक नितीन गडकरी जे संघाच्या अत्यंत जवळचे आहेत. दुसरीकडे राजनाथ सिंह आहेत. ज्यांचं सारं राजकीय जीवन हिंदी भाषिक पट्ट्यात गेलय. एवढच नाही तर ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री म्हणूनही देशाला ज्ञात आहेत. पाच राज्यातल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप समोरासमोर उभे आहेत. इथं दुसरं कुणी प्रादेशिक पक्ष नाहीत. पाच राज्यातून काँग्रेसला किती बळ मिळतं हे पाहावं लागेल. मतदारांच्या दृष्टीनं इथं या दोन मोठ्या पक्षाच्या लढतीत तिसऱ्या राजकीय पक्षाला स्थानच नाहीये. आजवर ज्या निवडणुका झाल्यात त्यात तिसऱ्या पक्षाला फारशी मतं मिळालेली नाहीत. कर्नाटकात पहा, काँग्रेसला ४२-४३ टक्के मतं मिळतात, भाजपला ३६ टक्के तर जेडीएस जी कधीकाळी सत्ताधारी होती ती केवळ १३ टक्क्यात सामावून गेली. बंगालमध्ये सीपीएमने इथं अनेक वर्षे राज्य केलं. पण त्यांना केवळ ५ टक्के मतं मिळालीत. काँग्रेस ३ टक्के मतंही मिळवू शकली नाही. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के मते मिळाली आहेत. तर भाजपला ३८ टक्के मतं मिळालीत! उत्तरप्रदेशात काँग्रेसला ज्याचं नेतृत्व प्रियांका गांधी करत होत्या, तिथं मात्र मतं मिळतात केवळ ३.२ टक्के. आरएलडी २.८ टक्के, आम् आदमी पार्टीला १ टक्केही मतं मिळाली नाहीत .२३ मतं मिळालीत. मात्र भाजप ४१.३ टक्के, समाजवादी पार्टी ३२ टक्के. बीएसपी, मायावती अगदी शांत होत्या. पण त्यांची एक विशेष व्होट बँक आहे. त्यांना १२, १३ टक्के मतं मिळणार म्हणजे मिळणारच. गुजरातमध्ये भाजप ४९ टक्के मतं घेते तर काँग्रेसला तिथं ४१ टक्के मतं मिळतात. ९० टक्के मतं या दोन पक्षाकडे आलीत मग इतरांना काय अन् किती मतं मिळालीत! यातून मतदारांचा कौल स्पष्ट होतो की, ते तिसऱ्या पक्षाला स्थान देत नाहीत. हाच तो दबाव होता जो India आघाडीला एकत्र येणं भाग पडलं. म्हणजे या साऱ्या पट्ट्यातल्या म्हणजे मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगढ, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, ओरिसा, हरियाणा, दिल्ली इथल्या १८० जागांपैकी काँग्रेसनं केवळ ८ जागा जिंकल्या आहेत. हा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. दुसरीकडे India आघाडी ज्या चार राज्यात अस्तित्वात आहे, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आणि महाराष्ट्र या चार राज्यात २१० जागा आहेत. यापैकी काँग्रेसनं केवळ ५ जागा जिंकल्यात. इथं लक्षांत घ्या की, काँग्रेस भाजपशी १८० जागेवर लढतेय तिथं ८ जागा जिंकतेय आणि आघाडीमध्ये २१० जागेवर ५ जागा जिंकतेय. म्हणजे ५४३ जागेपैकी ३९० जागेमध्ये काँग्रेसला केवळ १३ जागा मिळाल्या आहेत.
पाच राज्याच्या निवडणुकातून यात काही बदल घडेल. असं सांगितलं जातंय. पाच पैकी एक कर्नाटक काँग्रेसनं जिंकलेय. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड इथं निवडणुका होताहेत. हिमाचल प्रदेशमध्येही सरकार बनवलं गेलंय. आसामची स्थिती उत्तरपूर्व राज्यांशी जोडली जातेय. दक्षिणेचा दरवाजा भाजपसाठी बंद झालाय. उत्तरपूर्व राज्यातही अशीच स्थिती राहण्याचे संकेत आहेत. अशावेळी हिंदी पट्ट्यातून भाजप- संघ यांचं राजकारण रंगेल त्यावेळी तिथं राजनाथ सिंह दिसतील. जेव्हा भाजपला २७२ ऐवजी २२५ जागा मिळतील. तेव्हा इंडिया आघाडीतले जे महत्वाचे तीन चार पक्ष आहेत त्यात ममता बॅनर्जी यांच्याकडे २२ खासदार, नितीशकुमार यांच्याकडे १६ तर शरद पवार यांच्याकडे ४ खासदार आहेत. उद्धव ठाकरे हे मोदी-शहा यांच्या बरोबर जाणं केवळ अशक्य आहे. पण जर नितीन गडकरी यांचं नाव पुढं आलं तर ते वेगळा विचार करू शकतात. मोदींना पर्याय म्हणून ज्यांची नावं घेतली जाताहेत त्यात राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्याबरोबरच योगी आदित्यनाथ यांचंही नाव घेतलं जातंय. पण त्यांची भूमिका कधीच सर्वसमावेशक राहिलेली नाही. त्यांना बुलडोझर बाबा म्हणूनच ओळखलं जातं. त्यांच्या राज्यकारभारावर सतत टीका झालेली आहे. त्यामुळं जरी त्यांचं नावं पुढं आलं तरी त्यांना कुणीच पाठींबा देणार नाहीत. शिवाय पक्षातूनही त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी हे संघाचे अत्यंत जवळचे आहेत. सर्व पक्षात त्यांचे मधुर संबंध आहेत. त्यांचं नाव पुढं आलं तर मोठा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. मध्यभारतात, हिंदी भाषिक राज्यात राजनाथ सिंह यांचे घरोब्याचे संबंध आहेत. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते तसेच पक्षाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. त्यांनीच मोदींचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवलं होतं. सत्ता टिकवण्यासाठी कमी जागा मिळाल्या तरी खासदारांची जुळवाजुळव करताना ही नावं प्रामुख्यानं पुढं येतात. अशास्थितीत काँग्रेस India आघाडीही सत्तेसाठी प्रयत्नशील राहील. मग अशा अस्थिर स्थितीत तटस्थ राहिलेले पटनाईक, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांच्या भूमिका महत्वाच्या ठरतील. काँग्रेसला India आघाडी सोबत ठेवायला लागेल. साथीदारांची मनधरणी करावी लागेल. तरच साध्य साधता येईल. अन्यथा तेही सटकून जातील.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...